देशातील यंत्रमागाला संजीवनी देणाऱ्या पॉवरटेक्स इंडिया योजनेचा शुभारंभ

देशातील यंत्रमागाला संजीवनी देणाऱ्या पॉवरटेक्स इंडिया योजनेचा शुभारंभ

Sunday April 02, 2017,

4 min Read

देशातील यंत्रमाग क्षेत्राला संजीवनी देणाऱ्या पॉवरटेक्स इंडिया या सर्वात मोठ्या योजनेमुळे वस्त्रोद्योगाला सोन्याचे दिवस येतील, अशी आशा व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील यंत्रमागाला वीज दरातील सवलत वाढविण्यासाठी योजना आखली आहे, अशी माहिती दिली. ते यंत्रमाग उद्योगासाठी आखलेल्या पॉवरटेक्स इंडिया या देशव्यापी योजनेच्या शुभारंभप्रसंगी भिवंडी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या योजनेची वैशिष्ट्ये सांगून यामुळे या उद्योगात संपूर्ण परिवर्तन होईल असे सांगितले. 


image


वस्त्रोद्योग क्षेत्रात नवीन संशोधन-विकासाला चालना, नवीन वस्त्रोद्योग उद्याने, ब्रॅण्डिंग, विपणन, कौशल्य विकास, गुंतवणूक, विविध सवलती, कामगारांसाठी कल्याणकारी योजना आदींचा या देशव्यापी योजनेत समावेश आहे

यंत्रमाग क्षेत्राला उर्जितावस्था देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वस्त्रोद्योग विभागाने तयार केलेली ही योजना देशात नवा इतिहास रचेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, याची सुरुवात भिवंडीसारख्या पॉवरलुम कॅपिटलपासून होते आहे ही आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. फार पूर्वीपासून भिवंडीत हातमागास सुरुवात झाली, त्यानंतर पॉवरलूम सुरु झाले. आज संपूर्ण देशातील ४० टक्के पॉवरलूमचे उत्पादन एकट्या महाराष्ट्रातून होते. मेक ईन इंडियाला अनेक वर्षांपासून जिवंत ठेऊन लाखो लोकांना रोजगार देण्याचे काम ज्या क्षेत्राने केले त्याला संजीवनी देऊन पंतप्रधानांनी एक मोठे पाऊल उचलले आहे.

यंत्रमागधारकांची वीज दरात अधिक सबसिडी देण्याची मागणी आहे. यासंदर्भात सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असल्याने काही घोषणा करता येणार नाही. यापूर्वी १००० कोटींची वीज सबसिडी आमच्या सरकारने नुकतीच १५०० कोटी केली आहे. म्हणजे जवळजवळ ५० टक्के वाढ यात केली असून यासंदर्भात एका योजनेवर आम्ही काम करीत असून लवकरच त्यातील निर्णयांविषयी जाहीर करण्यात येईल.


image


यंत्रमागधारकांना सौर उर्जा वापरासाठी अधिक सबसिडी

सौर उर्जेविषयी पॉवरटेक्स इंडिया योजनेत भरीव तरतूद आणि प्रोत्साहन दिलेले आहे याचाच संदर्भ देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, यंत्रमागधारकांनी सौर उर्जेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. याच्या खर्चात पुढील २५ वर्षे तरी वाढ होणार नाही त्यामुळे एकूणच उत्पादन खर्चही कमी होईल. केंद्र सरकारने या योजनेत ५० टक्के सबसिडी दिली आहे. मात्र राज्य सरकार उर्वरित ५० टक्क्यांच्या बाबतीत अंतर्गत आणखी सबसिडी देता येते का, ते निश्चितपणे पाहील असे मुख्यमंत्र्यांनी टाळ्यांच्या गजरात सांगितले. महाराष्ट्र उर्जा विकास प्राधिकरणास देखील याबाबत आपल्याला मदत करण्याविषयी सांगण्यात येईल.

भिवंडीतील रस्ते, पार्किंगचे नियोजन हवे

भिवंडी हे हातमाग आणि यंत्रमागाचे मोठे केंद्र असल्याने याठिकाणी शहर विकास अधिक नियोजनबध्द रीतीने होणे गरजेचे आहे, येथील रस्ते अधिक चांगले हवेत, पार्किंगची व्यवस्था चांगली हवी , यादृष्टीने पालिका आयुक्तांनी नियोजन तयार करावे, यासाठी अनुदान दिले जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पॉवरलूम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत जिल्हाधिकारी यांनी देखील लक्ष घालावे तसेच सोशल सेक्युरिटीची योजना तयार करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


image


योजनेमुळे यंत्रमागात क्रांती- स्मृती इराणी

याप्रसंगी बोलतांना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, या नव्या क्रांतिकारी योजनेत आम्ही बऱ्याच नव्या आणि आवश्यक बाबींचा समवेश केला आहे. यंत्रमागाचा दर्जा वाढविताना देण्यात येणारी सबसिडी 30 टक्यांनी वाढविली आहे, ग्रुप वर्क शेड या योजनेत कामगारांसाठी विश्रांती घेण्यासाठी व राहण्यासाठी व्यवस्था असेल, आता 11 जण एकत्र येऊन यार्न बँक स्थापन करु शकतात. अशी बँक आता ज्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही अशा व्यक्ती देखील स्थापन करु शकतील. यासाठीची गॅरंटी कमी करून 25 टक्के केली आहे, यात कॉमन सर्व्हिस सेंटर्स असतील, प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज देतांना 4 टक्के इतक्या कमी व्याज दराने परतफेड करता येईल 1 लाख रुपयांचा मार्जीन मनी देखील शासन देईल. लवकरच पॉवरटेक्स चे एक मोबाईल एप काढण्यात येऊन त्यातून या योजनेची सर्व प्रकारची माहिती देण्यात येईल.

पॉवरटेक्स हेल्पलाईन

याप्रसंगी १८००२२२०१७ या पॉवरटेक्स हेल्पलाईनचे तसेच सर्वकष माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेविषयी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी व प्रचार करण्यात येणार असून त्यासाठी प्रसिद्धी रथाला देखील हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

या योजनेच्या देशव्यापी शुभारंभाचा कार्यक्रम भिवंडी येथे होत असतांना देशातील ४३ शहरांतील केंद्रांमध्ये देखील या योजनेचा शुभारंभ पार पडला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वस्त्रोद्योग मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी इचलकरंजी-कोल्हापूर, सुरत, बेंगलुरू, मालेगाव, बुऱ्हानपूर, तमिळनाडूतील इरोड अशा विविध केंद्रातील मान्यवरांशी संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांचे कौतुक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईत भव्य स्मारक व्हावे यासाठी गेल्या 15 वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत पण या स्मारकासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचे कौतुकच स्मृती इराणी यांनी केले. त्या म्हणाल्या की, केवळ तीन दिवसांत देवेंद्र फडणवीस यांनी या स्मारकासंदर्भातील अडकलेली कामे सोडविली. त्यानंतर दिल्लीहून आपण स्वत: विधिमंडळात येऊन सर्वांच्या साक्षीने सन्मानपूर्वक इंदू मिल येथील जमीन राज्य शासनाकडे हस्तांतरित केल्याची कागदपत्रे सोपविली असेही त्या म्हणाल्या.

यावेळी खासदार कपिल पाटील यांनी देखील आपले विचार मांडले. ते म्हणाले की ३ महिन्यात मंत्री स्मृती इराणी या भिवंडी येथे दोन वेळा आल्या. त्या या क्षेत्रातील कामगारांविषयी अतिशय संवेदनशील असून आम्ही या व्यवसायाला जिवंत ठेवण्यासाठी केलेल्या सर्व सूचनांचा या नव्या योजनेत समावेश आहे.