संपादने
Marathi

'परिणाम': गरीबीचा अंधकार दूर करणारी पणती

जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ॥ १ ॥ तोचि साधू वोळखावा । देव तेथेचि जाणावा ॥ २ ॥ संत तुकाराम महाराजांचा हा अभंग परिणाम या स्वयंसेवी संस्थेला अगदी तंतोतंत लागू होतो. गरीबीच्या गाळात रुतलेल्या समाजातल्या एका मोठ्या वर्गाला बाहेर काढण्याचं काम परिणाम या संस्थेनं केलं. त्यांचे गरीबी दूर करण्याचे कार्यक्रम जितके कल्पक, नाविण्यपूर्ण आहेत तितकेच ते सकारात्मक परिणाम देणारे सिद्ध झाले. संस्थेनं केलेलं काम लक्षात घेता संस्थेनं आपलं नाव आपल्या कामाच्या परिणामाद्वारे सार्थक करून दाखवल्याची खात्री पटते. अपार करूणा असणा-य़ा या कल्याणमित्र संस्थेबद्दल आणि ती चालवणा-या समर्थ आणि कणवाळू मल्लिका घोष यांच्याबद्दल आपल्याला माहिती असलीच पाहिजे. याच कार्याचा हा गोषवारा.

sunil tambe
26th Aug 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

एक सुंदर आणि काहीसा अगडबंब असा टेबल दिसतोय. त्यावर पेपरचे ढीग रचले आहेत. जुन्या काळातल्या जतन केलेल्या पुरातन मौल्यवान वस्तूंनी हा टेबल सजलेला आहे आणि मल्लिका घोष या टेबलच्या मागे बसलेल्या आहेत. मुलाखत घेण्यासाठी मी आत प्रवेश केला आणि मला हा नजारा दिसला. ‘परिणाम’ च्या संस्थापिका आणि मल्लिकांच्या आई, एलेनी घोष यांनी हा टेबल बनवला होता. मुलाखती दरम्यान बोलताना त्यांनी मला ही माहिती दिली. एलेनी नोव्हेंबर 2013 या दिवशी हे जग सोडून गेल्या. पूर्वी ‘परिणाम’ ही संस्था दोघी डायनॅमिक मायलेकी एकत्र मिळून चालवत होत्या. आता मल्लिका एकट्याच परिणामचं काम बघतात. आईच्या पश्चात परिणामच्या कामानं मलिका काहीशा नाऊमेद झाल्याचं त्या मान्य करतात, पण त्या आपल्या कामावर खूप प्रेम करत असल्यामुळं याची त्या पर्वा करत नाहीत. 


समाजकार्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून देण्यापूर्वी मल्लिका घोष इंग्लंडमध्ये बोर्डींग स्कूल, अमेरिकेतल्या विद्यापीठात जात असत आणि त्यांनी मॅक्कन्न एरिक्सनमध्ये दक्षिण भारत चित्रपटाच्या प्रमुख म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यांचे वडिल, स्मित घोष हे ‘उज्जीवन’ या नावाजलेल्या मायक्रोफायनान्स संस्थेचे संस्थापक होते. या संस्थेची स्थापना 2005 साली झाली होती. केवळ आर्थिक मदतीनं गरीबी दूर होऊ शकत नाही ही ‘परिणाम’ स्थापन करण्यामागची कल्पना होती. गरीबीचं अस्तित्व हे अनेकांगी असतं. आर्थिक मदतीसोबत परिणामकारक सामाजिक आधार देणारे आरोग्य, शिक्षण, रोजगार, समूह विकास हे महत्वाचे घटक गरीबी दूर करण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. आणि या सर्व घटकांचा विचार करून ‘परिणाम’ ही संस्था सर्वांगिण दृष्टीकोन ठेवून सेवा देत आहे. परिणामच्या या प्रयत्नांमुळे परिणामकारक असा सामाजिक आधार तयार झाला आणि परिणामचं हे पाऊल गरीबी दूर करण्यासाठी प्रभावी सिद्ध झालं. तेव्हा पासून परिणामने मोठा प्रवास केलेला आहे आणि ही संस्था उज्जीवन संस्थेच्या ग्राहकापुर्ती मर्यादित न राहत त्यापलिकडे जाऊन मोठ्या प्रमाणात विस्तार केलेला आहे.

विशेषत: त्यांचा प्रमुख कार्यकम असलेला अल्ट्रा पुअर प्रोग्रॅम हा शहरी गरीब वर्गावर लक्ष केंद्रीत करणारा कार्यक्रम आहे: असा अत्यंत गरीब लोकांचा वर्ग, ज्या वर्गाची अल्पपतपुरवठा करण्याइतपतही पात्रता नाही.

डोळ्यात तरळली स्वप्नं

डोळ्यात तरळली स्वप्नंपूर्णवेळ समाजकार्य करता यावं म्हणून यशस्वी कॉर्पोरेट कारकीर्द धुडकावली


त्या नंतर ज्या प्रकारचं मी काम करत होते त्या कामानं माझा काहीसा भ्रमनिरास केला. माझ्या आईवडिलांनी ‘परिणाम’ आणि ‘उज्जीवन’ या संस्था सुरू केल्या. इथं आम्ही तीन सेकंदांच्या जाहीरातींवर लाखो आणि करोडो रुपये खर्च करत होतो. आणि असं असूनही गोष्टी जशा दिसायला हव्यात तशा त्या अजिबात दिसत नाहीत, अशा प्रकारे क्लायंट्स आम्हाला पावलोपावली सुनावत होते. जेव्हा मी घरी जायचे तेव्हा महिलांबाबतचा आईबाबांचा संवाद ऐकायचे. ते ज्या महिलांना मदत करायचे त्या महिलांबद्दल, ज्या मुलांना ते शिक्षण द्यायचे त्यांच्या बद्दल, त्यांच्या आरोग्यातल्या प्रगतीबाबत, ते स्थापन करू पाहत असलेल्या त्यांच्या आर्थिक साक्षरतेच्या कार्यक्रमाबाबत आणि ते ज्या ज्या प्रकारचे सार्वजनिक सामाजिक कार्य करत असत त्या बद्दल त्यांच्या चर्चा चालायच्या. तुलनेनं सर्व लहान वाटायचं. मी काही फील्ड व्हिजीटला जायचे आणि जो सकारात्मक बदल घडत होता तो मी सतत पाहायचे. मला नेहमी लहान मुलं आवडायची. माझं पहिलं प्रेम म्हणजे लहान मुलं, नंतर प्राणी. मला प्राणीही फार आवडतात. म्हणून मी माझ्या कॉर्पोरेट कारकिर्दीला रामराम ठोकला.

माझी पहिली निवड ‘उज्जीवन’ किंवा ‘परिणाम’ कधीच नव्हती. मुलांसोबत काम करणं हीच माझी पहिली निवड होती. मी दोन आठवडे नर्सरी स्कूलला गेले, पण न बदलणा-या अभ्यासक्रमामुळे लवकरच कंटाळले. याबरोबर मला असं ही वाटत होतं की मी यामध्ये फारशी उपयुक्त भर टाकत नव्हते. मग मी मुलांसाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्थांबाबत संशोधन केलं. पण मला कोणतीही संस्था आवडली नाही. मग माझ्या वडिलांनी मला सांगितलं की, तुझ्या आईनं जी संस्था स्थापन केलेली आहे, त्या संस्थेबद्दल का विचार करत नाहीस. त्यानंतर माझ्या आईनं मला इंटर्न म्हणून काम करावयास सांगितले. माझी इच्छा होती की आईनं मला संस्थेची सल्लागार म्हणून बोलवावं. कारण माझा कामाचा एकूण अनुभव सात वर्षांचा होता. मी आईसोबत तीन महिने काम केलं. मी या कामात रमू शकेन असे चांगले प्रोजेक्ट तीनं मला दिले. आर्थिक साक्षरता कार्यक्रमाची पथदर्शी संकल्पना तयार करण्याच्या प्रकल्पावर मी काम केलं.

मी मुलांवर किती प्रेम करते याची कल्पना असल्यानं माझ्या आईनं मला पहिलं उन्हाळी शिबिर (समर कँप) हाताळायला सांगितलं. त्यानंतर मी या कामाशी बांधले गेले. मला त्या जाहिरातीच्या कामाकडं मुळीच परत जायचं नव्हतं. मला काहीतरी अर्थपूर्ण करायचं होतं.


‘परिणाम’ कशी टिकली ?


कलम 25 नुसार नोंद करण्यात आलेली ‘परिणाम’ ही स्वयंसेवी संस्था आहे. आम्ही अनुदान आणि फंडींगवर काम करतो, नेमक्या सांगायच्या झाल्या तर एकूण चार. मिशेल आणि सुसान डेल फाऊंडेशन, सिटी फाऊंडेशन, एचएसबीसी बँक आणि परोपकारी, दयाळू प्रवृत्तीच्या व्यक्ती हे आमचे मुख्य दाते आहेत. एक स्वयंसेवी संस्था म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही चांगला नावलौकिक मिळवलेला आहे. सुरूवातीपासूनच मी आमच्या आर्थिक व्यवहाराबाबत कडक धोरणं राबवलेलं आहे. निधी आणि अनुदानाचा जास्तीत जास्त भाग हा लाभार्थींवर खर्च झाला पाहिजे, तर प्रशासकीय कामावर कमीत कमी रक्कम वापरली गेली पाहिजे ही माझी नीती आहे.

फी च्या रुपानं किंवा आणखी कोणत्याही रूपात आम्ही आमच्या लाभार्थ्यांकडून काहीही पैसे घेत नाही. आमची सिस्टर ऑर्गनायझेशन असलेल्या उज्जीवनचे आम्ही भागीदार आहोत. उज्जीवन आम्हाला कोणत्याही प्रकारचा निधी किंवा पैसा देत नसली तरी आमच्या कामासाठी त्यांच्या विविध विभागांची आणि उज्जीवनच्या लोकांची आम्हाला मदत होत असते. आम्हाला जरी अनुदान मिऴत नसलं तरी आम्ही दर्जेदार काम करत असल्यानं आम्हाला या ना त्या स्वरूपात मदत मिऴत होती. यामुळे आमचं काम चालत राहणार आणि आमच्या संबंधात काहीही फरक पडणार नाही याची आम्हाला खात्री होती.


आव्हानं आणि अडथळ्याची शर्यत


सुरूवातीचे सर्व अडथळे हे संस्थेच्या नोंदणीच्या कामाशी संबंधित होते. एफसीआरए ( Foreign Contribution Regulation Act) मिळवणं ही आमच्यासाठी एक फारच मोठी गोष्ट ठरली होती. कारण ते मिळवण्यासाठी आमच्याकडं मोठी लाच मागितली गेली. पण आपल्या संपूर्ण आयुष्य़ात आईनं कधीही कोणाला लाच दिली नाही. यामुळं आम्हाला एफसीआरए मिळवण्यासाठी तब्बल तीन वर्षं खर्ची घालावी लागली.

या अशा परिस्थितीमुळं कार्यालय थाटणं हे आमच्यासाठी खूपच कठीण होतं. मी सल्लागार म्हणून परिणाममध्ये रुजू झाले. सहा महिन्यानंतर आईनं गेली चार वर्षं ती जे संस्थेचं कामं करत होती तीच कामं मला हाताळायला सांगितली. फायनान्स, अहवाल तयार करणं, अनुदान मिळवणं, प्रस्ताव या सगळ्या गोष्टींवर आम्ही एकत्र काम केलं. जेव्हा मी पहिल्यांदा इथं रूजू झाले तेव्हा आम्ही केवळ आरोग्य शिबिरं आणि काही शैक्षणिक कार्यक्रम राबवत असू. आता आम्ही उन्हाळी शिबिरं, आर्थिक साक्षरता कार्यक्रम असे शंभर ते तीस हजार ग्राहक संख्या असलेले मोठे कार्यक्रम राबवतो.

या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही पन्नास हजार बँकेची खाती उघडली आहेत. सुरूवातीला आम्ही आमचा अर्बन अल्ट्रा पुअर कार्यक्रम 30 कुटुंबांपासून सुरू केला होता. तोच आता तब्बल 700 कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे. मी या अभूतपूर्व विकासाचा एक भाग राहिलेले आहे. 

यशाला खेचून आणलं तर ते आपल्याकडं येतं

यशाला खेचून आणलं तर ते आपल्याकडं येतं


नोव्हेंबरमध्ये 2013 मध्ये जेव्हा माझ्या आईचा मृत्यू झाला तेव्हा आमच्यासमोर ही कामं पुढे चालवण्याचं आव्हान निर्माण झालं. त्यानंतर ही सगळी कामं मला माझ्या हातात घ्यावी लागली. पण तिच्या जागी राहून या जबाबदा-या पार पाडणं ही खूपच कठीण गोष्ट होती. आर्थिक बाजू पाहणं, मदतनिधी पुरवठा करणार्यांशी बोलणं, अनुदानं आणि देणग्या मिळवणं या गोष्टी जराही सोप्या नव्हत्या. साडेचार वर्षं आम्ही टीम म्हणूनच काम केलं. आता, माझ्याकडे उत्तम कर्मचारी वर्ग आहे, स्वतंत्रपणे काम करण्यास समर्थ आहे.

जेव्हा आपण नवीन काम सुरू करतो तेव्हा आपल्याला मोठ्या कठीण आव्हानांना तोंड द्यावं लागतं हे ओघानं आलच. ते आव्हान किती मोठं आहे यावरच ते किती काळात आपण परतवून लावू शकतो हे ठरत असतं. पण शेवटी ही आव्हानं नेमकी असताता कशी आणि आपल्यावर ते कशा प्रकारचा प्रभाव पाडतात हे लक्षात आलं की मग आपण अधिक मजबूत आणि सक्षम बनतो. मी तर आव्हानांना अशा प्रकारेच सामोरं जाते.


दीक्षा: परिणामचा आर्थिक साक्षरता कार्यक्रम


आर्थिक साक्षरता हे दुसरं तिसरं काही नसून पैशाबाबतचं मुलभूत प्रशिक्षण आहे. बँकेचं खातं उघडणं, बचत करणं अशा सगळ्या गोष्टी ज्या आपले पालक सर्वसाधारणपणे आपल्या मुलांना शिकवत असतात अशाच गोष्टींचा या प्रशिक्षणात समावेश आहे. लोकांना आम्ही मुलभूत गोष्टी तर शिकवल्याच पण इतक्यावरच न थांबता आम्ही त्यांना व्यावहारिक गोष्टी शिकवल्या आणि मला वाटतं की दीक्षाला इतकं मोठं यश मिळण्यामागचं हेच कारण आहे.

लहान असताना आपले पालक जेव्हा आपल्याला पॉकेटमनी द्यायचे तेव्हाच आपण या सगळ्या गोष्टी शिकलो आहोत. आपल्याला जेव्हा एखादी वस्तू विकत घ्यायची असायची तेव्हा आपले आईबाबा आपल्याला दिलेला पैसा जमा करा असं सांगत असत. अशा प्रकारे आपण बचत करायला शिकलो. मला आठवतय, जेव्हा मी पहिल्यांदा माझे बचत खाते उघडले , तेव्हा मी काहीशी घाबरलेले होत. मी एक सुशिक्षित व्यक्ती आहे, मी इंग्लंडच्या बोर्डिंग स्कूलमध्ये गेले आहे. मला अजूनही आठवतय मी एका मोठ्या काचेच्या इमारतीत गेले आणि जेव्हा माझ्याकडं कागदपत्रं मागितली गेली, तेव्हा मी घाबरले होते. तेव्हा माझ्या आईला बँकेत येऊन मला शिकवावं लागलं होतं. जेव्हा पहिल्यांदा मला माझं एटीएम कार्ड मिळालं, तेव्हा एटीएम मशीनमध्ये जाऊन प्रत्यक्ष पैसे काढण्याचं धाडस करायला मला चक्क एक महिना लागला होता. अशा अडखळत चालण्याच्या दिवसात तुमचे पालक तुम्हाला शिकवतात, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतात. पण अत्यंत गरीबीत जीवन जगणा-या, झोपडपट्टीत राहणा-या लोकांकडे पैशाबाबत असा दृष्टीकोन कधीच नसतो.

त्यांना नियमीत पैसा मिळतो असं नाही, आणि म्हणून ते सेविंग करत नाहीत, शिवाय जगण्याच्या आवश्यक त्या गरजा भागवण्या व्यतिरिक्त ते इतर कोणत्याही कामासाठी पैसा बाजूला काढून ठेवत नाहीत. आम्ही त्यांना अतिशय सोप असं आकड्यांचं कौशल्य शिकवतो, आपल्या खर्चावर सतत लक्ष कसं ठेवायचं हे त्यांना शिकवतो, शिवाय महत्त्वाचं म्हणजे आपल्या कमाई नुसारच उसनवारी किंवा कर्जाऊ पैसा घ्यायचा हेही त्यांना आम्ही शिकवतो. अत्यंत गरीब माणसासाठी कर्ज म्हणजे प्राणघातक असा सापळाच आहे. आज आम्ही देशातल्या सोळा राज्यामध्ये काम करतो आहोत, आणि हजारो ग्राहकांना आम्ही व्यावहारिक स्वरूपाचं वित्त व्यवस्थापन प्रशिक्षण दिलेलं आहे.


अल्ट्रा पुअर कार्यक्रम


'अल्ट्रा पुअर कार्यक्रम' हा माझ्या आईच्या डोक्यातून आलेली अभिनव संकल्पना आहे. अनेक प्रकारची कौशल्यं असलेली ती एक प्रतिभावान महिला होती. लग्न होण्यापुर्वी तिनं इंग्रजी आणि मानसशास्त्राचा अभ्यास केला. नंतर पुढं तिनं सिटी बँकेत आर्थिक विश्लेषक म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली. लग्न झाल्यानंतर मग तिने नोकरीतून ब्रेक घेतला. नंतर 1996 मध्ये आम्ही मध्य पूर्व देशातून ( आखातातून) भारतात परतलो.

माझ्या आईवडिलांनी बंगळुरूमध्ये थोडी जमीन विकत घेतली. आईला तिथं घर बांधायचं होतं. घर बांधणीच्या कामावर देखरेख करत असताना तिच्या एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे कंत्राटदार कशा पद्धतीने कामगारांचं शोषण करत होत. जेव्हा तिनं परिणामची स्थापना केली त्यावेळी अत्यंत गरीब असलेल्या या कामगारांवरच तिनं आपलं लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं. हे लोक इतके गरीब असतात, की ते अल्पपत पुरवठा करण्याइतपत सुद्धा पात्र नसतात. त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची असते. त्यांचं दरडोई उत्पन्न हे महिना हजार पाचशे रूपयांपेक्षाही कमी असतं. त्यांच्या झोपड्यांना वीजही नसते आणि पाणीही नसतं. आपल्या काही झोपडपट्ट्यांमधले लोक आजुबाजूच्या इमारतींमध्ये पाणी मागायला जातात. मुलं तर अनवाणी पायांनीच शाळेत जातात. जेव्हा आम्ही पहिल्यांदा झोपडपट्टीत गेलो आणि विचारलं की मुलं शाळेत का जात नाहीत, तर त्यांच्या पालकांनी उत्तर दिलं, “ त्यांनी का शाळेत जावं?” मग आम्ही इतर पुष्कळ अल्ट्रा पुअर कार्यक्रमाबाबत संशोधन केलं.

त्यांपैकी बरेच ग्रामीण लोकसंख्येवर आधारित होते. या गरीब लोकांचं जीवनमान उंचावण्यावर आम्ही आमचं लक्ष केंद्रीत केलं. तर शहरी गरीब लोकांच्या रोजगारावर लक्ष केंद्रीत करून त्यांना अल्पपत पुरवठा करता यावा इतकं पात्र बनवण्याचे आम्ही प्रयत्न सुरू केले. कुटुंबाला घटक मानून त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणारा हा कार्यक्रम अशा पद्धतीचा पहिलाच कार्यक्रम होता. कुटुंबाच्या पालकांना घरकाम, भाजी विक्री आणि शिवणकामासारखी कामं उपलब्ध करून देण्यावर आम्ही आमचं लक्ष केंद्रीत केलं. जेव्हा पैसा हवा तेव्हाच काम करायचं, अशा पद्धतीनं काम न करता आठवड्यातून सलग सहा ते सात दिवस ते काम करतात का याची आम्ही खात्री करून घेतली. मुलांना शाळेत पाठवणे ही आमची प्राथमिकता होती. त्यांच्या रोजगारामध्ये हस्तक्षेप करून आलटून पालटून त्यांना आर्थिक नियोजनाचं प्रशिक्षणही देण्यात आलं. आपलं आर्थिक नियोजन कसं करायचं याचं आकलन त्यांना झाल्यामुळे त्यांचं रहाणीमान झपाट्यानं सुधारलं. कधी आजारी पडलं किंवा काही अपघात झाला तर त्यांच्या पैकी ब-याच लोकांना स्वस्त किंवा नि:शुल्क आरोग्य सेवा कशी घ्यायची याबाबत जागृती निर्माण झाली होती खरी, परंतु ती मिळवायची कशी याबाबतची माहिती झालेली नव्हती.

दवाखान्यात जाऊन आपण कष्टानं जमा केलेली कमाई डॉक्टरांच्या खिशात जाऊ नये म्हणून आम्ही त्यांच्या वसाहतींनध्ये जाऊन याबाबत त्यांच्यात जागृती घडवून आणली.

प्रतिभेला मिळाला वाव

प्रतिभेला मिळाला वाव


दरिद्रीनारायण असलेल्या लोकांकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रं , ओळखपत्रं, राहण्याचा पुरावा किंवा जन्म दाखला अशी कागदपत्रं नसतातच. त्यांना ही सगळी महत्त्वाची कागदपत्रं मिळावीत यासाठी आम्ही काम केलं. आमच्या लक्षात आलं की गरीबीनं गांजलेल्या या लोकांच्या कुटुंबात अभ्यासात हुशार मुलं सुद्धा आहेत. पण सोईसुविधा नसल्यानं त्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण घेता येत नाही. म्हणून मग त्यांच्यासाठी आम्ही शिकवणी वर्ग सुरु केले. सुरूवातीला आमच्या शैक्षणिक उपक्रमात आपल्या मुलांनी जावं आणि शिकावं याला पालकांनी विरोध दर्शवला. पण जसं मुलं घरी जाऊन उत्साहात ए बी सी डी चे पाठ म्हणायला लागली, तसं पालकांना सुद्धा शिक्षणाच्याप्रति उत्साह निर्माण व्हायला लागला. आमच्या शिकवणी वर्गात प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना मग आम्ही क्रिस्टल हाऊस, इंडस कम्युनिटी स्कूल, होप फाऊंडेशन आणि बिल्डिंग ब्लॉक शाळेत प्रवेश मिळवून दिला.

या सगळ्या शाळा उत्तम होत्या. या शाळांनी विद्यार्थ्यांना वर्गात लॅपटॉप पुरवले होते. शिवाय पोहणे, घोड्यावर बसून रपेट करणं ( अश्वारोहण) आणि इतर आकर्षक सोईसुविधा देखील पुरवल्या होत्या. अत्यंत कमी फी आकारून या शाळा गरीबातल्या गरीब मुलांना शिक्षण देण्याचं काम करतात. पण अशा शाळा देखील या गरीब पालकांना परवडत नाहीत. मग आम्ही प्रायोजक म्हणून एक एक दाता व्यक्ती मिळवला आणि एका एका मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. एखाद्या गरजू मुलाला शिक्षणासाठी मदत करणं पुष्कळ लोकांना आवडतं. त्यामुळेच अनेक व्यक्ती अशा कामासाठी पुढे आल्या आणि निधी उभा करून त्यांनी आम्हाला चांगला हात दिला. माझी आई नेहमी म्हणायची की, आपण गरीबांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो, त्यांच्या आर्थिक साक्षरतेसाठी त्यांना मदत करू शकतो, पण शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे जी अशा गरीब लोकांना आपल्या दुखातून बाहेर काढून त्यांना मध्यमवर्गात येण्यासाठी सहाय्यक ठरू शकते. 

पहिल्याच वर्षी आमच्याकडं सतरा मुलं होती. पुढल्या वर्षी ही संख्या 120 वर गेली. आणि यावर्षी ही संख्या आणखी वाढलेली आहे. अल्ट्रा पुअर कार्यक्रम हा एकूण 12 महिने राबवण्याचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात गरीब कुटुंबांनी रस घेऊन सहभागी व्हावं म्हणून आम्ही मित्रत्वाचे संबंध बनवले आणि सलगीनं गरीब कुटुंबांना आपलसं केलं आहे. त्यांची होत असलेली प्रगती आम्ही पहात आहोत. त्यांची मुलं चांगल्या प्रकारे शाळेत जात आहेत आणि शिकत आहेत. आम्ही त्यांच्या आयुष्यात असा सकारात्मक बदल घडवू शकलो हे पाहून आम्हाला मनापासून आनंद होतो आहे. अत्यंत गरीब असलेल्या या अल्ट्रा पुअर झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छतेबाबत जराही जागरूकता नाही ही अत्यंत चिंताजनक आणि भीतीदायक अशी गोष्ट आहे. हे लक्षात घेऊन आम्ही स्वच्छतेविषयी व्यापक असा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. पण हे करत असताना दिखाऊपणासाठी याचा गाजावाजा होणार नाही याची काळजी आम्ही घेतली. 

त्यांची दिवाळी वीजेविनाच जाणार या परिस्थितीची जेव्हा आम्हाला जाणीव झाली त्यावेळी आम्ही त्यांच्यासाठी दिवाळी मोहीम आयोजित केली, आणि त्या माध्यमातून त्यांच्यासाठी सोलार लॅम्प्स मिळवून दिले. हेच या कार्यक्रमाचं सौंदर्य आहे. गरीबांसाठी काम करत असताना प्रत्येक दिवशी आम्हाला नव्या नव्या समस्या दिसतात आणि आम्ही त्या समस्या दूर करण्यासाठी नाविण्यपूर्ण, कल्पक आणि प्रभावी मार्ग शोधण्याचा सतत प्रयत्न करत आहोत.


असा जिंकला पहिला पुरस्कार


आई आणि मी, आम्ही दोघीही पुरस्कारासाठी अर्ज करणं टाळत आलो होतो कारण पुरस्कार ही काही आपली गोष्ट नाही असा आम्ही विचार करत होतो. आम्ही असा विचार करायचो की, जर आपण चांगली कामं करण्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं तर चांगल्या गोष्टी आपल्याकडं चालत येतीलच. नंतर पुढे कुणीतरी माझ्याकडे फायनान्शियल टाईम्स आणि सिटी बँक इंजन्यूईटी पुरस्कारासाठीचे अर्ज पाठवले आणि मी गम्मत म्हणून पुरस्कारासाठी अर्ज भरले आणि पाठवून मोकळी झाले. तसं पाहिलं तर ते पुरस्कार स्वयंसेवी संस्थांसाठी नव्हतेच. शहराचं जीवनमान उंचावण्यासाठी कल्पकतेनं तयार करण्यात आलेल्या शहरी कार्यक्रमांसाठी ते बक्षीस देण्यात येणार होते. सुरूवातीला मी आर्थिक साक्षरता या कार्यक्रमासाठी अर्ज भरत होते, पण नंतर मी विचार केला की, अल्ट्रा पुअर कार्यक्रमासाठी अर्ज केला तर अधिक चांगलं होईल. कारण हा कार्यक्रम अतिशय नाविण्यपूर्ण असा होता. पुरस्कारासाठी आमची निवड करण्यात आली आणि आम्ही एशिया पॅसिफिक पुरस्कार पटकावला.

आम्हाला पुरस्कार प्राप्त झाल्याच्या बातम्या वर्तमान पत्रांमध्ये झळकल्या आणि आम्ही करत असलेल्या कामाबद्दल सर्वांकडून आमचं अभूतपूर्व कौतूक झालं. ‘परिणाम’ ही संस्था 2009 ला सुरू झाली. यापुर्वी आम्ही कधीही पुरस्कारासाठी अर्ज केला नव्हता. याचं कारण म्हणजे एक तर आम्ही लहान होतो आणि आम्ही आमचं स्थान शोधत होतो. अल्ट्रा पुअर कार्यक्रम हा एक विस्मयकारक असा कार्यक्रम आहे, पण तो तयार करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. आता पर्यंत आम्ही केवळ 700 कुटुं बांसोबत काम केलं आहे. आमच्या या कार्याचा निश्चित असा दूरगामी परिणाम दिसण्यासाठी वेळ लागेल. आता आम्ही आमचा एक मार्ग तयार करून ठेवला आहे. आम्ही अशा अनेक संधीचा फायदा घेण्यासाठी अर्ज करत राहणार आहोत.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

Latest Stories

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा