‘डोरस्टेप स्कूल’ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारी शाळा, साक्षरतेला प्रत्येक स्तरावर पोहोचविण्याचा आगळा वेगळा प्रयत्न!
एक जुनी म्हण आहे – ‘तहान लागल्यावर विहिरीकडे जावे लागते, विहीर कधीही तहानलेल्याकडे येत नाही.’ मात्र जर त्याच्याविरुद्ध झाले तर? असेच काहीसे झाले आहे. विश्वास बसत नसेल तर, ही सत्यघटना आवर्जून वाचा.
शिक्षणाचा अधिकार देशात लागू झाला असला तरी, आजही लाखो मुलं अशी आहेत, जी वेगवेगळ्या कारणांमुळे शाळेत जात नाहीत. अशा मुलांची संख्या आता लहान शहरांच्या ऐवजी मोठ्या शहरांमध्ये एका आजाराचे रूप घेत आहे, जेथे मुले आपल्या कुटुंबीयांसोबत झोपडपट्टीत राहतात, रस्त्यावर झोपतात किंवा अशा ठिकाणावर राहण्यासाठी मजबूर असतात, जेथे एखादे निर्मितीचे काम सुरु असते. हीच गोष्ट लक्षात ठेवून मुंबईत राहणा-या बिना लश्करी यांनी ‘डोरस्टेप स्कूल’ची सुरुवात केली. जेणेकरून जी मुले शिकण्यासाठी शाळेत जाऊ शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत शाळा स्वतः पोहोचेल. हेच कारण आहे की, ५० मुलांसोबत सुरु झालेला हा प्रकल्प आज एक लाख मुलांपर्यंत पोहोचला आहे. विशेष बाब ही आहे की, ‘डोरस्टेप स्कूल’ मुंबई व्यतिरिक्त ठाणे आणि पुण्यात देखील काम करत आहे.
बिना शेट्टी-लश्करी यांनी ‘डोरस्टेप स्कूल’ ची सुरुवात वर्ष १९८८मध्ये तेव्हा केली जेव्हा त्या मास्टर्स इन सोशल वर्क मध्ये एक विद्यार्थिनी होत्या. त्या दरम्यान त्यांनी पाहिले की, काही मुले शाळेत जाण्याचे सोडून आपल्या कुटुंबियांचे पालन पोषण करण्यासाठी काम करण्यासाठी मजबूर होते. इतकेच नव्हे तर त्यांनी पाहिले की, जी मुले शिक्षण सोडून काम धंदा करायचे, त्यांचे वय ८ते १०वर्षाच्या दरम्यान होते, अशातच त्यांना शाळेत जाणे खूप कठीण होते. तेव्हा त्यांनी विचार केला की, मुलांना त्यांच्या जवळच जाऊन शिकविले पाहिजे. बिना यांनी या कामाची सुरुवात मुंबईच्या कफ परेड भागातील बाबासाहेब आंबेडकर नगर येथून केली होती.
‘डोरस्टेप स्कूल’ नावाची ही संस्था ‘स्लम’मध्ये राहणा-या मुलांसाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम चालविते. ‘स्कूल ऑन व्हील’ यातीलच एक कार्यक्रम आहे. त्यामार्फत एका विशेष पद्धतीने डिझाईन केलेली बस असते. ज्यात शाळेतल्या वर्गाचे वातावरण तयार करण्यात आले आहे. ही बस सकाळी आठ वाजेपर्यंत वेगवगेळ्या ठिकाणावर रोज जाते. एक बस, एका दिवसात चार वेगवगेळ्या ठिकाणावर जाते आणि या बस मध्ये येऊन मुले शिकतात. या बसमध्ये अडीच ते तीन तास मुलांना शिकविले जाते. ज्यानंतर मुले आपल्या घरी किंवा कामावर परततात. विशेष बाब ही आहे की, एका बसमध्ये जवळपास २० ते २५ मुले एकत्र बसून शिकू शकतात. या बसमध्ये शिकण्यासाठी येणा-या मुलांचे वय सहा वर्षापासून १८वर्षांपर्यंत असते. ज्यानंतर त्यांना वेगवगेळ्या गटात बसवून शिकविले जाते. या बसमध्ये ऑडियो व्हिज्युअल सोबत, पाणी, लायब्ररी सोबत ‘रिक्रीएशन मेटीरियल’ देखील असते. जेणेकरून येथे येणा-या मुलांची प्रतिभा ते दाखवू शकतील.
या बसमध्ये मुलांना हिंदी आणि गणित हे विषय शिकविले जातात. बिना यांनी ‘युवर स्टोरी’ला सांगितले की, “बस मध्ये शिकण्यासाठी येणा-या मुलांना केवळ लिहिणे- वाचणेच शिकविले जात नाही तर, त्यांना स्वच्छतेची देखील सवय लावली जाते. सोबतच त्यांना शिकविले जाते की, अश्लील भाषा सोडून चांगल्या भाषेत संवाद साधून आपल्या गोष्टीला कशाप्रकारे समोरच्याला पटवून सांगितले जाते. जी मुले येथे शिक्षणात चांगले असतात, त्यांचे नाव ते सरकारी किंवा दुस-या शाळेत दाखल करतात. जेणेकरून ते चांगले शिक्षण घेऊन पुढे आपली कारकीर्द घडवू शकतील.”
‘डोरस्टेप’ मुलांसोबत त्यांच्या आई–वडिलांचे देखील समुपदेशन करतात. आई–वडिलांची मुलांच्या शिक्षणासंबंधित मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करतात. बिना यांचे म्हणणे आहे की, “आमच्याकडे अशा पाच बस मुंबई आणि तीन बस पुण्यात आहेत. या बस व्यतिरिक्त आमचे शंभरहून अधिक अभ्यास केंद्र विभिन्न ‘स्लम’ भागात काम करत आहे.”
‘स्कूल ऑन व्हील’ प्रकल्पाव्यतिरिक्त ‘डोरस्टेप स्कूल’ नावाची एक संस्था शंभरपेक्षा अधिक अभ्यासकेंद्र देखील चालविते. जेथे एक वर्ग अडीच ते तीन तासापर्यंत असतो. मुलांचा हा वर्ग सोमवार ते शुक्रवार पर्यंत चालतो आणि एक शिक्षिका दिवसभरात दोन वर्ग घेते. प्रत्येक वर्गाचा एक पाठ्यक्रम असतो आणि त्याच्यामार्फत ‘स्लम’ आणि रस्त्यावर राहणा-या मुलांना शिकविण्याचे काम केले जाते. येथे येणा-या मुलांना विज्ञान, गणित, संगणक आणि विभिन्न भाषेचे ज्ञान दिले जाते. बस प्रमाणेच अभ्यास केंद्रात केवळ शिक्षणच घेत नाहीत तर, गाणे, डान्स आणि ड्रामादेखील शिकतात. हे अभ्यासकेंद्र अशा मुलांसाठी आहे, जे नियमित शाळेत जातात. ते त्यांना जास्तीचे प्रशिक्षण देण्याचे काम करतात. बिना यांच्या मते, “त्यांचे लक्ष्य हे आहे की, ही पहिली पिढी असते, जी शिक्षणासाठी पुढे येते आणि घरात त्यांच्या शिक्षणात त्यांना कुणीही मदत करणारा नसतो. अशात घरातून मदत न मिळाल्यामुळे अनेकदा इच्छा नसूनही मुलांना आपले शिक्षण मध्येच सोडावे लागते. त्यामुळे असे होऊ नये, म्हणून आम्ही हे अभ्यास केंद्र चालवितो.”
बिना यांचे म्हणणे आहे की, मुलांना ‘स्कूल ऑन व्हील’ या अभ्यासकेंद्रापर्यंत आणणे कुठल्याही आव्हानापेक्षा कमी नसते. त्यामुळे स्टडी सेंटर मध्ये शिकविणारी शिक्षिका मुलांच्या घरी जाते आणि प्रत्येक मुलाला स्वतःसोबत अभ्यासकेंद्रात घेऊन जाते. असे असूनही या भागात अनेक वर्ष काम केल्यामुळे काही मुले स्वतःच पोहोचतात, परंतु काही मुलांना अभ्यासकेंद्र किंवा बसपर्यंत आणणे हे मोठे आव्हान असते. त्याव्यतिरिक्त अनेक प्रकारच्या ‘मोटिवेशन एक्टिविटी’ देखील चालवितात. जेणेकरून मुले त्यापासून आकर्षित होऊन शिकण्यासाठी त्यांच्याकडे येऊ शकतील. आज त्यांनी शिक्षित केलेली अनेक मुले आपली संस्था चालवत आहेत, चार्टर्ड एकाउंटेंट बनले आहेत, खेळात सामील झाले आहेत किंवा विविध संस्थेत मोठ्या पदांवर काम करत आहेत.
आज ‘डोरस्टेप स्कूल’ संस्था १००पेक्षा अधिक वेगवेगळ्या शाळेसोबत मिळून देखील काम करत आहेत. जेणेकरून मुलांना चांगल्यात चांगले शिक्षण मिळू शकेल. ‘डोरस्टेप स्कूल’ च्या गटात ५००पेक्षा जास्त लोक आहेत. सध्या ही संस्था मुंबई, ठाणे आणि पुण्यात काम करत आहे. आता त्यांचा प्रयत्न मुंबई आणि त्याच्या जवळील नवी मुंबई आणि कल्याण सारख्या भागात काम करण्याचा आहे. सोबतच ज्या संस्था दुस-या राज्यात किंवा भागात काम करत आहे, त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे, जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने आपले काम करू शकतील.
अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :
लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचे लक्ष्य
शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवण्याकरता सात आकडी पगाराकडे पाठ फिरवणारा अवलिया
शिक्षणाला सहज आणि मनोरंजक बनवते “परवरिश, द म्युजियम स्कूल”!
लेखक : हरिश
अनुवाद : किशोर आपटे