"छंद सोडू नका..त्यातून तुमचं आयुष्य बदलू शकतं " सरिता सुब्रमण्यम -‘दि बेकर्स नूक’
आयुष्यात छंद खूप महत्त्वाचे असतात. पण काही जण त्यांना तितकं महत्त्व देतात, तर काही जण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. नेहमीच असं म्हटलं जातं, की तुम्ही कितीही व्यस्त असलात, तरी तुमच्या छंदाला, आवडीच्या कामाला वेळ द्या, त्यांना मरू देऊ नका. जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल, तुमचे छंद जोपासा. त्यांचा आनंद घ्या. कारण आपले हे छंद पूर्ण करण्याचं कोणतंही वय नसतं. छंद वयाच्या कोष्टकात बंदिस्त होण्यासाठी मुळी नसतातच. हे छंद जोपासल्यामुळे, जगल्यामुळे आपल्याला जो आनंद मिळतो, जे समाधान मिळतं ते विलक्षण असतं. आपल्या छंदाला जगणारं आणि त्यातून पुढे नावारूपाला आलेलं एक नाव म्हणजे सरिता सुब्रमण्यम. सरिता यांनी आपल्या छंदाला महत्त्व दिलं, त्याचं महत्त्व ओळखलं आणि आपला तोच छंद करिअरच्या रूपात साकार केला. त्यांच्या याच छंदामुळे त्यांनी यशाचं एक शिखर सर केलं. आणि त्यांचा हा छंद होता ‘बेकिंग’ अर्थात वेगवेगळ्या प्रकारचे बेकिंग खाद्यपदार्थ(केक, फ्लेवर्ड ब्रेड इ.) बनवणं. चेन्नईमध्ये त्यांनी ‘द बेकर्स नूक’ नावाची स्वत:ची कंपनीच सुरु केली आणि बघता बघता त्यांच्या रेसिपींना, त्यांनी बनवलेल्या केक्सना आणि पर्यायानं त्यांना अनेकजण ओळखू लागले.
सरिता सुब्रमण्यम यांच्या या छंदामागेही एक वेगळी कथा आहे. लहानपणी त्या आणि त्यांचा भाऊ रविवारच्या दुपारीची मोठ्या आतुरतेनं वाट पहायचे. कारण याचवेळी त्यांची आई त्यांच्या आवडीचं डेझर्ट (स्वीट, केक, आईसक्रिम इ.) बनवायची. याशिवाय काही कौटुंबिक कार्यक्रम असेल, तेव्हाही त्यांच्या आईच्या हातच्या स्पेशल केक्सची मेजवानी असायची. सरिता सांगतात की आईच्या हातचा केक कितीही वेळा खाल्ला तरी प्रत्येक वेळी तितकाच स्पेशल वाटायचा. जसजशा सरिता मोठ्या होऊ लागल्या, त्यांनी त्यांच्या आईला केक बनवायला मदत करायला सुरुवात केली. त्या काळात आत्तासारखी किचनमधली वेगवेगळी आधुनिक आणि कष्ट कमी करणारी उपकरणं नव्हती. त्यामुळे कोणताही पदार्थ बनवण्यासाठी झाडून सगळी कामं स्वत:च करावी लागायची. या कामांना साहजिकच खूप वेळ आणि मेहनत खर्ची पडायची.
सरिता त्यांच्या आईलाच त्यांच्या या छंदाचं आणि त्यांनी आज मिळवलेल्या यशाचं श्रेय देतात. जसजसा वेळ जाऊ लागला, तसतशी कुकिंग आणि विशेषत: बेकिंगमधली सरिता यांची आवड वाढू लागली. त्यांची शाळा पूर्ण झाल्यानंतर एखाद्या केटरिंग कॉलेजमध्ये, जिथे विविध पाककलांचं प्रशिक्षण दिलं जातं, जाण्याची त्यांची खूप इच्छा होती. मात्र त्या काळात त्यांना ते शक्य झालं नाही. पण यामुळे हताश न होता त्यांनी त्यांच्या घरीच जेवण बनवणं आणि नवनवीन रेसिपींचे प्रयोग करणं सुरु ठेवलं. काही काळानंतर त्यांचं लग्न झालं, त्यांना दोन मुलंही झाली. त्यामुळे साहजिकच वेळेअभावी आणि इतर कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना त्यांचा हा छंद जोपासता आला नाही. पण नंतर त्यांची मुलं मोठी झाल्यावर त्यांनी आपल्या आईच्या या छंदाची पूरेपूर काळजी घेतली. सरिता यांना मग या छंदासाठी घरातूनच प्रोत्साहन मिळू लागलं. त्याही पुढे जाऊन सरिता यांना मुलांनी हा फक्त छंदच न ठेवता त्याचं व्यवसायात रूपांतर करण्याचा सल्ला दिला. मग काय, कुटुंबियांच्या पाठिंब्याच्या आणि प्रोत्साहनाच्या जोरावर सरितांनी १९९४ मध्ये स्वत:चा केटरिंग बिझनेस सुरु केला. आणि त्याचं पहिलं नाव होतं ‘क्रंच अँड मंच’. सरितांच्या या ‘क्रंच अँड मंच’मध्ये जवळजवळ सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ मिळायचे. यामध्ये चायनीज, कॉन्टिनेन्टल, केक, कुकीज आणि डेझर्ट(स्वीट्स, आईस्क्रीम इ.) यांचा समावेश होता.
सरिता चेन्नईच्या अन्ना नगर आणि किलपॉक या भागांमध्ये प्रामुख्यानं त्यांचं हे काम करत होत्या. खरंतर ही फार छोटी शहरं होती. या छोट्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांना फार मागणी नव्हती. याचदरम्यान प्रसिद्ध फूडचेन ‘केक्स अँड बेक्स’ने चेन्नईमध्ये फ्रेश क्रीम केक्स द्यायला सुरुवात केली. या क्रीम केक्सला लोकांची भरपूर पसंती मिळाली. या सर्व घडामोडींमुळे तिथल्या स्थानिक महिलांमध्येही आता हळूहळू पाककलेविषयीची आवड वाढू लागली होती. यातून पाककलेचं प्रशिक्षण देणा-या कुकिंग क्लासेसचा शोध सुरु झाला. इथेच सरितांना एक नवी संधी दिसली. त्यांनी सर्वप्रथम बेकिंग क्लास सुरु केले. बघता बघता त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच वाढली. कारण सरिता सुब्रह्मण्यम यांच्या या क्लासमध्ये अगदी सोप्या पद्धतीनं जेवण बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. एकंदरीतच सर्वकाही चांगलं चाललं होतं. पण तितक्यात सरिता यांच्या पतीला नोकरीसंदर्भात परदेशात जावं लागलं. सरिता यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यांनाही त्यांच्या क्लासचा सगळा पसारा आवरून परदेशात जावं लागलं. पण सरितांमधली उत्तम कुक मात्र अजूनही तशीच होती. त्यांनी तिथेही आपला छंद जोपासला आणि आपलं कुटुंब आणि आसपासच्या मित्रपरिवाराला नवनवे पदार्थ बनवून खाऊ घालू लागल्या.
एकदा सहजच फेसबुकवर असताना त्यांना ‘होम बेकर्स गाईल्ड’ हा ग्रुप दिसला. आवड तर आधीपासून होतीच. त्या लागलीच त्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्या. या ग्रुपचा एक मोठा फायदा असा झाला की त्यामुळे सरिता यांना पुन्हा एकदा त्यांच्या या छंदाचा गांभीर्यानं विचार करायला भाग पाडलं. बेकिंगशी संबंधित काहीतरी नवीन करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. यानंतर काही काळ सरिता यांनी या विषयावर थोडा रिसर्च केला, संशोधन केलं. भरपूर पुस्तकं वाचली. इंटरनेटच्या माध्यमातून भरपूर माहिती गोळा केली. आणि जेव्हा त्यांना स्वत:वर पूर्ण विश्वास वाटू लागला, तेव्हा त्यांनी पुढचं पाऊल टाकायचा निर्णय घेतला. आणि तिथे सुरुवात झाली ‘द बेकर्स नूक’ची. मे २०१४ मध्ये ‘द बेकर्स नूक’ची स्थापना झाली. खरंतर हे सरिता सुब्रह्मण्यम यांचं एक मोठं आणि साहसी पाऊल होतं. कारण पुन्हा एकदा त्या त्यांच्या छंदाकडे वळल्या होत्या. इतक्या मोठ्या खंडानंतर. पण त्यांच्यासाठी यावेळी चांगली बाब ही होती, की आता त्यांची मुलं स्वत:ची काळजी स्वत: घेऊ शकतील इतकी मोठी झाली होती.
मे २०१४ मध्ये सुरु झालेला सरिता यांचा हा प्रवास आत्तापर्यंत उत्तम राहिलाय. त्यांचा छंद जोपासल्यामुळे त्या समाधानी आहेत. आत्तापर्यंत सरितांनी चार बेक सेल्स कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलाय. प्रत्येकवेळी मिळणारा अनुभव त्यांच्यात सकारात्मक बदल घडवणारा आणि त्यांची पाककला अधिकाधिक चविष्ट करणारा होता. या प्रत्येक ठिकाणी त्यांनी अनेक नवीन गोष्टी पाहिल्या, समजून घेतल्या आणि आत्मसात केल्या. इतर दर्जेदार बेकर्सला भेटल्या. सरिता म्हणतात, “मी दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करते. कारण माझा बेकिंगचा छंद जरी जुना असला, तरी लोकांच्या आवडीनिवडी मात्र बदलल्या आहेत. आणि जसजसा वेळ जातो, तसतसा त्यामध्ये सतत बदल होत आहेत. त्यामुळेच त्यानुसार स्वत:ही बदलत्या काळानुसार बदलणं गरजेचं आहे.”
बेकिंगशी संबंधित अनेक पदार्थ सरितांच्या पिटा-यात आहेत. यामध्ये मफिन्स, कुकीज, पाईज, डेझर्ट कप, डेझर्ट जार, रस्टिक, स्टफ्ड ब्रेड, बन्स, रोल्स आणि आणखी बरंच काही. आणि यातला प्रत्येक पदार्थ एकाहून एक चविष्ट. त्यामुळे साहजिकच लोकांनाही ते खूप आवडतात. आणि अर्थातच त्यांची मागणीसुद्धा सातत्यानं वाढत आहे.