संपादने
Marathi

नवउद्यमींसाठी उत्क्रांतीचा मंत्र! तज्ज्ञांचे नवउद्यमींना मार्गदर्शन!

Team YS Marathi
2nd Dec 2016
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

आपल्याला काय करायचे आहे, यापेक्षा काय करायचे नाही, हे निश्चित करून त्यावर ठाम राहण्याची सर्वात अवघड कसोटी प्रत्येक नवउद्यमीने पार करायलाच हवी. जगातील सर्व समस्यांवर आपल्याकडे भलेही उत्तर नसेल; परंतु आपण निवडलेल्या ग्राहकांना नेमके काय द्यायचे हे ठरवून, त्या दिशेने सतत बदल करीत राहून उत्क्रांत होत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन पेटीएमचे उपाध्यक्ष अभिषेक अरुण यांनी केले.

तरुणाईतील नवउद्यमी संस्कृतीला प्रोत्साहन म्हणून ‘लोकसत्ता’ने ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या ‘पर्व स्टार्टअपचे’ या दोन दिवसांच्या परिसंवादाचे उद्घाटन अभिषेक अरुण यांच्या हस्ते झाले. सर्वाधिक नवउद्यमशीलता फोफावणारा जगातील तिसरा मोठा देश असलेल्या भारतात नवउद्यमींची संख्या उत्तरोत्तर लक्षणीय गतीने वाढत आहे. परंतु यशस्वी नवउद्योगाच्या पायाभरणीसाठी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळव्यात, याचे कानमंत्र त्यांनी श्रोतृवर्गातील होतकरू नवउद्यमी तसेच व्यवस्थापन व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दिले. या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी मुंबईसह पुणे, धुळे, सातारा या भागांतून विद्यार्थी सहभागी झाले होते. पहिल्या दिवसातील चर्चासत्रांनंतर नवउद्योगाबाबतचे अनेक गरसमज दूर झाले असून, उद्योग उभारण्यासाठी दिशा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

फोटो सौजन्य : लोकसत्ता 

फोटो सौजन्य : लोकसत्ता 


पहिल्या दिवशी ‘आमचे स्टार्टअपचे दिवस’ या चर्चासत्रात मिहिर करकरे, उत्साह खरे आणि श्रीकृष्ण भारंबे यांनी त्यांच्या स्टार्टअपच्या दिवसांचे अनुभव सांगताना विद्यार्थ्यांना स्टार्टअप सुरू करताना नेमकी कोणती आव्हाने येतात, याबाबत मार्गदर्शन केले. तर नवउद्योगांत कशा प्रकारे गुंतवणूक केली जाते, ती करताना गुंतवणूकदार नेमका काय विचार करतो, बीज भांडवल व व्हेंचर कॅपिटलबरोबरच क्राऊड फंडिंगच्या नव्या पर्यायाचा वापर करून उद्योग कसा उभारता येऊ शकतो, याचा कानमंत्र शैलेश घोरपडे आणि सतीश कटारिया यांनी दिला तर सरकारी योजनांबाबत रवी त्यागी यांनी माहिती दिली. नवउद्योगात ठेचकाळण्याची वेळ येते, पण अपयश आले म्हणून खचून न जाता त्या चुकांमधून शिकून पुढे जात पुन्हा नवउद्योग उभारलेल्या आशीष शाह, शैलेश संसारे आणि किरण पाटील यांनी चुका कशा टाळता येतील, याबाबत मार्गदर्शन केले.

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविक करताना या दोन दिवसांच्या चर्चा-मंथनाची भूमिका विशद केली. नवउद्यमींचे भारतीय जीवनात महत्त्व आहेच, परंतु नवकल्पनांचे धुमारे हे पिठाची साधी गिरण ते आधुनिक माहिती-तंत्रज्ञानातील नावीन्यतेपर्यंत विविधढंगी आहेत. उपक्रमशीलता आणि एकंदर समाजजीवनाला गुणात्मक पैलू बहाल करणारी नवउद्यमी संकल्पना यांच्या सीमारेषा पुरत्या निश्चित झालेल्या नसल्याचे कुबेर म्हणाले.

समाधानी ग्राहक हाच विस्ताराचा दुवा

सामान्य ग्राहकोपयोगी उत्पादन कंपनीला ग्राहकांपर्यंत बलाढय़ विपणन यंत्रणा, जाहिरात, वितरक व विक्रेते या दुव्यांमार्फत पोहोचता येते, त्याउलट तंत्रज्ञान नवउद्यमींसाठी त्यांचे समाधानी ग्राहक हेच ग्राहकविस्ताराचा एकमेक दुवा असतात. थेट ग्राहकाशी जोडलेले असणे व त्यांचे समाधान करणे ही खूपच आव्हानात्मक गोष्ट आहे. परंतु सुरुवातीचा चांगला सेवाअनुभव मिळविलेले ग्राहकच त्यांच्या परिचितांमधून नवीन ग्राहक मिळवून देत राहतील व ही साखळी विस्तारत जाईल. याला ‘नेटवर्क इफेक्ट’ म्हटले जाते. तो या क्षेत्राचा चैतन्यदायी पैलू आहे आणि हेच गुगल, अ‍ॅपल या कंपन्या आणि त्यांच्या नजीकच्या स्पर्धकांतील मोठय़ा अंतराचे गमक असल्याचे वक्त्यांनी सांगितले. (सौजन्य: दै. लोकसत्ता)

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags