अंतर्मनाची हाक ऐकून इतर स्त्रियांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्नरत स्त्रीची कथा

26th Apr 2016
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close


पहिल्यांदा जेव्हा तिने आपल्या अंतर्मनाला प्रश्न विचारला तेव्हा ती न्यूयॉर्क शहरात कॉर्पोरेट क्षेत्रातल्या नवनव्या पायऱ्या चढण्यात आणि योग्य पर्याय निवडण्यात व्यस्त होती. ठरवलेल्या गोष्टी साध्य करण्याच्या वाटेवर अनू अनंतकृष्णनचे मार्गक्रमण सुरू होते पण तरीही काहीतरी मोठी पोकळी तिला जाणवत होत . ''अंतर्मनात विचारचक्र सुरू होते, या अकाउंटिंग फर्ममध्ये पार्टनरबाबतची माझी इच्छा साध्य होणार याची खात्री असतानाही मी आनंदी का नाही ?" आपले व्यक्तिवैशिष्ट्य आनंदाने जपण्याची प्रेरणा स्त्रियांना देणाऱ्या 'अरिया +लेया' या अंतर्वस्त्रांच्या ब्रॅण्डमागची सर्जनात्मक शक्ती असलेली अनू सांगते.

image


पार्टनर मिळवण्यासाठी व्यूहरचना आखण्याच्या कामावरून भारतीय महिलांसाठी अंतर्वस्त्र डिझाईनचे काम करणे ही नक्कीच मोठी उडी होती. स्वत्व आणि यश यासाठी इतरांच्या नियमानुसार न चालता स्वतःची कथा स्वतः लिहिण्याचा निर्णय तिने या अंतर्मनाच्या हाकेतून घेतला . नव्याच्या उर्मीने उत्सुकता न भीती दोन्ही संमिश्रपणे जाग्या झाल्या होत्या. रविवारची सुट्टी मजेत घालवल्यानंतर अपरिहार्यपणे येणारी सोमवारची सकाळ हताश करणारी असे, कंटाळवाणी असे. यातूनच तिला पहिला संकेत मिळाला. सगळे काही तिच्या मनासारखे घडत असूनही ऑफिसच्या चार भिंतीत तिला अडकल्यासारखे वाटे. आपले सर्जनस्वातंत्र्य जखडल्यासारखे वाटे. ''केवळ स्वतःला माहीत असलेल्या एकाच प्रकारच्या जीवनाच्या ठराविक साच्यात राहण्याचा मला कंटाळा आला होता . काहीतरी नवे करायचे होते .'' अनूच्या बोलण्यात स्पष्टता जाणवते.

''वयाच्या विशीच्या उत्तरार्धात उठलेले हे वादळ केवळ निराशेतून उठलेले नव्हतें. यामुळे मनात अधिक खोलवर डोकवण्याची गरज असल्याची जाणीव मला झाली. स्वतःचा आवाज पुन्हा ऐकण्याची गरज मला वाटू लागली. स्वतःला नक्की काय हवे आहे ते शोधण्याची गरज वाटू लागली. नुसतेच काहीतरी करायचे म्हणून करत राहण्यापेक्षा कोणीतरी होण्याची गरज मला जाणवली .'' आपण नक्की कोण आहोत हे शोधण्याचा आणि पूर्णपणे तसे होण्याचा निर्णय तिने घेतला.

image


या संदर्भात सारे धैर्य एकवटून तिने तिच्या पतीशी चर्चा केली. त्याच्या आणि कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे तिने मुंबईकडे प्रयाण केले. मुंबई - तिचे बालपणीचे शहर. हे पहिले मोठे पाऊल होते असे ती सांगते. यामुळे नव्याने सुरुवात करायला प्रोत्साहन मिळाले. नेमके काय करायचे याबाबतच्या सुरुवातीच्या गोंधळलेल्या अवस्थेतून बाहेर पडल्यावर गोष्टी जरा सोप्या झाल्या आणि तिच्या अंगवळणी पडल्या. आपले काम अर्थपूर्ण आणि प्रभावी पाहिजे याची खूणगाठ तिने बांधली. अशा प्रकारच्या कामासाठी अर्थातच वेळ आणि संयमाची आवश्यकता असते. त्यामुळे एक वर्ष तिने प्रवास, वाचन, ध्यानधारणा आणि लोकांच्या भेटीगाठी यात घालवले. तिला जसे वातावरण हवे होते तसेच अगदी मुंबईत होते. या शहराचा आत्मा, वैशिष्ठ्य त्यामुळे ती पुन्हा एकदा मुंबईच्या प्रेमात पडली. आपल्याला नेमके काय करायचे आहे याबाबत वर्षअखेरपर्यंत दोन गोष्टी तिच्या लक्षात आल्या. एक म्हणजे तिला मुंबईत राहून काम करायचे होते आणि दुसरे म्हणजे स्त्रियांसाठी, स्त्रियांबरोबर राहून काम करायचे होते. पण हा निर्णय सोपा नव्हता. कारण तिचे पती आणि कुटुंब परदेशात राहत होते.

त्यामुळे सर्वप्रथम जे करणे आवश्यक होते ते तिने केले. तिने आपल्या आकांक्षेला अनुरूप अशी आखणी केली. ती योग्य ठरेल असा विश्वास व्यक्त करून तिने तिच्या पालकांची, सासरच्यांची मनधरणी केली. तीन आठवडे मुंबईत आणि तीन आठवडे हाँगकाँगमध्ये राहण्याची योजना तिने आखली होती. जेणेकरून पतीला नियमितपणे भेटता येऊ शकेल. स्वतःच्या इच्छा - आकांक्षांबाबत तडजोड न करता वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात संतुलन साधण्याचा मार्ग तिने शोधला होता. ती सांगते, "माझ्या नवऱ्याचे कायम हेच म्हणणे असायचे की आपल्या दोघांचीही प्रगती आवश्यक आहे. तशी ती नाही झाली तर आपण दोघे एकत्र आनंदी राहू शकत नाही. त्यामुळे आपण दोघांनी जे आपल्या दोघांनाही आनंदी ठेवेल ते केलेच पाहिजे आणि त्यासाठी मार्ग शोधला पाहिजे.''

imageअनेक उद्योजकांप्रमाणे उद्योजक म्हणून तिचा प्रवासही अकल्पित, वैशिष्ठ्यपूर्ण अशा कल्पनेतून आणि निराशेतून झाला. अंतर्वस्त्र निर्मितीच्या उद्योगाची कल्पना तिला ज्या वस्तुस्थितीला तोंड द्यावे लागले त्यातून स्फुरली. "आपण सकाळी सर्वप्रथम परिधान करतो आणि केवळ आपल्या स्वतःसाठी निवडतो ती ही गोष्ट." अनू सांगत असते. पण भारतात आल्यावर अंतर्वस्त्रांच्या खरेदीबाबत तिचे समाधान होऊ शकले नाही. एकतर जी अंतर्वस्त्र आरामदायक आढळायची ती जुनाट पध्दतीची, गबाळी असायची आणि जी आकर्षक दिसायची ती परिधान करण्याच्या योग्यतेची नसायची. शिवाय अंतर्वस्त्रांची खरेदी म्हणजे निव्वळ उरकणेच असायचे. ती एक अवघडलेली प्रक्रिया होऊन जायची. खरेदीसाठी एकांत मिळेल अशा दुकानात ती शिरायची पण यासंदर्भात फारशी माहिती नसलेला दुकानातला विक्रेता अंतर्वस्त्र द्यायचा आणि ती विकत घेऊन अवघडलेपणाने ती त्या दुकानातून बाहेर पडायची. खरेदीबाबतचा हा अनुभव कधीच आनंददायी नसायचा. काही मैत्रिणींशी बोलताना हा विषय निघाल्यावर त्यांनाही असेच वाटत असल्याचे तिला कळले आणि याच क्षणी आपल्या नव्या उद्योगाची संकल्पना तिला स्फुरली.

"निर्मिती प्रक्रियेतून मला खूप काही शिकायला मिळाले. फिटिंग, पॅटर्न्स, अंतर्वस्त्र उद्योगातील भाषा याबाबत मिळतील ती सर्व पुस्तके मी वाचली. टेक्निकल डिझाइनरच्या साहाय्याने नेटवर्किंगचे कॉम्बिनेशन मी शोधले. त्यानंतर आमचे कठीण काम सुरू झाले. ते म्हणजे कापडाची आणि कारखान्यांची निवड. सर्वोत्तम साहित्य वापरून आमच्यासाठी काम करतील,आमच्या डिझाईनचे उत्पादन काढतील अशा कारखान्यांची निवड. "अनू सांगते.

image


हा अरिया +लेयाचा पाया झाला. असा ब्रॅण्ड जो दैनंदिन आयुष्यात वापरता येतील अशी सुंदर अंतर्वस्त्र तयार करतो. उच्च दर्जाच्या कापडापासून याची निर्मिती केली जाते आणि रास्त दरात ती महिलांसाठी आॅनलाइन उपलब्ध आहेत. " आम्ही भारतीय महिलांनाच डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या शरीरयष्टीनुसार, आकारमानानुसार ही अंतर्वस्त्र तयार केली आहेत. हे नक्कीच अरिया +लेयाचे वैशिष्ठ्य आहे. 'बी बोल्ड, बी ट्रू, बी यू' हे त्य ब्रॅण्डचे नुसते बोधवाक्य नाही तर दृष्टिकोन आणि यूएसपीदेखील आहे. आमच्या प्रतिमेतील प्रत्येक जण, ब्रॅण्डच्या प्रचारातील प्रत्येक वाक्य याबाबत खूप विचार करण्यात आला आहे. आधुनिक भारतीय महिलेला तिचे आयुष्य विचारपूर्वक, धैर्याने आणि रसरसून जगायची प्रेरणा देणे हा यामागचा उद्देश आहे. मला असे वाटते की उत्तमप्रकारे बसणारी आणि आपल्याला सौंदर्याची अनुभूती देणारी अंतर्वस्त्र परिधान करणे हे स्त्री म्हणून स्वतः स्वतःचा सन्मान करण्यासाठीचे चिमुकले पाऊल आहे. आपल्या प्रत्येकीची यशाची स्वतंत्र व्याख्या आहे. स्वतंत्र मार्ग आहेत. या मार्गात आपण एकमेकींचा पाठिंबा घेतला आणि दिला तर......'' अनू आत्मविश्वासाने व्यक्त होत असते.

अंतर्वस्त्रांसंदर्भात पुरुषी नजरेच्या पलीकडे जाऊन ती ब्रॅण्ड करत आहे. पुरुषाला आकर्षित करून घेणारे उत्पादन म्हणूनच अंतर्वस्त्रांचे मार्केटिंग होत असल्याचे आपण आतापर्यंत बघत आलो आहोत. यात अरिया +लेया बदल घडवत आहे.

त्यांच्या ब्रॅण्डचे तत्त्वज्ञान आचरणात असलेल्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रियाच तिने उत्पादनाच्या शुभारंभात निवडल्या होत्या. स्त्रियांना स्वतःवर प्रेम करायला आणि स्वतःचे अनमोलत्व जाणून घ्यायला सक्षम करणे ही त्यांच्या शुभारंभ मोहिमेची संकल्पना होती. त्याचे उत्तम स्वागत झाले. हा संदेश पोहोचवणारी कम्युनिटी तयार करण्याच्या मार्गावर ब्रॅण्ड आहे.

महत्त्वाचे म्हणजे आता तिची सोमवारची सकाळ कंटाळवाणी, निराश करणारी नसते. भारतीय स्त्रियांना सक्षम करण्यासाठी काय करता येईल याचा विचार तिला कामावर झटपट जाण्यासाठी प्रेरित करतो. "मैत्रिणींबरोबर वेळ घालवायला मला आवडते. आम्ही एकत्र जमतो तेव्हा अनुभवांची देवाणघेवाण करतो. एकमेकींची स्वप्ने प्रत्यक्षात यावीत यासाठी प्रोत्साहन देतो आणि मग काहीशी जादू घडते." एखाद्या लहान मुलीच्या उत्साहाने अनू सांगते.

ब्रॅण्डच्या धाग्यात हक्क गुंफणे ही त्यातलीच एक जादू-संकल्पनांची देवाणघेवाण करणार्‍या आणि त्यांना काळजी वाटणार्‍या सर्व गोष्टींबाबत, बदलांबाबत, खऱ्या सौंदर्याबाबत बोलणाऱ्या महिलांचा गट तयार करणारे हे सामाजिक अभियान.

ब्रॅण्डची ही मोहीम निर्मितीनंतरच्या प्रक्रियेतही दिसून येते. कोलकातामधील वेश्यावस्तीतल्या महिलांना शिवणाचे प्रशिक्षण देणार्‍या एका बिगरसरकारी संस्थेसोबत अरिया +लेयाने भागिदारी केली आहे. त्यांनी केलेल्या कापडी पिशव्या अरिया +लेया आपल्या उत्पादनांच्या पॅकेजिंगसाठी वापरते. महिलांचे आयुष्य अधिक स्वतंत्र व्हावे यासाठी त्यांचे सबलीकरण करण्याच्या उद्देशाने अनूने उचललेले हे पहिले पाऊल आहे.

स्त्रीचे दुसरे नाव त्याग असल्याचे आपल्याला कायम सांगितले जाते. पण आपल्याला आपली स्वतःची कहाणी लिहायची असेल तर परिस्थितीत बदल घडवावा लागेल. या जगाच्या उभारणीची सुरुवात आपल्या प्रत्येकापासून होते, याचे उदाहरण म्हणजे अनूची कहाणी आहे. आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या मार्गात येणाऱ्या अडचणींच्या डोंगरापुढे कचरणाऱ्या प्रत्येक महिलेला आपली गोष्ट प्रेरणा देईल अशी आशा अनूला वाटते. आपण नेटाने, तीव्रतेने खरोखर प्रयत्न केले तर सर्व काही साध्य होते असे तिला वाटते.

या सारख्या आणखी काही यशस्वी महिला उद्यमींच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

गर्भारपणातच नव्या उद्योगाची पायाभरणी करणाऱ्या श्रद्धा सुद

"मी तुमच्यातलीच एक आहे" इति भारतातली आठवी श्रीमंत महिला अनू आगा

निल्मा दिलीपन यांच्या दोन व्यवसायांच्या यशाचं गमक ‘प्रेमाचा प्याला’ आणि ‘पिवळी छत्री’


लेखिका : निपा आशाराम

अनुवाद : सोनाली कुलकर्णी -काकडे

Want to make your startup journey smooth? YS Education brings a comprehensive Funding and Startup Course. Learn from India's top investors and entrepreneurs. Click here to know more.

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

Our Partner Events

Hustle across India