अपयशानं खचलो नाही तर नवीन यशस्वी मार्ग शोधला – दीपक सिंग बोनल
लहान असताना आणि नंतर थोड मोठं झाल्यावरही मला असंच वाटायचं की, चांगला अभ्यास करायचा, चांगले गुण मिळवायचे, चांगल्या महाविद्यालयात शिकायचं आणि खूप पैसे मिळतील, अशी एखादी नोकरी शोधायची. माझा उद्देशच तो होता." दीपक सिंघ बोनल सांगत होते. आवडीने काही जण त्यांना 'दाजी' असाही म्हणतात . गोरखलच्या सैनिकी शाळेतून शिक्षण घेतल्यावर, त्यांनी आयआयटी दिल्लीमधून केमिकल इंजिनियरची डिग्री प्राप्त केली. महाविद्यालयीन जीवनात , त्यांना उद्योग सुरु करायचं सुचलं आणि त्यांचा पहिलाच प्रयत्न फसला. त्यांचा पहिला स्टार्टअप (हमाराब्रोकर) चांगलाच आपटला आणि मग त्यांनी आपल्या जीवनाकडे गंभीरतेनं पाहायला सुरुवात केली. ते म्हणतात " महाविद्यालयात जणू मी उंदराच्या शर्यतीत पळतोय असं मला वाटत होतं आणि त्यात मला समाधान नव्हतं. "
योग्य पर्याय निवडणे :
दीपक आणि त्यांचा मित्र गौरव जैन यांनी विना सरकारी संस्थांमध्ये इंटर्नशीपसाठी प्रयत्न सुरु केले .
आम्हाला असं जाणवलं की , सामाजिक संस्थांमध्ये , ऐच्छिकरित्या काम करण्यासाठी , एखादं विशेष व्यासपीठ उपलब्ध नाही. समाजाप्रती आपली जबाबदारी या विषयावर आम्ही अनेकांशी बोललो. आश्चर्य म्हणजे, सुमारे ८५% लोकांनी कोणत्या न कोणत्या तरी समाजकार्यात स्वत:ला झोकून देण्याची तयारी दाखवली, पण त्यांना योग्य ते व्यासपीठ मिळत नव्हतं.
एक जाणीव जी संधी बनली :
गौरव आणि दीपक यांनी ओळखलं की ही एक संधी आहे, ज्यामुळे, लोकांना मदत करणे, संस्था आणि समाजाला मदत करणे आणि आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण करण्याची त्यांची तळमळसुद्धा पूर्ण होणार आहे.
विचारमंथनानंतर त्यांना अखेर वाट सापडली . सामाजिक कार्यात रुची असणाऱ्या लोकांना एकाच ठिकाणी त्यांना हवी असलेली सामाजिक संस्था शोधून देणं , हेल्पिझ या बिन सरकारी यंत्रणेच पोर्टल त्यांनी उभारलं, ज्यामुळे काम करू इच्छीणाऱ्यांना आणि संस्था या दोघानाही त्याचा फायदा होइल.
आम्ही दीपक यांना या नावामागची कहाणी विचारली असता ते म्हणतात " एक सुंदर वाक्य आहे, मानवी जीवन हे सेवामयी जीवन आहे आणि दुसऱ्यांप्रती कणव असणे आणि मदत करण्याची इच्छा असणे. हेल्पी ही अशी व्यक्ती आहे, जिला दुसऱ्यांना मदत करायची आहे आणि आम्ही त्यासाठी एक व्यासपीठ बनवलं आणि म्हणून हे नाव 'हेल्पीझ. आमच्या मते, हा एक असा समुदाय आहे, ज्यांना आप आपल्यापरीने समाजसेवा करायची आहे. "
यातील मुख्य सदस्य आहेत, सचिन गर्ग , सुमित गार्बेल ,मयंक तिवारी, धर्मेंद्र प्रताप सिंग ,कपिल शर्मा आणि अंकित सिंग. या व्यतिरिक्त, आमच्या इथे शिकावू कार्यकर्तेही आहेत .
काय आहे हेल्पिझमध्ये ?
हेल्पिझ हे दोन प्रकारच्या समुहासाठी काम करत वैयक्तिक उपयोगासाठी आणि सर संस्थेच्या उपयोगासाठी. प्रत्येक व्यक्ती इथं त्याचं प्रोफाईल बनवू शकत, संस्थेची माहिती घेऊ शकतो आणि संस्थेशी संपर्कही साधू शकतो. त्याचबरोबर , संस्थेसोबत काम करण्याची , इंटर्नशिप करण्याची संधीही मिळवू शकतो. त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे समविचारी लोकांना भेटू शकतो. इथले युजर्स त्यांचे अनुभव आणि कामाबद्दलची माहिती इथं मांडू शकतात. यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हे युजर्स स्वत:हून काही सामाजिक उपक्रम राबवू शकतात आणि हेल्पिझमधल्या समुदायातून मदत आणि सहभाग मिळवू शकतात.
दुसरीकडे संस्था, आपलं काम या पोर्टलवर दाखवू शकतात. आपल्या सामजिक कार्यासाठी, स्वयंसेवक मिळवू शकतात आणि 'स्वयंसेवक व्यवस्थापन पद्धती' अंतर्गत या स्वयंसेवकांची व्यवस्थाही करू शकतात आणि त्याचबरोबर त्यांच्या सबस्क्रायबर बेसवर त्यांच्या कामाची छायाचित्र आणि बातम्या सतत अपडेट करू शकतात. आतापर्यंत हेल्पिझ च्या माध्यमातून ६५० विद्यार्थ्यांना, ३० स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकली आहे. " आम्हाला आमच्या सर्वच सदस्यांकडून चांगला अनुभव मिळाल्याची पोचपावती आली आहे. अनेक लोक आमच्याशी जोडले जाताहेत, याचा अर्थ समाजात याचा चांगलाच प्रभाव पडत असणार. विविध सामाजिक संस्थांकडूनही, आम्हाला त्यांच्यासोबत काम करण्याची आमंत्रणं येत आहेत आणि त्यांना स्वयंसेवक पुरवण्याची विनंतीही. असे स्वयंसेवक जे त्या संस्थांचे प्रयत्न त्या-त्या कार्याच्या यशात बदलतील आणि आम्हाला खात्री आहे हे सगळ इथेच थांबणार नाही." दीपक म्हणाले .
सध्या ते मोबाईलवर या एपची सुरुवात करण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत. डिसेंबर मध्ये हे एप सुरु करण्याची त्यांची इच्छा आहे, ज्यामुळे त्यांचा हा प्रामाणिक प्रयत्न अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल .
मिळकत आणि आव्हान :
दीपक सांगतात कि सध्या नफा या बाबीकडे त्यांनी दुर्लक्ष केलय. त्यांना हे पक्क माहितेय की, फार काळ विना मिळकतीच्या अभावे हे काम करत राहणं शक्य होणार नाही, ते म्हणतात " आम्हाला हा प्रकल्प स्वयंसिद्ध बनवायचा आहे. सध्या आम्ही एनएसएस आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने आमची मोहीम राबवतोय.. एनएसएस इंडिया आम्हाला आमच्या मोहीमेसाठी निधी पुरवत असते" भविष्यात मात्र आम्ही कॉर्पोरेट क्षेत्रासाठी कार्यक्रम आखायचे ठरवले आहेत आणि त्यांच्या CSR कार्यक्रमांची मदत करण्याचे ठरवले आहे. आमच्या कामाचा खर्च त्यातून निघेल .
दीपक आणि गौरव या दोघांच्याही मते, त्यांच्यासमोरच सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे , ध्येयाने झपाटलेली अशी माणसे मिळवणं ज्यांच्याकडे योग्य कुशलता आहे आणि ते 'हेल्पिझला भव्य यश मिळवून देतील .
सागरातला एक थेंब :
दीपकनं हेल्पिझवर लक्ष केंद्रित करण्यासाठी महाविद्यालयात कॅम्पस मुलाखतींना जाणही टाळलं. या मुलाखतींमुळं त्यांना सहज नोकरी उपलब्ध होऊ शकली असती . अश्याप्रकारच्या निर्णयानं घरातून विरोध होणं स्वाभाविक होत, पण ते म्हणतात "मी नशीबवान आहे कारण माझ्या मित्रांनी आणि कुटुंबियांनीही मला चांगली साथ दिली."
सर्वसाधारण व्यक्तीनं एखाद्या सामाजिक कार्यासाठी वेळ द्यायचा ठरवताना , 'हेल्पिझ' हा त्यांचा पहिला पर्याय ठरावा , अशी दीपक यांची इच्छा आहे. ते पुढे म्हणतात ," लोकांनी केलेलं चांगल समाजोपयोगी काम त्यांनी इतरांना दाखवावं आणि त्याबद्दल त्यांना अभिमान वाटावा, यासाठी हे व्यासपीठ आहे, येत्या ५ वर्षात ‘हेल्पिझ’ हि संस्था समाजसेवा करणारी आणि समाजसेवक पुरवणारी सर्वात मोठी सेवा बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जातीपातीच्या, आर्थिक ,सांस्कृतिक ,प्रांतिय अशा सर्वच कुंपणांना तोडून, याठिकाणी निव्वळ माणुसकीसाठी काम करणारे जमतील, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. जाता-जाता त्यांनी मदर तेरेसा यांचं म्हणणं सांगितलं " आपल्याला वाटत की आपण जे काही करत आहोत, ते म्हणजे सागरातला एक बिंदू मात्र आहे, पण तो बिंदू यात पडला नाही तर या समुद्रातल्या पाण्याची पातळी निश्चितच कमी झालेली असते."