जीवनसंघर्षातून पत्रकारिता करताना प्रगतीचा आलेख रेखाटणा-या हलिमा कुरेशी यांचा प्रेरणादायी लढा!
मराठीमध्ये राजकीय पत्रकारितेच्या क्षेत्रात मुली फारच कमी दिसतात आणि त्यातही मुस्लिम समाजातील तरुणी तर जवळपास नाहीच. पण त्यामुळेच या क्षेत्रात हलिमा कुरेशी सारख्या बावनखणी निडर पत्रकारिता करणा-या तरुणीचे वेगळेपण ठसठशीतपणे अधोरेखीत होते. ग्रामीण भागातून आलेल्या हलिमा यांच्या स्वकर्तृत्वावर मिळवलेल्या या स्थानाला म्हणूनच महत्व आहे.
हलिमा यांच्या या कर्तृत्वाची नुकतीच राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे, हलिमा यांना दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामनाथ गोएंका पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. हा राष्ट्रीय पातळीवरचा पत्रकारांसाठी असलेला प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. त्यांना तो ‘पॉलिटिक्स अँड गव्हर्नन्स’ या विभागात मिळाला आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर गोवंश हत्या बंदी कायदा लागू केला गेला. त्यानंतर त्याचे परिणाम विविध पातळीवर दिसू लागले होते. हा विषय आयबीएन-लोकमतसाठी कव्हर करताना हलिमा यांनी खूप कष्ट घेतले. त्यांनी या विषयाचा वेगवेगळ्या पातळ्यांवर पाठपुरावा केला. अगदी बीफ विकणाऱ्यांपासून विविध क्षेत्रांतील लोकांच्या प्रतिक्रिया त्यांनी घेतल्या. त्यातून ज्या गोष्टी पुढे आल्या त्यांचं चांगल्या प्रकारे विश्लेषणही केलं. त्यांच्या या बातमीदारीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.खरेतर योगायोग पहा, त्यांचा जन्म ज्या कुरेशी समाजात झाला त्या कुरेशी जमातीचा पारंपरिक व्यवसाय मटण विकण्याचा, पण हलिमा यांच्या वडिलांना मात्र तो करण्याची इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी ट्रक ड्रायव्हर म्हणून काम स्विकारले होते.
शिक्षणाचे माहेर असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या केडगाव चौफुला या गावीएका ट्रक ड्रायव्हरच्या घरात जन्म घेतेलेल्या हलिमा यांना पाच बहिणी आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. वडीलांचे शिक्षण फारस नसले तरी त्यांना आपल्या सर्वच मुलांनी सिकून मोठे व्हावे हा ध्यास होता त्यामुळे त्यांनी सर्वच मुलांना शिक्षण देण्यासाठी मेहनत घेतली. शाळेत शिकत असताना अभ्यासात हलिमा नेहमी आघाडीवर असायच्या, पण त्याचबरोबर अवांतर विषयांमध्येही उत्साहाने सहभागी होत असत. वक्तृत्व स्पर्धा त्यांचा आवडता प्रांत होता, त्यातूनच गावातल्या सार्वजनिक गणेशोत्सवात त्यांनी आपलं वर्क्तृत्व गाजवलं. वर्क्तृत्वाच्या क्षेत्रात नंतर त्यानी अनेकदा प्राविण्य मिळवल आहे. त्यांनी बारामतीमधील कृषी महाविद्यालयामधून बारावीनंतर बीएस.सी.ची पदवी मिळवून, मग पुणे विद्यापीठामध्ये एम.एससी. केलं. चाकोरीबद्ध नोकरी करण्यात हलिमांना कधीच फारसं स्वारस्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी नंतर पत्रकारितेची पदविका व रानडे इन्स्टिट्यूटमधून पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यातूनच आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीमध्ये काम करायची संधी मिळाली.
मग पत्रकारितेच्या क्षेत्रात अल्पावधीतच आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये पंढरपूरच्या वारीला महत्त्वाचं स्थान आहे हे जाणून त्यांनी ही वारी पायी चालून दोनदा पूर्ण केली. त्यातून आयबीएन-लोकमतसाठी वारीचं खूप चांगल्या प्रकारे वार्तांकनही केलं. महाविद्यालयात होणाऱ्या रॅगिंगचं प्रकरण बाहेर काढलं. अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण बातम्या करून त्यांनी आपल्या अभ्यासूपणाचा आणि चिकाटीचा प्रत्यय आणून दिला. गोमांस बंदीविषयीचं वार्तांकन त्यांना गोएंका पुरस्कारापर्यंत घेऊन गेलं.
पुण्यातल्या पुरोगामी विचारांच्या अनेक संस्था – संघटना मध्ये कार्यरत हलिमा या सर्व चळवळींच्या कार्यक्रमात सहभागी होत असतात. स्त्री-पुरुष समता व मुस्लीम स्त्रियांच्या समस्या त्यांना महत्त्वाच्या वाटतात, पण त्याचबरोबर मुस्लीम समाजात असलेली बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, हिंदू-मुस्लीम जातीयदंगे हे सर्व विषय त्याना अस्वस्थ करतात. समाजामध्ये परिवर्तन व्हावं, सुधारणा व्हायला हव्यात असं त्यांना वाटतं. त्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. एकतर्फी तोंडी तलाक, बहुपत्नीत्व, यामध्येही बदल व्हायला हवा असं त्यांचं मत आहे.
व्यक्तिगत आयुष्यातही त्यांनी आनेकदा संघर्ष केला आहे. पुण्यासारख्या शहरात वास्तव्य करताना हलिमा यांना वडिलांची किडनी खराब झाल्यानंतर त्यांचं डायलिसिस करावं लागायचं. त्यासाठीची धावपळ आणि खर्च सर्व त्यांनाच पाहावा लागला. त्यांनी दोन-तीन लाख रुपये कर्जरूपाने उभे केले आणि कुटुंबप्रमुख म्हणून आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. वडिलांचा मृत्यू त्यांनी धीरानं पचवला. स्वतःला आवडलेल्या तरुणाशी लग्न करतानाही त्यांना प्रचंड संघर्ष तिला करावा लागला. ते मुस्लीमच आहेत मात्र तरीही लग्नाला मुलाच्या घरातूनच विरोध होता. त्यांनी त्याला जवळ जवळ डांबून ठेवलं होतं. तिथून पळून ते पुण्यात आले. मशिदीमध्ये त्यांचं लग्न लावताना तीन ठिकाणी मौलानांनी नकार दिला. कारण काय तर वराच्या पालकाची संमती नाही. शेवटी एका मशीदीमध्ये लग्न लावण्यात यश आलं. हलिमा यांची आई, बहीण व भाऊ या लग्नाला हजार होते. काही काळानंतर हलिमा यांच्या सासऱ्यांना बरं नव्हतं. त्यांना आयसीयूमध्ये ठेवल्याचं समजल तेव्हा हलिमा आणि त्यांचे पती घरी गेले. त्यांनी त्यांची आपल्या परीने काळजी घेतली. तरीही सासरे काही त्यांना माफ करायला तयार नव्हते तेव्हा हलिमा यांनी सासूबाईंना विश्वासात घेतल आणि परिवारातल्या गैरसमजांना दुर करण्याचा प्रयत्न केला.
थोडक्यात, एकाच वेळी अनेक पातळ्यांवर लढण्याची हलिमा यांची क्षमता मुस्लीम व इतर तरुणींना प्रेरणा देणारी आहे. आणि म्हणूनच त्यांच्या पुरस्काराचं विशेष अप्रूपही आहे.