‘लेदर’च्या देखभाल-दुरुस्ती अन् रि-फिनिशिंगसाठी ‘लेदर लाँड्री!’

18th Oct 2015
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

‘दी लेदर लाँड्री’च्या संस्थापिका मल्लिका शर्मा थोडे गतकाळात जातात आणि भरभरून बोलतात… ‘‘मी २३ वर्षांची होते. मला अजूनही आठवते. एकदा माझ्या आईला बिलगुन मी फार रडले होते. मी आईला म्हणत होते, की आई तू मला पुरते पुस्तकी बनवून ठेवलेय अगं. अभ्यासातलं सगळं मला येतं, पण समाज, जग-दुनियेतलं काहीही कळत नाही मला. तुझी कडक शिस्त आणि सतत माझ्यावर असलेले डोळे… यामुळे मी अभ्यास एके अभ्यास तेवढे केले. अभ्यासाशिवाय काहीही केले नाही. माझे वर्गमित्र-मैत्रिणी वर्गाला खुशाल दांडी मारायचे, मजा करायचे, पाटर्या उडवायचे. एवढेच काय प्रेमातही पडायचे, पण मी यातलं काहीही केलं नाही. माझ्या खुप साऱ्या गोष्टी करायच्या राहून गेल्या त्या राहूनच गेल्या’’

मल्लिका पुढे म्हणतात, ‘‘आणि आज मी तेव्हा आईला जे काही बोलले, त्याच्या अगदी उलट विचार करते. एक चांगला विद्यार्थी म्हणून जे जे उत्पादक, निर्मितीक्षम गुण आणि लक्षणे आवश्यक असतात ती ती सर्वच खरंतर कुठल्याही निर्मितीक्षम कार्यासाठीही गरजेची ठरतात. आईच्या शिस्तीचा मला आज उपयोगच होतो. परिपूर्णतेचा मला ध्यास आहे. रखडलेली कामे पूर्ण व्हावीत म्हणून सतत मागोवा घेण्यात, त्या कामांचा पाठलाग पुरवण्याचा कंटाळा मला नाहीच. आज मला काय काय कामे करायची आहेत, ती मी एका कागदावर लिहून काढते आणि ती सगळी कामे त्या त्या दिवशी पूर्ण करण्यावर माझा भर असतो. साध्य होऊ शकतील, अशी उद्दिष्टे मी आधीच ठरवून घेते. नेमक्या वेळी नेमके काम झालेच पाहिजे म्हणून माझे वेळापत्रक तयार असते. स्वत:साठी कामे ठरवते. मी प्रामाणिक आहे. वेळा पाळते. हे सगळं कशाचं लक्षण आहे. एका चांगल्या विद्यार्थ्याचंच ना.’’

आईच्या नावाने एकेकाळी बोटे मोडणाऱ्या मल्लिका यांना आता आईचे ते शिस्तीचे धडे किती उपयोगाचे आहेत, हे आता चांगलेच उमगलेले आहे. आता तर आपल्या प्रत्येक यशाचे श्रेय ते आपल्या माऊलीला देतात.


image


बरं. आता जरा समजून घेऊया, की लेदर लाँड्री म्हणजे नेमके काय? लेदर लाँड्री नेमके करते तरी काय? कमावलेल्या कातड्यापासून तयार झालेल्या पेहरावांची, सुट्या भागांची, पादत्राणांची धुलाई करते. त्यावर रंगकाम करते. त्यावर दुसऱ्यांदा अखेरचा हात फिरवते. दुरुस्तही करते. कामांच्या दर्जाची पातळी अर्थातच कमालीची व्यावसायिक असते.

मल्लिका यांची कौटुंबिक पार्श्वभूमी

मल्लिका यांच्या वडिलांनी शुन्यातून जग निर्माण केलेले. आपला व्यवसाय स्थिरस्थावर व्हावा म्हणून त्यांनी सतत अकरा वर्षे संघर्ष केला. गेल्या २५ वर्षांपासून हा व्यवसाय उत्तम चाललेला आहे. व्यवसाय कसा चालवावा, ते मल्लिका अर्थातच वडिलांकडून शिकल्या. वडिलांचे व्यावसायिक कौशल्य मल्लिका यांच्यासाठी नेहमीच प्रेरणेचा मुख्य स्त्रोत राहिले. तर मल्लिकासह चारही मुलांवरील चांगल्या संस्कारात आईचा मोलाचा वाटा. मल्लिका यांच्या दोन्ही मोठ्या बहिणीही यशस्वी व्यावसायिक आहेत. एका वाक्यात सांगायचे तर संपूर्ण कुटुंब उद्यमी आहे.

लेदर लाँड्री कशी सुरू झाली?

मोठी बहिण नेहा यांनी मल्लिका यांना तू लेदर प्रॉडक्टस्साठी लाँड्री सर्व्हिस सुरू कर म्हणून सुचवले. एकदा संध्याकाळच्या वेळेला दोघी कॉफी घेत होत्या, तेव्हा हा विषय झाला. मल्लिका यांना ही कल्पना आवडली. कल्पनेला मूर्त रूप द्यायला त्यांनी सुरवातही केली.

शर्मा भगिनींनी ब्रिटनमधून वित्तपुरवठा आणि अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. शर्मा भगिनी या आपल्या व्यावसायिक उपक्रमाला नेहमीच अद्ययावत ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. शिवाय मल्लिका या एक प्रमाणित लेदर केअर टेक्निशियन आहेत. ब्रिटनमधल्याच एलटीटी या लेदर केअर तंत्रात जगप्रसिद्ध असलेल्या संस्थेत कमावलेल्या कातड्याची सर्वश्रेष्ठ निगा म्हणजे काय आणि कशी, हे त्या रितसर शिकलेल्या आहेत. प्रत्येक प्रकारच्या लेदरची स्वच्छता, निगा हे तंत्र तर त्यांना आत्मसात आहेच. शिवाय कलर मिक्सिंग, रिपेअरिंग, रिस्टोरेशन आणि रिकलरिंगमध्येही त्या मातब्बर आहेत.

लेदर लाँड्री सुरू करण्यापूर्वी मल्लिका संशोधन, नेमका आराखडा अशा कितीतरी प्रक्रियांतून गेल्या. ब्रँडेड लेदर प्रॉडक्टसच्या रिपेअरिंगसाठी फार वेळ लागतो. काही महिनेही उलटतात. चारच महिन्यांपूर्वी आपला व्यवसाय सुरू करणाऱ्या मल्लिका सांगतात, ‘‘लेदर प्रॉडक्टशी निगडित काही समस्या उद्भवली म्हणजे लोक थेट त्या-त्या ब्रँडेड लेदरच्या शोरूममध्ये जात. शोरूममधून हे लेदर प्रॉडक्ट मग एक तर देशातील अन्य शहरात किंवा मग थेट परदेशातही दुरुस्तीसाठी पाठवले जाई. यात वेळ जाणारच ना. खर्चही जास्तीचा लागणार.’’

स्थानिक सेवा पुरवठादाराचे महत्त्व

आता कुणालाही वाटणारच जर स्थानिक पातळीवर दुरुस्ती आदी सेवा देणारा पर्याय उपलब्ध असेल तर तो का म्हणून आजमवू नये? लेदर लाँड्रीने दोघा ब्रँडशी आता भागीदारीही केलेली आहे. हे ब्रँड लेदर लाँड्री सर्व्हिस हवी असलेल्या आपल्या सगळ्या ग्राहकांना मल्लिका यांचे, मल्लिका यांच्या प्रतिष्ठानाचे नाव सुचवतात. मल्लिका यांना आता जास्तीत जास्त ब्रँड्सशी टायअप करायचे आहे. विशेषत: मुख्यालय अन्य मेट्रो शहरांतून आहे, अशा ब्रँडशी टायअप करण्यावर मल्लिका यांचा भर आहे. जेणेकरून लेदर लाँड्री सुविधेसाठी त्या डोअर पिक अप सुविधा उपलब्ध करून देऊ शकतील. अशा टायअपने त्या ब्रँडसचा फायदाच होतो, असे मल्लिका यांचे मत आहे. कारण लेदरशी निगडित प्रत्येक प्रकारच्या सर्व्हिससाठी तो ब्रँड म्हणजे वन-स्टॉप-शॉप म्हणून ओळखला जातो. इथून माल घेतला म्हणजे खराब झाला तर इथेच दुरुस्त करून मिळतो, अशी त्याची ख्याती पसरते. लेदर फर्निचर क्लिनिंग क्षेत्रात उतरण्याचाही मल्लिका यांचा मानस आहे.

मल्लिका म्हणतात, ‘‘आपल्याकडे भारतात लेदर लाँड्री ही व्यवसाय संकल्पनाच नवीन आहे. किंबहुना अगदीच प्राथमिक अवस्थेत आहे. भारतीय ग्राहकांना याची ओळख व्हायलाही आणखी काही वेळ जावा लागणे शक्य आहे. पण दुसरीकडे ग्राहक दिवसेंदिवस जागरूक होत चाललेला आहे. लोकांची खरेदीक्षमता, खर्च करण्याची क्षमता वाढत चाललेली आहे. लवकरच लेदर लाँड्रीचा हा व्यवसाय वेग धरेल.’’ त्या हा मुद्दाही स्वीकारतात, की ही व्यावसायिक संकल्पना अगदीच नवीन आहे, असेही नाही. भारतात या क्षेत्रात आधीपासूनही व्यावसायिक आहेत. आता हे पाहणे औत्सुक्याचे आहे, की मल्लिका आपला व्यवसाय इतरांच्या तुलनेत कशा पद्धतीने करतात.

दिल्लीकर व्यावसायिक मल्लिका पुढे म्हणतात, ‘‘मी कधीही दराचे युद्ध खेळून, आपला रेट कमी करून स्पर्धक व्यावसायिकांना जेरीला आणण्याची योजना बनवलेली नाही. मला माझ्या कामाच्या गुणवत्तेवरच लक्ष पुरवायचे आहे. पॅकेजिंग, डिलिव्हरी तसेच अत्युच्च दर्जाची सेवा पुरवण्यावर भर देऊ इच्छिते. नम्रपणे, शिष्टाचारपूर्वक आणि वेळेत सेवा देणही त्यात आलेच. क्वालिटीला पसंती देणाऱ्या ग्राहकांवरच आमचा भरही आहे.’’ लोक अगदी आजी-आजोबांच्या काळातले लेदर प्रॉडक्ट घेऊन मल्लिका यांच्याकडे येतात आणि ही वस्तू कशा पद्धतीने रिस्टोर (संरक्षित) केली जाऊ शकते, त्याविषयी त्यांचा सल्ला विचारतात, तेव्हा मल्लिका यांना विशेष आनंद होतो. आपल्या व्यवसायात मजबुतीने पाय रोवून उभ्या असलेल्या मल्लिका स्त्रीवादी आहेत. वाचन आणि पर्यटन हे त्यांचे छंद आहेत.


image


मल्लिका टेनिसही उत्तम खेळतात. शिक्षणाचा तर त्यांना नादच आहे. सध्या त्या दिल्ली ‘आयआयएचआर’मधून ‘मानवाधिकार’ या विषयावर डिप्लोमा करताहेत.

Want to make your startup journey smooth? YS Education brings a comprehensive Funding and Startup Course. Learn from India's top investors and entrepreneurs. Click here to know more.

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

Our Partner Events

Hustle across India