३८९ सोनेरी पदकं जिंकणारी पोलादी जिद्द
“आम्हाला समाजाकडून दयेच्या नावाखाली कोणतीही विशेष मदत नकोय, फक्त समाजाने आम्हांला जसं आहे तसं स्वीकारावं, आमच्या आत्मसन्मानाला न दुखवता."
त्या कोवळ्या जीवावर पोलिओने आघात केला. सततच्या वाढत्या तापाने ती मानेपासून खाली पांगळी झाली होती. तब्बल २ वर्ष चाललेल्या इलेक्ट्रीक शॉक ट्रीटमेंटमुळे तिचं शरीर पूर्ववत होऊ लागलं होतं; पण दुर्दैवाने तिच्या कमरेखालचा भाग बरा होऊ शकला नाही, तो तसाच अधू राहिला. कमरेखालचा भाग पूर्ववत होण्यासाठी १५ वर्षे अनेक प्रकारच्या ऑपरेशन्सना तिला सामोरं जावं लागलं. आई-वडिल, डॉक्टर्स, मित्र-मैत्रिणी सगळ्यांनी आशा सोडली. पण तिचा दुर्दैम्य आशावद कधीच अधू झाला नाही. तिचा लढा चालूच राहिला.
शरीरावर आघात करण्यात काळ जरी यशस्वी झाला असला तरी मनाने ती अखंड राहिली. तिच्या या जिद्दीपुढे नंतर काळाला ही मान झुकवावी लागली. व्हीलचेअरग्रस्त एका सामान्य मालथी नावाच्या मुलीचं रुपांतर पद्म पुरस्कराने सन्मानित डॉ. मालथी क. होलामध्ये झालं. अर्जुन पुरस्कार, त्याशिवाय ४०० पदकं. ही आहे एका पोलिओग्रस्त मुलीच्या पोलादी जिद्दीची कथा. आजघडीला डॉ. मालथी क. होला या मथरू फाउंडेशन नावाने बंगळूरू इथे संस्था चालवतात, जी आज भारताच्या ग्रामीण भागातील शारीरिक अंपगत्व आलेल्या मुलांसाठी हक्काचं घर आहे.
डॉ. मालथी क. होला यांच्या स्वभावातला निर्भिडपणा, स्पष्टपणा मनाला वेगळाच आनंद देऊन जातो. जेव्हा त्यांनी युअर स्टोरीच्या मीडिया लॅबला भेट दिली होती, त्यावेळी त्यांचं प्रेरणादायी भाषण त्यांच्या कधीही हार न मानणा-या स्वभावाची ग्वाही देत होतं.
“मला नाही वाटत की मी अपंग व्यक्ति आहे, असेल मी शरीराने अपंग. पण फक्त शरीराचा एक भाग अपंग आहे; माझा आत्मविश्वास नाही,” –इति डॉ. मालथी.
खेळ हेच औषध –
१९५९ साली जेव्हा मालथी होला जेमतेम वर्षाची होती, तेव्हा तिला पोलिओची लागण झाली. त्यावेळी मालथीचे आई-वडिल पद्मावती आणि कृष्णामूर्ती होला, यांच्यासमोर तिच्या उपचारासाठी फार काही पर्याय नव्हते. मालथी ही चार भावंडांत सगळ्यात लहान होती. तिचे वडिल कृष्णामूर्ती आपल्या उदरनिर्वाहासाठी बंगळुरूच्या ग्रामीण भागात हॉटेल चालवायचे.
सुरूवातीच्या दोन वर्षाच्या काळात लहानग्या मालथीला इलेक्ट्रीक शॉक ट्रीटमेंट देण्यात आली. त्यामुळेच त्यांच्या कमरेवरचा भाग पुन्हा कार्यक्षम झाला. पण कमरेखालचा भाग अजूनही अधू राहिला होता. आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था झाली होती. घरच्यांनाही आता काय करावे समजत नव्हते. सरतेशेवटी तिच्या आई-वडिलांनी आपल्या मनाविरूद्ध चिमूरड्या मालथीला चेन्नईच्या ईश्वरी प्रसाद दत्तात्रय ऑर्थोपेडिक सेंटर मध्ये दाखल केले. तिथे ती पुढची १५ वर्षे राहीली. तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलं, त्याशिवाय तिथे तिच्यावर वैद्यकीय उपचारदेखील चालू होते. कमरेखालचा भाग बरा करण्यासाठी अनेक ऑपरेशन्स तिच्यावर झाले. त्याचबरोबरीने ती स्वत:ला शरीराने आणि मनाने मजबूत करण्यासाठी व्यायाम ही करायची, नवनवीन खेळ शिकायची. आणि त्याचवेळी मालथीला लक्षात आलं, की खेळ हे तिच्या आयुष्याचं एकमेव ध्येय बनलंय. डॉ. मालथी म्हणतात की “खेळ ही माझ्यासाठी एक प्रकराची थेरपी होती ज्यामुळे मी वेदना विसरू शकत होती.”
ती एक वेगळीच दुनिया होती. प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या प्रकारचं अपंगत्त्व येतं. वेदना, ऑपरेशन्स, वैद्यकीय प्रकिया, थेरपी या रोजच्याच गोष्टी झाल्या होत्या, त्याबद्दल ना भीती वाटायची ना कंटाळा यायचा. “चेन्नईच्या या केंद्रातील मुलं गरीब घरातून आलेली होती. मुलांच्या अपंगत्वाला कंटाळल्यानेच त्यांचे आई-वडिल त्यांना कधीही परत न घेऊन जाण्यासाठीच इथे सोडून गेले होते. खाणं, शिक्षण आणि वैद्यकीय उपचार केंद्राकडून दिले जायचे,” असं म्हणत जुन्या आठवणी डॉ मालथींच्या डोळ्यांसमोर काजव्यांसारख्या चमकून गेल्या. “रोजच्या होणा-या शारीरिक वेदना आणि मानसिक त्रास यांची सवय झाली होती. आम्ही ठराविक अंतराने होणारी कुठली न कुठली ऑपरेशन्स, त्याहीपेक्षा वेदनादायी फिजिओथेरपी सेशन्सला सामोरे जायचो. याचा मला कितपत फायदा होतोय हे ही समजत नव्हतं; पण हार पत्करायला मी नकार दिला होता.”
तिची लढाई सुरूच होती ती अपंग शरीर विरूद्ध सकंटावर मात करण्याची जिद्द. त्यातच भर पडली ती आणखी एका कठीण परिस्थितीची. १५ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ती आपल्या घरी आली. पण परिस्थिती काहीशी अवघड होती. मासा पाण्याबाहेर काढल्यावर जसा तडफडतो, तशी काहीशी तिची अवस्था झाली. शरीराच्या पराकोटीच्या वेदना ती सहन करू शकत होती, पण अपंग असल्याने मिळणारी लोकांची सहानभूती तिला मानसिकदृष्ट्या अपंग करत होती.
अपंग असण्याची सगळ्यात मोठी वेदना ही लोकांच्या दुय्यम दर्जाच्या वागणूकीमुळे होते. ही वेदना सहन न करता येण्याजोगी आहे. येत्या काळात माझ्या खेळाने माझं मनोधैर्य वाढवलं, मला माझ्या शारीरिक कमतरतेसह जगाला सामोरं जाण्याचं बळ दिलं.
सोनेरी प्रवास...
मालथी यांनी बंगळुरूच्या महाराणी कॉलेजमधून शिक्षण घेता-घेता आपल्या खेळाचं प्रशिक्षण सुरूच ठेवलं. १९७५ ते १९८१ च्या काळात मुंबईतल्या नॅशनल सोसायटी फॉर इक्वल ऑपरच्युनिटीज् फॉर द हॅन्डीकॅप्पड्कडून आयोजित केल्या जाणा-या स्पर्धेत त्या नियमितपणे पदकांची कमाई करत होत्या. १९८१ मध्ये त्यांच्या या कामगिरीची दखल सिंडिकेट बँकेच्या अधिका-यांकडून घेतली गेली आणि त्यांना बँकेत नोकरी मिळाली. त्यानंतर त्यांनी सगळ्या स्पर्धांमध्ये सिंडिकेट बँकेचे प्रतिनिधित्व केलं. गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, व्हीलचेअर रेस, अडथळ्यांची शर्यत अशा स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट सुरूच ठेवली.
१९८८ मध्ये पहिल्यांदा त्यांनी अपंगासाठी असलेल्या पॅराऑलिम्पिक या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला. सीउल येथे या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. परदेशी स्पर्धक या स्पर्धेत आपल्या प्रशिक्षकांसोबत आले होते. त्यामुळे परदेशी स्पर्धकांची कामगिरी अधिक प्रभावशाली वाटत होती. मालथी यांना त्यावेळी प्रशिक्षक परवडण्यासारखे नव्हते, म्हणून त्यांनी परदेशी ट्रेनरच्या कॅसेट्स पाहून ट्रेनिंगला सुरूवात केली. आणि वर्षभराच्या आतच त्यांची कामगिरी एवढी उंचावली की आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी सुवर्ण पदकांची लूट केली. १९८९ मध्ये डेन्मार्क येथे भरलेल्या वर्ल्ड मास्टर्स’ गेम्समध्ये त्यांनी २०० मी. गोळा फेक, थाळी फेक आणि भाला फेकमध्ये सुवर्ण पदकं जिंकली.
१९९६ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार आणि २००१ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्योत्सव पुरस्कार, दसरा पुरस्कार, सार्वजानिक क्षेत्रातील बँकाकडून असामान्य अपंग व्यक्ती पुरस्कार, के.के. बिर्ला फाउंडेशन पुरस्कार, प्रतिभा रत्न... त्यांच्या पुरस्कारांची यादी त्यांच्या आत्मविश्वासाप्रमाणे प्रचंड मोठी आहे.
वयाच्या ५६व्या वर्षी देखील त्या व्हीलचेअरवर असलेल्या सगळ्यात चपळ भारतीय खेळाडू आहेत. “आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ३८९ गोल्ड, २७ सिल्व्हर, ५ ब्राँझ पदकं मी जिंकली आहेत” मालथी सांगतच होत्या. त्यातही मजेदार गोष्ट अशी, की यातली बहुतेक पदकं त्यांनी भाड्यावर घेतलेल्या व्हीलचेअरवर जिंकलीत.
एक नवी सुरूवात अपंगांसाठी...
“माझं आता व्यवस्थित चाललंय, सन्मानपूर्वक आयुष्य मी जगतेय, पण माझ्यासारखे खूप कमी लोक असे आहेत ज्यांना आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळालीच नाही आणि त्यांचं काय ज्यांच्या दारात संधी पोहचलीच नाही” हाच विचार, हीच प्रेरणा घेऊन डॉ. मालथी यांनी २००२ मध्ये शारीरिक दृष्टया अपंग असलेल्या मुलांसाठी फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशन स्थापन करण्याआधी डॉ. मालथी यांनी बराच काळ त्यांचे मित्र कृष्णा रेड्डी, जे पॅराऐथलीट आहेत त्यांच्याशी चर्चा केली. मथरू फाउंडेशनच्या उभारणीला मालथींचे काही जवळचे मित्र, क्रिकेटर व्यंकटेश प्रसाद, अश्विनी नाचप्पा आणि एम. के. श्रीधर यांनी बहुमोल मदत केली. सुरूवातीला फक्त अपंग मुलांना शिक्षण द्यायचे, असं ठरलं होतं. परंतु फक्त शिक्षण न देता ग्रामीण भागातील पोलिओग्रस्त मुलांचं राहणं, खाणं-पिणं, वैद्यकीय खर्च अशा सर्व गरजा पूर्ण करायच्या, असं निश्चित झालं. त्यातही अशी मुलं निवडायची ज्यांच्या घरची परिस्थिती खूपच गरीब आहे किंवा आई-वडिलांना मुलांच्या देखभालीचा खर्च परवडू शकत नाही. “मथरू फाउंडेशनची सुरूवात आम्ही २ मुलांपासून केली, आता मात्र मी अशा २० मुलांची अभिमानी मम्मी आहे,” त्या म्हणाल्या. ही मुलं फाउंडेशनमध्ये त्यांना पहिली नोकरी मिळेपर्यंत राहणार. “आम्हांला वाटतं की त्यांनी या जगात स्वत:च्या पायावर उभं रहावं.”
डॉ. मालथी सिंडिकेट बँकेच्या मॅनेजरसुद्धा आहेत. अ डिफरन्ट स्पिरिट नावाचे त्यांचं पुस्तक २००९ मध्ये प्रकाशित झालं. हे पुस्तक आजघडीला हजारो लोकांना त्यांच्या शारीरिक अपंगावर मात करून सन्मानाने, आत्मविश्वासाने जगण्याची प्रेरणा देतंय...
मथरू चालवणं हे खूप जिकरीचं काम आहे. कर्नाटकातील माराथहाली शहरातून एका लहान घरातून फाउंडेशनचं काम चालतं. दोन कायम स्वरूपी माणसं इथे आहेत. जेवण बनवण्यासाठी यशोदामा आणि इथल्या अपंग मुलांना शाळेत नेण्यापासून ते शॉपिंगला नेण्यापर्यंत सगळी कामं कुमार नावाची व्यक्ति करते. इथल्या मुलांच्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा भार काही डॉक्टर्स स्वत: उचलतात. “फाउंडेशनमधली मुलं पोलिओ आणि सेरेब्रल पाल्सी सारख्या आजारांनी ग्रस्त आहेत. या मुलांच्या हॉस्पिटलचा खर्च आम्ही करतो, परंतु डॉक्टर्स ऑपरेशन्स करण्याचे कोणतेही चार्जेस आमच्याकडून घेत नाहीत.” त्या म्हणाल्या. एका मोठ्या दानशूर व्यक्तिने फाउंडेशनला दोन प्लॉट्स सर्जापूरमध्ये दिलेत, जिथे आणखी ही मुलांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून नवी इमारत बांधण्यात येतेय. “आम्हांला समाजाकडून दयेच्या नावाखाली कोणतीही विशेष मदत नकोय, फक्त समाजाने आम्हांला जसं आहे तसं स्वीकारावं, आमच्या आत्मसन्मानाला न दुखवता” डॉ. मालथी म्हणाल्या.
डॉ. मालथींच्या या सामाजिक उपक्रमाचे तुम्ही देखील साक्षीदार होऊ शकता. त्यांना ई-मेलद्वारे संपर्क साधा : - [email protected]. तसेच त्यांच्याशी संवाद साधा पुढील क्रमांकावर +91 98800 80133