संपादने
Marathi

टपरीत सुरू झालेला बुक डेपो आज ‘प्रकाशना’तील प्रकाशपर्व!

Chandrakant Yadav
13th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

१९६७ सालची ही गोष्ट. बेंगळुरूतल्या गांधीनगर परिसरातल्या एका पानटपरीवर पानमसाल्यासह पुस्तकांचीही विक्री सुरू झाली. व्यवसायाचे विचित्र ‘कॉम्बिनेशन’ होते हे… दहा बाय दहा फुटाचे हे दुकान एवढे सगळे सामान विकायला साहजिकच अपुरे पडायचे. म्हणून मग दुकानाने बऱ्यापैकी रस्ताही व्यापलेला असायचा. पुस्तक म्हणून पहिल्यांदा लिलिपुटची डिक्शनरी विकायला घेतली होती. डिक्शनरीची पहिली प्रत विकली तेव्हा आपण पुढे देशभरातल्या नामवंत प्रकाशकांच्या यादीत असणार आहोत, हे दुकानदाराला वाटण्याचा प्रश्नच नव्हता… म्हणजे तसे स्वप्न पाहण्याचीही त्याची हिंमत नव्हती! पण तसे घडले. विचित्र कॉम्बिनेटेड व्यवसायातील पानमसाला गळून पडलेला होता आणि… १९६७ सालात लावलेले व्यवसायाचे ते इवलेसे रोप… तयाचा वेलू गगनावरी भिडलेला होता…

‘सपना बुक हाउस’च्या यशाची गोष्ट अगदी आजीबाईंच्या बटव्यातली वाटावी अशीच. एकदम फँटसी! पानाच्या गल्ल्यापासून सुरू होणाऱ्या एका गोष्टीची परिणती म्हणून आजचा डोलारा पाहिला, की डोके चकरावतेच.

१९६७ मध्ये पहिले पुस्तक विकल्यानंतर पुढे व्यवसायातील यशाचा आलेख सतत उंचावत गेला. दहा वर्षांनंतर म्हणजे १९७७ मध्ये गांधीनगरातच १२०० स्क्वेअर फूट जागेत रिटेल आउटलेट सुरू झाले. आता या भुतकाळातून वर्तमानात म्हणजे २०१५ मध्ये येऊया पूर्ववत… तर आज बेंगळुरूत सपना बुक हाउसचे ८ रिटेल स्टोअर्स आहेत. अन्यत्र असलेले ४ मिळून एकुणात १२ रिटेल स्टोअर्स आहेत. शिवाय लवकरच नवे तीन स्टोअर्स सुरू होऊ घातलेले आहेत.

सपना बुक हाउस आज यशाच्या शिखरावर आहे. सुरेश शहा हे या प्रतिष्ठानाचे संस्थापक. पानमसाला व पुस्तके अशी व्यवसायाची मुहूर्तमेढ जेव्हा केली तेव्हा या इतक्या यशाचा विचारही त्यांना शिवलेला नव्हता.

image


‘सपना इन्फोवेज प्रायव्हेट लिमिटेड’ असे नाव ल्यायलेल्या आणि एक सुप्रतिष्ठित म्हणून नावारूपाला आलेल्या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ निजेश शहा (वय २५) म्हणतात, ‘‘आमचे हे यश श्रद्धेय सुरेश शहा यांच्या आशाआकांक्षांचे आकाश ओलांडून खूप पुढे निघालेले आहे. त्यांच्या अपेक्षांच्या कितीतरी पुढे आम्ही पोहोचलेलो आहोत. आज आम्ही १००० हून अधिक लोकांचा एक मजबूत संघ आहोत आणि आमचे नाव या संघभावनेच्या बळावर लागोपाठ सातव्यांदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सन्मानाने नोंदवले गेलेय.’’

देशातील बहुतांश प्रकाशक आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झगडताहेत, अशा खडतर काळात ‘सपना’चे यश म्हणजे एक मोठी गोष्ट आहे. ‘सपना’च्या यशाबद्दल निजेश पुढे सांगतात, ‘‘नेमक्या वेळेला आम्ही व्यवसायात वैविध्य आणले. ‘ब्रान्स अँड नोबेल्स’ ही एकेकाळची लोकप्रिय अमेरिकन प्रकाशक संस्था. पण केवळ बदलत्या काळानुसार स्वत:त बदल घडवून आणता न आल्यामुळे तोट्यात गेली.’’ निजेश नव्या पिढीचे… नव्या दमाचे…

image


ते पुढे सांगतात, ‘‘नुकतेच कंपनीत काही धोरणात्मक बदल आम्ही केले. आणि पुन्हा बाजारात जम बसवण्यासाठी स्वत:ला झोकून दिलेले आहे. थोडक्यात आधुनिकीकरणाबरहुकूम काळासमवेत तुमची पाऊले तुम्ही टाका. स्वत:ला बदला. बदलत्या बाजाराशी जुळवून घ्या. बदलत्या मागण्यांच्या कसोटीवर उतरा. अन्यथा संपून जाल. बदलांसाठी तयार नसाल तर इतिहासात जमा झालेले एक पान होण्यासाठी तयार रहा.’’

निजेश यांनी बेंगळुरूतील विख्यात ‘सेंट जोसेफ कॉलेज ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’मधून वित्तपुरवठा या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. कंपनी आता त्यांच्या नेतृत्वात वाटचाल करते आहे. कंपनीची धुरा सांभाळल्यानंतर अवघ्या दीड वर्षातच या नवयुवकाने ‘सपना इन्फोवेज…’ला एक उपक्रम म्हणून एक दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढे मूल्य मिळवून दिले आहे. किरकोळ विक्रीसह प्रकाशन, प्राद्योगिक, वितरण एवढेच काय तर ई-कॉमर्सच्या क्षेत्रातही ‘सपना इन्फोवेज…’ने भरारी घेतलेली आहे. जवळपास ३५ वर्षांपूर्वी १९८० मध्ये प्रकाशन व्यवसायात पाउल टाकल्यानंतर आजअखेर ‘सपना’च्या नावावर ५ हजारांहून अधिक पुस्तके आहेत. दररोज सरासरी १.५ पुस्तके! २०१२ मध्ये ई-कॉमर्समध्ये पडल्यानंतर कंपनीच्या कारभारात सुधारणाच सुधारणा झाल्या. प्रगतीची दालने खुली झाली. कंपनीने नंतर मागे वळून पाहिलेच नाही.

निजेश म्हणतात, ‘‘माउसच्या एका क्लिकवर जर गरज असलेली गोष्ट उपलब्ध होत असेल तर ही बाब लोकांसाठी सोयीचीच नाही का? ते ई-कॉमर्सचा मार्ग निवडतीलच ना!’’

image


‘सपना’ची ऑनलाइन आवृत्ती ‘सपना ऑनलाइन डॉट कॉम’चा वापर करणाऱ्यांची संख्या ८ लाखांहून अधिक आहे. डिसेंबर २०१४ मधल्या स्थितीनुसार कंपनीच्या ऑनलाइन आवृत्तीने जवळपास ७ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केलेला आहे. आवृत्तीचा विकास दर वर्षाला २० टक्के वाढता आहे, हे विशेष! दररोज सरासरी १८०० ते २००० ऑर्डर नोंदवल्या जातात आणि तेवढ्याच पूर्ण केल्या जातात.

एकदा तर एका दिवसात ४३०० ऑर्डर पूर्ण केल्या गेल्या होत्या. हाही एक उच्चांकच आहे. ब्रेव्हो ‘सपना!’

ऑनलाइन विक्रीव्यतिरिक्त कंपनीचे रिटेल स्टोअर्सही दिवसाला जवळपास ३ लाखांहून अधिक ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतात. ‘सपना’चे हे यशस्वी व्यवसाय मॉडेल पूर्णत: स्वावलंबी आहे, हेही उल्लेखनीय! कर्जबिर्जाची भानगडच नाही! दिवसेंदिवस शिक्षणाचे वाढत चाललेले महत्त्वही ‘सपना’च्या यशामागे आहेच. निजेश म्हणतात, ‘‘ हो. विकासाची संधी असणारे आणि दिवसेंदिवस वाढतच जाणारे क्षेत्र म्हणून ‘शिक्षण’ हेच असेल, हे आम्ही आधीच हेरलेले होते. योग्य वेळी यात गुंतवणूक करण्याचे आमचे धोरण म्हणून यशस्वीही ठरले. आज कितीतरी शाळा आणि महाविद्यालयांसह जवळपास ११ हजार संस्थांना आम्ही अभ्यासक्रमाचे साहित्य पुरवतो.’’

‘‘घानाच्या राजधानीत ‘अक्रा’मध्येही आम्ही एक कार्यालय सुरू केलेले आहे. घानातही आम्ही पुस्तके निर्यात करतो. तिथल्या चार विद्यापीठांशी आम्ही संलग्न आहोत. साधारणपणे वर्षभरापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या ‘डीपीएस’साठी अध्ययन सामुग्रीही आम्हीच उपलब्ध करून देत आहोत.’’ हे सांगताना निजेश यांच्या डोळ्यांत एक आगळीच चमक असते.

डिसेंबर २०१४ मध्ये आपला व्याप वाढवताना ‘सपना ऑनलाइन डॉट कॉम’ने इशिता टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडची ‘बुक अड्डा डॉट कॉम’, ‘अकिडझोन डॉट कॉम’ आणि ‘कुलस्कुल डॉट कॉम’ अधिग्रहित करून आपल्या अखत्यारीत घेतल्या. ही अधिग्रहणे म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रात नव्याने लक्ष केंद्रित करण्याच्या धोरणाचाच एक भाग होता, हे वेगळे सांगायला नको.

image


निजेश म्हणतात, ‘‘सध्या स्व-प्रकाशनाकडे लोकांचा वाढता कल आहे. तो पाहून आम्ही चारच महिन्यांपूर्वी सामान्य लेखक ते विख्यात साहित्यिक अशी वाटचाल करू इच्छिणाऱ्यांसाठी एक व्यासपीठ निर्माण केलेले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आतापर्यंत २२ लेखकांची पुस्तके आम्ही प्रकाशितही केलेली आहेत.’’ निजेश यांच्याकडे संपादकीय चमू उपलब्ध नसल्याने प्रकाशित मजुकरासाठी सर्वच पुस्तकांमध्ये लेखक हाच जबाबदार असल्याचे पहिल्याच पानावर सांगून टाकलेले असते. निजेश म्हणतात, ‘‘आम्ही लेखकाला साहित्यिकाच्या पंक्तीत बसवण्यात मदत करतो. आमची अट एवढीच, की लेखनाचा मध्यवर्ती विषय, मजकूर वादग्रस्त नसावा. हे स्वाभाविकही आहे.’’

या कामाला पैसे किती लागतात, याबाबतीत निजेश यांचे म्हणणे असे, की अशा स्वरूपातल्या प्रकाशनावरील खर्च दहा हजार रुपयांपासून काही लाखांपर्यंत जाऊ शकतो. वेगवेगळी परिस्थिती आणि वेगवेगळ्या अटीशर्तींवर खर्चाचा हा सारा खेळ अवलंबून आहे.

निजेश सांगतात, ‘‘आता बघा. आम्ही सहज म्हणून एका १२ वर्षे वयाच्या लेखकाचा कथासंग्रह छापला. २०० प्रती काढल्या. इथे काही पैशाअडक्याचा विचार नव्हता. निखळ आनंदासाठी आम्ही हे केले.’’

भारतीय प्रकाशन उद्योग जवळपास ४० अब्ज डॉलरहून मोठा आहे. पैकी ४ टक्के वाटा ई-पुस्तकांचा आहे. उद्योगातील विकासाचा दर हा ७० ते ८० टक्क्यांवर स्थिर आहे. प्रौद्योगिकीच्या वाढत्या वापराने हा दर कोसळण्याची शक्यता दिसत नाही.

प्रकाशन उद्योगाची विद्यमान परिस्थिती नेमकी न्याहाळली तर सपना बुक हाउस एका अशा पायरीवर उभे असलेले दिसेल, जिथून ते प्रकाशन बाजारातला एक भलामोठा भाग आपल्या कवेत अगदी सहज घेऊ शकते.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags