टाकाऊतून टिकावू फॅशनेबल वस्तूंचा उपक्रम : कंजर्व !
कचऱ्या पासून फॅशनच्या वस्तू बनविणाऱ्या अनिता अहुजा
अशक्य शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही. प्रतिकूल परिस्थिती त्यांच्या इच्छेला अधिक भक्कम बनवते. नवीन आणि उत्तम ते देणे हीच ज्यांची सवय बनली आहे त्या अनिता अहुजांबद्दल आपण बोलत आहोत. हे एक असे नाव आहे ज्याने अगणित लोकांना दिलासा दिला काही नवीन करून दाखवण्याची प्रेरणा दिली. भोपाळ मध्ये जन्मलेल्या अनितांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. जेव्हा त्या १० वर्षांच्या होत्या तेव्हा त्या परिवारा सोबत दिल्लीला आल्या. शालेय शिक्षणानंतर अनितांनी बीए आणि नंतर साहित्य आणि पाॅलिटीकल सायन्स मध्ये एमए केले. १९८४ मध्ये अनितांचे लग्न झाले. सन १९९४ मध्ये देशात बरीच खळबळ माजली होती. कुठे दंगली चालू होत्या तर कुठे मंडल आयोगामुळे वातावरण धुमसत होते. अशा वातावरणात अनितांचे संवेदनशील मन हेलावून गेले त्यांनी ठरवले की मनाच्या या अवस्थेला शब्दबद्ध करायचे आणि त्यांनी ‘फ्लेम्स ऑफ फेर्वर’ नावाच्या उत्कृष्ट कादंबरीच्या माध्यमातून हे साध्य केले. या पुस्तकाची भरपूर प्रशंसा झाली आणि पुढे तर या पुस्तकावर एका चित्रपटाचीही निर्मिती केली गेली आणि अनितांचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजले.
सन १९९८ मध्ये जेव्हा दिल्ली सरकारने भागीदारी कॅम्पेन चालवले आणि लोकांना या कॅम्पेन मध्ये सहभागी होण्यास सांगण्यात आले तेव्हा अनिता आणि त्यांचे पती शलभ (जे व्यवसायाने इंजिनिअर आहेत मात्र त्या वेळी सामाजिक कार्यही करत होते) दोघांनी एक स्वयंसेवी संस्था सुरु करून देशाच्या भागीदारीत सहभागी होण्याचे ठरवले. याच विचाराला मूर्त रूप देत दोघांनी कंजर्व इंडिया नावाची स्वयंसेवी संस्था सुरु केली. संस्थेचे उदिष्ट होते कचरा आणि टाकाऊ पदार्थांचा वापर करून त्यांना पुन्हा उपयोगात आणणे. ही कल्पना नवी होती आणि रचनात्मकही. लवकरच याला लोकांचा चांगला पाठिंबाही मिळू लागला या कामा संदर्भात अनिता आणि त्यांचे पती अनेक आरडब्लूओ सोबत संलग्न झाले. सेमिनार्स आणि कार्यशाळांमध्ये जाऊन त्यांनी लोकांना वेस्ट मेनेजमेंट विषयी सांगणे सुरु केले. दिवस रात्र काम करून अधिकाधिक लोकांपर्यंत आपले म्हणणे पोहोचवले आणि लोकांना आपल्या सोबत जोडून घेतले. यानंतर ते एमसीडीच्या लोकांना जाऊन भेटले आणि कचरा वेचणाऱ्या लोकांशी संपर्क साधला. या संस्थे सोबत जोडलेली कोणताही व्यक्ती पगार घेत नव्हती. सगळे जण मिळून मेहनतीने कामाला लागले होते. कचरा वेचणाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले गेले. यामध्ये कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या कचऱ्याला वेगवेगळे करायचे आहे. त्यांच्या करता नवे कपडे बनवले गेले आणि कचरा उचलण्या साठी नव्या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. २००२ च्या नंतर संस्थेला दिल्ली सरकार, पर्यावरण मंत्रालय, यूएसएआईडी आणि जागतिक बॅके कडूनही अनुदान मिळू लागले. मात्र या नंतर कंजर्व ने विचार केला केवळ प्रबंधना व्यतिरिक्त काही असे करायला हवे ज्याने कचरा वेचणाऱ्या लोकांनाही नियमित रोजगार मिळेल, त्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांच्या आयुष्याला आकार प्राप्त होईल. या सोबतच त्या देशासाठी सुद्धा काही नवे आणि चांगले करू इच्छित होत्या. तेव्हा अनितांनी पर्याय शोधणे सुरु केले मात्र नक्की कोणत्या दिशेला काम चालू करावे हे सुचत नव्हते. मनात अनेक प्रकारचा कल्पना येत होत्या, अनेक विषयांवर विचार झाला. बरेच नियोजन करण्यात आले. रात्र रात्र जागून इंटरनेट चाळले गेले.
सुरवातीला अनेक गोष्टींवर प्रयोग झाले आणि अखेरीस प्लास्टिक हँडबॅग बनवण्यावर एकमत झाले. या आधी कचऱ्याचे केवळ काम्पोष्ट बनवण्यात येत होते आता प्लास्टिक पासून बॅग बनवणे सुरु झाले. प्लास्टिकच्या पिशव्यांना आधी धुतले जाते आणि मग त्यानंतर प्लास्टिक पिशव्यांची एक चादर बनवली जाते आणि पुढे या सपाट चादरीं पासून हँडबॅग बनवले जातात. हळूहळू या कामानेही जोर धरला आणि आता या कामाचे वार्षिक उत्पन्न ७० लाखांहून अधिक आहे. केवळ देशातूनच नाही तर विदेशातूनही अनेक जण आता या हँडबॅगची मागणी करू लागले आहेत. या हँडबॅग दिसायला अत्यंत आकर्षक आहेतच सोबत त्या चांगल्या टिकाऊ आणि मजबूतही आहेत.
'कंजर्व' आज ३०० पेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळवून देत आहे. येणाऱ्या काळात ही संख्या बरीच वाढणार आहे. आज प्लास्टिक च्या पिशव्या एक समस्या बनल्या आहेत. हिमाचलप्रदेशने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली आहे. कचऱ्यात फेकलेल्या या पिशव्या निसर्गतः नष्ट होण्यास मोठा कालावधी लागतो. रस्त्यांना या पिशव्या खराब करतातच सोबत गटारांना ही तुंबवून ठेवतात ज्याने पर्यावरण आणि मानवी जीवन दोघांवर परिणाम होतो. आशा वेळी प्लास्टिक चा असा रचनात्मक उपयोग निश्चितच प्रशंसनीय ठरतो. आपल्या या यशा नंतर कंजर्व आता कुशन्स, लॅम्पशेड, पादत्राणे या सारखी उत्पादनेही बनवत आहे.
आज अनिता अहुजा लोकांसाठी सामाजिक कार्याव्यतिरिक्त एक उदाहरण बनल्या आहेत. अनिता यांनी दाखवून दिले आहे की कोणतेही काम कधीच लहान नसते. जर चिकाटी आणि प्रामाणिक पणे काम करत राहिलो तर लहानसे दिसणारे काम देखील तुम्हाला समाजात एक वेगळी उंची देऊन जाऊ शकते. वेस्ट मटेरिअल चे हे काम अनिता यांच्याकरिता केवळ एक व्यवसाय नाही. हे काम त्यांना मनःशांती देते, ही त्यांची स्वप्नपूर्तीची गोष्ट आहे. एक असे ध्येय ज्या सोबत अनेक जण जोडले गेले आहेत आणि याच्या आधारे आपले आयुष्य जगत आहेत. अनिता यांचा प्रयत्न आहे की त्या लोकांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा जे या देशाच्या सफाई कामात मदत करतात मात्र तरीही २ वेळचे अन्न मिळवणे त्यांना कठीण जाते. कचरा वेचणारे महिन्याला केवळ १५०० ते २००० पर्यंतच कमवू शकतात.यात सगळ्यात मोठी संख्या महिला आणि लहान मुलांची आहे. बऱ्याचदा कंत्राटदार यांना जेमतेम पैसेच देऊ करतो. नेहमी घाणीत राहिल्याने यांना अनेक प्रकारच्या आजारांनाही सामोरे जावे लागते मात्र याची दखल घेणारही कोणी नाही. 'कंजर्व' या वर्गासाठी एक आशेचा किरण सिद्ध होतोय. अनिता यांचा हा प्रयत्न एक प्रशंसनीय पाउल आहे. त्यांच्या या प्रयत्नात प्रत्येक वर्गातील माणसे जोडली गेली आहेत. मग त्या हँडबॅग बनवणाऱ्या महिला असोत अथवा कचरा वेचणारे लोक. अथवा मग श्रीमंत लोक जे त्यांच्या या हँडबॅग खरेदी करतात. आज 'कंजर्व' देशात पसरलेल्या कचऱ्याला वेचून त्याचा योग्य उपयोग करत आहे.