रोहन टिल्लू...मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील आशादायी चेहरा
राजू तुलालवार यांच्या बालनाट्य संस्थेमधून रोहनने अनेक बालनाटकांमध्ये कामं केलीत. इयत्ता नववीमध्ये असताना त्याची महत्वाची भूमिका असलेलं प्रविण दवणे लिखित जंतर मंतर पोरं बिलंदर या दोन अंकी नाटकाने महाराष्ट्रभरात पन्नास हून अधिक प्रयोग केले. महाविद्यालयीन जीवनामध्ये रोहनने चक्रनेमिक्रमेण, अक्ष एव जयते या एकांकीकेमधून अभिनय केला, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सादर झालेल्या या एकांकीकांमधल्या अभिनयासाठी त्याला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. यानंतर रामनारायण रुईया महाविद्यालयातर्फे सलग दोन वर्ष मर्यादेयं विराजते आणि नदीसूक्तम या एकांकीकांचे लेखन आणि दिग्दर्शन रोहनने केले, ज्यासाठी फर्ग्यसुन महाविद्यालयातील राज्य एकांकीका स्पर्धेमध्ये या एकांकीकांना प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
एकांकीकांचा आत्तापर्यंतचा हा गलेलठ्ठ अनुभव गाठीशी घेत रोहनने 'ती' या दोन अंकी नाटकाचे लेखन केले. जे नाटक सध्या यशाच्या नवनव्या पायऱ्या गाठतंय. प्रायोगिक स्तरावर सुरु असलेल्या या नाटकाची वाटचाल अनेक पुरस्कारांनी आणि नाट्यस्पर्धांनी समृद्ध झालीये. या नाटका विषयी बोलताना रोहन सांगतो की “वुमन इन ब्लॅक ही इंग्रजी कथा मी वाचत होतो, ती वाचत असताना लक्षात आलं की मराठीत अशा पद्धतीचे हॉरर नाटक अजून आलेले नाही. जर ही कथा मराठीत मांडता आली तर आणि मग जुळवाजुळव सुरु झाली ती, “ती...” या नाटकाची. या नाटकाचा निर्माता आणि दिग्दर्शक प्रितेश सोढा याने यापूर्वीच या कथेवर आधारित मन्छा हे नाटक गुजराती रंगभूमीवर आणलं होतं. तो अनुभव गाठिशी होताच.”
ती हे नाटक लिहिताना रोहनसाठी सर्वात मोठं आव्हान होतं ते यातल्या व्यक्तिरेखांची जुऴवाजुऴव करणं आणि नाटय जिथे घडतं त्या जागा निश्चित करणं. रोहन सांगतो, “आम्ही नाटकात इस्लामपुर दाखवलंय, नाटक नवीन असताना एकदा मुंबईत नाटकाचा प्रयोग झाला आणि एक व्यक्ती आम्हाला भेटायला आली त्या इस्लामपूरच्या होत्या, त्यांनी आम्हाला सांगितलं इस्लामपूरला स्टेशनच नाहीये मग या नाटकात तुम्ही कसे काय दाखवतात. झालं त्या प्रयोगानंतर प्रत्येक प्रयोगाच्या सुरुवातीला आम्ही नाटकातली पात्रं आणि स्थळ काल्पनिक असल्याची घोषणा करायला सुरुवात केली.
'ती' नाटकामुळे आम्हाला महाराष्ट्रातले प्रायोगिक रंगभूमीचे आजचे संघर्षमय वास्तव जाणवले. खरेतर राज्य सरकारातर्फे अधिकृत घोषणा झाली असतानाही फक्त प्रायोगिक नाटकांच्या तालमींसाठीना योग्य असे तालीम हॉल अजूनही उपलब्ध नाही.
आम्ही अक्षरशः कोणाच्या तरी घरी, कोणाच्या तरी बिल्डींगच्या टेरेसवर किंवा अगदी अनेकदा मुंबईतल्या मैदानांमध्ये या तालमी केल्या. एकतर मुंबईमध्ये जे तालीम हॉल आहेत त्यांचं तासागणिक भाडं आमच्यासारख्या प्रायोगिक रंगभूमीवाल्यांना परवडण्यासारखं नाही. आणि जे परवडण्यासारखं आहे तिथे जागेची उपलब्धता नाही. ”
“ अनेकदा आमच्या नाटकाला येणारा प्रेक्षक नाटक पाहिल्यावर त्याबद्दल बोलतो, सोशल नेटवर्किंग साईटवर लिहितो इतरांना सांगतो आणि मग कोणीतरी सांगितलं म्हणून 'ती' पहायला आलो असे प्रेक्षक आम्हाला त्याच्या पुढच्या प्रयोगात भेटतात. तीच्या प्रत्येक प्रयोगामध्ये हा अनुभव येतो त्यामुळे हळूहळू आम्हाला या नाटकाची प्रमोशनल स्ट्रेटेजी समजू लागलीये. खरेतर याच स्ट्रॅटेजीने गेले वर्षभरात तीचे तेरा ते चौदा प्रयोग झालेत आणि अजूनही सुरु आहेत. प्रायोगिक नाटकांसाठी प्रयोगांची ही मजलही भरपूर असल्याचे तो सांगतो. ”
नाटक रंगभूमीवर आणलं, त्याचे प्रयोगही होतायत पण आता सर्वात मोठं आव्हान आहे ते 'ती' या नाटकाला व्यवसायिक रुप देण्याचं. आत्तापर्यंत ज्या ज्या व्यवसायिक नाटय निर्मात्यांशी रोहन आणि त्याची टीम भेट घेतायत. त्या सर्वांना नाटक पसंत आहे मात्र व्यवसायिक गणितं पहाता त्यांना या नाटकाची मूळ टीम बदलायची आहे, काहींना या नाटकात मराठीतला स्टार चेहरा घ्यावासा वाटतो, तर काहींना या नाटकाचा मूळ दिग्दर्शक बदलायचा आहे. रोहन आणि त्याची ती या नाटकाची टीम मात्र याला साफ नकार देते.
रोहनच्या ती या नाटकात मोठ मोठे कलाकार नाहीत पण तरीही या नाटकाला प्रेक्षक येतायत इतकंच नाहीतर रंगभूमीवरुन थेट मिळणारी भीतीची ही जाणीव पुन्हा पुन्हा घेण्यासाठी प्रेक्षक दुसऱ्यांदाही ती पहायला येतोय, आमचं हेच यश असल्याचं रोहन सांगतो. ती बरोबरच मिसेस हिटलर...अ थिएट्रीकल एन्काऊंटर विथ इव्हा ब्राऊन या नव्या प्रायोगिक कलाकृतीमध्ये रोहन सध्या व्यस्त आहे. त्याच्या या नव्या प्रायोगिक आव्हानासाठी त्याला शुभेच्छा...