Marathi

बदलांना वाव आहे, इच्छाशक्ती हवी : जेसिका टैंजेल्डर

Chandrakant Yadav
18th Oct 2015
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
image


जेसिका यांच्या वैयक्तिक वाटचालीबद्दल मागेच बित्तंबातमी आम्ही काढलेली होती. तुम्हाला दिलीही होती आणि हो त्यांच्या उद्यमशीलतेबाबतच्या दृष्टिकोनांविषयी लवकरच आणखी काही माहिती तुम्हाला देण्याचा शब्द दिलेला होता.

ॲम्सटर्डममध्ये एके ठिकाणी काम करत असताना जेसिका टैंजेल्डरने एकाकीपणा काय असतो ते अनुभवले. उद्योजक होऊ पाहणाऱ्या प्रत्येकाला अर्थात या परिस्थितीचा सामना करावा लागतो.

जेसिका सांगतात, ‘‘स्वत:च्या क्षमतांबाबत एक प्रश्नचिन्ह निर्माण होते. तुम्ही स्वत:वर शंका घेऊ लागता. इतरांना तुमच्या तुलनेत तुम्ही जेव्हा पुढे जाताना पाहाता, तेव्हा मत्सर वाटू लागतो. इर्षा, मत्सर, द्वेष या नकारात्मक भावना तुमच्यासाठी अंतर्गत व्यवधाने तयार करतात. ध्येयाच्या दिशेने असलेली तुमची गती यामुळे मंदावते. असल्या विचारप्रक्रियेतून सहकाऱ्यांशी कामाचे बोलणे बाजूला पडते आणि हवापाण्याच्या गोष्टी तुम्ही करू लागतात.’’

या नकारात्मक वातावरणानेच पुढे तिला तक्रारी करत बसण्यापेक्षा हे वातावरण कसे बदलायचे यावर विचार, चर्चा करायची बुद्धी झाली. लांबलचक गोष्टी करण्यापेक्षा थोडक्यात जेवणानंतर २० मिनिटे या विषयावर चर्चा ठरली. सुरवात झाली.

जेसिका म्हणतात, ‘‘इथे जास्त वेळ खर्च करायचा नव्हता. तसेही दुपारच्या जेवणासाठी सोबतच्या सहकाऱ्यांना आपापल्या जागेवरून उठावे लागेच. ही वेळ साधून मी चर्चेला सुरवात केली.’’

जेसिका यांच्या मते समस्या आणि आव्हानांतून उद्योजकांना मार्ग काढायचा असतो. पण जर त्यांची क्षमता कमी पडली किंवा तशी परिस्थितीच नसली वा समोर असलेला मार्ग मनाजोगा नसला तर उद्योजकाची इच्छाशक्ती संपते. तो कच खातो.

नवोदित उद्योजक आणि ‘स्टार्टअप्स’ना जेसिका मदत करतात. प्रशिक्षण देतात. यावेळी जेसिका यांचा संपूर्ण भर संबंधितांच्या मानसिकतेवर असतो. याचा नेमका अर्थ काय? या प्रश्नावर त्या म्हणतात, ‘‘तुमची मानसिकता स्थिर असते तेव्हा तुमचे वर्तन सुनिश्चित असते. बाजारात असे नेमके कुठले उत्पादन हवे आहे वा अशी कुठली सेवा हवी आहे, जिची निकडही आहे आणि जे उत्पादन वा जी सेवा तुम्ही उद्योजक म्हणून अत्यंत दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देऊ शकता. हे सारे स्थिर मानसिक अवस्थेतच तुम्ही छान करू शकता.’’

बंगळुरूतील ‘जेसिका सत्र’ कार्यक्रमात अनेक उद्योजक होते. जेसिका यांनी या सत्रात बऱ्याच खास गोष्टी शेअर केल्या.

वैयक्तिक पातळीवर आम्हा सगळ्यांकडेच ज्ञान, कौशल्य आणि एक नेटवर्क असतेच. नेटवर्कच्या मागे असलेले नेटवर्क हेरणे हेच खरे अवघड असते. त्यासाठी जेसिका यांनी काही वर्कशॉप्स डिझाइन केलेले आहेत. लोकसंपर्काची संधी जिथे उपलब्ध करून दिली जाते. लोक आणि उद्योजक अशा दोन्ही घटकांना इथे संधी दिली जाते. व्यक्तिमत्व विकासही यातून साधला जातो.

सॅनफ्रान्सिस्को, ॲम्स्टर्डम आणि भारत या दरम्यान सातत्याने येत-जात असताना उद्यमाची सुरवात करत असलेल्या अनेकविध लोकांशी जेसिका यांच्या गाठीभेटी होतात. आणि म्हणूनच अशा नवोदितांना प्रशिक्षण देताना ऐकवायला खुप साऱ्या गोष्टी जेसिका यांच्याजवळ असतात. खुप सारे अनुभव असतात. जे ऐकणाऱ्यांसाठी खचितच उपयुक्त ठरतात. भारतातील उद्योजकांशी त्यांची झालेली चर्चा आणि एकुणच अनुभव जाणून घेण्यासाठी आम्ही जेसिका यांच्याशी बोललो.

‘भारतात मी अधिक उपयुक्त’

‘‘दीड वर्षापासून ॲम्स्टर्डम, सॅनफ्रान्सिस्को आणि भारत असे तिकडून इकडे, इकडून तिकडे माझ्या सतत वाऱ्या सुरू आहेत. मी दाव्याने एक गोष्ट सांगू शकते. माझ्या देशापेक्षा इथल्या उद्यमाला मी अधिक उपयुक्त आहे. इथले उद्योजक वेगळेच आहेत. हे लोक स्वत:ला स्वत:तच गुरफटवून टाकतात आणि तसेच गुरफटलेलेही असतात. त्यांचे वर्तुळ लहान असते. शाळा, महाविद्यालय, कुटुंब आणि गल्लीच्या पलीकडे आपले वर्तुळ ते विस्तारत नाही. तुम्ही जागतिक पातळीवर जाऊ इच्छित असाल तर या वर्तुळातून बाहेर पडावेच लागेल. प्रगती साधायची तर हा ‘कम्फर्ट झोन’ तुम्हाला तोडावाच लागेल. इथे तुम्हाला उगीचच वाटते, की तुम्ही सुरक्षित आहात. सर्व सोयीसुविधा इथं तुमच्या मते असतात. पण या सोयीस्कर जागेतून तुम्हाला बाहेर पडावेच लागेल आणि स्वत:साठी अशी जागा धुंडाळावी लागेल, जी सोयीस्कर नसेल, पण जादूने भरलेली असेल. जिथे आव्हाने असतील. माझे तंत्र जेव्हा मी वापरते आणि इथल्या बंगळुरूतल्या सत्राची तुलना ॲम्स्टर्डमच्या सत्राशी करते, तेव्हा मला हे स्पष्ट जाणवते, की इथल्या (बंगळुरूतल्या) नवोदित उद्योजकांवर फार मेहनत घ्यावी लागते. आता बंगळुरूतल्या उद्योजकांमध्ये क्षमता नाही, असा कृपया यातून अर्थ काढू नका. एवढेच आहे, की ती (क्षमता) बाहेर काढण्यासाठी जरा जास्तच जोर लावावा लागतो. जोर लावल्यावरच ते खुलतात.’’

बेपत्ता घटक कुठले?

‘‘प्रत्येकाला एका विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट परिस्थितीत आणि विशिष्ट लोकांमध्ये जरा बरे वाटते. पण एक उद्योजक म्हणून तुम्हाला नकारात्मक उत्तेजना, अनिश्चितता आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. हे इथे महत्त्वाचे आहे. तुम्ही असुरक्षित आहात आणि सुरक्षिततेसाठी जेव्हा एक पाऊल तुम्ही टाकता, तेव्हा इतरांनाही तुम्ही तसेच करायला सुचवता. हे करताना एकाच वेळी तुम्ही एक सुरक्षित ठिकाण स्वत:साठी निर्माण करता आणि इतरांनाही हे सांगण्यासाठी जणू स्वर्ग तयार करून देता, की- ‘मी फसलोय मला मदतीची आवश्यकता आहे.’ अर्थात ही चांगलीच गोष्ट आहे. यश हवे असेल तर उद्योजकाने दिलखुलास असायलाच हवे. लोक असेच दिलखुलास आणि असुरक्षित असावेत, ही माझी भावना आहे. आम्हाला असा उद्योजक बनायचे नाही, जो जगावर बिनबोभाट साम्राज्य गाजवतोय. हो, पण अपयशाची व्याख्या आम्हाला नव्याने करावी लागणार आहे. एक उद्योजक म्हणून माझ्या दृष्टीने अपयश म्हणजे केवळ पराभव स्वीकारणे, कच खाणे. पुढे जाण्यापासून स्वत:ला रोखणे. लोक काय सल्ला देतात, ते बघा. कुणीही तुम्हाला सांगणार नाही, तू पराभूत झालेला आहेस. दिलखुलासपणे, मोकळेपणाने ते ऐका… आणि पुढचे पाऊल टाका. मी माझ्या वर्तुळातल्या लोकांचे सल्ले, सूचना आपल्या जगण्यात समाविष्ट करत गेले आणि आतून आधीपेक्षाही जास्त मजबूत झाले.’’

महिला उद्योजक

‘‘महिलांना उद्यमशिलतेत प्रोत्साहन देणे हा स्त्री-पुरुष विषमतेविरुद्धचा लढा आहे किंवा नाही; कारण या विषम विश्वाच्या मागे असलेले खरे कारण आम्ही शोधून काढलेले नाही. ते आधी शोधायला हवे. कुणीतरी आमच्याकडून प्रेरणा घेतंय आणि महिला सशक्तिकरणात ते सहाय्यभूत ठरतंय, हे ऐकलं की बरं वाटतं. पण मी महिलांना उद्यमशिलतेसाठी असे काही मंत्र दिले असते, ज्याची अन्य दुसऱ्या कुठल्याही गोष्टींपेक्षा त्यांना जास्त मदत झाली असती. पुरुषांचे उपदेश, उद्योजकता आणि स्टार्टअप्समधील त्यांची तांत्रिक रहस्ये हे सगळे ऐकून माझा तरी अपेक्षाभंगच झालाय, हे मी माझ्या अनुभवांच्या आधारावर सांगते. पुरुषांच्या गर्दीत आपल्या यशाचे किस्से तिखटमिठ लावून सांगणारे हे पुरुष बहुदा आखातातील ‘सुपर फिट’ पुरुष असतात. उद्यमातील प्रवासाबद्दल ते सांगत नाहीत. मनातील असुरक्षिततेच्या भावनेबद्दल बोलत नाहीत. एखाद्या अपयशाचा किस्साही फारच मसाला लावून ऐकवतात. अगदी लघुकथेप्रमाणे. अपयशाची बोच त्यातून नसतेच. त्यांचा प्रवास खरंच इतका सरळसोट आहे, हा प्रश्न मला पडतो. तर तसं खरोखर नाहीये. आणि मग महिला आहोत म्हणून काय आम्हा सगळ्याच जणींना सॅनफ्रान्सिस्कोत प्रौद्योगिक क्षेत्रात कामाची संधी मिळते?’’

‘‘तुमच्यातली उत्सुकता नेहमी जागरूक ठेवा. जगाकडे एका बालकाच्या दृष्टीने बघा. सल्ला घ्या. सल्ला, मदत मागताना आपला स्वाभिमान आड येऊ देऊ नका. कोणता सल्ला ऐकावा, कोणता ऐकू नये हे अत्यंत लक्ष देऊन ठरवा. वापरलेला सल्ला उपयोगात आला, की नाही, हे बघा. आधी दिशा ठरवा, मग धोरणे. धोरणेही तपासून घ्या. मगच ते लागू करा आणि मगच अंमलबजावणी करा. नवनव्या लोकांना भेटत रहा. काम करताना ते आरामदायक कसे होईल, ते बघा. धोरणे आणि अंमलबजावणीवर तुमचे संपूर्ण नियंत्रण हवे म्हणून क्षमतेबरहुकूम काम करा. हे सगळे तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणूनही पुढे आणते. तुमच्या भोवतालच्या एकूणच वातावरणावर सकारात्मक प्रभाव पडतो.’’

‘‘एक शेवटची गोष्ट… विमान उडवताना ते जणू तुम्ही बनवत आहात, असा आनंद लुटा. हे सगळं केवळ प्रवासाच्या बाबतीतलं आहे. या प्रवासाचं ध्येय कदाचित अस्तित्वातही नसावं किंवा असलंच तर अत्यंत कंटाळवाणं असावं…’’

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags