संपादने
Marathi

डॉक्टर बिझ.... लक्ष्य पाच लाख रोजगाराचं

Narendra Bandabe
13th Jan 2016
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

एखाद्या आंदोलनातून काय मिळतं ? आंदोलनातून एक नेतृत्व तयार होते, कार्यकर्ता तयार होतो आणि महत्त्वाचं म्हणजे जगण्याचा एक मार्ग मिळतो. पण ठाण्याच्या सचिन महाजन यांच्याबाबतीत थोडसं वेगळं झालं. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधात सुरु केलेल्या आंदोलनात सचिन सक्रिय सहभागी होते. अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी विचारांमुळे ते या आंदोलनात ओढले गेले. ठाणे आणि मुंबईत त्यांनी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. डोक्यावर ‘मी अण्णा हजारे आहे’ ही टोपी मिरवण्यात वेगळा आनंद मिळत होता. इथंच सचिनमधलं नेतृत्व आकाराला येत होतं. आपल्या बरोबरच्या कार्यकर्त्यांना दिशा देण्याचं काम ते करत होते. ही दिशा फक्त आंदोलनातली नव्हती तर ती विचारांची दिशाही होती. यातून आपलं म्हणणं दुसऱ्याला समजावून सांगण्याची आणि त्याच्या गरजा लक्षात घेऊन त्याला योग्य तो मार्ग दाखवण्याची कलाही सचिनला या आंदोलनातच मिळाली. पुढे आंदोलन राजकिय झालं. सचिन त्यातून लागलीच बाहेर पडले. कारण फक्त राजकारण त्यांना पटणारं नव्हतं. पण आंदोलनात मिळालेल्या शिदोरीतून ‘डॉ.बिझ’ या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केलीय. डॉ. बिझच्या माध्यमातून पुढच्या दहा वर्षात पाच लाख रोजगार तयार करण्याचा मनसुबा सचिन महाजन यांचा आहे. त्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

image


सचिन महाजन मुळचे जळगावच्या रावेरचे... आई-वडील शेतकरी.... पॉलीमर इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण झालं, पण व्यवस्थापनाची ओढ अगोदरपासूनची. कारण पुढे जाऊन स्वत:चा बिजनेस करावा असं त्यांना वाटत होतं. त्यातूनच पुणे युनिवर्सिटीच्या डिपार्टमेन्ट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्समधून (पुम्बा) मार्केटींग क्षेत्रात एमबीए केलं. यावेळीच्या दोन इंटर्नशीपमधून त्यांना स्वत:चा बिजनेस सुरु करण्याचा विश्वास दिला. त्यांनी तो सुरुही केला होता, भरभराटीलाही आला. पण कॉर्पोरेट क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराचा फटका त्यांना बसला आणि ते अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाकडे खेचले गेले. दोन ते तीन वर्षे त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. पण हळूहळू राजकारणाकडे जाणारं हे आंदोलन पाहिल्यानंतर त्यांनी त्यातून माघार घेतली. आंदोलनात मिळालेल्या नेतृत्व गुणाचा वापर स्वत:च्या बिजनेससाठी करता येऊ शकतो का ? या प्रश्नाचं उत्तर होय असं मिळालं त्यातूनच मग डॉ.बिझची संकल्पना साकारली गेली.

image


डॉक्टर बिझची संकल्पना अगदी साधी आणि सोपी आहे. एखादी व्यक्ती खासकरुन छोटे आणि मध्यम स्वरुपाचे उद्योग करणारे बिजनेसमन आप-आपल्या व्यवसायात जास्त पारंगत असतातच. पण ते त्यात इतके अडकतात की अगदी क्लाईंट सर्विस पासून ते अकाऊंटपर्यंत त्यांनाच पहावं लागतं. यातून बाहेर पडण्याचा मार्गच त्यांना सापडत नाही. यामुळे त्या उद्योगाची हवी तेवढी प्रगती होत नाही. हेच सचिन महाजन यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या छोटे आणि मध्यम उद्योगपतींना व्यवस्थापनाचे धडे देण्यास सुरुवात केली. तेच हे डॉक्टर बिझ.

रि-एक्ट आणि गुड-टू-ग्रेट

छोट्या आणि मध्यम उद्योगपतींचं व्यवस्थापन कौशल्य वाढवण्याच्या कार्यक्रमाला सचिन महाजन यांनी ‘रि-एक्ट’ असं नाव दिलंय. हे बिझनेसमन आपल्या व्यवसायात इतके गुंतलेले असतात की त्यातून या सर्व गोष्टींकडे त्रयस्तपणे पाहण्याचा वेळ त्यांना नसतो. रोजच्या व्यापातून बाहेर पडून बिजनेसला वेगळ्या दृष्टीनं पाहण्याचं प्रशिक्षण या ‘रि-एक्ट’ कार्यक्रमामार्फेत देण्यात येतं. खरंतर आपल्या उद्योगाबाबत ही जाणीव या बिझनेसमन्सला स्वत:हून व्हावी अशी याची मांडणी करण्यात आली आहे. स्वत:हून सुरु केलेल्या बिझनेसला ऑटोमेशन प्रणालीत आणण्याचं काम त्याच्याकडून करुन घेण्यात येतं. रोजच्या व्यापातून बाहेर पडून बिझनेस करण्याचा नवा मार्ग दाखवण्याचं काम रि-एक्टमार्फेत केलं जातंय. हे सर्व अगदी वन टू वन म्हणजे प्रत्येक बिजनेसमनला स्वत: प्रशिक्षण देण्याचं काम सचिन महाजन करतात.

image


रि-एक्टचं पुढचं पाऊल म्हणजे गुड-टू-ग्रेट. यातून सामुहिकरित्या या उद्योगपतींचं प्रशिक्षण करणं. डॉक्टर बिझ मार्फेत ५० हजार उद्योगपतींना प्रशिक्षण देण्याचं लक्ष्य आहे. ते प्रत्येकाला वैयक्तिकरित्या देणे शक्य नाही. म्हणूनच हे गुड-टू-ग्रेट. हा १२ महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. ६ -६ बिझनेसमनच्या बॅचेसमधून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यातून नेटवर्किंग आणि उद्योगाला स्वयंपूर्ण बनवण्याचं प्रशिक्षण देणं हे महत्वाचं काम आहे. यातून आपला उद्योग नव्या पातळीवर नेण्याचे धडे देण्यात येत आहे.

image


डॉ. बिझ मार्फेत पुढच्या १० वर्षांत पाच लाख रोजगार तयार करण्याचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं आहे. सचिन सांगतात “आपल्या देशात १५ ते २५ वयोगट असलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अशा या मोठ्या वयोगटाला हाताला काम असणं महत्त्वाचं आहे. हे काम मिळालं नाही तर त्यातून मोठा अनर्थ होऊ शकतो. यामुळेच डॉ.बिझच्या माध्यमातून या ५० हजार उद्योगपतींमार्फत पाच लाख रोजगार सहज उपलब्ध होऊ शकतो. यावर माझा विश्वास आहे”.

imageसचिन यांचा सर्वसामान्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाला त्यांनी नाव दिलंय एकलव्य. काही तरी करण्याची धमक असतानाही केवळ आर्थिक परिस्थिती नाही आणि संधी मिळत नाही यामुळे गरिबीत खितपत पडलेल्यांची संख्या या देशात खूप आहे. मग अशा या लाखो एकलव्यांना एकत्र आणून त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम भविष्यात डॉक्टर बिझ मार्फत करण्यात येणार आहे.

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags