पर्यावरण संवर्धनाच्या जाणीव जागृतीसाठी ज्ञानाची कवाडे उघडून देत आहे, बर्जे दंपतीचे ‘कारवी ग्रंथालय’ !

14th Feb 2017
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

ग्रंथ हेच आपले गुरु, मित्र आणि वाटाडे असतात, असे वचन आहे, आजच्या माहितीच्या युगात तर याची प्रचिती पदोपदी येत असते. मात्र आजच्या धकाधकीच्या आणि आधुनिकतेच्या जगात एकुणच वाचनसंस्कृतीचा लोप होताना दिसतो, अशा काळात कुणी आपली नोकरी सोडून ग्रंथालय आणि ते देखील पर्यावरण आणि निसर्ग या विषयाला वाहिलेले ग्रंथालय चालवित असेल असे तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेला ना! होय अहो, हे प्रत्यक्षात घडले आहे आणि पुण्या-मुंबईत नाहीतर नाशिकात! हे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे नाशिकरोडला असलेल्या अजित बर्जे आणि त्यांच्या पत्नी मनीषा यांनी सुरु केलेले ‘कारवी’ संसाधन ग्रंथालय हे होय! रहिवासी इमारतींच्या दाटीवाटीत हरवलेल्या या वास्तूमध्ये पर्यावरण आणि निसर्ग संरक्षण तसेच संवर्धनाचेही काम चालते.


image


या उपक्रमाच्या सुरुवातीची कहाणी जाणून घेण्यासाठी ‘युवर स्टोरी मराठी’ने त्यांची भेट घेतली. त्यावेळी बोलताना बर्जे म्हणाले की, त्यांची शहरी जीवनशैली होती, नोकरी, संसार यात सारे काही चांगले चालले होते मात्र मनात कुठेतरी काहीतरी वेगळे करण्याची आस होती रोजच्या शहरी धकाधकीच्या जीवनापेक्षा वेगळे नैसर्गिक जीवनशैलीत काहीतरी करावे या शोधासाठी त्यांनी बरीच पायपीट केली. त्यातच त्यांना आरोहण या संस्थेच्या अभ्यास दौ-यात जावून शिकण्याची संधी मिळाली. हा अभ्यास दौरा झाल्यावर त्यांनी नेरळ येथील चंद्रशेखर भडसावळे यांच्या सगुणा बाग मध्ये जावून वर्षभर शेती आणि संबंधित प्रयोगांचा अभ्यास केला, मात्र शहरी पिंड असल्याने शेती पेक्षा वेगळ्यापध्दतीने निसर्गाचे काम करता येईल का याचा शोध त्यांनी जारी ठेवला. ते म्हणाले की, “ जॉब सोडल्यानंतर रिकामेपणा आला अर्थिक संकट समोर होते, घरात येणारा पैसा बंद झाला होता. मात्र मनात काहीतरी करुन दाखवायची आस होती, दरम्यानच्या काळात दुबईत जावून जॉब करण्याची ऑफर आली होती, मात्र निसर्गाच्या जवळ जाण्याचा ध्यास होता.” त्यामुळे त्यांनी केवळ याच गोष्टीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांना पर्यावरणप्रेमी दिलीप कुलकर्णी यांच्याकडूनही बरेच मार्गदर्शन मिळत राहिले आणि आठ वर्षांपूर्वी २००९च्या सुमारास त्यांनी स्वतः बरोबरच लोकांना निसर्गाबाबत आणि त्याच्या संवर्धनाबाबतच्या माहितीसंबंधी उद्यूक्त करण्यासाठी त्यांचे स्वत:चे पुस्तक संकलन सुरु केले. ते म्हणाले की, आजच्या काळात ग्रंथालयात जावून पुस्तक बदलणे सर्वाना शक्य होत नाही म्हणून घरपोच सेवा सुरु केली. तीन वर्षांपूर्वी कारवी हे पहिले आणि एकमेव ग्रंथालय होते ज्यांनी ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी सोबत भागीदारी केली.


image


 बर्जे यांनी सांगितले कि ब्रिटीश कौन्सिलच्या शैक्षणिक व ज्ञानवर्धक अशा सव्वा लक्ष इ-बुक्स चा उपयोग बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी, डॉक्टरांसाठी, सनदी लेखपालांसाठी, आणि इतर व्यावसायिकांसाठी होतो. सध्याच या संकलनात शैक्षणिक अभ्यासाची पुस्तके, ज्यात कृषी पासून सैन्यदलापर्यंतच्या अभ्यासांचा समावेश आहे. 

आज एक कळ दाबली की आपल्याला हवी ती माहिती उपलब्ध असते, मात्र त्याचवेळी बाजुच्या सहकारी सहनिवासातून ग्रंथालयातून देखील अशाप्रकारे माहिती मिळू शकते हे आपल्याला माहितीच नसते. कारण आज आपण बंद दरवाज्या आड राहून आपल्या ब-याच उपक्रमांना आकार देत असतो. मग ते दूरचित्रवाणीवरचे नाच किंवा गाण्याचे कार्यक्रम असतील किंवा बाहेर जावून केलेले कार्यक्रम असतील. दररोज नव्या नव्या प्रकारची माहिती आणि संकल्पना येत आहेत आणि त्यातून जीवनातील गुंता वाढत चालला आहे.


image


रोज आपण नवी क्षितीजे पार करत आहोत मात्र आपल्या भोवतालच्या निसर्गाला दूरावत चाललो आहोत. ज्या निसर्गाचे आपण अविभाज्य घटक आहोत. जीवन अधिक व्यावसायिक होत जात आहे, कारण सारेजण पैश्यातून आनंद विकत घेण्याच्या खटाटोपात गुंतल्याचे दिसते आहे. परिणामत: आपल्याला हे माहितीच नाही की निसर्गाचा -हास किती आणि कसा होत आहे आणि त्यात आपले काय योगदान आहे किंवा हे थांबविण्यासाठी काय योगदान असायला हवे.

मनीषा बर्जे म्हणाल्या की, “पारंपारिकता जपणा-या कुटूंबातून आल्या कारणाने आणि जेथे जीवनमुल्य हेच जगण्याच्या प्रेरणा आहेत अश्या कुटूंबातून आल्याने आपल्याला सामाजिकतेचे भान मिळते. त्यातूनच कारवी संसाधन ग्रंथालयासारख्या उपक्रमाला चालना मिळाली”.

कारवी या नावाबाबत सांगताना त्या म्हणाल्या की, “कारवी हे सह्याद्रीच्या दुर्गम डोंगररांगात सापडणारे झुडूप आहे, ज्याला सात वर्षातून एकदा फुलोरा येतो ज्याचा मानवी जीवनात अनेक प्रकारे उपयोग होतो. जसे की याचा उपयोग पोटाच्या विकारासाठी केला जातो. याच्या काठ्यांचा वापर आदिवासी झोपड्या उभारण्यासाठी करतात, याच्या फुलांचा मध दुर्मिळ औषधी समजला जातो. मधमाश्यांसाठी ही अन्न देणारी वनस्पती समजली जाते.”
image


मुद्रण व्यवसायातून आल्या कारणाने पुस्तकांचे महत्वाचे स्थान काय आहे, आणि निसर्गाच्या जवळ जाताना त्यांचा किती उपयोग होतो याचा त्यांना अनुभव होता. स्थानिक निर्सग विषयक उपक्रमातून, कृषीविषयक कार्यक्रमातून, किंवा मुलांसाठीच्या खेळघर सारख्या संकल्पनातून संवाद असण्याची आज किती गरज आहे ते दिसून येते.

त्यातून आजच्या काळात निसर्ग संवर्धनासाठी काम करण्याच्या प्रेरणाही जाग्या होतात. कारवीमध्ये मुख्य विषय आहे तो निसर्ग, त्यामध्ये कुणालाही सापडतील ती याच विषयावरील विविध पुस्तके, गोष्टी, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शास्त्रीय माहितीकोशांचा समावेश आहे. या सा-यांचे संतुलन करण्यासाठी इंग्रजीतून अणि मराठीतून वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीचा खजिना असलेली पुस्तके मोठ्या संख्येने येथे पहायला मिळतात. या शिवाय मराठीमधील गाजलेल्या कादंब-यामुळे या ग्रंथालयाच्या खजिन्याला वेगळी झळाळी प्राप्त झाली आहे.


image


“ ग्रंथालयाशिवाय आम्ही गैरव्यावसायिक प्रकाशकांची पुस्तके देखील विक्रीस ठेवतो, जसे की पर्यावरण शिक्षण केंद्राची पुस्तके, किवा राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट, विज्ञान प्रसार, ज्ञान प्रबोधिनी, विज्ञान आणि पर्यावरण केंद्र यांची पुस्तके, बाल पुस्तक ट्रस्ट, प्रथम बुक्स आणि इत्यादी. आमच्याकडे यासाठी वेगळा विभाग आहे जेथे ही पुस्तके तुम्ही खरेदी करु शकता. ही पुस्तके केवळ स्वस्तात मिळतात असे नाही तर अबालवृध्दांना यातील ज्ञानाचा नक्कीच चांगला उपयोग होत असतो.” असे मनीषा बर्जे सांगतात.

निसर्ग स्नेही जीवनशैली आणि पर्यावरण स्नेही विकासनीती यांचा पुरस्कार करणारा व त्या दृष्टीने विचार आणि कृती कार्यक्रम पुढे ठेवणारं गतिमान संतुलन नावाचं मासिक प्रसिद्ध होतं, त्यामध्ये तसेच इतर माध्यमातून अजित बर्जे सातत्याने लिखाण करत असतात.

कारवी ग्रंथालयाच्या माध्यमातून लहान मुलांसाठी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी विज्ञान आणि पर्यावरण संबंधित फिल्म, माहितीपट, कार्यशाळेचे आयोजन केले जाते. केवळ माहितीपटाच्या माध्यमातून नव्हे तर मुलांना प्रत्यक्षात निसर्गाच्या सानिध्यातील अनुभव देण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मनीषा बर्जे यांनी सांगितले.

आम्हाला विश्वास वाटतो की, आजच्या तरुणांना योग्य दिशा आणि माहिती दिली तर ते नव्या उंचीला हा विषय नक्कीच घेवून जातील, त्यातून पर्यावरण संतुलन आणि संवर्धनाच्या क्षेत्रात असामान्य काहीतरी ते निर्माण करतील, ज्यात अनेक प्रकारच्या कर्तृत्वाच्या संधी त्यांची वाट पहात आहेत ज्या मानवी जीवनाला वेगळी दिशा देतील” मनीषा बर्जे यांनी शेवटी सांगितले.

या सारख्या आणखी सकारात्मक गोष्टी माहिती करून घेण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close
Report an issue
Authors

Related Tags

Our Partner Events

Hustle across India