संपादने
Marathi

चामड्याच्या पादत्राणांचा महाराष्ट्रातील पहिला आणि एकमेव प्रकल्प ‘कास फुटवेअर‘

Anudnya Nikam
8th Nov 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

आपण आपल्या पोशाखाला शोभणारी चांगल्या डिझाईनची, ट्रेण्डी चप्पल किंवा शूज वापरण्याला अवश्य प्राधान्य देतो. मात्र ही चप्पल खरेदी करताना ती चांगल्या प्रतीची, पायांसाठी आरामदायक आणि आपल्या शरीरासाठी व आरोग्यासाठी हितकारक आहे का याचा विचार फारसा कोणी करित करीत नाही. नकळतपणे याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. हिलची चप्पल, पाऊलाला आरामदायी नसलेली पादत्राणे यामुळे पाठदुखी, पायदुखी तसेच प्लास्टीक चप्पलमुळे दृष्टीवर होणारा परिणाम अशा समस्या बळावतात. या समस्या टाळण्यासाठी चांगल्या दर्जाची अस्सल चामड्याची पादत्राणे वापरणे एक उत्तम उपाय आहे. महाराष्ट्रात आजवर चामड्याच्या चप्पलसाठी कोल्हापूर प्रसिद्ध समजले जायचे. मात्र प्रत्येक कोल्हापूरी म्हणवली जाणारी चप्पल आता अस्सल चामड्याची असतेच असे नाही. असे असले तरी अस्सल चामड्याची चप्पल वापरु इच्छिणाऱ्यांनी गोंधळून जायचे कारण नाही. कारण आता चामड्याच्या चप्पलसाठी महाराष्ट्रात कोल्हापूरला आणखी एक पर्याय निर्माण झाला आहे ‘कास फुटवेअर’च्या रुपात.

image


पादत्राणांच्या क्षेत्रात सिंथेटीक पादत्राणे आणि चामड्याची पादत्राणे अशा दोन प्रकारच्या पादत्राणांचे उत्पादन घेतले जाते. सिंथेटीक पादत्राणांच्या क्षेत्रात जगभरात चीन आघाडीवर आहे. तर चामड्याच्या पादत्राणांच्या उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो. असे असूनही तुलनेने चामड्याच्या पादत्राणांचे कमी उत्पादन आणि सिंथेटीक पादत्राणांच्या स्वस्त किंमती व चांगल्या डिझाईन्स यामुळे चिनी बनावटीच्या सिंथेटीक पादत्राणांचाच भारतातही सर्रास वापर होताना दिसतो. “सिंथेटीक पादत्राणे आरोग्याला अपायकारक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. म्हणूनच आरोग्याला हितकारक अशी चामड्याची पादत्राणे चांगल्या डिझाईन्समध्ये, विविध रंगांमध्ये लोकांना उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्रात चामड्याच्या पादत्राणांचा मोठा प्रकल्प सुरु करायचं आम्ही ठरवलं,” असं कास फुटवेअर इण्डस्ट्रीजचे संस्थापक राजेश कारंडे सांगतात.

image


तीन महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातील खेडच्या एसईझेडमध्ये एक एकर जागेवर हा प्रकल्प सुरु करण्यात आला असून २८ स्के. फूट जागेवर प्रकल्पाचे बांधकाम अजूनही सुरु आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरुन येथे अस्सल चामडयाची पादत्राणे तयार केली जातात. यासाठी कानपूर, चेन्नई, बांग्लादेश, बोस्नीया आणि तैवान येथून चामडे आयात केले जाते. पादत्राणांच्या वेगवेगळ्या, आकर्षक डिझाईन्स तयार करण्यासाठी कंपनीकडे स्वतःचे डिझायनर्सही आहेत.

राजेश कारंडे सांगतात, “हा प्रकल्प सुरु करताना आम्ही सामाजिक दृष्टीकोनही बाळगला आहे. आम्ही या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर देत आहोत. पादत्राणे बनविण्यासाठी करावी लागणारी शिलाई, पेस्टींगसारखी कामे महिला सहजरित्या करु शकतात असा विचार करुन आम्ही एसईझेडसाठी ज्यांची जमीन गेली आहे अशा घरातील महिलांना प्रशिक्षण दिले आणि कासमध्ये त्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला.” सध्या कास फूटवेअर इण्डस्ट्रीजमधील महिला कर्मचाऱ्यांची संख्या ९० आहे. येत्या दोन-तीन महिन्यात एकूण २०० महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे कंपनीचे लक्ष्य असल्याचे राजेश सांगतात.

मशीनवर तयार केलेल्या पादत्राणांबरोबरच इथे उपलब्ध असणारे पादत्राणांसंबंधीचे इतर पर्याय कास फुटवेअरचे वेगळेपण ठरत आहे. येथे ग्राहकांच्या मागणीनुसार हाताने बनविलेली पादत्राणेही उपलब्ध करुन दिली जात आहेत. यासाठी १० कारागिरांची वेगळी टीम काम करते. लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुट स्कॅनर मशीन वापरुन कस्टमाईज पादत्राणे बनविली जाणार आहेत. या मशीनद्वारे ग्राहकांच्या पायाचे ठसे घेऊन अचूक मापाचे मोल्ड बनविले जातील आणि त्या मापानुसार पादत्राणे बनविली जातील. ज्यांच्या पायाच्या मापाची पादत्राणे सहजरित्या बाजारात उपलब्ध होत नाहीत किंवा ज्यांना पायातील समस्येमुळे वेगळ्या पद्धतीची पादत्राणे वापरावी लागतात अशांना या सुविधेमुळे आपल्या पायाच्या अचूक मापाची, पाहिजे असलेल्या डिझाईनची, आरामदायी पादत्राणे वापरणे सहज शक्य होणार आहे. “फुट स्कॅनरच्या सहाय्याने बनविलेला ग्राहकाच्या पावलाचा मोल्ड आम्ही ग्राहकाला देणार आहोत. जेणेकरुन भविष्यात त्यांना त्याच मोल्डच्या आधारावर दुसरे चप्पल अथवा शूज बनवून घेता येतील,” असं राजेश सांगतात. देशांतर्गत बाजारपेठेत स्वस्त दरात चामड्याची पादत्राणे उपलब्ध करुन देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. यासाठीच मशीनवर बनविलेल्या शूजमध्ये टीपीआर फॅब्रिक मटेरिअलचे इनर लायनिंग वापरले जाते, जेणेकरुन ते ग्राहकांना स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यात येतील. मात्र ग्राहकांच्या मागणीनुसार बनविलेल्या हॅण्डमेड शूजमध्ये चामड्याचेच इनरलायनिंग वापरले जाते.

image


सध्या या प्रकल्पात केवळ जेण्ट्स फुटवेअरचे उत्पादन घेतले जात असून स्त्रीया आणि लहान मुलांच्या पादत्राणांचे उत्पादनही वर्षभरात सुरु केले जाणार आहे. “सध्या लहान मुलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे, डिझाईन्सचे सिंथेटीक मटेरिअलचे चप्पल आणि शूज बाजारात आले आहेत. शाळेचे शूजसुद्धा सिंथेटिक मटेरिअलचे असतात. असे शूज घालून राहणे मुलांच्या आरोग्याला अपायकारक आहे. म्हणूनच लहान मुलांचे लेदर शूजही आम्ही बाजारात आणणार आहोत,” राजेश सांगतात. इतकंच नाही तर दिवसदिवसभर बंदोबस्तासाठी उन्हात उभ्या राहणाऱ्या पोलीसांसाठीही खास चामड्याचे शूज बनविण्याचे कास फुटवेअरने निश्चित केले आहे. तसेच ओळखपत्र दाखविल्यावर त्यांना किंमतीमध्ये सुटही दिली जाणार आहे. तसेच भविष्यात पावसाळ्यात वापरण्यासाठी ‘वॉटरप्रूफ लेदर शूज’ आणि उन्हाळ्यासाठी ‘कूल शूज’ची निर्मितीही केली जाणार आहे.

सध्या येथे दिवसाला ५०० पादत्राणांचे जोड तयार केले जातात. भविष्यात ही संख्या वाढविण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. सध्या पुण्यात डेक्कन जिमखाना येथे कंपनीचे आऊटलेट सुरु असून लवकरच मोठमोठ्या मल्टीब्रॅण्ड आऊटलेट्समधून कासची पादत्राणे ग्राहकांना उपलब्ध होतील. त्याचबरोबर कासला आंतरराष्ट्रीय स्तरावरुनही विचारणा होत असून युरोपमधील काही फुटवेअर ब्रॅण्डसाठी डिझाईनचे तसेच निर्यात प्रकियेचे कामही सुरु आहे. कास फुटवेअरच्या भविष्यातील योजना पाहता लवकरच चामड्याच्या चप्पलसाठी ‘कास फुटवेअर’ महाराष्ट्राची ओळख बनेल असं म्हणायला हरकत नाही.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags