महिला बचत गटांनी थांबवली गावातल्या स्थलांतराची पावले
आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी गरज असते ती मेहनत आणि कल्पकतेची. रत्नागिरीतल्या तुरळ गावच्या महिलांनी हेच करुन दाखवलं. त्यांना मार्गदर्शन मिळालं ते शिल्पा करकरे यांचं. कोकणातलं निसर्गसौंदर्य शहरातल्या लोकांना अनुभवता यावं यासाठी शिल्पाताईं मुंबई सोडून आपल्या तुरळ या गावी राहायला गेल्या. रस्टिक होमच्या माध्यमातून त्यांनी पयर्टकांना कोकणातल्या निसगार्ची भुरळ घातली. त्याचबरोबर आपल्या गावातील महिलांनाही स्वयंपूर्ण करण्यासाठी गावातच रोजगार मिळावा यासाठी काम दिले. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यात आलं. यामुळं कामासाठी गावातून शहराकडे होणारं स्थलांतरही थांबलं.
रत्नागिरी जिल्हातल्या संगमेश्वर तालुक्यातलं एक छोटसं तुरळ. गावातल्या महिलांचा बचत गट सुरु करण्याचा प्रयत्न काही वर्षांपूर्वी फसला. पण त्याला अपयश न मानता शिल्पा करकरे यांनी महिलांना पुन्हा एकदा एकत्र आणलं. दोन वर्षांपूर्वी नव्यानं दोन नवीन बचतगट तयार केले. या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरुवातीला गृहउद्योगाअंतर्गत येणाऱ्या वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं. पापड, लोणची बनवण्याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं. त्याला बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळाला.
शिल्पाताईंनी या महिलांसाठी शिलाई मशिन आणल्या. कापडाच्या बॅगा बनवण्याचं प्रशिक्षणही या महिलांना देण्यात आलं. मग बचत गटाच्या माध्यामातून बॅगांचे उत्पादनही सुरु झाले. त्यालाही यश मिळालं. हे पाहता लाकूड, टेराकोटा आणि कापड यांच्या सहाय्यानं वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण या महिलांना मिळालं. यामुळं महिलांचा उत्साह आणि मनोबल वाढलं. याचाच फायदा हे गाव स्वयंपूर्ण होण्यासाठी झाला. महिला आपल्या घरातलं काम संभाळून या बचत गटासाठी अतिरिक्त वेळ काढू लागल्या. त्यांनी बनवलेल्या वस्तू इथल्या रस्टिक हॉलीडेज इथं कायमस्वरुपी पर्यटकांसाठी विकायला असतात. या वस्तूंची मागणी आता हळूहळू वाढतेय़ हे विशेष.
आज बचत गटाच्या माध्यमातून गावातल्या महिलां आर्थिकदृष्टा सक्षम झाल्या आहेत. या महिलांनी बनवलेल्या वस्तूंची वाढती मागणी पाहता त्यांच्या पतींनीही या कामात त्यांना मदत करायला सुरुवात केली. त्यामुळं रोजंदारीसाठी मुंबई आणि इतर शहरात जाण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत गेलं. यामुळं स्थलांतर थांबलं.
एका महिलेने आपल्या गावातल्या महिलांच्या सबलीकरणासाठी केलेली ही चळवळ यशस्वी झाली आहे. आता वेगवेगळ्या प्रदर्शनांतही तुरळ गावातल्या बचत गटांच्या वस्तूंना चांगली मागणी असते. कापडाच्या पिशव्या आणि लाकडाच्या वेगवेगळ्या वस्तू ही या बचत गटाची खासियत आहे. यासाठी हे बचत गट प्रसिध्द झालेत.