Marathi

तेंव्हा कुठे होता राधासुता तुझा धर्म. . . जेटली यांना प्रत्यूत्तर!

Team YS Marathi
30th Dec 2015
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

श्रीयुत जेटली यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये सुरुवातीलाच संसदेतील जीएसटी संदर्भातील कोंडीबाबत उल्लेख आहे. परंतू मुख्य लिखाणात सर्वत्र घसरत्या राजकीयक्षेत्रातील परिभाषेबाबत चिंता व्यक्त केली आहे. साधारणपणाने कोणाही राजकीय संस्थेने त्याला विरोध करण्याचे कारण नाही, त्यांनी त्याचे स्वागतच केले आहे. त्यात गेल्या काही काळाकडे पाहता नाकारण्यासारखेही काही नाही, कारण गेल्या काही दिवसांत राजकीय टिकांपलीकडे संवाद आणि चर्चा थांबल्या आहेत. असंसदीय भाषा आणि शब्दप्रयोग फारच सहजपणाने केले जात आहेत, त्यातून हा फरक देखील करणे कठीण जात आहे की काय असंसदीय आहे आणि काय नाही. परिणामत: ही राजकीय अध:पतन आणि घसरण आहे हे स्पष्ट होते. यामागचे कारण गुन्हेगारीवृत्तीच्या लोकांचा कायदेमंडळात होणारा प्रवेश आणि सरकार तसेच पक्षांमधील महत्वाच्या जागांवर होणारी नियुक्ती हे देखील असावे. यामागचे साजूक स्पष्टीकरण असे की, आपल्या राजकारणाच्या विकेंद्रीकरणाची ती उपउत्पादने आहेत किंवा काहीजण म्हणतात तसे मुख्य प्रवाहाचे हे विभागीयकरण होत आहे.


image


परंतू याचे खोलवर विश्लेषण करण्याची गरज आहे आणि तपासणी देखील. तो एक काळा होता जेंव्हा स्वातंत्रपूर्व काळ होता आणि कॉंग्रेसपक्षाच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये समाजाच्या सर्व घटकांतून आलेले नेते होते आणि ते परदेशातून उच्चविद्याविभूषित होऊन आलेले देखील असत. इंग्लडच्या संसदीय प्रथापरंपरांबाबत त्यांना फारच चांगले ज्ञान असायचे. ते सारे इंग्रजी भाषा आणि संस्कृती याबाबत फारच रूळलेले आणि तेथील सभ्यतांबाबत आदर करणारे होते. त्यांच्यासोबत त्यांनी जे वातावरण आणले होते त्यामुळे भारतीय राजकारणाला जी उंची आणि शिस्त प्राप्त झाली होती त्यामुळेच ते या देशाचे आदरणीय नेते म्हणून उदयास येऊ शकले होते. ही परंपरा महात्मा गांधी यांनी मोडली आणि खादीची सुरूवात केली. विस्टर्न चर्चिल यांना हे अजिबात रूचले नव्हते आणि त्यांनी त्यांची संभावना ‘अर्धनग्न फकीर’ अशी केली होती. चर्चिल यांचे विचार काही उच्चदर्जाचे नव्हेत पण ते परंपरागत इंग्लिश पध्दतीचे आणि आपल्या सिगारवर प्रेम करणारे तसेच सायंकाळी सूरापान करण्याच्या रूढीतील होते. गांधीजी वेगळे होते. त्यांना माहित होते की समाजाच्या तळागाळातील लोकांना जोडायचे असेलतर त्यांना परकीय भाषांमध्ये नाही तर देशी भाषांमध्ये बोलावे लागेल आणि वेशभूषाही देशी ठेवावी लागेल. त्यांचे खादीचे प्रयोग यशस्वी झाले. नेहरू दुस-या बाजूला ब्रिटिशांच्या पध्दतीने प्रभावित व्यक्तीमत्व होते. त्यांचे इंग्रजीभाषेवरही चांगलेच प्रभुत्व होते. त्या वातावरणात ते त्यांना हवा तसा संवाद साधू शकत होते. त्यांच्या अनुयायांमधील लाल बहादूर शास्त्री हे एकमेव होते ज्यांनी या सा-यांचा मेळ उत्तम प्रकारे घातला होता. पण भाषेची बंधने आणि भारतीय राजकारणातील राजकीय सभ्यतांच्या सीमारेषा सर्वात पहिल्यांदा ओलांडल्या त्या राम मनोहर लोहिया यांनी, कॉंग्रेसविरोधाचे मूळ खंदे पुरस्कर्ते आणि मागासवर्गीय राजकारणाचे समर्थक. त्यांचा प्रवेश आणि वागणे यांची भारतीय राजकारणाला सवय नव्हती. त्यानंतरही कॉंग्रेसपक्ष हा सर्वाना कमी लेखणारा पक्ष होता जो ‘ब्राम्हण’ समाजाच्या नेत्यांकडून चालवला जात होता. लोहिया म्हणाले की, “जे बहुसंख्य असतील तेच समाजाचे नेते असायला हवेत” त्या मागचे लोकशाहीचे तत्व अत्यंत योग्य पध्दतीने मांडण्यात आले होते जे त्याकाळातील राज्यकर्त्यांच्या विरोधात होते. जरी ते फारकाळ त्यांच्या मागासवर्गियांच्या राजकारणाला पाहण्यासाठी राहिले नाहीत तरी १९९० मधील मंडल आयोगाच्या प्रवेशामुळे नवीन नेतृत्व उदयाला आले जे प्रत्येक बाबतीत वेगळेच होते.

लालू, मुलायम, मायावती, काशीराम, कल्याणसिंग, उमाभारती, ही मंडळी काही तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आली नाहीत किंवा उच्चभ्रू राजकारणाचा त्यांना काही गंधही नव्हता. ते सारे रस्त्यावरील धुळीतून उभे राहिलेले नेतृत्व होते. त्यांनी भारतीय राजकारणाला नवी भाषा शैली दिली, जी अर्थातच राजकीय साधनशुचित्वाच्या काही लोकांना रूचणारी नव्हती. लालू , मुलायम आणि मायावती यांची या गटाने थट्टा केली. त्यांची भाषा अशुध्द आहे. हे नेते त्यांच्या वागणूकीतून सभ्यता जोपासत नाहीत. बहुतांश नेत्यांना इंग्रजी बोलताना समस्या येते आहे. ते जात्यांध देखील आहेत. ते उच्चवर्णिय आणि निम्नवर्णिय असा भेद करणारे आहेत. भ्रष्टाचार आणि अक्षमता ही आणखी दोन वैशिष्ट्ये त्यांच्या शिरपेचात शोभतात त्यामुळे त्यांच्यावरील टीका सिध्द करणे शक्य होते. पण एका संधीसाधु गटाने पर्याय नसल्याने त्यांचा स्वीकार करण्यात पुढाकार घेतला. चर्चांमध्ये या गटाचे म्हणणे असे की, राज्यघटना निर्माण करतानाच यांना शिक्षण देण्याची गरज प्रतिपादन केली होती आणि त्यांनाही समान मतदानाचा हक्क देण्यात आला आहे, जो त्या आधी नाकारण्यात आला होता.

मला असे म्हणायचे नाही की, राजकारणाचे सार्वत्रिकीकरण हेच भाषेचा दर्जा घसरण्याचे एकमेव कारण आहे, पण हे देखील खरे आहे की, त्यांनी भाषेचा पोत नक्कीच बदलण्यास सुरुवात केली. इंग्रजीच्या जागी बोलीभाषा आल्या. हा नवीन बदल इंग्रजी बोलणा-या वर्गासाठी नवा धक्का होता. हे सारे पूर्ण तेंव्हा झाले जेंव्हा दोन गट एकत्रित आले. संधीसाधू गटाला राजकीय व्यवस्था बदलण्याचे आव्हान होते ते त्यांनी राजकीय वर्ग बदलून साध्य करण्याचा प्रयत्न केला. हे विभाजन अधिक मुलभूत होते, दोन्ही गट समान राजकीय उद्देशांसाठी लढत होते. कुणीही शरण जाण्यास तयार नव्हते. परंतू त्यांच्यात संख्यात्मक फरक होता. परस्परांचा आदर आणि एकमेकांप्रती स्विकार्हता ही पहिली समस्या होती. राजकीय स्पर्धा राजकीय वैमनस्यात बदलली. आणि चर्चांना वादांचे स्वरूप येऊ लागले.

‘आप’ने नवीन बदल घडवला. राजकीय खेळात ते नवीन होते. आणि हे राजकीय आव्हान होते. जुन्यांना नवीन तथ्यांचा सामना करणे कठीण जात होते. आपने या सुरुवातीच्या संघर्षाचा फायदा घेण्याचे ठरवले. त्यांच्या प्रवेशातूनच हे स्पष्ट झाले. सारे प्रस्थापित पक्ष आपच्या विरोधात होते. या नवख्या मुलाला सांभाळावे कसे याचे त्यांना आकलन होत नव्हते. जेंव्हा पक्षाची स्थापना झाली तेव्हांच पक्षाच्या नेत्यांनी राजकीय उणिवांवर बोट ठेवले होते. आम्हाला ‘कुरतडणारे उंदीर’ संबोधण्यात आले. दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आम्हाला सोडले नाही आणि आम्हाला ‘जंगलात राहणारे नक्षली’ संबोधण्यात आले. त्यांनी आंम्हाला ‘कमनशिबी’ म्हणूनही हेटाळणी केली. पंतप्रधानासारख्या व्यक्तीसाठी ही नवीच घसरण होती. पंतप्रधानपद सांभाळणा-या व्यक्तीला ही भाषा शोभनीय नक्कीच नव्हती. आणखी एक भाजपाचे नेते गिरीराजसिंग यांनी आम्हाला ‘राक्षस’ म्हटले. साध्वी ज्योती निरंजन यांनी तर हद्द केली. त्यांनी आणखीच वेगळी प्रतिक्रिया दिली. आम्हाला ‘हरामजादा’ म्हणण्यात आले. भाजपाच्या त्यावेळच्या नेत्यांनी त्यांना रोखले नाही किंवा समज दिली नाही. ही यादी खूप मोठी आहे.

मला अजूनही लक्षात आहे, गुजरातच्या २००७च्या निवडणूकीत श्रीमान मोदी यांनी सोनिया गांधी आणि त्यावेळचे मुख्य निवडणूक आयुक्त जे एम लिंगडोह यांचा कसा उल्लेख केला होता. मला त्याचा पुनरुच्चार करायचा नाही पण ते नक्कीच शोभनीय वक्तव्य नव्हते. मला ते देखील आठवते ज्यावेळी यशवंत सिन्हा त्यावेळच्या पंतप्रधान मनमोहनसिंग यांना ‘शिखंडी’ म्हणाले होते. जे अशोभनिय होते. सिन्हा वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात प्रभावी नेते होते. आता जेटली आणि भाजपाच्या नेत्यांना अरविंद यांच्या पंतप्रधानाबाबतच्या भाषेने आक्षेप नोंदवावेसे वाटतात. मला इतकेच सांगायचे आहे की, ‘इतरांना दोष द्या आणि स्वत:च्या आंत डोकाऊन पाहू नका’ ही काही चांगली गोष्ट नाही. ते जे काही मांडत आहेत ते वास्तवात सत्यच आहे. ‘आप’ला त्याची जाणिव आहे पण प्रत्येकाने आत्मपरिक्षण करायला हवे आणि सुधारणाही करायला हव्यात. अगदी आपचा जन्मही झाला नव्हता त्यावेळी संसदेने मुल्यमापनसमिती स्थापन केली होती, ज्यातून खासदारांनी कसे वर्तन करावे याची दखल घेतली जाणार होती, मात्र त्याला कुणीही गंभीरपणाने घेतले नाही. आणि त्याचे कारण सोपे आहे. भारताचे राजकारण बदलले आहे. अगदी ऐतिहासिक कारणांपासून, बदल हे जुन्या पक्षांना नेहमीच जड वाटले आहेत आणि जुन्या गोष्टी सहजपणाने कुणीच सोडायला तयार नसते. इतिहास आणि वर्तमान या चौकात एकमेकाच्या समोर येतात आणि परिणामस्वरुप भाषेचा बदल लक्षात येतो जी व्यर्थ असल्याचे समजते. पण मला हे सांगायचे आहे की हा बदल आहे आणि तो आपल्या सा-यांच्या भल्यासाठीच व्हायला हवा.


( वरील लेखाचे मूळ लिखाण इंग्रजी भाषेत वरिष्ठ पत्रकार आणि आम आदमी पार्टीचे नेते आशुतोष यांनी केलेले आहे. वरील लेखातील विचारांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. मराठी अनुवाद- किशोर आपटे )

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags