Marathi

त्वचादानाचा प्रचार करणारे देवदूत...संडे फ्रेंड्स

shachi marathe
27th Nov 2015
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

हुंड्यासाठी सासरच्या माणसांकडून जाळल्याच्या घटना, कधी फटाक्यांमुळे भाजलेली लहान मुलं तर कधी आगीत होरपळलेले दुर्देवी जीव...मुंबईतल्या सायन हॉस्पिटलच्या बर्न वॉर्डमधील डॉक्टर्स आणि नर्सेस अशा अनेक पीडितांच्या जखमांवर फुंकर घालत त्यांच्यावर उपचार करत असतात. मात्र काही केसेसमध्ये डॉक्टरांचे प्रयत्न पुरेसे नसतात. भाजलेल्या रुग्णांना तातडीनं गरज असते ती नव्या त्वचेची. आणि नेमकी हीच गरज भागवण्याचं काम संडे फ्रेंड्स करतात. मुंबईतील सायन हॉस्पीटलशी संल्गन असेलेला संडे फ्रेंड्स हा ग्रुप स्कीन डोनेशनसाठी जनजागृती करतो. डॉ.माधुरी गोरे यांच्या प्रयत्नांनी सायन हॉस्पिटलमध्ये त्वचेचं बँकींग सुरु झालं. मात्र या बँकेसाठी गरज होती ती त्वचादात्यांची आणि म्हणूनच एप्रिल २००० पासून संडे फ्रेंड्स सायन हॉस्पिटलमधील पीडितांना नव्या त्वचेचं दान मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करताहेत.

सुरवातीला त्वचा दान करता येते ही माहिती लोकांना सोडा, डॉक्टर्ससाठीही नवी होती. त्यामुळे मग सर्जन्स आणि स्पेशल जनरल फिजिशिअन्स यांच्यासाठी सेमिनार्स घेतले . कारण एखाद्या कुटुंबात जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा सर्वात आधी फॅमिली डॉक्टरला बोलावण्यात येतं. फॅमिली डॉक्टर हा त्या कुटुंबाला ओळखत असतो. त्यामुळे त्या डॉक्टरकडून त्वचादानाबद्दल कुटुंबीयांना कळलं तर त्याचा परिणाम हा सकारात्मक असतो. त्याचप्रमाणे वर्तमानपत्रात जाहिरात दिली आणि माऊथ पब्लिसिटीच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत आमच्या उपक्रमाची माहिती पोहोचली. सायन आणि परिसरात गुजराथी, जैन समाज मोठ्या संख्येनं रहातो. सुरवातीच्या काळात त्वचादान म्हणजे आपल्या धर्माच्या विरोधात आहे की काय अशा भीतीपोटी कोणी पुढे येत नव्हतं. म्हणून मग लोकांची समजूत काढण्यासाठी संडे फ्रेंड्र्सच्या मदतीला जैन समाजातील आचार्य आणि स्वामी यांनीही भाग घेतला. त्यांनी त्वचादानाचं महत्व लोकांला सांगितलं, त्याचाही चांगला फायदा झाला. २००७ पासून त्वचादात्यांची संख्या वाढायला लागली. आज आम्ही अकराशे त्वचादात्यांमार्फत अनेक रुग्णांना जीवनदान दिलंय. त्वचादात्यांच्या माध्यमातून मिळालेली त्वचा ही सायन हॉस्पिटल आणि नॅशनल बर्न सेंटर, ऐरोली इथल्या रुग्णांवरील उपचारांसाठी वापरली जाते, गरजेपेक्षा अधिक त्वचेचं बँकिंग झालं तर इतर रुग्णालयांतील रुग्णानांही उपचार मिळू शकतात.

एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर काही तासांचाच अवधी असतो. अशावेळी अनेक आय बँक आम्हाला मदत करतात. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांच्या संमतीनं डोळ्यांबरोबरीनचं त्वचादानही केलं जातं. मृत व्यक्तीच्या मांडीवरची त्वचा काढून घेतली जाते, त्यानंतर त्या त्वचेवर विविध प्रकारच्या एकोणीस चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांमधून पास झालेली त्वचा 180 डिग्रीपर्यंत स्टोअर केली जाते, मात्र त्वचेची मागणी इतकी असते की स्टोरेज करण्याची वेळच येत नाही.

image


संडे फ्रेंड्स या ग्रुपचे शंभरहूनही अधिक कार्य़कर्ते आज विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवताहेत. आठवडाभर आपली नोकरी आणि व्यवसाय सांभाळून संडेला समाजोपयोगी काम करायचं या भावनेतून जमलेला हा सगळा गोतावळा, म्हणून नाव ठेवलं गेलं संडे फ्रेड्स. आम्ही सगळे कार्यकर्ते, कोणीही मोठं नाही, छोटं नाही. म्हणूनच कोणालाही मुलाखत देताना किंवा आमच्या वेबसाईटवरही तुम्हाला कोणाची नावं किंवा फोटो दिसणार नाही. एक ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणाले. आमचं काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, नाव नाही. ते सांगतात. आज त्वचादानाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण होतेय. आम्हाला मुंबईबाहेरुनही फोन येतात. मात्र सगळ्याच शहरात स्कीन बँक उपलब्ध नाही. ती जेव्हा सुरु होईल तेव्हा त्वचादात्यांच्या संख्येत नक्कीच वाढ होईल.

image


संडे फ्रेंड्स सायन आणि परिसरात अनेक उपक्रम राबवते. रस्त्यावरील गरीब लोकांना अन्नवाटप केलं जातं. सायनमधील लिटिल एंजल्स शाळेतले दोन वर्ग संडे फ्रेंड्सकडून चालवले जातात. जिथे गरीब मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं. तसंच ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं. त्वचेचं दान देणारे हे संडे फ्रेंड्स रुग्णाचं संपूर्ण आयुष्यच सुर्य़ाप्रमाणे उजळवून टाकतात.

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags