Marathi

रातुल नरेन यांचं ‘बेंपु ब्रेसलेट’ अपुऱ्या वजनाच्या बालकांना देतयं संजिवनी

Team YS Marathi
16th Apr 2016
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

रितिक्षाने जन्मानंतर पहिले तीन आठवडे एक चमकदार ब्रेसलेट घातलं होतं. तुम्ही म्हणाल मग त्याचं काय? पण हे साधंसुधं ब्रेसलेट नाही तर असंख्य नवजात शिशुंकरता हे ब्रेसलेट जीवनदायी ठरत आहे. निमोनिया झाल्यामुळे रितिक्षाच्या आईला तिचं पहिलं बाळ गमवावं लागलं. डॉक्टरांनी रितिक्षाच्या जन्मानंतर तिला हे ब्रेसलेट घालायला तिच्या आईला सांगितलं. ब्रेसलेटमधून जर सतत बीपबीप आवाज येत असेल तर बाळाच्या शरिराचं तापमान कमी होत चाललयं. बाळाचं तापमान परत सामान्य होण्याकरता तातडीनं डॉक्टरांकडे न्यायची गरज आहे असं समजावं. एके रात्री सतत सहा तास रितिक्षाच्या ब्रेसलेटमधून बीपबीप आवाज येत होता. घाबरलेल्या आईने ब्रेसलेटच्या हेल्पलाईनला फोन लावला. रितिक्षाला तातडीने डॉक्टरांकडे न्यायचा सल्ला हेल्पलाईनमधून देण्यात आला. रितिक्षाच्या आतड्यात आणि पोटात जंतुसंसर्ग झाल्याचं निदान झालं. लगेचच उपचारांना सुरूवात झाली. यातून ती आता संपूर्ण तंदुरुस्त झालीय. सहा महिन्याच्या या तान्हुलीचं वजन आता पाच किलो झालं आहे.

तंदरुस्त रितिक्षा

तंदरुस्त रितिक्षा


हे अनोखं जीवनदायी ब्रेसलेट किफायतशीर दरात बेंगळुरुच्या बेंपुनं (Bempu) शोधलयं. वैद्यकीय उपकरण निर्मिती करणारी बेंपु ही एक सामाजिक संस्था आहे. विकसनशील देशांमध्ये सध्या नवजात बालकं हायपोथर्मिया म्हणजेच शरिराचं तापमान कमी होऊन दगावण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. बाळाच्या शरिराचं तापमान कमी झाल्याचं बिप आवाजामुळे पालकांच्या लगेच लक्षात येतं. बाळाला लागलीच वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे त्यांचा जीव वाचतो.

image


बाळाच्या शरिराचं तापमान सामान्य ठेवायला आणि जन्मानंतरच्या पहिल्या महिन्यात वजन वाढण्याकरता बेंपु मदत करतं. यामुळे बाळाचा शारिरीक विकास व्हायला मदत होते. बाळाच्या शरीराचं तापमान अर्ध्या अंशानेही कमी झाल्यास त्याच्या शरीरातील चरबीच्या प्रमाणात घट होते. म्हणजेच बाळाचं वजन वाढण्याऐवजी कमी होतं. मेदामध्ये घट झाल्यामुळे बाळाच्या शरिरातलं अॅसिडचं प्रमाण वाढू लागतं. याचा परिणाम बाळाच्या श्वासोच्छावर होतो. बाळाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. ऑक्सिजनचा पुरवठा खूप कमी होतो आणि अवयव निकामी होऊ लागतात. वेळेआधीच जन्माला आलेल्या बालकांमध्ये (Premature babies) तापमान कमी होण्याचं प्रमाण जास्त असतं. यामुळे अवयव निकामी होणं, चटकन जंतूसंसर्ग होऊन शरीर थंड पडणं या गोष्टी बऱ्याचदा होताना दिसतात. या सगळ्यातून उद्धभवणाऱ्या समस्यांचा दूरगामी परिणाम त्या बाळाच्या पुढील जीवनावर होतो.

बेंपुची कथा

रातुल नरेन यांनी २०१३ मध्ये बेंपुची स्थापना केली. बायोमेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि स्टँडफोर्ड विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यावर रातुलनी सहा वर्ष जॉन्सन एण्ड जॉन्सनमध्ये काम केलं. तिथे ते नवजात बालकांच्या ह्रदयरोग उपचारांशी संबंधित उपकरणांचे संशोधन करत होते. त्यानंतर वर्षभर एम्ब्रास इनोव्हेशनमध्येही त्यांचं हे काम सुरूच होतं.

आपण नवजात बालकांच्या आरोग्यात सुधारणा आणण्याकरता काहीतरी करावं असं ३१ वर्षीय रातुल यांना सतत वाटत राहायचं. मग त्यांनी त्यांचं ध्येय निश्चित केलं. ते सांगतात, “एम्ब्रासमध्ये काम करताना नवजात बालकांच्या आरोग्याशी माझा जवळून संबंध आला. काहीतरी प्रभावशाली बनवण्याची माझी जबरदस्त इच्छा होती. नवजात बालकांच्या आयुष्याशी संबंधित भरिव काहीतरी करणं म्हणजे भावी पिढीला आरोग्यपूर्ण आयुष्य बहाल करणं. तान्हं असतानाच बाळाचं आयुष्य बदलण्याकरता तुम्ही काही केलंत तर त्याचा परिणाम पुढच्या ६० ते८० वर्ष टिकणारा असतो”.

रातुल नरेन, संस्थापक, बेंपु

रातुल नरेन, संस्थापक, बेंपु


रातुल यांनी २०१३ मध्ये नवजात शिशूंच्या आरोग्य आणि देखभालीतील उणीवा जाणून घेण्याकरता संपूर्ण भारतभर प्रवास केला. मोठ्या शहरांपासून लहान खेडीही त्यांनी अक्षरशः पिंजून काढली. खाजगी आणि सरकारी मोठ्या, अत्याधुनिक रुग्णालयांतील नवजात शिशु विभाग तसंच ग्रामीण प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये ते तासनतास निरिक्षणं करत असायचे. रातुल याबाबत सांगतात, “मी तिथं अक्षरशः पडून असायचो. रुग्णांसोबतच डॉक्टरांचंही आयुष्य समजण्याचा प्रयत्न करायचो. माझ्याकडच्या वहीत तिथल्या सगळ्या नोंदी नोंदवायचो. तिथल्या त्रुटी काय आहेत? बाळ आजारी का पडलं? बाळ मृतावस्थेत रुग्णालयात पोहचण्याची कारणं हे सगळं मी सविस्तर लिहित होतो." ते पुढे सांगतात, “अमेरिकेत अपुऱ्या वजनाच्या बालकाला त्याच वजन पुरेसं भरेपर्यंत इनक्युबिलेटरमध्ये ठेवण्यात येतं. त्यानंतरच त्याला घरी पाठवण्यात येतं. पण भारतात अपुऱ्या वजनाच्या बालकांचं वजन एक किलो दोनशे ग्रॅम असलं तरी घरी पाठवण्यात येतं. ही बालकं बऱ्याच कारणांमुळे मोठ्या धोक्याखाली असतात. त्यातली प्रमुख कारण म्हणजे शरीराचं तापमान कमी होणं आणि जंतुसंसर्ग. आम्ही निश्चितच इनक्युबलेटरची जागा घेऊ शकत नाही, मात्र आम्ही बाळांना एक उबदार संरक्षक कवच देतो. ज्याद्वारे या नाजूक बालकांचं तापमान नियमित नोंदवलं जातं”.

image


वापर

डॉक्टरांनी सांगितल्यावरच एखाद्या बालकाला बेंपु ब्रेसलेट बांधलं जातं. देशातल्या अकरा राज्यातल्या दीडशे केंद्रांमध्ये हे ब्रेसलेट उपलब्ध आहे. पुण्यातलं सुर्या हॉस्पीटल, गुडगावमधीलं क्लाऊड नाईन आणि बेंगळुरुतलं मीनाक्षी हॉस्पीटल या काही रुग्णालयात हे ब्रेसलेट मिळतं.

image


नवजात बालकाच्या जन्मदिवसापासून पहिले चार आठवडेच हे ब्रेसलेट काम करतं. हे ब्रेसलेट डिसपोसेबल आहे. त्याच्या वापरादरम्यान ते एकदाही चार्ज करावं लागतं नाही. त्यात पुरेशी बॅटरी असते. पण जर का हे उपकरणं परत केलं तर ते रिचार्ज आणि रिसेट करून दुसऱ्या बाळाला परत वापरता येईल, मात्र असे करणे सोयीचे नाही कारण बऱ्याचदा खेड्यातल्या स्त्रिया प्रसुतीकरता तालुक्याच्या ठिकाणी येतात. किंवा प्रसुतीकरता आपल्या गावी येऊन नंतर लगेचच आपल्या कामाच्या शहरात किंवा गावात परत जातात. हे उपकरणं भाड्याने देण्याची कुठलीच सोय सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही. कलेक्शन सेंटर, डिपॉझीट घेणे, उपकरण देणे, ते परत ताब्यात घेऊन निर्जंतुक करणे, रिचार्ज करून परत एखाद्याला देणे यासर्व गोष्टींची सोय सध्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाही.

आशा सेविका आणि आंगणवाडी सेविकांच्या मदतीने पुढील काही महिन्यांमध्ये असा प्रयत्न करता येऊ शकतो असं रातुल यांनी सांगितलं.

image


रातुल यांना बरेच जण विचारतात हे उपकरण ब्लू ट्रूथ किंवा एसएमएस सेवा पुरवून स्मार्ट फोनच्या सोबत का जोडत नाहीत. ज्यामुळे पालकांना आगाऊ सूचना मिळेल. या शंकेवर राहुल उत्तर देतात, “अल्प उत्पन्न गटावर आम्ही प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यांच्या अडचणी समजून घेत समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. समजा रात्री बाळाच्या शरिराचं तापमान कमी झालं आणि आई झोपलीय. तर स्मार्टफोनमधील सोय यातून मार्ग नाही काढू शकत”. स्मार्ट फोन घेण्याची क्षमताही या गटाची नसते. रातुल यांनी बेंपु उपकरण हाताळायला अतिशय सहज आणि सोप बनवलं आहे. जेणेकरुन कोणताही गोंधळ न उडता पालकांना जास्तीत जास्त माहिती मिळेल. जर का उपकरणाच्या डिस्पेलवर तापमान दिसलं तर बाळांच्या मातांचा जास्त गोंधळ उडण्याची शक्यता आहे. बाळाचं कमी वजन आणि नाजूक तब्येतीमुळे त्या आधीच खूप काळजीत असतात. त्यामुळे बाळाची तब्येत चांगली असल्याचं उपकरणावरील निळ्या रंगाचा लाईट दर्शवते तर लाल लाईट बाळाच्या शरिराच्या तापमानात घट होत असल्याचे दर्शवते. बिपबिप असा आवाज सतत होत असेल तर बाळाला ताबडतोब वैद्यकीय मदतीची गरज असल्याचं समजावं. या उपकरणाची कार्यप्रणाली इतकी साधी ठेवण्यात आली आहे.

मान्यता आणि आर्थिक सहाय्य

मे २०१४ मध्ये रातुल यांची सामाजिक उद्योजकत्वाकरता इकोइंग ग्रीन फेलोशीपसाठी निवड करण्यात आली. जुलै २०१४ मध्ये विलग्रोमधल्या इनक्युबलेटरकरता बेंपु घेण्यात आलं. नोव्हेंबर २०१४ मध्ये गेटस् फाउंडेशन आणि कॅनडाच्या ग्रँड चॅलेंजसकडून बेंपुला अर्थसहाय्य करण्यात आलं. त्याचदरम्यान बेंपुनी आपला पहिला कर्मचारी नेमला. युएसएआयडीने आयोजित केलेल्या ‘नवजात अर्भकांचं आयुष्य वाचवणारा किमयागार’ या स्पर्धेत पुरस्कार मिळवला. जगभरातून याकरता साडेसातशे प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील १७ पुरस्कारप्राप्त प्रवेशिकांमध्ये बेंपुही यशस्वी ठरलं. बेंपुला नॉर्वे आणि कोरिया सरकारनेही आर्थिक मदत केली.

image


तात्काळ आणि दूरगामी आव्हानं

सरकारी प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये बेंपुचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. त्यामुळे बेंपु समोरचं सध्या सर्वात मोठं आव्हान आहे, सरकारी प्राथमिक आरोग्यकेंद्रासोबत काम करणे. देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमधील आरोग्यकेंद्रांसोबत काम करण्याकरता युएसआयडीकडून बेंपुला ग्रांट मिळाली आहे. रातुल सांगतात, “प्रत्यक्षात हे उपकरण किती उपयोगाचं आहे हे दाखवून दिलं की, सरकारकडून या उपकरणाला मान्यता मिळून हे स्टार्टअप सुरू होण्यास वेळ नाही लागणार. तळागाळातल्या ज्या ज्या बालकांना हे उपकरण आवश्यक आहे तिथपर्यंत पोहचण्याचं आमचं ध्येय आहे. ज्यामुळे त्या बाळाचे प्राण वाचतील आणि त्याच्या पुढील आयुष्यावरही विपरित परिणाम होणार नाही”.

आम्ही रातुल यांना विचारलं, भारतात सरकारी यंत्रणांसोबत काम करताना बऱ्याचदा निराशाच पदरी पडते. मग तुम्ही हे सगळं कसं करणार? यावर रातुल यांनी खूप आशावादी उत्तर दिलं, “मी ऐकलयं की सरकारी कार्यालयांमध्ये ही काम करवून घेणं जरा जड जातं. पण राष्ट्रीय आरोग्यावर सरकारचं बारकाईने लक्ष आहे. आम्ही आरोग्य आणि कुटंब मंत्रालयांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. आम्हाला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या ब्रेसलेटचा वापर करून गरजवंत बालकांच्या आयुष्यात आशेचा किरण मिळेल असं या अधिकाऱ्यांनी म्हटलं. त्यामुळे या ब्रेसलेटला सरकारची मान्यता लवकर मिळण्याकरता हे अधिकारी प्रयत्न करत आहेत”.

सरकारी मान्यतेकरता खूप मोठी प्रक्रिया आणि खूप लोक गुंतल्यामुळे याकरता थोडा वेळ लागेल याची रातुल यांना कल्पना आहे. आरोग्याचा विषय राज्य सरकारच्याही अखत्यारित येत असल्यामुळे बेंपु प्रत्येक राज्य सरकारच्या संपर्कात असून, तळागाळातल्या गरजवंत बालकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे.

Website – www.bempu.com

लेखिका – स्निग्धा सिन्हा

अनुवाद – साधना तिप्पनाकजे

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags