बॉक्सिंग चँपियनचा टेंपो ड्रायव्हर होतो तेव्हा...

होय, बॉक्सिंग चँपियन असलेला, राष्ट्रीय बॉक्सिंग चँपियनशीपमध्ये कास्य पदक जिंकणारा, डोळ्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे महान स्वप्न पाहणारा मृणाल भोसले पुण्यात चक्क मालाचा टेंपो चालवतो. बॉक्सिंगमध्ये वाकबगार असलेला हा गुणी खेळाडू अशा अवस्थेला का पोहचला ? त्याच्या खांद्याला झालेली दुखापतही तो का दूर करू शकत नाही ? त्याच्या स्वप्नांना नेमकं कुणी जायबंदी करून ठेवलंय ? या प्रश्नांची सुटका करणारी आणि वाचकाला विचारप्रवृत्त करणारी ही बॉक्सरची (की सरकारी अनास्थेच्या बळीची ?) कथा.

5th Sep 2015
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

मृणाल भोसलेसाठी जानेवारी २०१५ हे वर्ष नेहमीच विशेष असणार आहे. जीवघेणी दुखापत, अपघातामुळं स्पर्धांपासून दिर्घकाळ दूर राहणं, दुय्यम प्रक्षिक्षण सुविधा, आर्थिक ताण आणि अशा अडचणींच्या काळात नागपूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग चँपियनशीपमध्ये मृणालनं कास्य पदक पटकावलं.

तर या हिरोला तुम्ही कुठे भेटू शकता ? सर्वप्रकारची काळजी घेणा-या आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरवणा-या खेळाडूंच्या चमूत ? नाही. नुकत्याच मिळालेल्या विजयाच्या किर्तीची चैन लुटण्याऐवजी आणि एखाद्या राष्ट्रीय चँपियनला जसा सन्मान मिळायला हवा तो मिळण्याऐवजी, मृणाल आपली रोजीरोटी कमावण्यासाठी पुण्यात मालवाहू टेंपोचा ड्रायव्हर बनलाय. विश्वास बसत नसला तरी हे एक कटू सत्य आहे.

भारत देशाने कधीही आपल्या खेळांडूप्रती दयाभाव दाखवलेलाच नाही. क्रिकेटर काय ते याला अपवाद आहेत. ग्लॅमरस असलेल्या क्रिकेटचे जणू इतर सगळे खेळ आणि त्याचे खेळाडू ही सावत्र भावंडच आहेत.

सरकारी अनास्था आणि परिस्थितीचा बळी ठरलेला बॉक्सिंग चँपियन मृणाल भोसले

सरकारी अनास्था आणि परिस्थितीचा बळी ठरलेला बॉक्सिंग चँपियन मृणाल भोसले


पदक जिंकल्यानंतर सरकारी नोकरी देऊ ही घोषणा प्रत्यक्षात न येता हवेतच विरून गेल्यामुळं आपल्या रोजच्या रोजीरोटीसाठी मृणालला आज संघर्ष करावा लागतोय. बॉक्सिंग हा दोन खेळाडूंचा जवळून शारिरीक संपर्क आणणारा खेळ असल्यामुळं या खेळात खेळाडूला वारंवार दुखापती होत असतात. खेळत असताना मृणालच्या खांद्याला दुखापत झालेली आहे, आणि त्याच्या खांद्यावर ताबडतोब शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

मृणालच्या कुटुंबात एकूण सहा लोक राहतात. वडिल आर्मी वर्कशॉपमध्ये मजूर आहेत, तर आई गृहिणी. दोन मोठ्या बहिणींचं लग्न झालंय आणि लहान बहिण नुकतीच भारतीय पोलीस सेवेत भरती झालीय. सध्या ती हवालदार या पदाचं प्रशिक्षण घेत आहे. अशी बिकट परिस्थिती असतानाही मृणाल भारताला ऑलिंपिक पदक मिळवून देण्याचं आपलं स्वप्न साकार करण्याच्या मागे लागलाय.

मृणालचं स्वप्न काय आहे, त्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय याबाबत जाणून घेण्याच्या उद्देशानं आम्ही ‘सोशलस्टोरी’ च्या वतीनं मृणालशी संवाद साधला.

क्रिकेट ? अतिशय महागडा खेळ

“ मी जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा शाळा सुटल्यानंतर माझ्याकडं भरपूर वेळ असायचा. मी यावेळेत नुसताच इक़डं तिकडं उनाडक्या करत असायचो. मग माझ्या आईबाबांनी विचार केला, की याला असच उनाडक्या करत ठेवण्यापेक्षा याची ऊर्जा खेळ किंवा डान्स अशा उपक्रमांकडं वळवली तर शहाणपणाचं ठरेल. मला क्रिकट खूप आवडायचं, म्हणून डान्सकडं न वळता मी खेळाचीच निवड केली. पण क्रिकेट हा खूपच महागडा खेळ आहे. या खेळासाठी सुरूवातीला बॅट, हेल्मेट आणि पॅड विकत घ्यावे लागतात. या सगळ्या आवश्यक वस्तू विकत घेणं माझ्या कुटुंबाला परवडण्याजोगं नव्हतच.”

 

मग मृणाल बॉक्सिंगकडं कसं काय वळला ? मृणाल तेव्हा १२ वर्षांचा होता. एकदा त्याच्या एका नातेवाईकानं मृणालला खेळताना पाहिलं आणि मृणालनं बॉक्सिंगचं प्रशिक्षण घ्यावं असा सल्ला त्यानं दिला. कारण या खेळासाठी खूपच कमी पैसा खर्च करावा लागतो आणि यात करिअरच्या संधीही ब-याच असतात असं त्या नातेवाईकाचं म्हणणं होतं. एक आनंद देणारा खेळाचा प्रकार म्हणून कोणत्याही मुलानं केली असती त्या प्रमाणच मृणालनंही बॉक्सिंगची निवड केली. मृणाल जेव्हा या खेळाच्या सराव सत्रांमध्ये व्यस्त होऊ लागला आणि इतर खेळाडूंशी संवाद साधू लागला तेव्हा या खेळाच्या पुढच्या शक्यता काय आहेत याची जाणीव त्याला झाली.

नेहरू स्टेडियमच्या महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स क्लब (MIGS) मध्ये मृणाल दिवंगत टी. जे. नाईक ( त्यांचा मृत्यू २०१२ मध्ये झाला ) यांच्या मार्गदर्शनाखाली तासंतास सराव करायचा. बॉक्सिंगच्या माध्यमातून मृणालसमोर आता निश्चित असं धेय्य तयार झालं होतं. दुदैवानं, २००८ मध्ये झालेल्या एका बाईक अपघातात मृणालच्या पायाला दुखापत झाली. यामुळं मृणालसमोर बॉक्सिंगच्या सराव सत्रांना जाणं बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. पूर्णपणे फिट झाल्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजेच २०१० मध्ये कनिष्ठ श्रेणीत खेळल्या जाणा-या बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेण्याचा मग मृणालनं प्रयत्न केला. पण वय वाढल्याच्या कारणावरून ही संधी त्याला नाकारली गेली.

परिस्थितीनं निर्माण केलेला अतिशय कठीण काळ आणि भविष्यकाळाची भकास झालेली अवस्था लक्ष्यात आल्यामुळे मृणालला कमालीचं नैराश्य आलं. त्यावेळी त्याची भेट प्रसिद्ध बॉक्सर मनोज कुमार ( २०१० कॉमनवेल्थ गेम्समध्ये लाईट वेल्टरवेट गटात सुवर्ण पदक विजेते ) आणि विजेंदर सिंग ( २००८ च्या ऑलिंपिकमध्ये कास्य पदक विजेते) यांच्याशी झाली. या दोघांनी मृणालला मोठ्या प्रमाणात प्रेरितही केलं आणि दिशादर्शनही घडवलं. यामुळं मृणालचा गेलेला उत्साह परत आला आणि मृणालनं वरिष्ठ श्रेणीत कमबॅक करण्याचा निर्णय सुद्धा घेतला.

त्याच्या खात्यावर पदक. आता आयुष्य घडलंच म्हणून समजा, मात्र प्रत्यक्षात नाहीच...

नॅशनल बॉक्सिंग चँपियनशीपमध्ये पदक जिंकल्यानंतर मृणालला नेहमीचाच प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला, “ मी पूर्ण तयारी केली होती. मी पदक जिंकण्याच्या स्थितीला पोहचण्याइतपत नक्कीच प्रगती करेन असा मला ठाम विश्वास होता. मला जे जे शक्य होतं ते ते मी केलं. मी शरीरानं आणि मनानंही तयार होतो. जेव्हा आपण सामना खेळायला जातो त्यावेळी प्रत्येकजण थोडा घाबरलेलाच असतो, पण त्यावेळी माझ्या मनात एकच विचार घोळत होता, आणि तो म्हणजे – मला पदक जिंकायचं आहे. जर मी पदक जिंकलं तर मला सरकारी नोकरी मिळेल. आणि एकदा का सरकारी नोकरी मिळाली की मग मला आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. शिवाय मला माझ्या खेळाच्या सरावासाठी विशेष वेळ सुद्दा काढता येईल. मी भारतीय रेल्वेचे संघ पाहिलेले आहेत. बॉक्सिंगवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यांनी खेळाडूंना भरपूर वेळ दिलेला आहे. यामुळं खेळाडूंना जास्त काळ खेळत राहण्याची क्षमता प्राप्त होते. म्हणून मग मी पदक जिंकण्यावर भर द्यावा आणि नोकरी मिळवावी यावरच लक्ष केंद्रीत केलं, जेणेकरून मी देशाला पुन्हा ऑलिंपिक सुवर्ण पदक मिळवून देण्याचं जे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं ते मी पूर्ण करू शकेन. ”

नॅशनल बॉक्सिंग चँपियनशीपमध्ये मृणालनं कास्य पदक जिंकलं. या विजयानंतर मृणालला वाटलं की त्याच्या अडचणी आणि दु:ख आता शेवटचा निरोप घेत आहेत. पण या विजयानंतर जेव्हा जेव्हा त्यानं सरकारी नोकरीसाठी अर्ज केला तेव्हा तेव्हा दुर्दैवानं त्याला वयाचं कारण देत बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

मरण्यापूर्वी गाठायचाय मोठा पल्ला

मृणालनं हार मानली नाही. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करता यावा यासाठी मृणाल या दिवसांमध्ये आता मालवाहू टेंपो चालवतो. हा असा व्यवसाय आहे की ज्यात कामाचे तास पूर्वनिश्चित नसतात. अशा प्रकारच्या कामामुळं मृणाल इतका थकून जातो, की त्याच्यात बॉक्सिंगचा सराव करण्याची क्षमताच उरत नाही. पण त्याच्या विरोधकांना चुकीचं सिद्ध करण्यासाठी तो स्वत:ला दररोज प्रेरित करत असतो.

मृणाल आता महाविद्यालयीन पदवी परीक्षाही देत आहे.

“ प्रत्येकजण म्हणतो की मी पदवी घ्यावी. पण स्पर्धांच्या तारखा आडव्या आल्यानं प्रत्येकवेळी मला परीक्षा देणं जमत नव्हतं. पण मी आता ऑक्टोबरमध्ये परीक्षा देण्याचं ठरवलंय. यामुळं मी आता पदवी मिळवणारच. माझे वरिष्ठ मला सांगतात की मी एक चांगला खेळाडू आहे आणि यापुढंही राहिन, पण मी कधीही शिक्षणाशी तडजोड करू नये. मला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचं आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला नोकरीची गरज आहे. याचसाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यांनी ज्यांनी मला याबाबतीत मार्गदर्शन केलं त्या सर्वांचा मी आभारी आहे.”

समस्यांनी घेरलेला

हे खरं आहे की क्रिकेट या खेळाव्य़तिरिक्त इतर खेळांच्या प्रकारांना जितकं महत्त्व दिलं जायला हवं होतं तितकं दिलं गेलेलं नाही. आपल्या देशात आयपीएलचा फार मोठा विस्तार झालेला आहे आणि या स्पर्धेसाठी पाण्यासारखा पैसा ओतला जातो. त्यात असलेला ग्लॅमर हा भाग आणि त्याला जोडलेल्या मनोरंजन क्षेत्राच्या मजबूत सहकार्यामुळं स्पर्धेच्या या प्रकारानं नव्या खेळाडूंना आपली ओळख निर्माण करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. मृणाल म्हणतो, “ जे लोक खेळत नाहीत पण फक्त संघ निर्माण करतात अशांना मोठे आर्थिक लाभ मिळतात. पण बॉक्सिंग सारख्या खेळाच्या प्रकाराबाबत अशी स्थिती नाही. इतर खेळांना सावत्र मुलांसारखी वागणूक दिली जाते. मला आशा आहे की इतर खेळांची ही परिस्थिती बदलेल आणि त्यांनाही समान महत्त्व दिलं जाईल. मला आत्ता जरी ते करण जमलं नसलं, तरी देखील येणा-या काही वर्षात ही परिस्थिती नक्कीच बदलेल आणि मी ज्या परिस्थितीतून गेलो, जे काही भोगलं त्याचा इतर कुणाला तरी फाय़दा झाला तर मला समाधान मिळेल.

सरकार काय करू शकतं याबाबत मृणालला काय वाटतं यावर छेडलं असता मृणाल आम्हाला विचारतो, “ ज्याला आपली बॉक्सिंग सुरूच ठेवायची आहे अशी श्रीमंत व्यक्ती तुम्ही पाहिली आहे काय? ” बॉक्सिंग खेळणा-या खेळांडूंपैकी बहुतेक खेळाडू हे अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबातून आलेले असतात. त्यांना आर्थिक पाठबळ नसतं आणि आपल्या आयुष्यात येणारा आर्थिक भार उचलता येत नसल्याकारणानं ब-याचदा त्यांना खेळ सोडून द्यावा लागतो. सरकारनं याची दखल घेणं गरजेचं आहे आणि असा एखादा कार्यक्रम आखला पाहिजे ज्याद्वारे खेळाडूंना आर्थिक मदत मिळू शकेल. मृणाल म्हणतो, "मी जिथं सराव करतो त्या क्लबमध्ये अतिशय कमी सुविधा देण्यात येतात. मुलभूत सोयींचा देखील तिथं अभाव आहे. आणि या क्लबमध्ये खूप चांगले खेळाडू आहेत. त्यांनी आपल्या प्रतिभेची चमकही दाखवलेली आहे. पण अशा खेळाडूंना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. या खेळात अत्यंत वाकबगार असलेल्या खेळाडूंना आपल्या जीवनातल्या कठोर वास्तवाशी दोन हात करण्यासाठी खेळ सोडून द्यावा लागलेला आहे. आपल्या देशात असे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत जे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून विजयश्री खेचून आणू शकतात, पण ज्याच्यावर आपलं कुटुंब पोसण्याची जबाबदारी आहे अशी व्यक्ती काय करणार ?"

अशा ब-याच लहान लहान गोष्टी आहेत ज्या माणसाला प्रेरणा देऊ शकतात. एखाद्या खेळाडूसाठी, ती गोष्ट त्याच्या सरावाच्या कीट इतकीही लहान असू शकते, किंवा मग रनिंग शूज एवढीही लहान असू शकते. सुविधांचा अभाव, आर्थिक स्थैर्याचा अभाव आणि दुखापतपूर्व वैद्यकीय मदतीचा अभाव या तीन प्रमुख कारणांमुळं खेळाडू खेळ सोडून देतात. मृणालचा खांदा निखळला आहे. तो ठीक होण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज आहे. पण त्याच्याकडे साधन नाही. मार्ग नाही. ही परिस्थिती पाहून तुम्हाला वाटेल की मृणाल खेळ साडून देईल. पण मृणाल वेगळ्याच मातीचा बनलेला आहे.

मी पाहतो स्वप्नाचं स्वप्न

मृणालचे प्रशिक्षक वारल्यानंतर त्यांनीच प्रशिक्षित केलेले मृणालचे वरिष्ठ त्याला प्रशिक्षण देण्याचं काम करतात. प्रशिक्षक आणि वरिष्ठांच्या गैरहजेरीत मृणालला आपल्या वेळेनुसार लहान मुलांना शिकवायला भरपूर आवडतं. मृणाल म्हणतो, “ पाच वर्षापुढील वयोगटातली मुलं बॉक्सिंगचे धडे गिरवण्यासाठी क्लबला येतात. मला त्यांना शिकवायला खूप आवडतं. त्यांना माझा भरपूर लळा लागलाय. मी कधी क्लबमध्ये नसलो तर माझी विचारणा कऱण्यासाठी त्यांच्या पालकांचे मला फोनही येतात. त्यावेळी मला खूप आनंद होतो.”

“ मला मनोज कुमारांकडून ज्या प्रकारची मदत मिळाली त्यामुळं ते माझे आदर्श बनले आहेत. लोक आता मला केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशभर ओळखतात. माझ्यासाठी मनोज कुमारांनी जे केलं तेच मला इतरांसाठी करायचय.” या मुद्यावर आम्ही मृणालला विचारलं की त्याला एक दिवस स्वत:ची अकादमी स्थापन करून खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचं काम करायचं आहे का? या प्रश्नाच्या उत्तरानं आम्ही आश्चर्यचकित झालो. तो म्हणाला, “ नाही. माझ्या प्रशिक्षकांनी मला या अकादमीत शिकवलं, आणि मी सुद्धा इथेच शिकवीन. माझ्या प्रशिक्षकांची काही स्वप्नं होती; ती पूर्ण न होताच ते हे जग सोडून निघून गेले. कदाचित या मार्गानं मी त्यांची स्वप्नं पूर्ण करु शकतो.”

आम्ही सर्वप्रकारच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहोत. प्रत्येक दिवशी मृणाल प्रायोजकांच्या फोनची वाट बघत असतो. त्याला प्रायोजक मिळाला, तर प्राथमिक गरज असलेल्या रनिंग शूजची जोडी विकत घेण्यासाठी त्याला काळजी करावी लागणार नाही. पुढच्या वेळेस एखाद्या आंतरराष्ट्रीय खेळात आपल्या देशानं निराशाजनक कामगिरी केल्याची तक्रार करण्याअगोदर, हे लक्षात ठेवा की ज्या कोल्ड ड्रींकवर आपलं बोलणं सुरू आहे त्यासाठी मोजलेली रक्कम ही एखाद्या धावपटूची गरज भागवू शकते. पंचतारांकित हॉटेलमधलं जेवण टळल्यान वाचलेली रक्कम त्याच्यासाठी ग्लोव्ह्ज ची जोडी खरेदी करण्याच्या कामी येऊ शकते.

‘मिलाप’, हे भारतातलं छोटी कर्जं देणारं आघाडीचं प्लॅटफॉर्म आहे. आर्थिक मदत देऊ शकतील अशा प्रेक्षकांशी जोडून गरजू लोकांसाठी आर्थिक मदत उभारण्याच्या दृष्टीनं हे प्लॅटफॉर्म मदत करतं. मृणालला आपला बॉक्सिंगचा खर्च भागवता येईल या उद्देशानं मिलाप निधी उभा करून देत आहे. आपणही या प्रयत्नांना हातभार लावू शकता.

आपल्या देशासाठी ऑलिंपिक पदक जिंकावं हे प्रत्येक बॉक्सरचं स्वप्नं असतं. हे मृणालचं सुद्धा स्वप्न आहे. तो म्हणतो,

“ जर मला सरकारी नोकरी मिळाली असती, तर मी बराच काळ खेळत राहिलो असतो, यामुळं मला मोठा दिलासा मिळाला असता, परंतु आता सुद्धा मी खेळत राहणार आहे. जर मी काही प्रायोजक आणि निधी मिळवू शकलो, तर आर्थिक ताणतणावातून मी मला बाहेर काढू शकेन. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि हे प्रयत्न मी सतत सुरू ठेवणार आहे. माझ्या मायभूमीचा झेंडा अधिकाधिका ऊंच फडकवण्यासाठी मी कायम प्रयत्न करतच राहणार आहे.”

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close
Report an issue
Authors

Related Tags

Our Partner Events

Hustle across India