सध्या शाहरूखच्या ‘फॅन’ चित्रपटाची सगळीकडे चर्चा असली तरी निवृत्ती घेऊनही मास्टर ब्लास्टर सचिनच्या फॅन्सची संख्याही दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसून येतयं. अशाच एक सचिनच्या ‘जबरा फॅन’ने एक तपाहून अधिक काळ सचिनबद्दल छापून आलेली प्रत्येक बातमी संग्रही करण्याचा अनोखा प्रयत्न केलाय. बघता बघता त्याची तीस हजाराहून अधिक छायाचित्र, पंधरा हजाराहून अधिक लेख, शेकडो पुस्तक, मॅग्जिन्स गोळा झाली आहेत. परळला राहणारा २८ वर्षाच्या अभिषेक साटमची उत्कृष्ट फोटोग्राफर, रांगोळीकार असण्यासोबतच सचिनचा 'डायहर्ट फॅन' ही विशेष ओळख ही निर्माण झाली आहे.
सचिन आणि त्याचे फॅन्स यांचं अतूट नातं वेळोवेळी पहायला मिळालं आहे. कोणी मैलोनमैल प्रवास करत सचिनची प्रत्येक मॅच पाहायला जातो. कोणी चेहऱ्यावर रंगरंगोटी करतो तर कोणाच्या हातावर सचिनचा टॅटू पाहायला मिळतो. तसंच काहीसं अभिषेक साटमच याबाबतीत झालयं. लहानपणी चिंचोका, तिकीट गोळा करायच्या वयात हा गडी सचिनचे पेपरमधली कात्रणं गोळा करायला लागला. एखादा सामना संपल्याच्या दुसऱ्या दिवशी स्वारी निघायची आणि स्टाँलवरचे जवळजवळ सर्वच पेपर घेऊन यायचा. खाऊसाठी, खचार्साठी मिळालेले सर्वच पैसे सचिनप्रेमासाठी खर्च होत होते. घरामध्ये रद्दीच रद्दी. काही दिवसांनी रद्दी विकायची आणि मिळालेल्या पैशातून पुन्हा सचिनच घरी आणायचा..सचिनवेडापायी हळूहळू नियतकालिक, पुस्तक, मासिक, साप्ताहिक सर्वच घरी येऊ लागली होती.त्यात घरामध्ये जेमतेम जागा, चार माणसं आणि त्यात सचिनही जागा व्यापू लागला. आईला राग येण अपेक्षित होतं पण बाबांचा सचिनवेडाला फूल टू सपोर्ट असल्याने दिवसेंदिवस संग्रह वाढतच होता. शाळा संपली, कॉलेज संपल, एमएससीचा अभ्यासक्रम सुरु झाला, पण सचिनप्रेम तीळमात्रही कमी झालं नाही. २४ एप्रिलला सचिनच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या या सचिनप्रेमावर एक व्हिडिओ रसिकांच्या भेटीला येत आहे.
तरीही इच्छा अपूर्णच...
दरवर्षी २४ एप्रिलला सचिनचा वाढदिवस येतो तसा अभिषेकच्या सचिन कलेक्शनमध्येही कलेकलेने वाढ होत आहे. या सर्व संग्रहाचं एक प्रदर्शन व्हावं यासाठी तो प्रयत्नशील आहे. कोणत्यानाकोणत्या मागार्ने हे सचिनवेड सचिनपर्यंत पोहोचविण्याच्या तो प्रयत्नात आहे. पण वषार्नुवर्ष अभिषेकच्या या इच्छा अपूर्णच राहत आहेत.
जेव्हा सचिनचा आॅटोग्राफ मिळतो....
रद्दीवाले , रस्त्यावर पुस्तकांची दुकाने सर्वांमधला सचिन शोधयचा अशी सवयच अभिषेकच्या अंगवळणी पडली. ‘द मेकींग आॅफ क्रिकेटर्स’ या पुस्तकाच्या शोधात तो अनेक दिवस होता. एक दिवशी फ्लोरा फाउंटन येथे रस्त्यावरच्या दुकानदारांची पुस्तके चाळत असताना त्यामध्ये ‘द मेकींग आॅफ क्रिकेटर्स’ पुस्तक त्याला दिसल्याने त्याला आनंद झाला. घरी येऊन पाहतो तर त्यातल्या पहिल्या पानावरच सचिनची खरखुरी सही त्याला दिसली. दुग्धशर्करा योग त्या दिवशी जुळून आल्याचे अभिषेक सांगतो.
शाहरूखच्या फॅन चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अभिषेक आणि त्याच्या अनोख्या वेडावर व्हिडिओ साँग चित्रित होत आहे. अभिषेक करंगुटकर, पराग सावंत, गुरुप्रसाद जाधव या तरुणांनी मिळून अभिषेक साटम याचा गेल्या बारा-तेरा वर्षातला ’सचिनवेडा’ चा प्रवास रंजकरित्या कॅमेराबद्ध केला आहे.
यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा :