टेलिव्हिजन टीआरपीचा विचार न करता, गोष्टीशी प्रामाणिक राहून काम केलं तर यश तुमचंच - दिग्दर्शक मंदार देवस्थळी
होणार सून मी ह्या घरची या मालिकेने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला. १५ जुलै २०१३ ला ही मालिका टेलिव्हिजनवर सुरु झाली होती. त्यानंतर आजपर्यंत या मालिकेचा यशस्वी प्रवास माहित नसलेला मराठी माणूस मिळणं अशक्यच. श्री-जान्हवी, आईआजी सारख्या व्यक्तिरेखांना घराघरात पोचवणारी ही मालिका टेलिव्हिजनच्या दुनियेत अनेक बाबतीत ट्रेंडसेटर बनली. खरंतर कुठलीही कलाकृती पडद्यावर साकार होण्यापूर्वी ती दिग्दर्शकाच्या नजरेत आणि डोक्यात तयार झालेली असते. होणार सून...या मालिकेचा दिग्दर्शक मंदार देवस्थळी याने मालिकेच्या यशासाठी प्रेक्षकांचे भऱभरून आभार मानलेत.
१९९० साली दूरदर्शनवरच्या दिनमान आणि सत्यवती या मालिकांचे सहदिग्दर्शक म्हणून छोट्या पडद्यावरचा आपला प्रवास सुरु करणाऱ्या मंदारने राजा राजे, मला नाही जमायचं सारख्या मालिका दिग्दर्शित केल्या. पण मंदारच्या करिअरची खरी सुरुवात झाली ती दिवंगत अभिनेते विनय आपटे यांच्यामुळे. त्यांनी मंदारला बोक्या सातबंडे, मना मनाची व्यथा, वळवाचा पाऊस आणि सांगाती सारख्या मालिकांच्या कार्यकारी दिग्दर्शनाची जबाबदारी दिली. जी मंदारने यशस्वीरित्या पारही पाडली. पण मंदारला दिग्दर्शक म्हणून खरी ओळख दिली ती आभाळमाया या मालिकेने. “आभाळमाया या मालिकेने मला माझ्या व्यावसायिक आयुष्यातला रस्ता दाखवला होता, वादऴवाटने या रस्त्यावरची वाटचाल पुढे नेली आणि होणार सून...या मालिकेने माझी ही वाटचाल खऱ्या अर्थाने यशाकडे नेली ” अशी कबूलीही मंदार आवर्जुन देतो.
मंदार सांगतो, “मालिकेच्या एका ठराविक टप्प्यानंतर ती थांबवण्याचा निर्णय हा प्रेक्षकांसाठी अचानक असला तरी आमच्यासाठी हा अचानक नव्हता. मालिका सुरु झाली तेव्हाच यातली गोष्ट कशी मांडायची आहे आणि कितपत पुढे न्यायची यावर मी आणि झी वाहिनीची सखोल चर्चा झाली होती. साधारण ८०० भागानंतर ही मालिका थांबेल हे पुर्वनियोजित होते. त्यामुळे आम्ही सर्वचजण या निरोपासाठी आधीपासूनच तयार होतो.
होणार सून...चे यश हे अवर्णनीय आहे, प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रेम दिले ज्याबद्दल आम्ही त्याचे नेहमीच ॠणी राहू” अशी कबूली मंदार देतो. होणार सून...ही मालिका अनेक बाबतीत ट्रेंड सेटर असल्याचेही त्याला वाटते. तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर या मालिकेमधल्या दोन मुख्य व्यक्तिरेखांना घेऊन एक अख्ख प्रेमगीत बनवणे हे होणार सून...मुळे मराठी टेलिव्हिजनक्षेत्रात पहिल्यांदाच घडत होते. तू मला..मी तूला हे गीत या मालिकेसाठी तयार केले गेले, हे गीतही मोठ्या प्रमाणात गाजले. मराठीत पहिल्यांदाच भव्य दिव्य सेटवर काम केले गेले ते या मालिकेमुळेच.
“ टेलिव्हिजन टीआरपीचे नवनवे रेकॉर्डस ही याच मालिकेने बनवले, कधी 9.1 तर कधी 7.1 अशा टीआरपी आकड्यांना गाठणारी मराठीतली ही पहिलीच मालिका. विशेष म्हणजे मालिकेचे हे टीआरपी रेकॉर्डस ती संपेपर्यत तसेच राहिलेत ज्याचा आम्हाला अभिमान आहे, म्हणूनच प्रेक्षकांच्या या प्रेमाचा गैरफायदा न घेता यशाच्या शिखरावर असतानाच हसत हसत निरोप घेणे कधीही चांगलेच ना,” असे मत मंदार व्यक्त करतो.
“ प्रत्येक दैनंदिन मालिका ही हळूहळू सर्वसामान्यांच्या आयुष्याचा एक महत्वाचा घटक बनू लागते, प्रेक्षक तिच्यातल्या व्यक्तिरेखांशी समरस होतात. पण त्या मालिकेचे कर्तेकरवते म्हणून आम्हाला मात्र नेहमीच एक त्रयस्थ म्हणून विचार करावा लागतो. म्हणजे मालिकेच्या माध्यमातून सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीशी नेहमी प्रामाणिक रहायला हवं, जेवढ्या प्रामाणिकपणे तुम्ही तुमची गोष्ट सांगाल तेवढ्याच प्रामाणिकपणे प्रेक्षकही तुमची मालिका पसंत करतील हा माझा अनुभव असल्याचे” मंदारने यावेळी कबूल केले.
होणार सून...या मालिकेमुळे मंदार पहिल्यांदाच निर्माता बनला. हिंदी मालिकांसारखे भव्यदिव्य सेट आणि आऊटडोअर लोकेशन्स मराठीमध्ये शक्य नाही असा विचार अनेक निर्माते करत असताना मंदारने निर्माता बनून या विचारांना कायमची खीळ बसवली.
मंदार सध्या माझे पती सौभाग्यवती या मालिकेच्या निर्मिती दिग्दर्शनामध्ये व्यस्त झालाय. याबरोबरच तो आणखी एका नव्या मालिकेच्या जुऴवाजुऴवीमध्ये गुंतलाय. टेलिव्हिजनमध्येही आता पैसा येऊ लागलाय, एकेका मालिकेसाठी शंभर जणांची टीम कार्यरत असते, त्यामुळे आता मालिकांचे हे जगही अनेकांच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आहे. छोट्या पडद्यावरचा हा चैतन्यमय प्रवास असाच अविरत सुरु राहो यासाठी त्यांना शुभेच्छा...