इंग्लंडमध्ये 'एमबीए'चे शिक्षण पूर्ण करून आपल्या गावातील चारा छावण्यांचा प्रश्न मार्गी लावणारा अमेय पाटील
दिवसेंदिवस महाराष्ट्रभर दुष्काळाची छाया गडद होतांना दिसत आहे. त्यामुळे माणसं पाण्यासाठी रात्रंदिवस कोसो दूर भटकत समस्यांना तोंड देत आहे. माणसाच्या बाबतीत हे घडत आहे, तर जनावरांचे काय हाल होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. जनावरांच्या चाऱ्याचा, पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. जनावरांना जगवणे कठीण होऊन बसले आहे. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था तसेच अभिनेतेही सरसावले आहे. उस्मानाबाद जिल्यातील हंडोग्री गावातल्या मूळ शेती व्यवसाय असलेल्या शेतकऱ्याची विवंचना पाहून इंग्लंडमध्ये एमबीएचे शिक्षण पूर्ण केलेल्या अमेय पाटील याने कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीत नोकरी न करता जनावरांच्या चारा छावणीसाठी रात्रंदिवस राबत आहे.
इथल्या चारा छावणीची सर्व जबाबदारी त्याने घेतलेली आहे, इथल्या प्रत्येक पशु मालकांची समस्या निवारण्याचे काम त्याने हाती घेतले आहे. या कामामध्ये त्याने गावातल्या सर्वांनाच सहभागी करून घेतले आहे. अमेयचे वडीलही शेतीसोबत व्यवसाय करतात. अमेयनं पुण्यात बॅचलर इन फाॅरेन ट्रेडचं शिक्षण घेतलं आणि नंतर एमबीए करण्यासाठी इंग्लंडला गेला. तिथले शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या शिक्षणाचा, विशेषतः व्यवस्थापन कौशल्याचा उपयोग आपल्या गावात शेतीसंबंधी जोडधंदा करण्यासाठी करण्याचे त्याने ठरवले. सध्या निर्माण झालेला चारा-छावणी सारखा गंभीर विषय त्याने मार्गी लावला. या क्षेत्रात काय अडचणी येतात आणि त्या कश्या सोडवायच्या हे सर्व त्यांनी जवळून अनुभवले. चाऱ्याची जुळवा जुळव कशी करायची, जनावरांना कुठल्या वेळी काय खाद्य द्यायचे ओला चारा, वाळला चारा, पेंड, वेळोवेळी पशूंना औषधोपचार, पाणी या सर्व सोयी गावात निर्माण केल्या, यामध्ये तिथल्या शेतकऱ्याचीही त्याला साथ लाभली आणि चाऱ्याचा प्रश्न सुटून दुधाचे उत्पादन वाढले.
या गावातल्या चारा छावणीवरील सर्व शेतकरी सुखी समाधानी झाले आहेत. सर्व जनावरांना वेळेवर चारा मिळतो. सोबतच शेतकऱ्यांना १५ दिवसाचा शिल्लक चारा दिला जातो. चारा संपत आला असेल तर, त्यासाठी चारा, ऊस, कुठे मिळेल याचा शोध घेऊन अमेय अन्य शेतकऱ्यांच्या मदतीने चारा उपलब्ध करून देतो. आमच्या गावात शेती हा पारंपारिक व्यवसाय असल्यामुळे शेती विषयी सर्व समस्यांवर वेळीच उपाय शोधले जातात. गावात प्रमुख व्यवसाय हा दुधाचा आहे, शिवाय बारा महिने आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत नाही. आठवड्याला दुष्काळात सुद्धा दुधातून ४ ते ५ हजार रुपये उत्पन्न मिळते. प्रत्येक शेतकऱ्याकडे ४-५ गायी आहेत. त्यामुळे शेतीवर पूर्णपणे अवलंबून न राहता जोड धंद्याकडे वळलो, असे इथले शेतकरी सांगतात.
भारतीय आणि इंग्लंड शिक्षण पद्धतीमध्ये फरक तो काय असे विचारले असता अमेय सांगतो की, "भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये एखाद्या विषयाचा अभासक्रम तयार केला जातो आणि वर्षानुवर्षे तोच अभासक्रम राबवला जातो. त्यामुळे इथले बहुतांश विद्यार्थी पुस्तकाची घोकंमपट्टी करताना दिसतात. इंग्लडच्या शिक्षणपद्धतीत मात्र तसे नाही, तिथे प्रात्यक्षिकांवर जोर दिला जातो. विद्यार्थ्यांना स्वतः निरीक्षण करून संशोधन करावे लागते. तिथले विद्यापीठ संशोधनावर जास्त भर देतात. काहीतरी नवीन करा, नवीन शिका, चुका झाल्यास सुधारणा करा, स्वअध्ययन करा, या पद्धतीचा अभ्यासक्रम तेथे राबवला जातो. जे शंभर वर्षा पूर्वीचे सिद्धांत होते तेच आज उपयोगात न आणता नवीन सिद्धांत मांडले जातात."
अमेय टीम वर्कला जास्त महत्व देतो. चारा छावणी उभारण्याचे श्रेय सर्व शेतकरी तुम्हाला देतात असे विचारल्यावर अमेय सांगतो की, हे सर्व माझ्या एकट्यामुळे नाही तर गावातील सारे शेतकरी, पशुमालक यांचे वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले त्यामुळे चारा छावणीचे व्यवस्थापन करणे मला शक्य झाले. गावात दुधदुभत्याचे प्रमाण वाढले. दुष्काळी परिस्थितीवर यामुळे मात करता आली. शेतकऱ्यांना आधार मिळाला. गावातील काही शेतकऱ्यांनी दुध विक्रीतून येणाऱ्या रकमेतून घरे बांधायला काढली. हंडोग्री गावातील एकही महिला दुसऱ्याच्या शेतात काम करण्यासाठी जात नाही. महिलांना कामाच्या शोधासाठी कुठे जायची गरज नाही, असं इथल्या महिला सांगतात.
'संकटकालीन परिस्थितीत सर्वजण मिळून धैर्याने सामोरे घेल्यास, अशक्य असे काहीच नाही, फक्त प्रयत्न प्रामाणिक असायला हवे' अमेय सांगतो. भविष्यात आपल्या गाव-परिसरातील गावं दुष्काळमुक्त व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं अमेय सांगतो.
यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :