संपादने
Marathi

बाळ-बाळंतीण, मायेची वीण... धागा ‘संगोपन’

Chandrakant Yadav
3rd Nov 2015
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

‘‘थोड्या दिवसांपूर्वीच रिचाने फोन करून आम्हाला पुन्हा बोलावलेले होते. ती दुसऱ्यांदा गरोदर होती. प्रसूतीला अजून महिना बाकी होता. चार वर्षांपूर्वीही जेव्हा मातृत्वाचा पहिला अनुभव रिचाने घेतला, तेव्हाही तिने आम्हाला असाच फोन केला होता. रिचाला पुन्हा एकदा ‘संगोपन’ची प्रसूतिपूर्व मसाज सेवा अपेक्षित होती. ‘संगोपन’च्या या विशेष सेवेची पहिली ग्राहक रिचाच होती आणि तिला दुसऱ्यांदा हीच सेवा पुन्हा ‘संगोपन’कडूनच हवी होती.’’

‘संगोपन’च्या व्यवस्थापकीय संचालिका तेजश्री जोशी मोठ्या उत्साहाने हा अनुभव सांगतात. ‘संगोपन’ एका खास वर्गातील गर्भवती माता आणि नवजात बाळांसाठी अत्युत्तम आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देणारी संस्था आहे.

‘संगोपन’चा संस्कृतातील अर्थ नवजात शिशूची काळजी वाहणे असा आहे. मातृत्वाचा आनंद हा अगदी कोणत्याही स्त्रीसाठी तिच्या आयुष्यातील सुखाचा एक परमोच्च क्षण असतो.

तेजश्री सांगतात, ‘‘या दिवसांमध्ये कितीतरी मानसिक आणि शारीरिक बदल स्त्रीमध्ये होत असतात. ‘संगोपन’मध्ये गर्भवती, स्तनदा माता आणि नवजात बाळ दोघांनाही मसाज दिला जातो. आमचा हा मसाज म्हणजे प्राचीन भारतीय पद्धती आणि आधुनिक आरोग्य सेवेचा सुंदर मिलाफ होय.’’

मागची चारही वर्षे ‘संगोपन’साठी प्रत्येक अर्थाने समृद्धीची ठरलेली आहेत. एक मुख्य परिचारिका आणि एक परिचारिका अशा दोन जणींच्या स्टाफसह चार वर्षांपूर्वी ‘संगोपन’ची मुहूर्तमेढ झाली होती. आज ‘संगोपन’कडे बारा जणींची जाणकार टीम आहे. ‘संगोपन’ने आजअखेर १० हजारांपर्यंत माता आणि त्यांच्या नवजात बाळांना मसाज सेवा दिलेली आहे.

image


आरोग्यविषयक सेवेतील रस

तेजश्री तसे पाहाता वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनी, पण कॉलेजला असतानापासूनच त्यांना आरोग्य आणि औषधोपचारात कमालीचा रस होता. यातूनच त्यांनी होमिओपॅथीशी संलग्न असलेला एक कोर्स केला. पुढे हैदराबादेत त्या ‘मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन’चे काम घरबसल्या करू लागल्या. या कामाला चार वर्षे उलटलेली होती. ‘मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन’मधील एक मुख्य भाग असलेले ‘कंटेन्ट एडिटिंग’ अर्थातच त्या आनंदाने करत असत. त्यांचे कामही उत्तम होते आणि म्हणून उत्तम चाललेले होते. याचदरम्यान त्यांना आरोग्य जगताबद्दलची भरपूर माहिती मिळालेली होती.

तेजश्री यांचा जन्म कानपूरचा आणि बालपणही तिथेच गेलेले. तिथे त्यांचे वडील एका लेदर फॅक्टरीत तंत्रज्ञ म्हणून होते. कुटुंबाचा अवघा गाडा त्यांच्याच खांद्यावर चालायचा. १९९८ मध्ये वडिलांचे निधन झाले. मग या गाड्याचा जू आईने आपल्या खांद्यावर घेतला. तिने प्रिंटिंगचा एक लहानसा व्यवसाय सुरू केला.

तेजश्री सांगतात, ‘‘वडिलांच्या मृत्यूने आम्ही खचून गेलेलो होतो. अशात आईने जसा व्यवसाय सुरू केला आणि चालवून दाखवला, तसे ... अरे स्त्रीदेखील हे सगळे करू शकते म्हणून एक आत्मविश्वास तर निर्माण झालाच, पण व्यवसायाबद्दलचे आकर्षणही निर्माण झाले... म्हणजे नोकरी तशी नकोशीच होती.’’

‘संगोपन’ची स्थापना...

२०१० मध्ये तेजश्री आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार होत्या, पण प्रसूतिपूर्व मसाजसाठी म्हणून त्यांना प्रशिक्षित परिचारिका मिळणे अवघड होऊन बसले होते. इथेच तेजश्री यांच्या लक्षात आले, की ही सेवा पुरवणाऱ्यांची आपल्याकडे वाणवा आहे. सेवेची गरज जेवढी आहे, सेवेकरी तेवढे नाहीत.

आपण गर्भवती असल्याचा आनंद स्त्रीला असतोच, त्यासह नाना तऱ्हेच्या शंकाकुशंका आणि भीतीही असतातच, म्हणून अशा नाजुक काळामध्ये तिला योग्य मानसिक आधार आणि समुपदेशनाचीही आवश्यकता असते. आणि हे सगळं उपलब्ध करून देणारं जर काहीही नसेल किंवा नेमकी त्याचीच कमतरता असेल तर मग आपण हेच करावं काय, असं तेजश्री यांना तेव्हाच वाटलेलं... अर्थात वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार या विषयांची तेजश्री यांना आधीपासून आवड होतीच. आणि लोकांना अशा सेवेची गरजही होती. आपण आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह हे नवे शिवधनुष्य पेलू शकतो, असे त्यांना मनोमन वाटले आणि पटलेही.

तेजश्री सांगतात, ‘‘एकतर बाळ आणि बाळंतीण यांच्यासाठी ही सेवा आहे. एका जणीकडून ती शक्य नाही म्हणून या कार्यात अनेक जणी एकत्रित येऊ शकतात आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे ज्या कुटुंबांना आपण ही सेवा देतो, त्या कुटुंबांशी आपले एक आगळे असे भावनिक नातेही तयार होते, या क्षेत्रात कार्य करण्यासाठी मला एवढी प्रेरणा पुरेशी होती.’’

तेजश्री यांनी मग काही ‘पॅरेंटिंग फोरम्स’ना मेल केले. प्रसूतिपूर्व मसाज करून घेण्यासाठी कुणी इच्छुक महिला आहेत काय म्हणून विचारणा केली. गर्भवती महिलांना उद्देशून एक आवाहनही शक्य तितके प्रसारित केले. ‘संगोपन’ला प्राप्त झालेला प्रतिसाद हा अपेक्षेपेक्षा मोठा होता.

image


पुढे २०११ पर्यंत संगोपनच्या सेवांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या १० हजारांवर गेलेली होती.

सद्यस्थितीत आपल्या कामाबद्दल आणि कामाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल तेजश्री बऱ्यापैकी समाधानी आहेत. आजही जेव्हा त्या मागे वळून पाहातात… जरा सिंहावलोकन करतात तेव्हा या कामात उभ्या राहिलेल्या अडचणी त्यांच्याभोवती फेर धरून नाचू लागतात. एकेका अडचणीवर आपण कशी मात केली आणि या अडचणींच पुढे आपल्या कशा मार्गदर्शक ठरल्या किंबहुना आपल्यासाठी यशाची एकेक पायरी ठरल्या, हेही त्यांना जाणवते.

तेजश्री सांगतात, ‘‘मी रोजच्या कामांमध्ये गुरफटलेली असे. कामवाली बाई वेळेवर आली नाही म्हणून दगदग, घरातल्याच खोळंबलेल्या कामांसाठी तगमग असे सारखे चाललेले असे. दुसरीकडे माझा व्यवसाय. बरं… माझ्या व्यवसायाचे स्वरूप म्हणजे नवजात बाळ आणि बाळंतिणीची काळजी वाहणे. बरं… दररोज ते वेळच्यावेळी करावेच लागते. मग मी परिचारिकेच्या संपर्कात सातत्याने असे. कामासंदर्भातल्या आवश्यक त्या सूचना देई. मार्गदर्शन करत असे आणि आणखी बरेच काही. ग्राहकाला तत्क्षण सेवा आणि त्याच्या समस्या तसेच गरजांशी क्षणात एकरूप होणे… म्हणजे ‘चट समस्या पट उपाय’, ‘चट गरज पट मार्ग’ असे. आणि हेच आमच्या व्यवसायात सर्वांत महत्त्वाचे आहे. तेच जर गंभीरपणे केले नाही तर मग चालायचे कसे?’’

तेजश्रीच सेल्सपर्सन

व्यवसाय जोमाने चालवणे आणि मार्केटिंग करणे ही आव्हाने देखील सुरवातीच्या काळात होतीच.

तेजश्री सांगतात, ‘‘माझ्या कंपनीत आजही मीच एकमेव सेल्सपर्सन आहे.’’

अर्थात आता त्या हा डोलारा वाढवताहेत. चार वर्षांहून अधिक काळ तेजश्री यांच्या या उपक्रमाला लोटलेला आहे. या कालावधीत दस्तुरखुद्द तेजश्री यांनी ३००० हून जास्त गर्भवती मातांना ‘संगोपन’च्या कार्याबद्दलची माहिती स्वत: दिलेली आहे. तेजश्री स्वत: दोन मुलींच्या आई आहेत.

‘संगोपन’ला सुरवात झाली तेव्हा त्यांची दोन नंबरची कन्या अवघ्या चार महिन्यांची होती. इटुकलीला सांभाळत, घराची इतर कामे सांभाळत त्यांनी या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. पुढे बरेचदा काम थांबवावं लागतं, की काय, असे प्रसंग उद्भवले. दुसरीकडे ग्राहक आणि आपले कर्मचारी अशा दोन आघाड्यांवर कसरत त्यांचा तापदायक ठरे. खरं तर हे सगळं कठीण होतं, पण जमून आलं.

आपल्या यशाचे श्रेय तेजश्री आपल्या यजमानांना देतात. ‘‘माझ्या नवऱ्याने मला सांभाळून घेतले. खुप मदत मला केली. विशेष म्हणजे व्यवसायाची माझी ही कल्पना उचलून धरली. व्यवसायाला नक्की यश मिळेल, हा विश्वास ठेवला.’’ तेजश्री यांनीही तो अर्थातच सार्थक ठरवला.

संगोपन अंगणी... आनंदआसवांजली!

तेजश्री एक अनुभव शेअर करताना सांगतात, की त्यांच्याकडे एकदा एक वयस्कर गृहस्थ आले. त्यांच्या मुलीला जुळे झालेले होते. पैकी एका बाळाच्या डोक्यात कोंडा झालेला होता. काही केल्या जात नव्हता. कळस म्हणजे हे गृहस्थ अमेरिकेहून आलेले होते. त्यांनी एका अप्रशिक्षित परिचारिकेला कामावर ठेवलेले होते. साहजिकच उपयोग झालेला नव्हता. ‘संगोपन’ने त्या माणसाच्या मुलीलाच मालिश कशाने आणि कशी करायची ते शिकवले. पुढे वर्षभर ‘संगोपन’ने दोन्ही बाळं सुदृढ कशी राहतील म्हणून मदत केली. निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा आमचे आभार मानताना जुळ्यांचे आजोबा अक्षरश: रडले होते. ‘संगोपन’साठी स्नेहार्द्रतेची ही गोड आठवण तर होतीच, त्याबरोबरच ‘संगोपन’चा आत्मविश्वास वाढवणारीही ती होती.

हळूहळू आमच्या या व्यवसायातही अनेक लोक आलेले आहेत. पण ‘संगोपन’कडे सेवेचा मोठा अनुभव आहे. सुरवात ‘संगोपन’ने केलेली आहे. सेवेच्या बळावर ग्राहकांच्या हृदयात स्थान मिळवलेले आहे. म्हणून नव्या स्पर्धेबद्दल भीती बाळगण्याचे ‘संगोपन’ला कारण नाही.

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags