आयटी उद्योगातून आलेल्या कर्मचाऱ्यांची शेती उद्योगात यशस्वी इनिंग- अक्षयकल्प फार्म्स
भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंगळुरूपासून १५० किलोमीटर अंतरावर सध्या शेतीमध्ये आगळेवेगळे प्रयोग सुरू आहेत. आयटी क्षेत्रामध्ये काम करणारे काही तरुण आता शेती करतायत. याच शेतांमध्ये त्यांचं बालपण गेलंय. शेती उद्योजक म्हणून ते शाश्वत अशी सेंद्रिय शेती आणि ग्रामीण दुग्धव्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत. यातील प्रत्येकाला दर महिना ४० हजार ते एक लाख रुपये उत्पन्न मिळतंय. दुग्धव्यवसायाची नव्यानं रचना करुन ग्रामीण उद्योजकतेला नवसंजीवनी देण्याचं काम अक्षयकल्प फार्म अँड फूड्स लि. ही खासगी संस्था करतेय. पशुवैद्यक तज्ज्ञ डॉ. जीएनएस रेड्डी यांनी ही संस्था सुरू केलीये. ग्राहकांना उच्चदर्जाचं आणि पौष्टिक दूध देण्याबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिक फायदाही मिळतोय. तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं ग्रामीण-शहरी अशी दरी कमी करुन ग्रामीण भागातून शहरांमध्ये होणारं स्थलांतर कमी करण्यासही यामुळे मदत होतेय.
भारतात ग्रामीण विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे आणि भारतीय एग्रो इंडस्ट्रिज फौंडेशन (BAIF)चे संस्थापक आणि गांधीवादी डॉ. मनीभाई देसाई यांच्या भाषणाने प्रभावित होऊन डॉ. रेड्डी यांनी त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. सुमारे वीस वर्ष त्यांनी वन, जलसिचंन आणि जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम केलं.
पण अक्षयकल्पचं मॉडेल BAIF मध्ये बसत नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे उद्योग सुरू करण्याचा निर्णय़ घेतला. २०१०मध्ये त्यांनी कर्नाटकमधील तिप्तूर जिल्ह्यात २५ कोटी रुपयांची गुंतवणूक अक्षयकल्प फार्म्सची निर्मिती केली. खेड्यांमध्येच उत्पन्न मिळवणे आणि ग्रामीण भागातील लोकांना सक्षम करणं हा त्यांचा हेतू होता. ३ बाय ३ च्या टपरीतून एखाद्या पानवाल्याला जेवढं उत्पन्न मिळतं तेवढंही उत्पन्न तीन एकर शेती असलेल्या शेतकऱ्याला मिळत नाही, हे बदललं पाहिजे असं डॉ.जीएनएस रेड्डी सांगतात.
क्रिसिलच्या अहवालानुसार देशातील संघटित दुग्धव्यवसाय गेल्या पाच वर्षांपासून (२०११-२०१५) २२ टक्क्यांनी वाढतोय. तसंच २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात या व्यवसायात २०१४ -१५ च्या १९ टक्के दरापेक्षा २५ टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पण बाजारात विकल्या जाणाऱ्या दुधापैकी ७० टक्के दूध हे भेसळयुक्त आणि पिण्यास अयोग्य असल्याचं दूध भेसळीबाबतच्या २०११ च्या राष्ट्रीय अहवालातून सिद्ध झालंय. ग्राहकाला दूधासाठी पैसे मोजलेले असतानाही पौष्टिक दूध मिळत नसेल तर त्याचा उपयोग काय असा सवाल डॉ. रेड्डी विचारतात. त्यांच्या मते दुग्ध व्यवसायावर चुकीच्या पद्धतीने लक्ष केंद्रित केल्याने हे घडत आहे. दर्जा विरुद्ध प्रमाण या वादात कायम गायींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. गायींना बंदिस्त गोठ्यात बांधून ठेवणं, त्यांना मोकळ्यावर चरायला बंधन घालणं, त्यांना कृत्रिम चारा उदा. ढेप खायला देणं, स्टिरॉईड्स आणि कृत्रिक हार्मोन्स इंजेक्शनद्वारे दिल्याने दूधाचं प्रमाण वाढतं पण हानीकारक रसायनांमुळे दुधाचा दर्जा घसरतो आणि ते घातक ठरु शकतं. घरात दूधाचा साठा करुन ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे सोय नसते म्हणून दुधावर प्रक्रिया केली जाते. पण या प्रक्रियेमुळे अ, ब६, ब १२ ही जीवनसत्व तसंच कॅल्शिअम आणि आयोडिन नष्ट होतात. त्यामुळे ते दूध जवळपास मृत झालेले असते आणि इथेच परिवर्तन घडवण्यासाठी अक्षयकल्प फार्म्सचं काम सुरू होतं असं डॉ. रेड्डी सांगतात.
गायीचं दूध काढण्यापासून ते गोठवण्यापर्यंतची सगळी कामं मानवी हातांचा स्पर्श होऊ न देता करण्याचा तंत्र अक्षयकल्पने विकसित केलंय. यामुळे आजारांचा धोका कमी होतो. परिपूर्ण अक्षयफार्मची निर्मिती करण्यासाठी जवळपास २० ते २५ लाख रुपयांची आवश्यकता असते. यात २० ते २५ गायी, अद्ययावत गोठा, दूध काढण्याची स्वयंचलित यंत्रणा, चारा बारीक करणारी आणि दूध गोठवणारी यंत्र, बायोगॅस प्रकल्प आणि जनरेटर इ.चा समावेश असतो. या सगळ्यापेक्षा आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कंपनीचा सगळ्यात जास्त भर असतो तो गायींच्या आरोग्यावर..प्रत्येक गायीला कुठे चरायचं याचं स्वातंत्र्य असतं असं डॉ. रेड्डी सांगतात. त्यांचे गोठे नियमितपणे स्वच्छ केले जातात. गायींवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं नजर ठेवली जाते. त्यामुळे त्यांचं आरोग्य आणि जास्तीत जास्त दूध मिळवण्यास मदत होते. गायींना पौष्टिक अन्न खाऊ घातलं जातं यात सेंद्रिय चारा, मका, नाचणी, ज्वारी, सोयाबीन, वाटाणे आणि चारा याचा समावेश असतो, असं, डॉ. रेड्डी सांगतात. शेतकऱ्यांनी हे सर्व सेंद्रिय पद्धतीनं उगवलेलं असतं आणि तेच गायींना हे सर्व खाऊ घालतात.
स्वयंचलित यंत्रणेद्वारे दूध काढण्यापासून ते गोठवण्यापर्यंत सर्व प्रक्रिया मानवी हातांचा स्पर्श न होऊ देता केली जाते. यामुळे दूध जंतुविरहित करण्याची प्रक्रिया पूर्णपणे टाळली जाते. ही यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी गायींचं शेण आणि गोमूत्र बायोगॅस प्रकल्पाकडे वळवलं जातं. त्यातून मिथेन गॅसच्या मदतीनं या गोठ्यांना आवश्यक असणारा ऊर्जा पुरवठा आठ तासापर्यंत करता येतो. ग्रामीण भागातील विजेच्या समस्येचा विचार करता शेतकऱ्यांना हे फायद्याचं ठरतं.
शेतकऱ्यांना यातून भरपूर फायदा होतो.
• शेतकऱ्यांना त्यांच्या गोठ्याच्या दर्जानुसार महिन्याला ४० हजार ते १ लाखांपर्यंत उत्पन्न मिळतंय. हे उत्पन्न शहरातील व्यक्तींच्या उत्पन्नाच्या बरोबरीने आहे.
• या प्रक्रियेमुळे गायी अत्यंत सुदृढ झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गायीमागे दुधाचं राष्ट्रीय प्रमाण दर दिवसाला अडीच लिटरवरुन १० लिटरपर्यंत वाढलं आहे.
• दुधाच्या एका ग्लासबरोबर शरीराचं कार्य आणि वाढीसाठी आवश्यक अशी साठ प्रकारची प्रथिनं, पोषक द्रव्य आपल्या पोटात जात असतात. याचबरोबर पनीर, दही, तूप आणि बटर असे इतर पदार्थही अक्षयकल्पतर्फे तयार केले जातात.
देशाच्या विकासात शेतकरी योगदान देऊ शकतात या विश्वासाने डॉ. रेड्डी यांनी हे काम सुरू केलं होतं. यात यश आलं असून आपलं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना डॉ. रेड्डी व्यक्त करतात. सध्या ११० फार्म्सच्या माध्यमातून दरदिवसाला ७ हजार लिटर लूढ उत्पादन केलं जातंय. पुढील ६ महिन्यात २०० फार्म्स आणि दिवसाला ३० हजार लिटर दूध उत्पादनाचं लक्ष्य असल्याचं डॉ. रेड्डी सांगतात. त्यांच्या प्रयोगाला टाटा कॅपिटलने भांडवल पुरवलं आहे. तर काही राष्ट्रीय बँकाही मदत करत आहेत. त्याचबरोबर डॉ. रेड्डी यांनी आयटी क्षेत्रातील १० माजी कर्मचाऱ्यांची टीम तयार केलीये. या सगळ्यांना ग्रामीण भागात काम करुन शेतकऱ्यांची निर्मिती क्षमता वाढवायची आहे तसंच व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करुन देण्याची त्यांची योजना आहे. शहरी आणि ग्रामीण भागात संबंध प्रस्थापित करण्याचं डॉ. रेड्डी यांचं पुढचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानलं जातंय.
आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :
परदेशातील करोडोची नोकरी सोडून गोशाळेद्वारे गावाचा कायापालट करत आहेत 'विज्ञान गडोदिया'
सॉफ्टवेअर अभियंत्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आयुष्यात आणला आशेचा नवा किरण
एका संगणक अभियंत्याने स्व:बळावर पर्यटनासाठी विकसित केले 'ईको टूरीझम'
लेखिका- श्वेता विटा
अनुवाद – सचिन जोशी