संपादने
Marathi

गुंगा पहलवान: मूक साक्षीदार, सरकारी अनास्थेचा !

मुका फिर्यादी, बहिरा राजा आणि आंधळी न्यायदेवता, तर तुम्हीच सांगा … अन्याय कसा संपावा ?

Jyotibala Bhaskar Gangurde
2nd Sep 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

एका देशी आखाड्यात, धूळ मातीने मढलेल्या शरीराचा वीरेंद्र सिंग आपली तीक्ष्ण चमकदार नजर त्याच्या दणकट प्रतिस्पर्ध्यावर रोखून धरत; त्याच्याभोवती हळुवार पावलाने फेर धरत होता, आणि अचानक आश्चर्यकारक चपळाईने त्या महाकाय प्रतिस्पर्ध्याला जाऊन थेट भिडला. थोड्याच वेळात वीरेंद्र सिंगने काही कुशल डावपेचांच्या जोरावर आपल्यापेक्षा अंगापिंडाने मोठ्या असलेल्या प्रतिस्पर्ध्याला चारीमुंड्या चीत केलं आणि प्रेक्षकांनी उस्फुर्तपणे एका सुरात मोठा हर्षनाद केला. पण वीरेंद्र सिंग मात्र त्याच्यासाठी होणारा हा जयघोष ना ऐकू शकत होता, ना त्या शाबासकीचा वर्षाव करणाऱ्या प्रेक्षकांना धन्यवाद देऊ शकत होता. तो फक्त चेहऱ्यावर मनसोक्त हास्य ठेवून प्रेक्षकांच्या प्रेमाचा स्वीकार करत होता.

ह्या गोष्टीवर विश्वास ठेवावासा वाटत नव्हता की हा २८ वर्षीय गुणी, तरुण पहलवान मूक-बधिर आहे.

पण खेळ प्रेमींसाठी वीरेंद्रच्या वरील विजयामागील कटू सत्य जास्त त्रासदायक आहे आणि ते म्हणजे हा विजय त्याने अशा एका स्पर्धेत मिळवला होता जी 'देसी दंगल' म्हणून ओळखली जाते व जेथे स्पर्धक केवळ चरितार्थ चालवण्यासाठी पैसे कमावायला आपला कस पणाला लावतात.

त्याची शारिरीक कमतरता त्याला ५ आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ५ वेळा सुवर्णपदक मिळवण्यापासून रोखू शकली नाही, ज्यात २००५ सालच्या मेलबोर्न येथे झालेल्या डिफलीम्पीक्स (Deaflympics) मध्ये जिंकलेल्या भारताच्या पहिल्या सुवर्णपदकाचा सुद्धा समावेश आहे. डिफलीम्पीक्स (Deaflympics) मधील अजून एक सुवर्णपदक त्याने २०१३ मध्ये बल्गेरिया येथे जिंकले होते.

ही डोळे दिपवणारी कामगिरी आहे अशा एका मुकबधीर तरुणाची ज्याला देश 'गुंगा पहलवान' म्हणून ओळखतो. दुर्देवाने ही कामगिरी अशा देशासाठी केली गेलीये जिथे 'खेळ' हा समाजजीवनातील सगळ्यात दुर्लक्षित भाग आहे.


वीरेंद्र सिंग - डोळस न्यायाची मूक प्रतिक्षा

वीरेंद्र सिंग - डोळस न्यायाची मूक प्रतिक्षा


छत्रसाल स्टेडियम, जिथून भारतातील जास्तीत जास्त पहलवान आॅलिम्पिकसाठी तयार होतात, जिथून आपला स्टार कुस्तीयोधा सुशील कुमार भारताला मिळाला. तिथेचं वीरेंद्र सिंग आजपर्यंत सामान्य श्रेणी मधून खेळणाऱ्या व ऐकू-बोलू शकणाऱ्या पहलवानांबरोबर सराव करत आला आहे आणि त्यांच्या समोर जिंकतही आला आहे. इतकेच नाही तर तो सुशील कुमारबरोबरही लहानपणापासून प्रशिक्षण घेत आला आहे व आज ही ते एकत्र सराव करतात, पण असे असूनही वीरेंद्रला अजून भारतात अधिकृत स्पर्धेमध्ये कुस्ती लढण्यासाठी रिंगणात उतरण्याची संधी मिळालेली नाही.

"हेल्लो! मी गुंगा पहलवान," जेव्हा आम्ही वीरेंद्रला बंगळुरूमध्ये India Inclusion Summit मध्ये भेटलो तेव्हा त्याने साइन लँग्वेज मधून आमच्याशी संवाद साधत स्वतःची ओळख करून दिली. अशी ओळख सांगताना त्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या तेजस्वी स्मितहास्यावरून हेच जाणवत होतं की त्याला मिळालेले 'गुंगा पहलवान' हे टोपणनाव तो फार अभिमानाने मिरवतो.

माझ्यासाठी हे सत्य खूप क्लेशकारक होतं जेव्हा वीरेंद्र म्हणाला की त्याने इतकी सुवर्ण पदकं मिळवूनसुद्धा आजपर्यंत त्याच्या वाटेला ना एखादा सरकारकडून पुरस्कार आला आहे; ना काही रोख रकमेचा मोबदला मिळाला आहे. आजही हाता-तोंडाची मिळवणी करण्यासाठी तो हरयाणा पॉवर कॉर्पोरेशन मध्ये लिपिक (क्लार्क) ची नोकरी करतो व दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि राजस्थान येथे होणाऱ्या कुस्तीच्या 'दंगली' मध्ये खेळतो.

त्याची ही बेताची आर्थिक परिस्थिती आपल्या देशातील खेळ आणि खेळाडूंबद्दल असणारी अनास्था दर्शवण्यासाठी अपुरी होती म्हणून की काय; त्याच्याकडून हे ही कळलं, की २००४ च्या डिफलीम्पीक्स (Deaflympics) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा तो एकमेव पहलवान असून सुद्धा त्याला स्वतःच्या खर्चाने त्या स्पर्धेत भाग घ्यावा लागला होता. तेथे त्याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले, हे सत्य सुद्धा आपल्या देशासाठी अगदीच मामुली ठरलं कारण २००४ च्या डिफलीम्पीक्स (Deaflympics) मध्ये सुवर्णपदक जिंकून देखील परत २००८ च्या जागतिक कर्णबधिर कुस्ती स्पर्धेत (World Deaf Wrestling Championship) त्याला स्वतःच्या खर्चानेच जावं लागलं.

सरतेशेवटी २०१३ च्या डिफलीम्पीक्स (Deaflympics) चा वीरेन्द्रचा खर्च Sports Authority of India (SAI) ने नाखुशीने आणि खूप आढे-वेढे घेत केला.

वीरेंद्रने मनात हे स्वप्न बाळगलं आहे की एक दिवस त्याला आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व शारीरिकदृष्ट्या अपंग ह्या श्रेणीमध्ये करायचं नसून, शारीरिक दृष्ट्या धडधाकट अशा सामान्य श्रेणीमध्ये करायचं आहे. ज्यांनी कोणी त्याला कुस्ती लढताना पाहिलं आहे ते त्याच्या ह्या स्वप्नावर नक्कीच विश्वास ठेवतील आणि त्याच्या शारीरिक क्षमतेची व कुस्तीतील त्याच्या पराक्रमाची ग्वाही देतील.

आजही कर्णबधीर खेळाडू सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतात, अगदी आॅलिम्पिक मध्ये सुद्धा. खरं तर, २०१२ च्या लंडन गेम्स मध्ये अमेरिकेच्या टीममध्ये ३ कर्णबधिर खेळाडू होते, पण बहुतेक Wrestling Federation of India ला अजून तरी ह्या गोष्टी कडे लक्ष द्यावंसं वाटलेलं नाही.

भारतातील खेळांच्या अशा दयनीय आणि उदासीन अवस्थेत विशीतले ३ तरुण चित्रपटकर्ते मित जानी, प्रतिक गुप्ता आणि विवेक चौधरी जगाला वीरेंद्रची मूक कथा सांगायला निघाले आहेत. त्यांनी बनवलेली एक तासाची documentary फिल्म 'गुंगा पहलवान' ही त्यांच्या 'प्रोजेक्ट रिओ-१६' चे दर्शनी स्वरूप आहे. "हा आमचा एक प्रयत्न आहे रिओ इथे होणाऱ्या २०१६ च्या ऑलिम्पिक मध्ये वीरेंद्रचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी", मित, प्रतिक आणि विवेक ने युअर स्टोरी शी बोलताना सांगितले. "वीरेंद्रला आज पर्यंत एकदा ही त्याने जिंकलेल्या पदकांसाठी सरकारकडून रोख रकमेचा एकही पुरस्कार मिळालेला नाही ही बाब अगदीच धक्कादायक आहे."

खरंच आपल्या मनातील आक्रोश सरकारपर्यंत पोहचवू न शकलेल्या वीरेंद्रला काय वाटत असेल, जेव्हा आपल्या देशातील इतर लोकप्रिय खेळ आणि खेळाडूंवर होणाऱ्या पैशाच्या अमाप वर्षावाला तो बघत असेल. एशियाड, ऑलिम्पिक अशा स्पर्धांच्या रंगारंग उद्घाटन आणि निरोप समारंभामध्ये १०/१५ मिनिटं निव्वळ हजेरी लावण्यासाठी चंदेरी दुनियेतील चमकत्या तारे-तारकांवर सरकारी तिजोरीतून लाखो रुपये उधळले जातात. अशा वेळेस होणाऱ्या मनातील मुकबधीर यातना वीरेंद्र त्याच्या हावभावांच्या सांकेतिक भाषेमधून व्यक्त करू शकत असेल का?

विवेक ने सांगितलं की वीरेंद वर्षाला २० ते २५ दंगली मध्ये भाग घेतो, जेथे बक्षिसाची रक्कम ५००० ते १००००० रुपयांपर्यंत असते. "आम्ही पाहिलेल्या त्याच्या दंगलीपैकी फक्त एका दंगली मध्ये तो हरला होता ते देखील पंचाने केलेल्या चुकीमुळे. वीरेंद्र ७४ किलोचा आहे आणि तो जरी भारतातर्फे खेळताना त्याच वजन गटात खेळत असला तरी दंगलीमध्ये तो १०० किलोपेक्षा जास्त वजनाच्या पहलवानांविरुद्ध लढतो आणि जिंकतो सुद्धा."

त्यांची डॉक्युमेंटरी फिल्म सध्या देशभरात विविध शहरांमध्ये दाखवली जात आहे. त्यांना आशा आहे की, क्रिडा क्षेत्रातील शासनाधिकारी वीरेंद्रची दखल घेतील आणि त्याला रिओ ऑलिम्पिकसाठी राज्य तथा राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या पात्रता फेऱ्यांमध्ये भाग घेण्याची संधी देतील.

'गुंगा पहलवान' ही फिल्म बनवतानाचे अनुभव मित, प्रतिक आणि विवेक आपल्याला सांगताना खालील व्हिडीओत पहा.


'गुंगा पहलवान' ह्या फिल्मसाठी जनतेकडून पैसे स्वीकारण्याचे अभियान अजूनही सर्वांसाठी खुले आहे. जर ह्या अभियानाला जनतेचे संपूर्ण सहकार्य मिळाले तर फिल्म मार्फत मिळालेल्या आर्थिक सहाय्याच्या जोरावर 'प्रोजेक्ट रिओ-१६' चे अंतिम ध्येय गाठण्यासाठी बळ मिळेल.

आमच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी आम्हांला तुमच्या मदतीची नक्कीच गरज आहे. 

विशबेरीचे अभियान तुम्ही खालील लिंकवर पाहू शकता, वीरेंद्र सिंग आणि 'प्रोजेक्ट रिओ-१६' बद्दल सगळी माहिती तुम्हांला येथे मिळेल.

https://www.wishberry.in/campaign/goonga-pehelwan/

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags