काश्मिर ते कन्याकुमारी ‘गौरव-बावरी’ सायकलीने

2nd Nov 2015
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

‘‘श्रीनगरात पोहोचलो तसा मी घाबरा-घाबरा झालेलो होतो. उगीचच भासही होत होते. निसर्गाने सर्वदूर बर्फ अंथरलेला होते. लागोपाठ पाऊस सुरू होता. पाऊसही थेंबाळ नव्हता तोही बर्फाळच! मला थकवा आलेला होता. पाठीवरले सामानाचे ओझे उतरवून बाजूला ठेवले आणि जरा हलके हलके वाटू लागले, पण आतले ओझे काही केल्या कमी होत नव्हते. इथं येण्यात आपली काही चुक तर झाली नाही ना… प्रवासात पुढे नियतीने एखादे संकट तर वाढून ठेवलेले नसेल ना, अशा शंकाकुशंकानी माझे मन मलाच खात होते.’’ हे शब्द आहेत गौरव सिद्धार्थ याचे. काश्मिर ते कन्याकुमारी अशा ४००० किलोमीटर अंतराच्या सायकल यात्रेला तो निघालेला होता.

गौरव दिल्लीच्या बाहेर, पण दिल्लीला लागून असलेल्या एका कंपनीत ‘यूआय डिझायनर’ म्हणून नोकरीला आहे. कामाच्या आणि जगण्याच्या रहाटगाड्यातील तोच तोचपणा गौरवला नकोसा झाला आणि काहीतरी वेगळे करण्याचे त्याने ठरवले. काहीतरी वेगळे म्हणजे असे, ज्यात आव्हाने आहेत आणि जे जरा धाडसाचेच आहे. गौरव सांगतात, ‘‘दिल्लीतील जीवनशैली एकुणात धावपळीची. इथले आमचे जगणे म्हणजे अगदी साचेबद्ध. दैनंदिन वापराच्या वस्तूंची खरेदी, घराचे भाडे, ट्रांसपोर्टेशन आणि वेगवेगळ्या प्रकारची बिले भरण्यात दरमहा ३० ते ४० हजार रुपये आम्ही अगदी सहज खर्च करतो. इथेच माझ्या लक्षात आले, की ही रक्कम आपण आपल्या ‘ॲअॅडव्हेंचर’वर का खर्च करू नये?’’

image


अर्थात गौरवसमोर मोटरसायकलवरूनही ही आगळी यात्रा पार पाडण्याचा पर्याय होता. पण त्यांनी सायकलच निवडली. यासंदर्भात जेव्हा त्यांना विचारले तेव्हा ते हसत-हसतच उत्तरले, ‘‘मला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहायचे होते आणि एक लढाऊ बाणा आपल्या ठायी बाणवायचा होता. म्हणून मी सायकलीला प्राधान्य दिले. सुरवातीला तर मी साधी सायकलच नेण्याचे ठरवलेले होते, पण एका मित्राने गियरवाली सायकल नेण्याचा सल्ला दिला. मी कधीही ही गियरवाली सायकल चालवलेली नव्हती. म्हणून आधी दिल्लीतच भरपूर सराव केला. आपण ही सायकल सहज चालवू शकतो, असा आत्मविश्वास जेव्हा मला वाटू लागला, तेव्हा मी ठरवून टाकले, की हीच सायकल आपण काश्मिरात सोबत न्यायची.’’

रेल्वेत सायकल आणि डोळ्यात काश्मिर ते कन्याकुमारी सायकलयात्रेचे स्वप्न घेऊन गौरव काश्मिरसाठी रवाना झाले. तीन दिवसांच्या प्रवासानंतर जेव्हा श्रीनगरला पोहोचले, तेव्हा तिथे संततधार पाऊस सुरू होता. गौरव यांनी दुसऱ्याच दिवशी सायकल यात्रा सुरू करण्याचे ठरवलेले होते, पण दुसऱ्यादिवशीही पाऊस काही थांबला नव्हता.

‘वादळ वारा पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे, तुफानातले दिवे आम्ही तिमिरातले दिवे,’ असा बाणा गौरवमध्ये रुजलेलाच होता. मग पाऊस तर पाऊस आपण निघायचेच, असे त्याने ठरवले. भर पावसात गौरव निघाला. मनात भीती होतीच. थकवाही होता. एक क्षण तर असा आला, की गौरव यांना वाटले पाठीवरले ओझे उतरवून पावसातच आडवे पडावे.

गौरव सांगतात, की ज्या दिवशी त्यांनी प्रवास सुरू केला तो दिवस कमालीचा कठीण होता. संततधार पाऊस, जोराची हवा अशा परिस्थितीत सायकल चालवून ते फार दमलेले होते. पायडल मारणेही अवघड जात होते. पण त्या दिवशी ठरलेला प्रवास त्यांनी पूर्ण केला आणि सायंकाळीच विराम घेतला. दृढ आत्मविश्वासानेच त्यांच्यासाठी यादरम्यान उर्जेचे काम केले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गौरवनी सांगितली ती म्हणजे दररोज त्यांनी २० किमी अंतर कापायचे ठरवलेले होते. दुसऱ्या दिवशी एवढ्याच अंतराच्या प्रवासासाठी ते स्वत:ला तयार करत असत. २० किमीने सुरू झालेल्या या प्रवासाने गौरव यांच्यात पुढे दररोज १२० किमी अंतर सायकलीने प्रवास करण्याची क्षमता आली.

विशेष बाब म्हणजे त्यांनी आपल्या या आगळ्या आणि रंजक प्रवासातील सायकलीचे ‘बावरी’ असे नामकरणही केलेले आहे. आपल्या सायकलीला ते ‘बावरी’च म्हणतात. यात्रेदरम्यान आपण उगीचच कितीतरी अनावश्यक वस्तू पाठीवर ओझे म्हणून लादलेल्या आहेत, ही गोष्टही गौरव यांच्या लक्षात आली. त्यामुळेही अंतर कापणे जरा अडचणीचे ठरत होते. एक्स्ट्रॉ बेडशिट, टूथपेस्ट, जेवणाची आणि इतर पाकिटे अशा वस्तू त्यांनी या ओझ्यातून वजा केल्या आणि मग हा प्रवास जरा त्यांना हलका झाला.

image


गौरव सांगतात, की यातल्या बऱ्याच वस्तू तुम्हाला हायवेवर सहज उपलब्ध होतात. गौरव प्रवासादरम्यानचे अनुभव आणि माहिती फेसबुकवर शेअर करत असत. काश्मिरातील आपल्या अनुभवाबाबत गौरव सांगतात, तो संपूर्ण परिसर सीआरपीएफ जवानांच्या घेऱ्यात आहे. सीआरपीएफ जवानांची त्यांना मदत झाली. काश्मिर खोरे कमालीचे सुंदर आहे. इथला निसर्ग म्हणजे जणू वरदान आहे. इथे थोड्याथोड्या अंतरावर पाण्याचा स्वाद बदलतो, हे विशेष! काश्मिरमधल्या अनुभवांनी जीवनातला सर्वाधिक आनंद आपणास दिला, असे गौरव मानतात. गौरव यांनी सांगितले, की कधी-कधी रस्ता चुकल्यानंतर काश्मिरातील स्थानिक रहिवाशांना पत्ता विचारावा लागे. काश्मिरी म्हणून इथल्या रहिवाशांबद्दल मनात भीती असे. आणि पत्ता विचारला, की हे लोक मला घरी बोलावत. पाहुणचार करत. भेट म्हणून सुक्या मेव्याची पाकिटे देत. मग भीती कुठल्याकुठे गायब झाली.

काश्मिरचा प्रवास संपल्यानंतर जम्मूच्या दिशेने ते निघाले. इथे हलका हलका उष्मा वातावरणात होता. जम्मूत भेटलेल्या एका जवानाला जसे कळले, की गौरव हे एका आगळ्या यात्रेवर निघालेले आहेत, त्याने गौरव यांना एक कडक सॅल्यूट ठोकला आणि मेरिगोल्ड बिस्किटाचे पाकिटही दिले.

गौरव सांगतात, की यात्रेदरम्यान पाण्याची बाटली सहसा मी ठेवत नसे. हायवेवरील पेट्रोल पंपांवर पाणी प्यायचो. मध्यप्रदेशातील एक घटना ते आवर्जून सांगतात, पाणी पिण्यासाठी ते एका पेट्रोल पंपावर थांबले तेव्हा इथले कर्मचारी त्यांच्याशी बोलले आणि त्यांना जेव्हा माझ्या यात्रेबद्दल कळले, त्यांनी मला बर्फाने भरलेली एक बाटली दिली. गौरव सांगतात असे इतके प्रसंग या प्रवासात वाट्याला आले, की ते विसरणे शक्य नाही. पंजाब आणि हरयाना आटोपल्यानंतर गौरव दिल्लीला पोहोचले. इथून ते आपल्या गावी लखनौला गेले. आईची तब्येत खराब होती. लखनौत आईसह काही दिवस घालवल्यानंतर पुन्हा आपली यात्रा सुरू केली. गौरव यांनी सांगितले, की दिल्लीहून ते वृंदावनला (उत्तर प्रदेश) निघाले. गौरव होलिकोत्सव सुरू असताना वृंदावनला पोहोचले. वृंदावनातील मौज पाहणे हा देखील गौरव यांच्या दृष्टीने एक छान अनुभव होता. उत्तर प्रदेशातील एका भागात पोहोचल्यावर गौरव यांच्यासमोर भाषेची समस्या उद्भवली. अर्थात भाषा हिंदीच होती, पण तिला बुंदेली बाज होता. बरेच शब्द व काही वाक्ये समजण्यात गौरव यांना अडचण येई. १७ दिवसांच्या यात्रेनंतर गौरव काश्मिरातून उत्तर प्रदेशात पोहोचलेले होते. गौरव हसतच सांगतात, की भाषेची अडचण काय असते हे खरं तर त्यांना महाराष्ट्राची सीमा ओलांडल्यानंतर तेलंगानात कळले. दक्षिणेत पोहोचले, की भाषाच काय भोजनही बदललेले असते. पेहराव वेगळा असतो. दक्षिणेतील अनुभव एक आगळा आनंद देणारा ठरला. तेलंगनातील एक रंजक किस्सा सांगताना गौरव म्हणतात, की एके दिवशी सुर्यास्ताआधी त्यांना जवळच्या एका गावात पोहोचायचे होते, पण रस्त्यात उशीर झाला. अंधारही पडला. अशात रस्त्याच्या कडेवरील एकाला त्यांनी रात्र घालवण्यासाठी कुठे जागा आहे काय म्हणून विचारले. भाषेची अडचण होतीच. त्याला नेमके काही कळले नाही, मग त्याने एका घाणेरड्या जागेवर गौरव यांना झोपायला सांगितले. तिथे आधीच तिन लोक झोपलेले होते. ना पांघरूण होते ना अंथरूण, मग सायकलीचाच बिछाना केला आणि बॅगेची उशी करून त्यांनी रात्र काढली.

गौरव यांनी काश्मिर, जम्मू, पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकपर्यंत सायकल यात्रा पूर्ण केलेली होती. बंगळुरूहून त्यांना सलेम, मदुराई, डिंडिगल आणि शेवटी कन्याकुमारीला जायचे होते. गौरव मोठ्या उत्साहाने सांगतात, की प्रवास आटोपायला एक आठवडा उरलेला होता आणि त्यांनी ठरवले, की ज्या क्षणी आपण कन्याकुमारीला पोहोचू सायकल वर उचलून मनसोक्त ओरडू. गौरव पुढे सांगतात, जसजशी त्यांची यात्रा पूर्णत्वाकडे पोहोचत होती, तसतसा त्यांचा उत्साह वाढत होता. सगळा थकवा जणू गायब झालेला होता. ते ‘इंदिरा पॉइंट’च्या दर्शनासाठी कमालीचे उत्सुक होते.

या यात्रेने गौरव यांच्यात काय बदल घडले, या प्रश्नाच्या उत्तरात गौरव सांगतात, की या यात्रेने त्यांच्या सहनशिलतेत कमालीच वाढ झाली. प्रसंग व परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता आधीपेक्षा आता कितीतरी वाढलेली आहे, या प्रवासातूनच हे शक्य झाले. गौरव म्हणतात, की तुमचा मेंदू तेच करतो, जे तुम्ही करायला सांगतात. मग ते सकारात्मक असो वा नकारात्मक. शरीर थकू शकते, खचू शकते आणि माघार घेऊ शकते, पण मन आणि मस्तिष्क थकत नाही, खचत नाही, की माघारही घेत नाही. गौरव यांनी आपल्या शरीरापेक्षा आता आपल्या मनावर आणि मेंदूवर जास्त विश्वास टाकायला सुरवात केलेली आहे. शेवटी ते म्हणतात, ‘मन हरले तर पराभव, मन जिंकले तर विजय!’

Want to make your startup journey smooth? YS Education brings a comprehensive Funding and Startup Course. Learn from India's top investors and entrepreneurs. Click here to know more.

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा

Our Partner Events

Hustle across India