या रणरागिणीच्या देशप्रेमाला काय म्हणावं. . . दिव्यत्वाची येथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती!

या रणरागिणीच्या देशप्रेमाला काय म्हणावं. . . दिव्यत्वाची येथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती!

Tuesday June 07, 2016,

4 min Read

या देशाला जसं लाखो हजारो वीरांच्या बलिदानाचं वरदान मिळालं आहे तसंच त्या वीरांच्या मागे सतीचं वाण म्हणून त्यांच्या कर्तव्यपरायण देशसेवेचं व्रत चालविणा-या वीरपत्नींचं देखील या देशाला भाग्य लाभलं आहे. म्हणून अगदी इतिहासात जरी पाहिलं तरी अहिल्याबाई होळकर, ताराराणी आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या महाराष्ट्र कन्या पतीच्या युध्दात निधन झाल्यानंतर त्याच्या चितेवर सती न जाता त्याच्या जीवतकार्यातील खडतर अधु-या कार्याला पूर्ण करण्याचा वसा घेऊन हाती तलवार घेऊन रणरागिणी झालेल्या आपण पाहिल्या. या अश्याच एका रणरागिणीचा महाराष्ट्र कन्येचा स्वाती महाडिक यांचा युअर स्टोरीला सार्थ अभिमान आहे आणि त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतानाच आम्ही बीग सँल्यूटही देतो!

image


पतीच्या पार्थिवावर देशसेवाचा निर्धार

जम्मू- काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेचं रक्षण करत असताना, सह्याद्रीचा वीरपुत्र संतोष महाडिक यांना वीरमरण आलं. अतिरेक्यांना टिपून मारणाऱ्या संतोष महाडिक हे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात धारातीर्थी पडले. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी साताऱ्याचा हा जवान अधिकारी शहीद झाला. मात्र त्यांच्या पार्थिवावर पत्नी स्वाती यांनी आपण स्वत: आणि मुलं आर्मीतच जातील, असा निर्धार त्यांनी केला होता. तसे त्या फक्त बोलल्याच नाही तर खरच अवघ्या सहा महिन्यांतच ते त्या व्रत पूर्ण करत आहेत. स्वाती आता एक अधिकारी म्हणून भारतीय लष्करात रुजू होतील.

स्वाती यांनी पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. लष्करात दाखल होण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह यांनी स्वाती महाडिक यांना वयाच्या बाबतीत सूट दिली. “त्यांचा देशसेवेचा दृढ निश्चय आणि समाजाप्रती बांधिलकी पाहून, आम्हाला प्रभावित केलं,” असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. देशसेवा, समाजप्रेम असलेल्या या वीरपत्नीने इतरांसमोर एक नवा आदर्शच ठेवला आहे. स्वाती यांना एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. दोन्ही मुलांचे शिक्षण सुरू आहे. संतोष महाडिक यांनी अनेकदा दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेत अतुलनीय शौर्य गाजविल्याबद्दल आणि पथकाचे उत्कृष्ट नेतृत्व केल्याबद्दल त्यांना सेनेतील पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

image


स्वाती यांच्या या निर्णयाने शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या संपूर्ण कुटुंबात देशभक्ती किती ठासून भरली आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. खडतर परिश्रमातून आर्मीच्या वर्दीत स्वाती महाडिक या ’21 पॅरा स्पेशल फोर्स’मध्ये दाखल झाल्या आहेत. स्वाती यांना आर्मीचा ड्रेस केवळ सहानुभूतीतून नव्हे, तर एका सामान्य सैनिकाला जे जे करावं लागतं, त्या सर्व खडतर परिश्रमातूनच मिळाला आहे. त्यांना केवळ सूट मिळाली ते वयाच्या अटीतून. स्वाती या अवघड अशी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड अर्थात SSB ची परीक्षा पास झाल्या. त्यानंतर त्या ट्रेनिंगसाठी चेन्नईत दाखल झाल्या आहेत. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई इथं त्यांचं प्रशिक्षण होईल.

मुलं बोर्डिंगमध्ये, आई मिलिट्री ट्रेनिंगमध्ये

स्वाती महाडिक या दोन मुलांच्या आई आहेत. त्यांच्या मुलांचं शिक्षण सुरु आहे. त्यांचा एक मुलगा पाचगणीत तर मुलगी देहरादूनमध्ये शिक्षण घेत आहे. तर स्वत: स्वाती महाडिक देशसेवेच्या प्रेरणेने चेन्नईत मिलिट्री ट्रेनिंग घेत आहेत. ट्रेनिंग सेंटरमध्ये स्वाती यांच्यासोबतचे सर्व उमेदवार हे किमान दहा वर्षांनी लहान आहेत. त्यामुळे स्वाती यांना त्यांच्याप्रमाणे प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे. तशापद्धतीने त्यांना शरीररचना, व्यायाम, प्रशिक्षणासाठी तयारी करावी लागणार आहे.

image


वीरपत्नी लष्करात

स्वाती यांच्या पूर्वी अनेक वीरपत्नी भारतीय लष्करात दाखल झाल्या आहेत. २०१२ मध्ये अरुणाचलप्रदेशात शहीद झालेले नाईक अमित शर्मा यांच्या पत्नीही २०१४ मध्ये आर्मीत दाखल झाल्या आहे.

पोगरवाडीचा सुपुत्र

शहीद कर्नल संतोष महाडिक यांचं मूळ नाव संतोष मधुकर घोरपडे असं होतं. त्यांचा जन्म साताऱ्यातील पोगरवाडी इथं झाला. संतोष यांना त्यांच्या आईच्या वडिलांनी म्हणजे आजोबांनी त्यांना दत्तक घेतलं होतं. त्यानंतर त्यांचं नाव संतोष महाडिक असं झालं. संतोष यांचे आजोबा पोगरवाडीपासून जवळच असलेल्या आरेदरे या गावात राहत होते. त्यामुळे संतोष महाडिक यांचं बालपण आरेदरे गावातच गेलं. त्यांनी १९९४ मध्ये सातारा सैनिक स्कूलमधून विज्ञानशाखेतून बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून पदवीचे शिक्षण १९९७ मध्ये पूर्ण केलं. मग १९९८ साली ते लष्करामध्ये अधिकारी म्हणून भरती झाले होते. 

विशेष दलात आघाडीवर

संतोष महाडिक हे सुरुवातीला लष्कराच्या विशेष दलात कार्यरत होते. त्यावेळी दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेत अतुलनीय शौर्य गाजविल्याबद्दल आणि पथकाचे उत्कृष्ट नेतृत्व केल्याबद्दल त्यांना सेना पदकाने गौरविण्यात आलं होतं.

आरेदरेत या मुळगावी शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवांचं संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांनीही दर्शन घेतलं, या वीराला श्रद्धांजलीही वाहिली. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले, मात्र परिवाराच्या दुःखापुढे सांत्वनाची औपचारिकताही फिकी पडत होती. त्यावेळी मनोहर पर्रिकर यांनी शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या कुटुंबियांशी काही वेळ संवाद साधला. “माझी मुलगी आणि माझा मुलगा हे दोघंही देशाची सेवा करण्यासाठी लष्करातच जातील.” असं वीरपत्नी स्वाती म्हणाल्या होत्या. याचवेळी संरक्षणमंत्र्यांनीही शक्य तेवढी मदत करण्याचे तत्काळ आश्वासनही दिले. पती गमावल्याचं दु:ख असतानाच त्यांच्या पत्नीने व्यक्त केलेली ही भावना नक्कीच अभिमानास्पद आहे. अभिमानाचा हुंदका, आठवणींचे अश्रू आणि लष्कराच्या सलामी देणाऱ्या बिगुलाचा अंगावर काटा आणणारा नाद, यासह महाराष्ट्राचा वीरपुत्र अनंतात विलीन झाला. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पोगरवाडीत शहीद संतोष महाडिक यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनेक वीरपत्नी पतीच्या निधनानंतर दुसरा विवाह करून मुलांना आणि स्वत:ला जीवनाच्या नव्या सुखाच्या सहजपणाच्या मार्गाने घेऊन जाताना दिसतात, आणि त्यात काही वावगे देखील वाटायचे कारण नाही. पण शहीद संतोष महाडिक यांच्यावरील ख-या प्रेमाचा वसा घेऊन त्यांची वीरपत्नी पाच वर्षाचा मुलगा आणि अकरा वर्षाच्या मुली समोर देशभक्तीचा जो नवा विरश्रीचा आदर्श ठेवत आहेत तो खरंच दिव्यत्वाची प्रचिती देणारा आहे त्यामुळे त्यांच्या या असीम धैर्य़ाला ‘तेथे कर माझे जुळती’ असेच म्हणून मानवंदना द्यावीशी वाटते.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

… कारण हे व्यर्थ न हो बलिदान- शहीद संतोष महाडिक अमर रहे!

महिला सक्षमीकरणासाठी अन्यायविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणाऱ्या सुनिता कृष्णन

नऊवर्षाच्या वयातच पारो कशा बनल्या, देशाच्या पहिल्या महिला हॉकर? का मिळाला राष्ट्रीय पुरस्कार ?

    Share on
    close