Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
ADVERTISEMENT
Advertise with us

रुढींची बेडी तोडून फॅशनच्या शिडीवर अनिता डोंगरे

रुढींची बेडी तोडून फॅशनच्या शिडीवर अनिता डोंगरे

Monday November 09, 2015 , 5 min Read

अनिता डोंगरे ५० वर्षांच्या आहेत. महिला म्हणून त्यांचे जीवन रोमहर्षक असेच राहिलेले आहे. पारंपरिक भारतीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. साचेबद्ध जगणे, हेच ज्या समाजात महिलांचे नशीब असते. इतर बहिणी, काकू, अन्य बायका जिथे लग्न करून लेकुरवाळ्या होऊन आनंदात होत्या… पण आयुष्याने अनिता यांच्यासाठी काहीतरी वेगळाच विचार करून ठेवलेला होता.

अनिता सांगतात, ‘‘मी पारंपरिक सिंधी कुटुंबात वाढले. माझे आजी-आजोबा जयपूरचे. उन्हाळ्याच्या कितीतरी सुट्या मी जयपुरात घालवल्या आहेत. माझी चुलत भावंडे कडक शिस्तीत वाढताना मी बघितलेली होती. माझ्या जन्माच्या काही महिन्यांआधीच माझे वडिल मुंबईला आलेले होते आणि मुंबई हे जरा वेगळेच शहर होते. इथे महिला विविध व्यवसायांतून चांगले नाव कमवत होत्या.’’ अनिता सांगतात, की त्यांच्या कुटुंबात कुठल्याही स्त्रीने कुठलाही व्यवसाय कधीही केलेला नाही. भाऊबहिणी मिळून अनिता यांची ५० चुलत भावंडे आहेत. इंटर्नशिपनंतर जेव्हा अनिता यांनी नोकरी सुरू केली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अनिता सांगतात, ‘‘सगळ्यांनाच नवल वाटले. मला सगळेच सल्ला द्यायला लागले. अनिता काम करते आहे म्हणजे यांच्या घरात चणचण आहे, असेही बोलले जाऊ लागले.’’

image


अर्थात आता हे सारे मागे पडलेले आहे. अनिता डोंगरे देशातील आघाडीच्या फॅशन डिझायनर्सपैकी एक आहेत. कितीतरी ज्ञात आणि अज्ञात चेहऱ्यांसाठी त्यांनी कपडे तयार केलेले आहेत.

प्रारंभ

एक व्यावसायिक म्हणून जीवनात पुढे काय करायचे आहे, हा प्रश्न जेव्हा पुढ्यात उभा ठाकतो, तेव्हा यापेक्षा बहुदा महिला म्हणून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे कितीतरी सोपे गेले असते, असे वाटायला होते. घरातील महिलांना सुंदर पेहराव विणताना पहिल्यांदा जेव्हा पाहिले, तेव्हाच अनिता यांच्यात फॅशन डिझायनरची बिजे रोवली गेलेली होती. या अर्थाने अगदी लहान असतानाच त्या फॅशनच्या जगाकडे ओढल्या गेलेल्या होत्या. आई पुष्पा सवलानी हस्तकलेत कुशल होत्या. अनिता आणि तिच्या भावंडांसाठी पुष्पा कपडे विणत असत.

मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठातून अनिता यांनी फॅशनची पदवी संपादन केली आणि आपल्या स्वप्नांच्या दुनियेतले हेच त्यांचे पहिले पाउल होते. अनिता सांगतात, ‘‘जेव्हा मी १५ वर्षांचे होते, तेव्हा मला डिझाइन आणि फॅशन आवडत होते. एनएम कॉलेजात ज्यांच्यासोबत मी वाणिज्य शाखेत होते, असे माझे अनेक मित्र चार्टर्ड अकाउंटंट बनले, पण मला हे कंटाळवाणे वाटत असे. मला फॅशनचीच ओढ होती.

अनिता यांनी ३०० स्क्वेअर फुटात आपला व्यवसाय सुरू केला. लहान बहीण त्यांच्यासमवेत होती. काही वर्षांनी लहान भाऊही या व्यवसायात पडला. सुरवातीची वर्षे जरा जड गेली. पुरेशी जागाही काम करायला नव्हती. अनिता सांगतात, ‘‘त्या काळात अनेकदा व्यवसाय बंद करण्याचा विचार आला. पण अर्थात तो क्षणिक ठरायचा. सकाळी उठल्यावर मी म्हणत असे काय करू काहीच कळत नाहीये. भाडे द्यायला पुरेसे पैसे नसल्याने घरमालकाने आम्हाला घरातून बाहेर काढले, इतका टोकाचा प्रसंगही या काळात आमच्यावर ओढवला.’’

त्या सांगतात…

‘‘सुरवातीच्या वर्षांत पैशांची तर फारच अडचण होती. पण नंतर सगळं सुरळीत होत गेलं. मला वाटतं व्यावसायिकाच्या दृष्टीने येणारा प्रत्येक दिवस म्हणजे एक आव्हानच असते. आजही मी दररोज एका नव्या आव्हानाचा सामना करते. अर्थात या आव्हानांची पोत आता बदललेली आहे. मला वाटते अडचणींवर मात करणे तुम्हाला शिकावेच लागते.’’

फॅशन हा आवडीचा विषय असल्याने अनिता डोंगरे आपल्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीवर त्याच दृष्टीने लक्ष देतात. ‘अँड’ ही त्यांची कंपनी १९९९ मध्ये लाँच झाली आणि पुढे २००७ मध्ये ‘रिटेल वेस्टर्न वियर’, ‘ग्लोबल देसी’ लाँच करण्यात आल्या. अनिता सांगतात, ‘‘नवी उत्पादने बाजारात आणताना मी कुठलेही विशिष्ट धोरण आखत नाहीत. आतला आवाज तेवढा ऐकते.’’ आपला ब्रँड लाँच करण्याचे कारणही असे ठरले, की ज्या स्टोअर्सना त्या पाश्चात्य धाटणीचे पेहराव देत, त्या स्टोअर्सनी ते घेण्यास नकार दिला. डिझाइन बरोबर नाही, हे कारण सांगितले. ‘‘नोकरदार महिलांना डोळ्यासमोर ठेवून मी हे डिझाइन केलेले होते, पण कुणीही ते पसंत केले नाही. मला राग आला. म्हणून मग आता माझाच ब्रँड लाँच करेन असे मी ठरवून टाकले. आणि अशा पद्धतीने अनिता डोंगरेंचा उदय झाला,’’ अनिता दिलखुलास हसत सांगतात.

‘अँड’चे सध्या देशभरात १०४ स्टोअर्स आहेत. आणि २०१० पासून ५७ टक्के सरासरी वार्षिक वाढीच्या दराने त्यात वाढ होत आहे. नव्या आर्थिक वर्षात ३५० कोटी रुपयांच्या व्यवसायाची अपेक्षा आहे.

image


झेप महत्त्वाकांक्षी…

अनिता यांनी मॉरिशसमध्ये नुकतेच दोन ‘ग्लोबल देसी’ स्टोअर सुरू केलेले आहेत. आपल्या देशातील संधींबाबतही त्या आश्वस्त आहेत. ‘‘माझ्या एका मित्राने मला २० वर्षांपूर्वी सांगितले होते, तू जर अमेरिकेत असतीस तर तुझा व्यवसाय शंभरपटीने वाढला असता. पण ठिक आहे, मला त्याचे काही अप्रुप नाही. मला भारतीय परिधान बनवायला आवडते. आणि यासाठी इथे खुप संधी आहेत.’’

कुटुंबाला त्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. त्या आणि त्यांच्या व्यवसायासाठीही कुटुंब म्हणजे एक दीपस्तंभ आहे. शक्तिकेंद्र आहे. वडिलांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना काही पैसे दिले होते आणि त्या पैशांवर त्यांनी व्याजही आकारले होते. अनिता सांगतात, ‘‘माझे वडिल कडक आर्थिक शिस्तीचे होते. पैशांच्याबाबतीत ते अजिबात कनवाळू नव्हते, याचा मला आनंद आहे. त्यांनी आम्हाला पैशांचे महत्त्व शिकवले. आजही आर्थिक निर्णय घेताना मी आणि माझी बहीण आम्ही चौफेर विचार करतो मगच निर्णय घेतो. पैशाचा आदर करायला मला वडिलांनीच शिकवले.’’

अनिता सांगतात, की त्यांना कपडे बनवणे पसंत आहे आणि जोवर क्षमता आहे, तोवर त्या हे काम करत राहतील. नैराश्य आणि अपयशही त्यांना हे काम थांबवायला भाग पाडू शकत नाही. त्या म्हणतात, ‘‘लोकांना चांगले कपडे नेसवणे, महिलांना एक चांगला अनुभव देणे मला आवडते. मी शेवटपर्यंत हेच काम करू इच्छिते. मी माझ्याउपरांतही माझ्याच कार्यप्रणालीवर विसंबून राहील, असे एक भव्यदिव्य फॅशन हाउस सोडून मगच या जगाचा निरोप घेऊ इच्छिते.’’

नेहमी आनंदी रहा आणि आपल्या कामाचा अभिमान बाळगा, हाच सल्ला अनिता इतर व्यावसायिक महिलांना देतात. चांगल्यात चांगल्या दर्जाचे काम करा, असेही त्या सांगतात.

अनिता यांचा अशा महिलांसाठी एक कानमंत्रही आहे, तो असा…

कुठल्याही कामाची सुरवात पैसे कमवण्याच्या उद्देशाने करू नका. आपले सर्वस्व त्या कामात ओतून द्या… बघा सगळे चांगलेच होईल…