मेट्रो मार्ग-2 ब आणि मेट्रो मार्ग-4 प्रकल्पांच्या एमएमआरडीएमार्फत अंमलबजावणीस मान्यता

5th Oct 2016
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

मुंबईमधील दळणवळणाची सुविधा अधिक सक्षम, विस्तारित आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्यादृष्टीने महानगरामध्ये मेट्रोचे जाळे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यास गती देण्यासाठी मेट्रो मार्ग-2 ब (डी.एन.नगर-मंडाळे) आणि मेट्रो मार्ग-4 (वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली) या दोन मेट्रो प्रकल्पांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) अंमलबजावणी करण्यास मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

मान्यता देण्यात आलेला मेट्रो-2 ब हा मार्ग डी.एन.नगर ते मंडाळे असा 23.643 कि.मी. लांबीचा असून यादरम्यान 22 स्थानके आहेत. तसेच मेट्रो-4 हा मार्ग वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली असा 32.32 कि.मी. लांबीचा असून यादरम्यान 32 स्थानके आहेत. मेट्रो मार्ग-2 (दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द) चा भाग असलेल्या मेट्रो मार्ग टप्पा क्र-2 ब या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची एकूण किंमत 10 हजार 986 कोटी आणि मेट्रो मार्ग-4 या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची एकूण किंमत 14 हजार 549 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली. या दोन्ही मेट्रो मार्गांची अंमलबजावणी मेट्रो कायदा 2009 (सुधारित) नुसार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

image


दोन्ही प्रकल्पांची अंमलबजावणी प्राधिकरणाकडील स्वत:चा निधी आणि आंतरराष्ट्रीय, आंतर्देशीय किंवा इतर व्दिपक्षीय, बहुपक्षीय वित्तीय संस्थेकडून कर्ज सहाय्यानुसार करण्यात येईल. मात्र, त्याचे कोणतेही दायित्व किंवा जबाबदारी राज्य शासनावर येणार नाही या अटीवर एमएमआरडीएला मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांपैकी मेट्रो-2 ब साठी 3727 कोटी एमएमआरडीएकडून, 1274 कोटी शासकीय जमीन रुपाने, 1296 कोटी राज्य शासनाकडून व्याजी दुय्यम कर्ज व 4695 कोटी ADB कर्ज सहाय्य अशा प्रकारे अर्थसहाय्य उभारण्यात येणार आहे. तसेच मेट्रो-4 साठी 6940 कोटी एमएमआरडीएकडून, 1274 कोटी, 3693 कोटी राज्य शासनाकडून व्याजी दुय्यम कर्ज व 3916 कोटी कर्ज सहाय्य या सहभागानुसार प्राधिकरणातर्फे भागभांडवल पूर्ण करण्यासाठी मान्यता देण्यात आली.

दोन्ही मेट्रो मार्गाच्या प्राधिकरणाने प्रस्तावित केलेल्या खालील प्रवासी भाडे दरास मान्यता देण्यात आली.

अंतर (कि.मी.)- भाडे

        ०-३ अंतरासाठी भाडे रु १०, ३-१२ साठी रुपये २०, १२-१८ साठी रुपये ३०, १८ ते २४ साठी रुपये ४०, २४ ते ३० साठी रुपये ५०, ३०-३६ अंतरासाठी रुपये ६०, ३६-४२ साठी रुपये ७० ,तर 42 पुढील अंतरासाठी ८० रुपये दर आकारण्यात येणार आहे.

तसेच उल्लेखित केलेले भाडे मेट्रो सुरु करण्यापूर्वी वित्तीय व्यवहार्यता तपासून गरज भासल्यास त्यामध्ये आवश्यक बदल करण्याचे अधिकार वापरण्यास एमएमआरडीए किंवा प्राधिकरणास प्राधिकृत करण्यास आणि त्या प्रमाणे भाडे निश्चिती बाबतची जबाबदारी एमएमआरडीएची राहील यास मान्यता देण्यात आली.

शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सदर प्रकल्पासाठी कायमस्वरुपी आवश्यक असलेल्या जमिनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे नाममात्र दराने भाडेतत्वावर हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांतर्गत प्रकल्पबाधितांचे (PAP) पुनर्वसन व पुनर्वसाहत बहुपक्षीय, आंतरराष्ट्रीय बँक किंवा इतर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेने सहमती दर्शविल्याप्रमाणे "मुंबई नागरी परिवहन प्रकल्प पुनर्वसन व पुनर्वसाहत धोरण (MUTP -R & R Policy)" नुसार करण्याकरीता मान्यता देण्यात आली.

मेट्रो मार्ग 2 ब प्रकल्पाच्या दुरुस्ती व देखभाल डेपोसाठी मंडाळे येथील जमीन व मेट्रो मार्ग 4 प्रकल्पाकरीता दुरुस्ती व देखभाल आगारासाठी ओवाळे येथील 20 हे. व विक्रोळी येथील गोदरेजच्या ताब्यात असलेल्या 15.5 हे. जमीन वापरण्यास मान्यता देण्यात आली. तसेच उपलब्धतेनुसार व आवश्यकतेप्रमाणे इतर जमीन वापरात आवश्यक ते बदल करुन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे नाममात्र दराने भाडेतत्वावर हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच, अतिरिक्त जमीन प्रकल्पासाठी निधी उभारण्याच्या दृष्टीने रहिवासी/वाणिज्यिक विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे नाममात्र दराने हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली.

हे दोन्ही मेट्रो प्रकल्प "निकडीचे सार्वजनिक प्रकल्प" व "महत्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प" म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. या दोन्ही मेट्रो मार्ग प्रकल्पाकरीता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास "विशेष नियोजन प्राधिकरण" म्हणून नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली. मेट्रो प्रकल्प 2 अ, 2-ब, 7 आणि मेट्रो मार्ग-4 करीता मुंबई महानगर प्रदेशात प्रवाशांच्या सोयीसाठी प्राधिकरणामार्फत एकात्मिक तिकिटीकरण पद्धती (ITS) सुरू करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांसाठी इतर मेट्रोप्रमाणे केंद्र शासनाचा निधी प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्यास मान्यता देण्यात आली.

Want to make your startup journey smooth? YS Education brings a comprehensive Funding and Startup Course. Learn from India's top investors and entrepreneurs. Click here to know more.

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close