संपादने
Marathi

आयआयटी-आयआयएम... लेखकांची खाण! ...आणि खाणीतील हिरा म्हणजे निखिल सचान!!

Chandrakant Yadav
4th Oct 2015
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

निखिल सचानबद्दल ‘मला एवढे आकर्षण असण्याचे कारण नेमके काय? तो एक आयआयटी-आयआयएम पदवीधर आहे म्हणून? वरून एक लेखक आहे म्हणून? ...तर तसे काहीही नाहीये. निखिल सचानच्या पुस्तकातील साचेबद्ध सच्चेपणाच त्याच्याबद्दलच्या माझ्या आकर्षणाचे खरे निमित्त ‘नमक स्वादानुसार’ हा निखिल यांचा कथासंग्रह. आठ वर्षांवर कालावधीत या कथा लिहिल्या गेलेल्या आहेत. एकीकडे या कथा आपल्या नैतिक आणि सार्वजनिक मूल्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करतात तर दुसरीकडे आपल्याला रम्य बालपणातील आठवणींच्या हिंदोळ्यात झुलायला लावतात. प्रत्येक कथेची विषयवास्तू अशी निवडलेली, की वाचकाने प्रेमातच पडावे. अनेक गंभीर विषयांवरील चिंतन या कथांतून आहे. वाचक म्हणून या विषयांकडे तुम्ही बघालच, पण निव्वळ वाचक म्हणून तुम्हाला या विषयांकडे बघू देईल तो निखिल सचान कसला... एक बालक म्हणूनही या विषयांकडे निखिल तुम्हाला अगदी निखळपणे बघायला भाग पाडणारच!

निखिल सचान

निखिल सचान


निखिलकडून हिंदीचीच निवड का?

निखिल यांचे शालेय शिक्षण कानपूरला झाले. नंतर २००५ मध्ये त्यांनी आयआयटीत (भुवनेश्वर) प्रवेश घेतला. झाले एकदाचे आयआयटी. पुढे कोझीकोडेत आयआयएम केले. आयबीए मध्ये कन्सल्टंट म्हणून व्यावसायिक कारकीर्द सुरू केली. ही सगळी धावपळीची वर्षे. हिंदीतून लिहायला निखिल यांना भाग पाडेल, असे काहीही यादरम्यान घडले नाही. भाषेवर आपले किती प्रेम आहे. व्यक्त व्हायला आपल्याला किती आवडते... आणि या सगळ्यावर पाणी सोडायला एक दशक उलटलेले आहे, हेही यादरम्यान निखिल विसरलेले होते. महाविद्यालयातील फुलपंखी दिवसांमध्ये निखिल यांनी रंगमंचावर तसे बरेच रंग उधळलेले. कितीतरी नाटके, एकांकिका लिहिलेल्या आणि दिग्दर्शितही केलेल्या. लघुकथांमध्येही ही वल्ली रमलेली. आणि कविताही कितीतरी प्रसवलेल्या. अचानक हे फुलपंखी दिवस पुन्हा सभोवताली भिरभिरू लागले. निखिल यांची मातृभाषा हिंदी. अर्थातच निखिल यांना इंग्रजीही छान बोलता येते, पण साहित्यात नुसतेच संवाद साधणे महत्त्वाचे नसते, व्यक्त होणे त्यातही अभिव्यक्त होणे अधिक महत्त्वाचे असते. निखिल यांना खोल आतून वाटत होते, की या हृदयीचे त्या हृदयी पोहोचवायचे तर हिंदी हीच माझी भाषा आहे. निखिल म्हणजे हिंदीसह हिंदीचीच भाषाभगिनी असलेल्या उर्दूचेही शब्दभंडार! रिडर्स बेस (वाचकबळ), रॉयल्टी (पैसा) या पलीकडे जाऊन निखिल हिंदीतून लिहिते झाले तेच मुळी हिंदी साहित्याबद्दलच्या आत्मीयतेतून. स्वत: निखिल सचानच सांगतात...‘‘मी अगदी मनापासून सांगतो. पुस्तकविक्रीतून पैसे येतील आणि माझे त्यातून काही भागेल, हा भागच माझ्या मनाला कधी शिवलेला नाही. माझी नोकरी त्यासाठी पुरेशी आहे. हिंदी साहित्यापुरते बोलायचे तर मार्केट शून्य आहे. मरणासन्न अवस्था आहे. मी लिहायला पेन घेतो तेव्हा मला याचे भान असते, की पैसे प्रसवणार नाहीयेत. आणि कदाचित म्हणूनच दर्जेदार कलाकृती प्रसवते!’’


‘नमक स्वादानुसार’ची प्रसवकथा!

आपल्या नावावर एखादे पुस्तक असावे म्हणून नमक स्वादानुसार मुळात लिहिले गेलेले नाही. लेखक अभिव्यक्त होत गेला आणि कथा साकारत गेल्या. कथांमागच्या प्रेरणेबद्दल निखिल म्हणतात, ‘‘बरेचदा आपल्याला रात्री झोप लागत नाही. विचारांची गर्दी डोक्यात गोंधळ घालत असते. अशावेळी जे काही सभोवताली घडत असते, ते पाहतो वा त्याबद्दल काहीतरी वाचतो आणि पुन्हा अस्वस्थ होतो... याच अस्वस्थतेने मला लिहायला भाग पाडले. अगदी एकाच बैठकीत एखादी कथा साकारली, असे झाले नाही. कथेतील पात्रांची रचना, सुचणाऱ्या कल्पनांवरले कोरीव काम डोक्यातून हे असे सगळे कागदावर उतरायला काही दिवस गेलेच...’’


पूर्वीप्रमाणे लेखन आणि प्रकाशन हे आता तितकेसे अवघड राहिलेले नाही. अलीकडे तर लेखकांच्या संमेलनाला एखाद्या नवोदिताने नुसती हजेरी लावली तरी याबाबतच्या समस्या सुटतात. अर्थात नवोदिताला पहिले पाऊल टाकावेच लागते. लेखकांच्या मांदियाळीत एकदाची उठबस सुरू झाली, की प्रकाशकांपर्यंत जाळे भिडायला फार वेळ जात नाही. एमएस वर्डच्या रूपात पुस्तक लिहिण्यासाठीची यंत्रणा उपलब्ध आहे. अगदी पुस्तकाच्या फोर्मेटमध्ये! जवळपासच छपाईची सुविधाही उपलब्ध असते. वितरणासाठी फ्लिपकार्टची सोयही असतेच. निखिल यांच्या या पहिल्या लेखनप्रपंचाचेही याहून वेगळे काही झाले नाही. बरेच जण प्रकाशक शोधण्यातच कितीतरी वेळ घालवत बसतात. काही वर्षांपूर्वी महाविद्यालयात असताना वरचेवर येणारा प्रकाशन व्यवसायातील एक गृहस्थ आठवला आणि निखिल यांनी त्याला गाठले. निखिल यांच्या ब्लॉगचा हा गृहस्थ चाहता असल्याने चहाच्या एका पेल्यात सारे काही जमून आले! शेवटचा हात फिरवलेली कथासंग्रहाची प्रत प्रकाशकाकडे पोहोचती केल्यानंतर दोनच महिन्यांत ते एका छानशा पुस्तकाचे रूपडे लेवून बाजारात दाखल झालेले होते.

image


‘नमक स्वादानुसार’ पुस्तकाचे कव्हर

लेखक हेकेखोर नको, अन् लहरीचा गुलामही नको

आपल्या फुलपंखी दिवसांत हौशी नाट्यलेखन, काव्यलेखन करणारे निखिल सचान आणि आता एका रसिकप्रिय पुस्तकाचे लेखक असलेले निखिल सचान... ‘नमक स्वादानुसार’नंतर असा बराच बदल झालेला आहे. निखिल स्वत:ही ही बाब स्वीकारतात... ते म्हणतात, ‘‘शंभर टक्के खरे आहे. आता मी जेव्हा माझे फेसबुक अकाउंट उघडतो, तेव्हा ते मॅसेजेस्नी आणि कमेंट्सनी गजबजलेले असते. पूर्वी असे इतके नव्हते. लोक आपल्या वेदना, आपला आनंद माझ्या कथांमधल्या प्रसंगांतून वेचतात अक्षरश: आणि लेखक म्हणून ही गोष्ट तुम्हाला फार समाधान देते. वाचक कथांमध्ये समरस होताहेत. कथेतील कुठल्याशा पात्रात स्वत:चा शोध घेताहेत. आपले अनुभव शेअर करताहेत. हे सारे समाधान देणारे असले तरी लेखक म्हणून जबाबदारी वाढवणारेही असतेच. वाचकांच्या समरसतेचा, कौतुकाचा, टीकेचा कुठलाही परिणाम पुढल्या लेखनप्रपंचावर होता कामा नये. मी एक लेखक आहे, तत्ववेत्ता नाही, याचे भान मला सदैव असले पाहिजे. लेखक हा हेकेखोर नसावा आणि आपल्या लहरीचा गुलाम तर कधीही नसावा. सृजनाला ते मारक ठरते.’’


कुणी स्वीकारले काय अन् कुणी नाकारले काय, निखिल हे अलीकडल्या ‘आयआयटी-आयआयएम लेखनजगतातील एक चमकते तारे आहेतच आहेत! स्वत: निखिल यावर भाष्य करताना म्हणतात, ‘‘प्रत्येकालाच व्यक्त व्हायचे असते. कुणाला लेखनातून, कुणाला अभिनयातून, कुणाला बोलण्यातून. चेतन भगत, अमिश त्रिपाठी, रश्मी बंसल आणि अशा कितीतरी ‘आयआयटी-आयआयएम’ जगतातील लिहित्या ताऱ्यांनी आपापल्या अभिव्यक्तीतून प्रकाश उधळलेला आहे. एक नवा पायंडा पाडलेला आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की प्रकाशक मंडळी याच जगतातून लिहिते तारे टिपते आहे वा या जगतातील नवोदितांना प्रोत्साहनही देते आहे, त्यामागचे कारण म्हणजे... या ताऱ्यांच्या लेखनाला वाचक म्हणून तयार असलेले, बसलेले एक मार्केट आधीच अस्तित्वात आहे!’’


उत्तम लेखक व्हायचे, तर हे करा...

लेखन हे केवळ अभिव्यक्तीचे माध्यम मानले म्हणजे वास्तवापासून दूर निघून जाणे हे ओघाने येते... तर म्हणून जेव्हा तुम्ही पुस्तक लिहायला घेता तेव्हा काही पथ्ये पाळली पाहिजेत, थोडी काळजी घेतली पाहिजे. लेखनप्रपंचात बस्तान मांडू इच्छिणाऱ्यांना निखिल यांच्या काही सूचना आहेत... विशेषत: या प्रांतात दबदबा निर्माण करू इच्छिणाऱ्यांना...


१) खूप वाचा. दर्जेदार वाचा. विविध भाषांतले साहित्य समजून घ्या. बेस्ट सेलर्सच्या मोहात पडू नका.

२) ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’पासून सावध रहा. म्हणजे... सध्या बाजारात कुठल्या विषयाची चलती आहे, त्याच विषयावर लिहू, असे करू नका.

३) लिहित असताना तुमची पात्रे समजून घ्या. उमजून घ्या. कारण गोष्ट जर तुम्ही जवळून पाहिलेली असेल तर तिची मांडणी सहजसाध्य ठरते.

४) जशी कलाकृती तुम्हाला सादर करायची आहे, तशीच करा. कुणाचीतरी, कुठलीतरी सूचना तुमच्या कल्पनेतील रचनेला बाधक ठरू शकते.

५) प्रकाशन हा एक व्यवसाय आहे आणि लेखन ही एक कला आहे, ही गोष्ट सदैव ध्यानात असू द्या. प्रकाशक हा बाजारावलंबी असतो तर लेखक हा कल्पनावलंबी असतो, याचा विसर पडू देऊ नका.


निखिल यांनी वाचक म्हणूनही जे जे वाचले, त्याचे संपूर्ण रसग्रहण केले. आनंद घेतला. हिंदीतील उदय प्रकाश, सआदत हसन माँटो, विनोदकुमार शुक्ला या लेखकांनी निखिल यांना आपापल्या जगात फिरवून आणले. जोसेफ हिलर, अरुंधती रॉय आणि मीलन कुंद्रा या अन्य भाषांतील लेखकांच्या रचनाविश्वातही निखिल यांनी मुक्त संचार केला.

जरा बदल म्हणून...


एकदा मायानगरीतही सैर करावी म्हणून निखिल यांच्या मनात येऊन गेले. चित्रपटासाठी लिहावे वाटले. अर्थात यामागेही भुरळ वा पैसा असे काही नव्हते. हिंदीप्रमाणेच हिंदी चित्रपटाबद्दलचे प्रेम हीच या वाटण्यामागचीही एकमेव प्रेरणा, पण निखिल यांनी नंतर स्वत:चीच समजूत काढली. अजून खूप लिहायचेय तुला, असे स्वत:लाच सांगितले आणि मायाजाल विरले तूर्त...


विषयांतर करत निखिल एक प्रसंग आठवतात आणि सांगतात... त्यांना स्मरते, की दिल्लीत रस्त्यावरल्या एका पुस्तक विक्रेत्याला उद्देशून स्टॉलवर हिंदी पुस्तके का ठेवत नाहीस म्हणून त्यांनी टोकले होते. विक्रेता त्यावर म्हणाला होता, की साहेब अहो मी ठेवायचो आधी हिंदी पुस्तके, पण महिना-दीड महिना उलटूनही एकसुद्धा विकले गेले नाही. भरीसभर म्हणून एकदा एक पोलीसदादा आला आणि ती सगळी हिंदी पुस्तके फुकटात घेऊन गेला. आता निखिल काय बोलणार? फुकटात का असेनात, पण कुणीतरी नेलीत एकदाची वाचायला हेच समाधान त्यांना होते. हिंदी पुस्तक बाजाराच्या विदारक स्थितीचे इतके चपखल वर्णन करू शकेल, असे कुठले उदाहरण यापेक्षा उत्तम ठरावे? हिंदी जाणणाऱ्या कोट्यवधी वाचकांशी निखिल यांना या विषयावर वाद घालायचा नाही, की अन्य प्रादेशिक भाषांतील साहित्याच्या स्थितीबद्दल ब्र काढायचा नाही, पण एक विचार जरूर द्यायचा आहे... ‘‘शक्य असेल तर किवा एक बदल म्हणून आपल्या आईबाबांकडून घरात आलेल्या व असलेल्या पुस्तकांवरली धूळ तर आपण झटकू शकतोच... फ्लिपकार्टवरही हिंदी पुस्तके ब्राऊज करू शकतो... आपण हिंदी विसरलोय खरे, पण खरं तर इतकी विसरलेलो नाही... म्हणजे अजूनही तसा फार उशीर झालेला नाही, बस फक्त धूळ झटकण्याची वेळ आहे आणि हिंदीला प्रेमचंदी दिवस आलेच म्हणून समजा...’’

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags