’टिक टिक वाजते‘ च्या रुपाने त्याने केलेली ’दुनियादारी’..’टाइमपास’ करताना त्याने साकारलेले ’सुन्या सुन्या मनामध्ये ...’, ’कट्ट्यार....‘च्या निमित्ताने त्याचे ‘सुर निरागस’ या व अशा कित्येक गाण्यांमुळे तरुणाईचा आणि अबालबृद्धांचा ताईत बनलेला गीतकार कोकणपुत्र मंगेश कांगणे. त्याच्या या यशामागचं मूळ म्हणजे कोकण...कोकणातली साधीभोळी माणसं, त्यांचे संस्कार, चालीरीती, लोकगीत या साऱ्याचा प्रभाव मंगेशच्या गीतांमधून, स्वभावातून आपसूकच जाणवतो.
चित्रपटसृष्टीतील गायक, संगीतकार, निमार्ते, दिग्दर्शक अशा सर्वांनाच मंगेशच्या गीताने भूरळ पाडली आहे. मेहनत आणि सातत्य, नाविण्याच्या जोरावर त्याने स्वत:च वेगळ स्थान चित्रपटसृष्टीत निर्माण केलं आहे. खेड तालूक्यातल्या खारी या गावातलं मंगेशचं बालपण...वडिल बँकेत कामाला... शाळेत शिक्षणासोबतच कोकणात होणारा जाकडी, नमन, भारूड,भजन यांची आवड..काही वर्षांपूर्वी समारंभाप्रसंगी व्हीसीडी वरुन चित्रपट दाखविले जायचे. त्यावेळी केवळ चित्रपटाची आवड म्हणून व्हीसीडी वाल्यासोबत दूर दूर जायचं..चित्रपट बघायचे हे नित्याचं बनलं होतं....बाजारातून गाण्यांची पुस्तक आणून वाचायची, वहीच्या कुठल्यातरी कोपऱ्यात चारोळ्या लिहून ठेवायच्या, कोकणातली पारंपारीक गाणी ऐकायची त्यांना वेगळ्या चाली लावायच्या, शाळेत एखादं वेगळं गाणं बसवायचं अशा करामती चालू असायच्या...लोक कौतूक करायचे..तेवढ्यापुरतं बर वाटायचं..हळूहळू आपण काहीतरी करू शकतो ही आशेची पालवी मनातून फुटत होती. आणि त्यानंतर सर्वसामान्य कोकणी माणसाप्रमाणे नोकरीसाठी मुंबईची वाट धरली. दहावीनंतरचं शिक्षण मुंबईत विक्रोळीच्या विकास रात्र महाविद्यालयामध्ये झालं..लेखन, वाचन, अभिनय, पथनाट्य या गोष्टीं पुन्हा सुरु झाल्या.. आपला एखादा सिनेमा असावा..एखादं काम मिळावं, लिखाण करावं, अभिनय करावा असं राहून राहून वाटू लागलं. पण नोकरीमुळे वेळही देता येत नव्हता.
२००८ हे वर्ष त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. कारण याच दरम्यान ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकरांचा सहवास त्याला मिळाला.लोखंडाला परीसस्पर्श व्हावा असं काहीसं यावेळी झालं. एका कवीच्या पुस्तक प्रकाशनेच्या प्रस्तावनेसाठी पाडगावकरांना भेटण्याचा योग आला. ’अरे कांगण्या मस्त लिहितोस की तू..तूझ एखाद पुस्तक काढ ना’..मी लिहितो प्रस्तावना..हे शब्द मनावर आयुष्यभरासाठी कोरले गेलेयत..त्यावेळी सोनचाफा हा चारोळी संग्रह प्रकाशित झाला. खऱ्या अर्थाने कवितेच्या या प्रवासाला सुरूवात झाली.
आपल्या लेखणीच्या बाबतीत जसा तो शिस्तप्रिय आहे त्याप्रमाणेच त्याच्या शब्दांना चांगला संगीतकार, गायक, निर्माता मिळावा, यासाठीही तो आग्रही असतो. सोनु निगम, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, हरीहरन, आदित्य नारायण, विशाल दादलानी, चिनार, अरिजीत सिंह, दलेर मेहंदी, स्वप्निल बांदोडकर, अवधुत गुप्तेंपासून ते नंदेश उमप, विवेक नाईक, रोहित राऊत, महालक्ष्मी अय्यर, हमसिका अय्यर, बेला शेंडे, सायली जोशी, भूमी त्रिवेदी, आनंदी जोशी, नेहा राजपाल, उर्मीला धनगर, वैशाली माडे, शाल्मली खोलगडे,केतकी माटेगावकर, श्रेया घोषाल अशा आघाडीच्या गायकांनी गाणी गायली आहेत. चिनार-महेश, शंकर एहसान लाय, शैल-प्रितेश, पंकज-पुष्कर, निलेश मोहरीर, आकाश राजपाल, परेश शहा, आदित्य बेडेकर, ए. व्ही. प्रफुल्लचंद्र अशा अनेक दिग्गजांनी मंगेशच्या शब्दांना संगीतबद्ध केलय. आजी, भूतकाळ, विठ्ठला शपथ, मस्त कलंदर, आंबट, लोचा, सुरसपाटा, नेबर्स, अॅण्ड जरा हटके अशा आगामी चित्रपटांमधूनही मंगेशची गीते रसिकांपर्यत लवकरच पोहोचतील.
प्रत्येक काव्य लिहिताना ते सर्वसामान्य माणसाला समजावं, कळावं, बोलता यावं हा या मागचा उद्देश असतो. आयुष्याकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवल्या नाहीत पण जे ठरवायचं त्यासाठी प्रयत्न करायचे हा लाईफचा फंडा असल्याचे तो सांगतो. प्रत्येक पायरीवर चांगली माणसं भेटत गेल्याने लिहिलेलं काव्य, गीते सर्वांपर्यंत पोहोचल्याचे समाधान तो व्यक्त करतो. गीतकार ही ओळख मिळण्यात आयुष्यातली २५ वर्ष गेली. चित्रपट हाच आवडीचा विषय असल्याने मनातल्या लिखाण, अभिनयाच्या सुप्त इच्छाही त्याला पूर्ण करायच्या आहेत.
सुन्या सुन्या मनामध्ये सुर हलके....
टाइमपास -२ मधील हे गाणं रसिकांप्रमाणे मंगेशच्या मनालाही खूप भावतं. मंडप, मुंडावळया, मेहंदी असे लग्नात मानल्या जाणाऱ्या शुभशकुनांना घेउन त्यात नवरीला सलणारे दुख: मांडणं आव्हानात्मक होतं. रसिकांनी या गाण्याला उचलून धरल्याचा आनंद मोठा असल्याचे मंगेश सांगतो. साखरपुडा, लग्न समारंभावेळी आवडीने गायल्या जाणाऱ्या या गाण्यांच्या शब्दांचा अर्थ कालांतराने जसा उमगतो तशी त्यातली मजा आणखी वाढत जाते. या गाण्याचा प्रत्येक शब्द त्याला कित्येक वर्ष मागच्या आठवणीत घेऊन जातो.
’माझी पायरी ओळखतो..’
मंगेश पाडगावकरांच्या घरी जाण्याचा योग मंगेशला अधूनमधून यायचा. एका कार्यक्रमाला जाताना दोन मजले उतरुन पाडगावकरांच्या सोबतीने चालताना सहजच त्याने विचारलं, या पायऱ्या चढ-उतारण्याचा त्रास नाही का होत?..तेव्हा पाडगावकर उत्तरले, ’या पायऱ्या चढ-उतारानेच मला आयुष्यात खूप काही शिकवलं आहे. आता याची सवय झाली आहे. म्हणून मी माझी पायरी नेहमी ओळखून असतो.. ’ आयुष्याचं खरं गमक मला इथे कळल्याचं मंगेश सांगतो. त्यामुळे आयुष्यभर सर्वसामान्य जगण त्याला जगायचं आहे.
नोकरीला प्राधान्य
लेखन ही आपली आवड आहे आणि नोकरी आपली गरज आहे हे ओळखून नोकरीला प्राधान्य द्यायचं पक्क झालं आहे. आजही अनेक सोहळे, कार्यक्रम, मिटींग्सना हजर राहता येत नाही. पण सध्या काम करत असलेल्या शिपिंग कंपनीतही वेळ सांभाळून कामं घेतली जात असल्याचे मंगेश सांगतो.
यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :