संपादने
Marathi

शहरांतून उद्यमी आत्मतत्वाची गरज : गुडगाव आयुक्त विकास गुप्ता

Team YS Marathi
22nd Dec 2015
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

पंधराच्या जवळपास जाट मंडळी गुडगावातील महापालिका आयुक्तांच्या दालनात धाडधाड प्रवेश करती झाली. जाट असे धाडधाडच येतात. धडधाकड जाट आणि त्यांचे ते धाडधाड येणे आयुक्तांचे भलेमोठे दालन इवलेसे वाटू लागले. आयुक्तांच्या खुर्चीलगतच्या मोठ्या बाकावर जाट मंडळींनी ठाण मांडले. नेहरू जॅकेटमधील तडफदार आयुक्तांच्या देहबोलीतून ते या मंडळींसमोर फार नमलेले वगैरे आहेत, असे काही वाटत नव्हते. जाट मंडळींत काही तरुण तर काही ज्येष्ठही होते. आयुक्तांसाठी अर्थातच हे रोजचे शुक्लकाष्ठ होते. ही जाट मंडळीही कुठल्या तरी नागरी समस्येने भेडसावलेली होती. तरुणांच्या भेदक नजरांतून वैताग ओसंडत होता. खालच्या पातळीवर त्यांची ओंजळ रितीच राहिलेली होती आणि म्हणूनच ते आयुक्तांपर्यंत धडकलेले होते. त्यांना समस्या सोडवून हवी होती.

गुडगाव महापालिकेचे आयुक्त विकास गुप्ता. वय वर्षे ३८. गुप्तांसाठी असले घेराव रोजचेच. स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वोच्च पदावर गतवर्षी ते नियुक्त झाले आणि तेव्हापासून जणू ते कर्तव्यावर नाहीत तर मोहिमेवरच आहेत! गुडगावातील गतीमान नागरीकरण काही सगळंच छान-छान घेऊन येत नाहीये. पायाभूत सुविधांसंदर्भातील विषमता एकीकडे संघर्षाला कारणीभूत ठरते आहे तर दुसरीकडे मूळ रहिवासी संतप्त आहेत. गुप्ता हे २००१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी. नागरी विकास व्यवस्थापन क्षेत्रातला त्यांचा दांडगा अनुभव आणि त्यांची याआधीची कारकीर्द पाहता अस्ताव्यस्त गुडगावमधील त्यांची नियुक्ती म्हणजे खाचेत चपखल बसलेली पाचरच!

image


गुडगावातील या नियुक्तीपूर्वी गुप्ता हे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था विभागात निदेशक आणि सचिव होते, राज्य नागरी सजगता मोहिमेचे तसेच राज्य नागरी विकास प्राधिकरणाचे निदेशक होते. रोहतक महापालिकेत आयुक्त म्हणून तसेच उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. हरियाणातील त्यांचा एकूणच प्रशासकीय अनुभव हा ध्यासाने भारलेला राहिला आहे.

शांततेचा सौदा

...तर गुप्ता आपल्या एसी कार्यालयात बसलेले आहेत. बाजूला जाट गावकरी आहेत आणि या गावकऱ्यांची आपल्याच गावातील एकाबद्दल तक्रार आहे. तोही हजर आहे. सगळी तक्रार गुप्ता यांनी ऐकून झालेली आहे आणि दोन्ही बाजूच्या मंडळींना गुप्ता यांनी आनंदाने परतवून झाले आहे.

...तर झाले असे होते, की जाट मंडळींनी गावातच एका अन्य युवा ग्रामस्थाने बसवलेल्या कचरा पृथ:करण यंत्रणेबद्दल तक्रार नोंदवलेली होती. एवढेच नव्हे तर या युवा ग्रामस्थाकडून मानसिकदृष्ट्या दुर्बल आणि निराधारांसाठी चालवल्या जात असलेल्या आधारगृहालाही जाट मंडळींचा विरोध होता. एव्हाना ही यंत्रणा आणि आधारगृह चालवणारा युवक जरा जास्तच तापलेला होता. ‘‘मला जर खड्यासारखे बाजूला काढण्यात आले, वाळीत टाकण्यात आले तर मी जायचं कुठं?’’, हा युवक आयुक्तांना उद्देशून बोलला. ‘‘मला जमिनीचा बरोबरीने हिस्सा माझ्यासोबत राहणाऱ्या माझ्या या आप्तांसाठी दिला गेलाच पाहिजे’’, तो पुढे म्हणाला. तक्रारदार ग्रामस्थांमध्येही कमी संताप नव्हता. त्यांना हे आधारगृह गावात नकोच होते. थोड्याच दिवसांपूर्वीच आधारगृहातील काही मनोरुग्ण गावात विवस्त्र हिंडले होते. गावात तरुण पोरीबाळी असतात, कसे वाटते हे सगळे, असा या ग्रामस्थांचा संतप्त सवाल होता. अवघे गाव आधारगृहाविरुद्ध एकवटलेले होते. विशेषत: मनोरुग्णांनी नग्नावस्थेत आधारगृहाची हद्द ओलांडून थेट गावात दाखल होण्याविरुद्ध ही एकजूट जरा जास्तच प्रखर होती.

आपल्या सचिवाशी चर्चा केल्यानंतर आयुक्तांनी या युवकाला आपली यंत्रणा आणि मनोरुग्णांचे आधारगृह हलवायला सांगितले. त्याला पर्यायी जागा यासाठी उपलब्ध करून दिली. पुढे सगळ्यांना महिनाभर वाट बघायला सांगितली. प्रश्न तेव्हा सोडवू म्हणून आयुक्तांनी या सगळ्यांना सांगितले आणि वादळ शमले. पुढे मग हा वाद काही कुणाच्या कानावर आला नाही.

सुरवातीचे दिवस

जयपूरला जन्मलेले आणि वाढलेले गुप्ता जयपुरातीलच प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पदवीधर आहेत. पुढे या महाविद्यालयाचे नामकरण मालविय राष्ट्रीय तंत्रशिक्षण संस्थान असे करण्यात आले, हा भाग अलाहिदा. इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन या विषयात गुप्ता यांनी पदवी संपादन केलेली. लहर म्हणून ते आयएएसच्या परीक्षेला बसले.

गुप्ता सांगतात, ‘‘मी एक सर्वसाधारण विद्यार्थी होतो. पहिल्या दहामध्ये अर्थात माझा नंबर असायचा, पण पहिल्या पाचात कधीही नाही. तुम्ही जर विचाराल की मी इंजिनिअरिंग का निवडले तर त्याचे काहीही उत्तर माझ्याकडे नाही. तरी मला वाटते, की विज्ञान आणि गणितात मला बऱ्यापैकी गती असल्याने हे याच ओघात घडले असावे. इंजिनिअरिंग ही बहुदा माझी स्वाभाविक निवड असावी. पण जर तुम्ही मला विचाराल, की आयएएसकडे कसा ओढला गेलो तर तीही एक लहर असली तरी एक लय तीत होतीच. राजकीय घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करणे माझ्या रक्तात भिनलेले होते. मंदिर-मंडल आंदोलनाचा मी साक्षीदार होतो. तो आक्रोश मी जवळून पाहिला अनुभवला. नववीला होतो मी तेव्हा पण यातले सगळेच मला कळत होते.’’

अभियांत्रिकीत पदवी संपादन केल्यानंतर ‘बिझनेस मॅनेजमेंट’ला ॲअॅडमिशन घ्यावी आणि पुढे आपले बाकीचे मित्र करताहेत तसा कॉर्पोरेटमध्ये एखादा जॉब करावा, असे गुप्ता यांना वाटून गेले होते. तथापि, १९९६ मध्ये एक सिनिअर महाविद्यालयीन मित्र आयएएस अधिकारी झाल्याचे गुप्ता यांनी ऐकले आणि चक्री फिरली.

गुप्ता सांगतात, ‘‘आता कॉर्पोरेट जॉब किंवा मग स्पर्धा परीक्षेतून सरकारी सेवा करावी असे दोन पर्याय माझ्यासमोर होते. एक सिनिअर मित्र जर आयएएस करू शकतो तर आपणही पहावा प्रयत्न करून, असे मनात आले आणि मी त्यासाठी आपले भाग्य आजमवण्याचे ठरवून टाकले.’’

आपल्या ध्येयासाठी गुप्ता यांना तीन सरळ प्रयत्न करावे लागले. गुप्ता म्हणतात, ‘‘माझ्या पहिल्या प्रयत्नात मला रेल्वेत संधी मिळाली, पण मला इथे जायचे नव्हते. तिसऱ्या वर्षी केवळ आयएएस परीक्षेची पुनरावृत्ती करण्यात काही हाशिल नाही, जोडीला आपण कॅटही द्यावी, असे मी ठरवले.’’ आणि या वर्षी गुप्ता यांनी सगळ्या परीक्षा यशस्वीरित्या पार केल्या.

आयुष्यात घडलेला एक प्रसंग गुप्ता आठवतात. म्हणतात, ‘‘या प्रसंगाने माझा आयुष्याबद्दलचा दृष्टिकोनच बदलून टाकला. मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना माझ्या प्रयत्नांना माझ्यातले शंभर टक्के दिलेले नव्हते आणि मला ६५ विद्यार्थ्यांतून २३ वा क्रमांक मिळाला. मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्सच्या व्हायवा टेस्टला मी अगदी काहीही न करत गेलेलो होतो. मला काहीही येत नव्हते. तेव्हा मला कळले, की कठोर परिश्रमाशिवाय आयुष्यात तुम्हाला काहीही मिळू शकत नाही.’’

पुढे ‘कठोर परिश्रमाशिवाय आयुष्यात काहीही मिळू शकत नाही’, हा गुप्ता यांच्या एकुणच आयुष्याचा मूलमंत्र बनला!

लोकसहभाग

नोव्हेंबरमध्ये गुडगावात पार पडलेल्या एका संमेलनात (YS Gurgaon Story event) गुप्ता यांनी लोकसहभागावर कमालीचा भर दिला होता. ते म्हणाले होते, ‘‘गुडगाव महापालिकेसारख्या नागरी स्वायत्त संस्थेची शहराच्या घातांकी वाटचालीतील भूमिका निर्णायक बनलेली आहे. मला वाटते कुठल्याही शहराची प्राथमिक आवश्यकता जर का कुठली असेल तर ती त्या शहरातील लोकांचा कृतीशील सहभाग ही होय. उद्यमी चेतना तर कुठल्याही शहरासाठी अनिवार्य अशीच आहे.’’

दहा ‘स्टार्टअप्स’शी गुप्ता यांनी या संमेलनात संवाद साधला होता. नवोदित उद्योजकांच्या हितासाठी त्यांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी आपण तत्पर असल्याचे अभिवचन दिले होते. नागरी वाहतूक आणि विजेच्या समस्येबद्दल तोडगा काढण्याच्या दिशेने काय काय करता येईल, त्यावर सविस्तर चर्चा केली होती व लगोलग कार्यवाहीच्या हालचालीही केल्या होत्या. गुडगावसारख्या शहरात प्रशासन चालवण्यात आणखीही बरीच आव्हाने आहेत. ग्रामीण आणि शहरी असा झगडा इथं कायमचा आहे. जगण्याचा बैलगाडाकालिन मार्ग आणि जेटकालिन मार्ग असे दोन मार्ग परस्परांविरुद्ध इथं उभे ठाकलेले आहेत. आतले-बाहेरचे वाद आहे. म्हणूनच प्रत्येकाचे समाधान करणारे एक धारदार मनमस्तिष्क असलेल्या प्रशासकाची इथं जरा जास्तच गरज आहे.

विकास गुप्ता यांच्या रूपात या शहराची ही गरज नेमकी पूर्ण होते आहे आणि शहरवासियांच्या प्रश्नांना उत्तरे मिळता आहेत, असे दिसते आहे…

लेखिका : दीप्ती नायर

अनुवाद : चंद्रकांत यादव

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags