लहानग्या उद्योजकाची मोठी भरारी

लहानग्या उद्योजकाची मोठी भरारी

Sunday April 10, 2016,

3 min Read

जेंव्हा त्याच्या बरोबरीची मुले ही टी20 विश्वचषक पहाण्यात मश्गुल होती, तेंव्हा तो मात्र त्यापेक्षा कितीतरी अधिक महत्वपूर्ण ध्येय गाठण्याच्या तयारीत होता. कारण दोनच दिवसांत हा लहानगा उद्योजक त्याच्या आयुष्यातील एक महत्वाचा करार करणार होता. त्याचे नाव आहे अक्षत मित्तल आणि वय वर्षं अवघं तेरा.... मंगळवारी त्याने ऑड-इव्हनडॉटकॉम (Odd-even.com) या त्याच्या वेब प्लॅटफॉर्मची विक्री केली. गुरगाव स्थित कारपुल ऍप कंपनी ओराहीडॉटकॉम (Orahi.com) ने ही कंपनी विकत घेतली असून, त्यातून अक्षतला मिळालेल्या रकमेची घोषणा मात्र करण्यात आलेली नाही.

गेल्या वर्षी दिल्लीतील खासगी गाड्यांसाठी दिल्ली सरकारने ऑड-इव्हन अर्थात सम-विषम हा नियम लागू केला. राजधानीत प्रचंड प्रमाणात वाढणारे प्रदूषण आणि रहदारीची समस्या रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली होती.

image


पण हा नियम लागू झाल्यानंतर उद्भवू शकणाऱ्या परिणामांचा या चतुर मुलाने आधीच अंदाज बांधला होता. यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला होता, “ जेंव्हा मुख्यमंत्र्यांनी सम आणि विषम क्रमांकाच्या गाड्या एक दिवसा आड वापरण्याबाबत घोषणा केली, तेंव्हाच मी या नवीन नियमाची अंमलबजावणी होत असताना, लोकांना येऊ शकणाऱ्या समस्येबाबत विचार केला होता. कल्पना अशी होती की, एकाच भागात रहाणाऱ्या बऱ्याच जणांना कदाचित सारख्याच ठिकाणी जायचे असू शकते आणि या गोष्टीची त्यांना माहितीच नसते. अशा लोकांमधील संवादाची ही दरी साधणे, हेच माझ्या संकेतस्थळाचे लक्ष्य आहे. त्याशिवाय नवीन ओळखी निर्माण करण्यामध्येही या माध्यमाची मदत होईल.”

यामागील अक्षतचा तर्क अगदी साधाच असला, तरी होता मात्र जबरदस्त.. फक्त सम-विषम तर्कशास्त्र विचारात घेत, विषम दिवशी विषम क्रमांकाच्या गाड्या या माध्यमातून दाखविण्यात येतील तर सम क्रमाकांच्या गाड्या सम दिवशी दिसतील.

कोण आहे हा अक्षत मित्तल?

अक्षत हा नोयडा येथील ऍमिटी इंटरनॅशनल स्कूलमधील नववीचा विद्यार्थी... तो TiE दिल्ली-एनसीआर यंग आंत्रप्रुनर (टीवायई) या कार्यक्रमात सहभागी झाला होता. अक्षय सांगतो की, मोठ्या प्रमाणात सामाजिक परिणाम साधू शकेल, असा उपाय निर्माण करण्याची त्याची नेहमीच महत्वाकांक्षा होती. अगदी लहान वयातच वेबसाईटसाठी कोडींग करण्यास तो शिकला आणि त्यामध्ये त्याच्या वडिलांची त्याला मोठी मदत मिळाली. त्याचे वडील स्वतः एक आयटी उद्योजक आहेत. “ मी एचटीएमएल, सीएसएस आणि जावा कोडींग केले आणि माझ्या वडिलांनी मला पीएचपी कोडींगमध्ये मदत केली,” तो सांगतो.

ऑड-इव्हन.कॉम मागची संकल्पना

त्याच्या संकेतस्थळाच्या पहिल्या टप्प्यावर लक्ष केंद्रीत करताना, अक्षतचे लक्ष्य होते ते विविध फिल्टर्स आणि रिफाईन्ड सर्चच्या आधारे, अशा लोकांना एकत्र जोडण्याचे, ज्यांचे इच्छित स्थळ हे समान आहे. “ हे संकेतस्थळ चालण्यासाठी मी वय, लिंग, व्यवसाय आणि प्रवाशांची प्रवास करायची वेळ या आधारे अल्गोरीदम्स तयार केली. यासाठी तुम्हाला केवळ लॉग इन करणे आणि त्यानंतर तुमची सविस्तर माहिती - ज्यामध्ये नाव, गाडीचा नोंदणी क्रमांक, इच्छित स्थळ आणि प्राधान्य यांचा समावेश असेलेली माहिती भरणे गरजेचे आहे,” तो पुढे सांगतो.

यासाठी वापरकर्त्यांकडे त्यांची स्वतःची गाडी असणेही गरजेचे नाही, ते यामाध्यमातून फक्त सवारीदेखील मिळवू शकतात. मात्र हा नियम उठविल्यानंतरही हे संकेतस्थळ सुरुच आहे. एवढेच नाही तर त्यांचे दुसऱ्या टप्प्यावरील काम सुरु झाले असून, ज्याद्वारे एखाद्या आपत्तीच्या वेळी काळजी घेण्यासाठी म्हणून सुरक्षा कवचांची बांधणी होत आहे. त्याचबरोबर या संकेतस्थळावर वापरकर्त्यांना त्यांच्या फेसबुक किंवा लिक्डइन प्रोफाईलच्या माध्यमातूनही नोंदणी करण्यास सांगण्यात येते, जेणे करुन त्यांच्या खरेपणाची खात्री पटवून घेता येईल आणि त्याचबरोबर आधारकार्ड सारखे सरकारी ओळखपत्रही अपलोड करण्यास सांगण्यात येत आहे.

करार

ओराहीडॉटकॉमने अक्षतच्या कंपनीची खरेदी पूर्णपणे रोख रक्कम कराराच्या माध्यमातून केली असून, तो ओराहीच्या सल्लागार मंडळावर असेल आणि कंपनीद्वारे त्याला मार्गदर्शनही मिळेल.

याबाबत खूपच खूष असलेला अक्षत, एक वर्षभराचा काळ या मंडळाबरोबर घालविण्यासाठीही खूपच उत्सुक आहे. सध्या तरी ऑड-इव्हनडॉटकॉमकडे ३०,००० वापरकर्ते आहेत. या संपादनाबाबत बोलताना ओराहीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण भारती म्हणाले, “ आम्ही यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला कारण, हे नाव खूपच आकर्षक आणि सहज लक्षात रहाण्यासारखे होते. त्याशिवाय, पंधरा एप्रिलपासून सम-विषमचा दुसरा टप्पा सुरु झाल्यानंतर अधिक वापरकर्त्यांची नोंदणी होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

इथून पुढे, ऑड-इव्हनडॉटकॉमचे ग्राहक ओराहीच्या दिशेने वळविण्यात येतील.

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित :

दिल्लीमधील सम विषम योजना ही पर्यावरणासाठी ठरू शकते एक वरदान

११व्या वर्षी डॉक्टरेटची उपाधी मिळवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवणारा 'अमन रहमान'!

स्टार्टअप इंडिया मोहिमेने प्रेरीत बालउद्योजक बंधूंकडून पायाभरणी स्मार्टअप इंडियाची...

लेखक – तरुष भल्ला

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन