संपादने
Marathi

स्टार्टअप विश्वातील समुपदेशन, लिखाण आणि नाविन्यपूर्णता याबद्दल अनुराधा गोयल यांच्याशी बातचीत

Team YS Marathi
22nd Mar 2016
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

अनुराधा गोयल लेखिका आणि उत्सुक ब्लॉगर आहेत. आयटी इण्डस्ट्रीमध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त अनुभव घेतल्यानंतर त्यांनी नुकताच इनोव्हेशन कन्सल्टन्ट म्हणून स्वतंत्ररित्या व्यवसाय सुरु केला आहे. त्याद्वारे त्या विविध संस्थांना नवीन ग्रुप तयार करायला, इनोव्हेशन प्लॅटफॉर्म सेट करायला आणि इनोव्हेशन स्ट्रॅटीजीज आणि रोडमॅप निश्चित करायला मदत करतात.


image


पंजाबमध्ये जन्मलेल्या अनुराधा यांनी लहानपणापासून वडिलांच्या कामाच्या निमित्ताने खूप प्रवास केला आहे. त्यांच्या बालपणीचा सुरुवातीचा बराच काळ त्या चंदीगढमध्ये राहिल्या, तिथे त्यांनी स्वतःचे जास्त ते शिक्षण पूर्ण केले. अनुराधा यांनी पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगढमधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांना शास्त्रज्ञ व्हायची इच्छा होती पण स्वतःचं काहीतरी करण्याच्या आशेमुळे त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी कम्प्युटर सायन्सची निवड केली आणि याच क्षेत्रात पुढची 15 वर्ष करिअर केले.

अनुराधा यांनी सुरुवातीला बिर्ला हॉरिझॉन्स लिमिटेडमध्ये म्हणजेच आताच्या बिर्लासॉफ्टमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी कोका-कोला इंडियासोबत काही वर्ष काम केले आणि त्यानंतर इन्फोसिसच्या बंगळुरु येथील कार्यालयात काम करायला सुरुवात केली. जिथे त्यांनी इन्फोसिसच्या बिझनेस सोल्युशन ग्रुपचे नेतृत्व केले आणि तिथेच बिझनेस इनोव्हेशन क्षेत्रातील त्यांच्या कामाला सुरुवात झाली.

अनुराधा यांनी लिहिलेल्या पुस्तकाबाबत, त्याचप्रमाणे त्यांच्या इनोव्हेशनबाबत आणि प्रेरणेबाबत आम्ही त्यांच्याशी केलेल्या चर्चेचा हा काही भाग -

प्रश्न – तुम्हाला प्रभावित करणारे काही मनोरंजक किस्से, अनुभव याबाबत कृपया सांगा.

अनुराधा – मी सहा वर्षांची असताना पहिल्यांदा एकटी प्रवासाला गेले होते. मी माझ्या आजीबरोबर रहायचे आणि तिने मला दुसऱ्या शहरात रहाणाऱ्या तिच्या बहिणीला काहीतरी देण्यासाठी बसमधून पाठवले होते. जेव्हा मी तिला म्हणाले की मला कसं जायचं ते माहिती नाही, तेव्हा ती म्हणाली होती, “तुझ्या तोंडात जीभ आहे; आसपास विचार.” त्यावेळी मी काय प्रतिक्रिया दिली होती ते मला आठवत नाही. मात्र त्यानंतर आजीचं तेच वाक्य माझ्या आयुष्यात माझं मार्गदर्शक तत्व झालं. जर तुम्हाला काही माहिती नसेल, तर ज्याला माहिती आहे त्याच्याकडे जा आणि त्याला विचारा किंवा त्याबद्दल माहिती मिळवा. तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टीला तुम्हाला जे करायचे आहे त्याच्या रस्त्यातील मर्यादा बनू देऊ नका.

प्रश्न – उद्योगांमध्ये नाविन्यपूर्णतेची कमतरता अनेकदा जाणवते. कुणीतरी एखादा उद्योग सुरु करतो आणि मग अनेकजण केवळ त्याची नक्कल करतात, त्याचेच बिझनेस मॉडेल कॉपी करतात. एक इनोव्हेशन कन्सल्टन्ट म्हणून तुमचं याबाबत काय म्हणणं आहे ?

अनुराधा – भारतातील अनेक नवे उद्योजक असंच करत असल्यामुळे मी तुझं म्हणणं नाकारु शकत नाही. अनेकजण एखाद्या ठिकाणी यशस्वी झालेली कल्पना उचलून आपल्या भागात ती राबविण्याचं काम करतात. मात्र असं असलं तरी, जसं की मी माझ्या पुस्तकातील फ्लिपकार्ट प्रकरणामध्ये नमूद केलं आहे, एखाद्या सुस्थापित बिझनेस मॉडेलशी जुळवून घेण्यासाठी त्यामध्ये खूप सारे नाविन्यपूर्ण बदल करावे लागतात. भारतातील ई-कॉमर्स क्षेत्र चालविणारी कॅश ऑन डिलीव्हरी संकल्पना हे माझं सर्वात आवडतं उदाहरण आहे. भारतातील ई-कॉमर्स कंपन्यांनी ही संकल्पना आणली. किंवा मॅट्रिमोनिअल वेबसाईट्सची संकल्पना – ही संकल्पना कदाचित डेटिंग वेबसाईटवरुन प्रेरित असावी, पण आज ही संकल्पना भारतीय संकल्पना म्हणून अस्तित्वात आहे आणि भारतीय बाजारातील ते एक अद्वितीय उत्पादन आहे.

थोड्या प्रमाणात असे स्टार्टअप्सही आहेत जे खरोखरच नाविन्यपूर्ण काम करत आहेत. जगभरात कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेवर नजर टाकल्यास अशा स्टार्टअप्सची टक्केवारी ही नेहमी कमीच असते. होतं काय, केवळ परदेशात वेगळं काहीतरी केलेल्यांच्या कथांकडे लक्ष देण्याकडे आपला कल असतो, जेव्हा की आपल्या आसपासही स्टार्टअप्सची दुनिया पसरलेली आहे आणि हेच कारण आहे ज्यामुळे आपल्याला असलेली माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये खूप तफावत असते.


image


प्रश्न – ‘माऊस चार्मर्स’ या तुमच्या पुस्तकात तुम्ही डिजीटल स्टार्टअपच्या संदर्भात कॉमर्स, कन्टेन्ट, कनेक्टर्स याविषयी भाष्य केलं आहे. हे तीन पैलू तुमच्या कसे लक्षात आले?

अनुराधा – मी जेव्हा भारतातील शंभरहून जास्त डिजीटल कंपन्यांचे विश्लेषण करत होते आणि त्यांचे बिझनेस मॉडेल समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा बिझनेस मॉडेलचे हे तीन प्रकार उदयाला आले. ई-कॉमर्स खूप सोपं असतं, जेव्हा तुम्ही तुमचं शॉप ऑनलाईन घेऊन येता पण निश्चितच प्रत्येक कार्यक्षेत्रानुसार याविषयी मतभेद आहेत किंवा जेव्हा प्रश्न उत्पादन विक्री विरुद्ध सेवा विक्रीचा येतो तेव्हा याबाबत मतभेद पहायला मिळतात.

इन्टरनेटमुळे कन्टेन्टला वेगळं परिमाण मिळालं आहे आणि त्यामुळे डिजिटल जगतात पूर्णपणे अद्वितीय असलेले युजर-जनरेटेड कन्टेन्ट किंवा मोबाईल फोनच्या जमान्यासाठी एक गिफ्ट असलेले रिअल-टाईम कन्टेन्ट यासारखे कन्टेन्टचे वेगवेगळे मॉडेल्स अस्तित्वात आले.

कनेक्टर्स हे दोन इन्टरेस्टेड पार्टीजना जोडणारे लोक असतात. हे डाटाबेसवर आधारित बिझनेस आहेत. इंटरनेट अस्तित्वात येण्यापूर्वीही हे बिझनेस वेगळ्या स्वरुपात अस्तित्वात होते. मात्र आता इंटरनेटवर ते ज्या प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळे ग्राहकांनाही अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मी पुन्हा मॅट्रिमोनिअल वेबसाईटचे उदाहरण देईन. तुमचा लाईफ पार्टनर शोधण्याकरिता या पोर्टल्सची निवड करण्यापूर्वी तुम्हाला आपला साथीदार शोधण्याकरिता किती पर्याय उपलब्ध होते ?

जेव्हापासून पुस्तक प्रकाशित झालं आहे, तेव्हापासून मी ही वर्गवारी वैध करीत आहे आणि सर्व डिजीटल बिझनेस यापैकीच एखाद्या वर्गात मोडतात याबाबत आता मला पूर्वीपेक्षा जास्त खात्री पटली आहे. तुम्ही जर पुस्तकातील प्रत्येक विभागाची प्रस्तावना वाचाल, तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक वर्गवारीतील टिपीकल बिझनेस मॉडेल आणि सबमॉडेल काय आहेत आणि याच कारणामुळे अनेक उद्याेजकांनी या पुस्तकाची प्रशंसा केली आहे.

प्रश्न – तुमच्या अनुभवावरुन सर्व उद्योजकांसमोरची सामाईक आव्हानं काय आहेत असं तुम्हाला वाटतं?

अनुराधा – अनेक उद्योजक काही गोष्टींमध्येच चांगले असतात. कुणाचे तंत्रज्ञान चांगले असते, तर कुणाचे मार्केटिंग चांगले असते. पण एक उद्योजक म्हणून तुम्ही एकाच वेळी किमान २० गोष्टींमध्ये चांगलं असणं आवश्यक असतं. हेच त्यांच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान असतं. सुरुवात करतानाच चांगली माणसं मिळणं हे एक मोठं आव्हान असतं आणि मला वाटतं निधी उभारण्याच्या आव्हानाला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं.

प्रश्न – उद्योगक्षेत्रात स्त्रिया मागे आहेत असं वाटतं का?

अनुराधा – आताच्या काळात मला नाही वाटत की तसं काही आहे. स्त्री उद्योजकही आज उद्योगक्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अग्रेसर आहेत. मला वाटतं काही वर्षांपूर्वीपर्यंत स्त्रिया उद्योगक्षेत्रात मागे आहेत असं म्हणणं योग्य होतं. मात्र असं असलं तरी पुरुषांच्या तुलनेत स्त्री उद्योजकांचं प्रमाण अजूनही कमी आहे. पण मला वाटतं हळूहळू हे प्रमाणही समानत्वाकडे पुढे सरकत आहे.

प्रश्न – आजपर्यंत तुम्ही सामना केलेले सर्वात मोठे आव्हान कोणते आणि तुम्ही त्याला कसे सामोरे गेलात ?

अनुराधा – गेली आठ वर्ष स्वतंत्र व्यावसायिक म्हणून काम करताना प्रत्येक दिवस एक नवीन आव्हान घेऊन येतो. दर दिवशी एका नव्या आव्हानाला मी सामोरं जाते. मला नाही वाटत की यापूर्वी माझ्या आयुष्यात मी अशा कुठल्या आव्हानांना सामोरं गेले आहे. कॉर्पोरेट आयुष्यही सहज-सोपं होतं. मला नोकरीबाबत चिंता करावी लागण्याअगोदरच मला नोकरी मिळाली आणि नशीबाने साथ दिल्याने शिक्षणही ठरवल्याप्रमाणे पूर्ण झालं.

स्वतंत्र व्यावसायिकांना प्रोफेशनली वागवलं जावं अशी मी आशा करते. विविध संस्थांबरोबर काम करताना मी विरुद्ध एक मोठी संघटना अशी एक प्रचंड तफावत प्रत्येकवेळी पहायला मिळते आणि माझी खूप शक्ती तिथे खर्च होते, जी मी तिथे वापरण्याऐवजी अजून काहीतरी निर्माण करण्यामध्ये किंवा काहीतरी नवीन करण्यासाठी वापरु शकते.

प्रश्न – तुमच्या कामात तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं ?

अनुराधा – जवळपास सर्वच. प्रवास आणि पुस्तकांचं, मला नव्या जगाकडे नेणारे मार्ग खुले करुन देणं आणि नवीन कल्पना सुचतील अशा छेदबिंदूवर आणून ठेवणं, मला खूप आवडतं. माझी इच्छा आहे की उद्योजक बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मी एखाद्या प्रवासाला घेऊन जावं – जागृती यात्रेसारखं काही तरी आणि त्यांना पुस्तकं द्यावी जी त्यांना विचार करायला प्रवृत्त करु शकतील.

प्रश्न – तुम्ही तुमच्यासाठी वेळ कसा काढता आणि काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल कसा साधता?

अनुराधा – मी घरातून काम करत असल्यामुळे डिजीटल प्लॅटफॉर्मवरुन माझं काम चालतं. माझं प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्य याची खरोखरच सरमिसळ झालेली आहे. मला त्यांना वेगळं करायचं आहे का? तर नाही. जे चाललं आहे ते मी एन्जॉय करते आहे आणि मी ज्या तीन क्षेत्रात काम करत आहे - ती प्रवास, नवनिर्मिती आणि पुस्तकं - या तिन्ही विषयांची मला आवड असल्यामुळे मी दर दिवशी १८ तास कामामध्ये अखंड बुडालेलं असणंही एन्जॉय करते.

प्रश्न – तुम्ही ज्याचं पालन करता असं तुमचं ब्रीदवाक्य?

अनुराधा – तुमच्या मनाचा आणि त्याने पाहिलेल्या स्वप्नांचा पाठलाग करा, उर्वरित सर्व तुमच्या मागोमाग येईल.

प्रश्न – तुमची प्रेरणा ?

अनुराधा – या क्षणी माझे वाचक माझी प्रेरणा आहेत.

लेखिका : तन्वी दुबे

अनुवाद : अनुज्ञा निकम

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags