जगातील ८० राष्ट्रांमध्ये स्थान मिळवणाऱ्या धात्रक दम्पतीच्या ‘वरूण ऍग्रो प्रोसेसिंग’ची प्रेरणादायी कहाणी !

जगातील ८० राष्ट्रांमध्ये स्थान मिळवणाऱ्या धात्रक दम्पतीच्या ‘वरूण ऍग्रो प्रोसेसिंग’ची प्रेरणादायी कहाणी !

Thursday April 20, 2017,

10 min Read

गेल्या काही वर्षात देशात आणि प्रामुख्याने आपल्या राज्यात नेहमीच बातमीचा विषय राहिला आहे तो शेतक-यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने ते हवालदिल झाल्याचे. ‘टोमॅटोचे विक्रमी उत्पादन झाले पण भाव नसल्याने ते टाकून देण्यात आले, किंवा कांदे फेकून देण्यात आले.’ या बातम्या ऐकताना हेच जाणवते की, या कृषीमालाला प्रक्रिया उद्योगाची जोड दिली तर त्याला शाश्वत भाव मिळेल आणि त्यांच्या मेहनतीला न्याय मिळेल. पण हा झाला विचार, त्यानुसार त्या दिशेने आजही जिद्दीने ज्यांनी प्रयत्न केले आणि आज नाशिक जिल्ह्यात पाच हजार पेक्षा जास्त शेतक-यांच्या कृषीमालावर प्रक्रिया करून निर्यात करणारा प्रकल्प राबविला आहे, अशा एका दंपतीची माहिती युवर स्टोरी मराठी च्या माध्यमातून आपल्याला करून देणार आहोत. ही कहाणी आहे शेतक-यांच्या कल्पकतेच्या आणि जिद्दीच्या मेहनतीच्या बळाला पंख लावून त्याच्या स्वप्नाला सातासमुद्रापार न्याय देवून स्वत:ची ‘मनिषा’ सिध्द करणा-या मनिषा आणि शशिकांत धात्रक या दांपत्याची! त्यांच्याशी बातचित केल्यावर समजले ते सप्तपदीच्या प्रत्येक पावलासोबत त्यांनी कशी स्वप्न पेरली आणि जिद्दीने- मेहनतीने एक असा संसार असे विश्व तयार केले जे फारच क्वचित वेळेला कुणा दांपत्याच्या जीवनात येत असेल.


image


युवर स्टोरीला माहिती देताना वरुण अ‍ॅग्रोचे व्यवस्थापकीय संचालकपद भूषविणाऱ्या मनीषा धात्रक यांनी सांगितले की, मनमाड येथे मराठी माध्यमाच्या शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि पुढच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवरानगर गाठले. प्रवरानगरला इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी त्यांनी प्राप्त केली. विखे-पाटील प्रवरानगर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच व्यवसाय करण्याची ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली. शिक्षण घेत असतानाच त्यांचे निरीक्षण सुरु होते की कशा पद्धतीने शैक्षणिक संस्था चालवल्या जातात. साखर कारखाना चालविला जातो. त्याचवेळी मनीषा यांनी एखादा छोटेखानी व्यवसाय करण्याचा ठाम निश्चय केला.

मनीषा यांनी सांगितले कि, “ शिक्षण पूर्ण झाले आणि घरात लग्नाची बोलणी सुरु झाली. त्यावेळी लग्नापूर्वी सहसा मुलींना पुढे काय करायचं असं विचारलं जात नव्हतं. पण मी मात्र ठरवलं होतं कि माझ्या भावी पतीशी चर्चा करेन. आणि ठरविल्याप्रमाणेच झालं नाशिक जिल्ह्यातील उमराळे गावातल्या शशिकांत धात्रक यांचे स्थळ पाहण्यात आले. कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या शशिकांत यांच्याशी लग्नाची बोलणी करतानाच मी त्यांना विचारलं कि जर मला काही स्वतंत्रपणे काम करायचं असेल तर तुमचा होकार आहे का ? कि मला तुम्ही घरात बसवणार ? कारण त्याआधी मला दोन- तीन खूप मोठ्या घरची स्थळं चालून आली होती ज्यांना फक्त इंजिनिअरींगची डिग्री असलेली सून हवी होती. बाहेर जाऊन किवा स्वतंत्रपणे काम करायला त्यांची परवानगी नव्हती. माझं तर असं म्हणणं होतं, कि मला असा जोडीदार हवा जो मला स्वतंत्रपणे काम करू देईल. त्यावेळी मनीषा यांनी विचारलेल्या प्रश्नांना शशिकांत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला”.


image


लग्नाच्या या बैठकीतच या उभयतांनी आपल्या भविष्यातील वाटचालीची चर्चा केली. त्यातून व्यवसाय करण्यावर दोघांचे एकमत झाले आणि विवाहानंतर त्यांची व्यवसाय करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु झाली. सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील या दोघांकडे व्यवसाय कोणता करावा, कसा करावा या विषयीचे कोणतेही ज्ञान नव्हते. मात्र हळूहळू त्यांनी अभ्यास करून अनेक गोष्टींची माहिती करून घेतली. उमराळे गावात त्यांची सात एकर शेती आहे. १९९६ मध्ये नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे भरघोस उत्पादन झाले होते. पण भाव इतके कोसळले, की उत्पादन खर्च वसूल होणे तर दूरच, टॉमेटो बाजारात विक्रीला नेण्याचा खर्चही परवडत नव्हता. त्यामुळे ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेताबाहेर टोमॅटो फेकला जात होता. रस्त्यावर फेकलेल्या टोमॅटोवरील संकटातच धात्रक दंपतीला व्यवसाय करण्याची संधी दिसली.

टोमॅटो प्रक्रिया संबंधीची माहिती त्यांनी गोळा केली. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि बाजारपेठ याचाही त्यांनी अभ्यास केला आणि टोमॅटो केचअप तयार करण्याचा छोटेखानी व्यवसाय त्यांनी सुरु केला. जवळपास ५०० किलो टोमॅटोवर प्रक्रिया करता येईल असा तो व्यवसाय होता, पण प्रकल्प उभा करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. धात्रक दाम्पत्याच्या गाठीशी केवळ पाच हजार रुपये होते. त्यांच्या दोघांच्या घरची आर्थिक स्थितीही बेताचीच असल्याने त्यांच्याकडून मदत मिळण्याची शक्यता नव्हती. बँकाही कर्ज देण्यास तयार नव्हत्या. काही बँकांनी बिनशेती मालमत्ता तारण ठेवण्याची मागणी केली. धात्रक कुटुंबाकडे शेती व्यतिरिक्त तारण देण्यासाठी काहीच नव्हते. त्यामुळे कर्ज मिळणे अवघड झाले. यावेळी मूळचे उमराळे गावातील असलेले, नाशिकच्या जनलक्ष्मी बँकेचे अध्यक्ष माधवराव पाटील यांनी या नवउद्योजकांना आपल्या बँकेतून कर्ज दिले. त्यानंतर अर्धा एकर जागेत या छोटय़ाशा उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

“ सुरवातीला नाशिकमध्येच व्यवसायाचा विस्तार करायचं ठरवलं. नाशिक हॉटेल्स मध्ये मार्केटींग सुरु केलं तेव्हा लक्षात आलं इथे व्यवसाय विस्तारासाठी भरपूर संधी आहेत. ५०० किलो पासून २ टनापर्यंत व्यवसाय विस्तार केला. नाशिकच्या सीमारेषा ओलांडत मग संपूर्ण नाशिक जिल्हा, औरंगाबाद जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र, गुजरातची बॉर्डर, दमनपर्यंत या उद्योगाचा विस्तार केला हे सगळं करत असताना सात आठ वर्षात असं लक्षात आलं कि या क्षेत्रात दोन टन, तीन टन, चार टनपर्यत आपण उत्पन्न घेऊ शकतो. पण एवढ्यावरच मर्यादित कसं राहायचं आपलं स्वप्न तर याही पुढे जाण्याचं आहे.


image


मग त्यांनी पुन्हा व्यवसाय विस्ताराच्या संधीवर सर्वेक्षण-संशोधन केलं. नाशिक जिल्हा द्राक्षे उत्पादनासाठी अग्रेसर आहे, अनेक जणांनी द्राक्षासाठी शीतगृह उभारले होते, अनेकजण द्राक्ष निर्यात करत होते. “मग आम्ही पण स्वतः द्राक्षाचं उत्पन्न घेतलं आणि दुसऱ्याच्या शीतगृहाच्या मदतीने ते निर्यात केले तेव्हा असे लक्षात आले कि यामध्ये व्यवसायाला भरपूर वाव आहे. म्हणून मग स्वतः शीतगृह (कोल्ड हाउस) उभारण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कडून कर्ज घेतलं तसं प्रोजेक्ट लहान असल्यामुळे त्याला मंजुरी मिळाली आणि कोल्ड हाउस उभारणी झाली २००९ मध्ये द्राक्ष निर्यात करायला सुरुवात केली. तेव्हा एक दोन वर्षातच लक्षात आलं कि हा व्यवसाय वाटतो तेवढा सोपा नाही, त्यामध्ये अनेकदा फसवणूक होत असल्याचं आमच्या लक्षात आलं. अक्षरशः आम्ही पाठवलेली द्राक्षं खराब झाली म्हणून दुसऱ्याची खराब झालेली द्राक्षं आम्हाला दाखवली जायची. त्यामुळे त्या व्यवसायात पुढे जाण्यास फारशी अनुकुलता वाटली नाही आणि आम्ही आमचा मोर्चा मग पुन्हा टोमॅटो प्रक्रिया उत्पादनावर वळवला,” मनीषा सांगत होत्या.

त्यावर्षी टोमॅटो उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं. त्यावेळी मग धात्रक दम्पतीने विचार केला कि एवढ्या मोठ्या प्रमाणात कच्चा माल आपल्या परिसरात उपलब्ध असताना आपण इतर फळांच्या मागे का पळायचं, मग पुन्हा टोमॅटोवर अधिक काय करता येईल यावर संशोधन सुरु केलं, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला सुरुवात केली. टोमॅटो पेस्ट तयार करायची असेल तर काय करावं लागेल. तर त्यासाठी एक दोन जणांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं टोमॅटो पेस्ट बनवण्यासाठी ज्या मशिनरी लागणार होत्या त्या इम्पोर्ट कराव्या लागणार होत्या. मग त्यादृष्टीने प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यास घेतला. त्या म्हणाल्या की, “ सुरुवातीला वाटलं कि, दोन किवा तीन कोटीपर्यंत हे काम होऊन जाईल, पण प्रत्यक्षात २० कोटीचा खर्च येणार होता. आमचं बॅलन्सशीट एक कोटीचं पण नव्हतं, काही लाखातच होतं. पण माझ्यामध्ये एक जिद्द होती हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याची. रिपोर्ट तयार करताना सुरुवातीला खूप अडचणी आल्या. मी सीएकडे गेली तेव्हा त्यांनी तर मला स्पष्टच सांगितलं कि एवढं मोठं स्वप्न काही पाहू नका, तुमचं हे काम होणार नाही. पण माझी जिद्द कायम होती, कारण कुठेतरी आत्मविश्वास होता की आता पुढचा टप्पा गाठायचा आणि त्याच जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी बँक अधिकाऱ्यांच्या मागे लागून प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा हे जाणून घेतलं”. आणि तब्बल दोन वर्ष या रिपोर्टवर काम केल्यानंतर प्रोजेक्ट बँकेमध्ये मंजूरीला गेले, पण नाकारण्यात आले. 


 त्या म्हणाल्या, “पण मी हार मानली नाही थेट बँक ऑफ महाराष्ट्रच्या चेअरमनला गाठले आणि त्यांना रिजेक्शनचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले की, तुमचं बॅलन्सशीट मोठं नाही, त्यामुळे कॅलक्यूलेशन मध्ये ते बसत नाही. तेव्हा मी त्यांना म्हटलं, ठीक आहे तुम्ही मला पाठिंबा दिला तरच माझं बॅलन्सशीट मोठं होईल. ते ऑटोमॅटिक मोठं होणार नाही, मीटिंगमध्ये मी त्यांना अंबानींच उदाहरण दिलं कि ते पहिल्याच दिवशी मोठे झाले नाही. आणि माझा कामाचा अनुभव पहा. या क्षेत्रात मी सक्षमतेने काम करू शकते. अशा पद्धतीने मी त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला.” 

अशा पद्धतीने सहा महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रोजेक्ट मंजूर झाले पण १६ ते १७ कोटीपर्यंतच ही मंजूरी होती. तरी देखील धात्रक दंपतीने परदेशात जाऊन कुठल्या मशिनरी घ्यायच्या याचा अभ्यास केला आणि त्या खरेदी करून वर्षभरात प्रकल्प उभा केला. आणि व्यावसाईक उत्पादन सुरु केले. अशा तऱ्हेचा मोठय़ा क्षमतेचा उद्योग नाशिकमध्ये कार्यान्वित होत असल्याची चर्चा उद्योग- जगतात सुरू झाली होती. ही वार्ता ऐकून हिंदुस्थान युनिलिव्हर एक टीमने या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी भेट दिली. इतक्या प्रचंड क्षमतेने फळांवर प्रक्रिया करण्याचा विचार करणाऱ्या उद्योगाच्या आर्थिक स्थितीची चाचपणी केली. धात्रक दाम्पत्याची कठोर मेहनत आणि दर्जेदार उत्पादन पाहून या टीमने त्यांना मदत करायचे ठरवले आणि तोच या व्यवसायाचा ‘टर्निग पॉइन्ट’ ठरला. मग जागतिक मानकाप्रमाणे त्यांनी उत्पादन घेण्यास सुरुवात केली. टोमॅटो पेस्टचं उत्पादन जेव्हा त्यांनी हिंदुस्थान युनिलीव्हर नेदरलँड्ला ऑफिसला पाठवला तेव्हा त्यांनी वरुण अॅग्रोच्या या उत्पादनाला मान्यता देत ग्लोबल वेंडर म्हणून मान्यता दिली. “त्यानंतर आम्ही आनंदाने उत्पादन सुरु केलं. तेव्हा झालं काय कि दीड महिन्याच्या प्रोडक्शननंतर विजेचं तब्बल १८ लाखाचं बिल आलं. बिल भरण्यासाठी पैसे नव्हते. सगळा पैसा आर्थिक जुळवाजुळव करताना संपला होता. त्यावेळी मोठी अडचण समोर उभी होती. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मग मी माझे सगळे दागिने बँकेकडे ठेवले. कशीबशी आर्थिक जुळवणी केली, हिंदुस्थान युनिलीवरने सुद्धा मदत केली आणि विजेचं बिल भरलं आणि काम जोमाने सुरु ठेवले. पहिल्याच वर्षी आमचा १५ कोटीचा टर्नओव्हर झाला. आणि त्यानंतर कितीतरी पटीने वाढतच गेला. मग मात्र आम्ही कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज आमची कंपनी भारतातली सर्वात मोठी टोमॅटो प्रोसेसिंग कंपनी आहे आमचं ऐशी टक्के उत्पादन हिंदुस्थान युनिलिव्हरला जातं आणि हिंदुस्थान युनिलिव्हर ते जगभरात वितरीत करते. ” मनीषा सांगतात.

टोमॅटो केचअप बनविणारा हिंदुस्थान युनिलिव्हर हा देशातील सर्वात मोठा उद्योग! भारतात आवश्यक त्या प्रमाणात टोमॅटो पेस्ट उपलब्ध होत नसल्याने त्यांना चीनमधून ती आयात करावी लागत असे. त्यांची ही निकड वरुण अ‍ॅग्रोने पूर्ण केली. त्यामुळे या उद्योगाला आता चीनमधून टोमॅटो पेस्ट आयात करावी लागत नाही. 


image


आज केवळ भारतातच नाही, तर युरोपीय आणि आखाती देशांसह जवळपास ८० राष्ट्रांमध्ये वरुण अ‍ॅग्रोची उत्पादने निर्यात केली जातात. अमेरिका व युरोपीय देशांत कृषिमाल पाठवायचा झाल्यास कठोर स्वरूपाचे निकष असतात. त्या निकषांची पूर्तता करून वरुण अ‍ॅग्रो जगभरात प्रक्रिया केलेले उत्पादन निर्यात करीत आहे. हे उत्पादन घेताना प्रतवारी करून फळ प्रक्रियेसाठी स्वयंचलित यंत्रणेत सोडल्यानंतर पेस्ट वा गर थेट पॅकबंद होऊन बाहेर येते. म्हणजे या प्रक्रियेत प्रतवारीचा भाग वगळता मानवी स्पर्श कुठेही होत नाही. टोमॅटोची पेस्ट आणि आंबा, पेरू, पपई, केळी, लिंबू यांचा गर काढल्यानंतर तो १८ महिने चांगला राहील, यादृष्टीने अतिशय विशिष्ट स्वरूपाच्या पिशवीत वेष्टित होतो. आंबा व पेरूच्या गराला परदेशात प्रचंड मागणी आहे. पाच हजार रुपयांत सुरू झालेल्या वरुण अ‍ॅग्रोची वार्षिक उलाढाल आज कोटय़वधीच्या घरात गेली आहे.

ग्रामीण भागातील या कारखान्याने २०० जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. इतकेच नव्हे, तर प्रक्रियेसाठी नियमितपणे कच्चा माल उपलब्ध होण्यासाठी पाच हजार शेतकऱ्यांशी करार पद्धतीने शेती केली जाते. त्यासाठी संबंधितांना बियाण्यांपासून आवश्यक ते संपूर्ण तंत्रज्ञान पुरविले जाते. करारबद्ध शेतकऱ्यांना मार्गदर्शन व तंत्रज्ञान पुरविण्यासाठी वरुण अ‍ॅग्रोने तज्ज्ञांचे स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यातील सुमारे पाच हजार शेतकऱ्यांशी करार पद्धतीची शेती करत त्यांनी संबंधितांच्या कृषिमालाला शाश्वत भाव आणि बाजारपेठही मिळवून दिली आहे.


image


मनीषा धात्रक यांनी सांगितले की, “ त्यांच्या फळप्रक्रिया उद्योग उभारण्याच्या संकल्पनेला त्यांचे पती व सासरच्या मंडळींनी भक्कम पाठबळ दिले आणि उमराळे या त्यांच्या गावातच नापिक जमिनीवर हा प्रकल्प उभा राहिला. आज शेकडो शेतकऱ्यांच्या शेतमालाला तो भरभक्कम आर्थिक आधार देत आहे. जेमतेम ५०० किलो फळांवर प्रक्रिया करून सुरू झालेल्या या उद्योगाने आता दररोज ५०० मेट्रिक टन इतक्या प्रचंड प्रमाणात प्रक्रियेची क्षमता विस्तारली आहे. वर्षभरात या प्रकल्पात एक लाख मेट्रिक टन फळांवर प्रक्रिया केली जाते.”

प्रगतीचे हे शिखर गाठताना धात्रक दाम्पत्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. भांडवल जमवताना जशी कसरत करावी लागली, तसेच प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक ५० परवाने मिळवतानाही प्रचंड दमछाक झाली. धात्रक दंपतीच्या अथक मेहनतीतून साध्य केलेल्या या कामगिरीची दखल विविध पातळीवर घेण्यात आली. हिंदुस्थान युनिलिव्हरने ‘बेस्ट सस्टेनेबल सप्लायर’ तसेच ‘आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट पुरवठादार’ या पुरस्कारांनी वरुण अ‍ॅग्रोला सन्मानित केले आहे. मनीषा धात्रक यांना राज्य शासनाने ‘कृषिभूषण’, तर एबीपी माझा वृत्तवाहिनीने ‘शेती सन्मान’ पुरस्काराने गौरविले आहे. दिल्ली येथील केंद्रीय संस्थेमार्फत दोन पुरस्कारांनी धात्रक दाम्पत्याच्या कामगिरीची नोंद घेण्यात आली.


image


भविष्यातील काय योजना आहेत असा प्रश्न विचारला असता मनिषा धात्रक म्हणाल्या की, “वरुण अ‍ॅग्रो लवकरच फळांचा रस तयार करण्याच्या क्षेत्रात उतरत आहे. मेक इन इंडियाच्या कार्यक्रमामुळे विदेशातील उद्योजकांना येथे येवून काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यामुळे फूडइंडस्ट्रीला खूप मोठे भवितव्य आहे, आम्ही त्या दिशेने जाण्याचे नियोजन करत आहोत.”

 शेतीला उद्योगाची जोड दिली तर मेहनत करणा-या शेतक-याला त्याच्या शेतीच्या मालाला न्याय देता येतो याचे जिवंत उदाहरण धात्रक दांपत्याच्या वरूण ऍग्रो प्रोसेसिंगच्या या उद्योगाने घालून दिले आहे. कोणत्याही शासकीय अनुदानावर विसंबून न राहता धात्रक दाम्पत्याने शेतक ऱ्यांना यशाचा हा राजमार्ग दाखवला आहे. केवळ शेतकरीच नाही तर गरजूंना गावातच रोजगार देवून आणि भारतीय कृषीमालाला निर्यातक्षम बनवून देशाला परकीय चलन मिळवून देणा-या या धडाडीच्या सहजीवनाला म्हणूनच ‘युवर स्टोरी मराठी’चा सलाम !

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.