हिंदी सिनेमाचा इनसायक्लोपिडीया : अरुण पुराणिक

हिंदी सिनेमाचा इनसायक्लोपिडीया : अरुण पुराणिक

Wednesday December 02, 2015,

3 min Read

पासष्ट हजार हिंदी क्लासिकल आणि फिल्मी गाण्यांचा संग्रह, दहा हजारहून अधिक सिनेमांची पोस्टर्स, बुकलेट्स, ग्लास लाईट असं पब्लिसिटी मटेरीअल, लीला चिटणीस ते हेमामालिनी अशा हिरॉईन्सचे जवळपास साडेसातशे दुर्मिळ फोटोज्. हे सगळं कलेक्शन कोणा फिल्म आर्काईव्ह किंवा म्युझियममधलं नाहीये, तर हा सगळा दुर्मिळ खजिना आहे अरुण पुराणिक या हौशी सिनेप्रेमींचा.

या छंदाची सुरवात लहानपणापासूनच झाली. माझे आजोबा पंढरपूरचे. ते शास्त्रीय संगीत गायचे. ते वारल्यानंतर खूप वर्षांनी आजीनं आजोंबाचा आवाज मला ऐंकायचाय अशी इच्छा व्यक्त केली. माझे आजोबा गायचे तो काळ होता एकोणीशे सव्वीस-सत्तावीसचा. त्यांच्या आवाजातल्या रेकॉर्ड शोधायला निघालो, त्या काही मिळाल्या नाहीत. पण त्या निमित्तानं सिनेमा आणि संगीताच्या वेगळ्याचं दुनियेची ओऴख मला झाली आणि मग नादच लागला या वेडाचा. अरुण पुराणिक हे सगळं सांगतांना फ्लॅश बॅकमध्ये जातात.

जिथे जिथे जुनी गाणी मिळतील अशी सगळी माणसं आणि जागा माझ्या ओळखीच्या होत्या. एका मुजरा कलावंतीणीकडून मी अब्दुल करीम खाँ, केसरबाई केसकर, उस्ताद फय्याज खाँ, लच्छू महाराज यांच्या गाण्यांच्या ट्रंकभरुन रेकॉर्डस् मिळवल्या. त्यावेळी त्याचे पंच्याण्णव रुपये मी मोजले. आपला हा शौक खर्चिक आहे याची जाणीव पहिल्यापासून होती. त्यामुळे नोकरी करायला लागल्यापासून पगारातील वीस टक्के रक्कम मी या छंदासाठी राखून ठेवत असे. लहानपणी घरी एकच रेडिओ होता. वडील कडक शिस्तीचे. त्यांना क्लासिकलमध्ये रस होता. आई भावगीतं ऐंकायची आणि मला फिल्मी गीतांचा शौक होता. वडीलांना ते आवडायचं नाही, त्यामुळे चोरुन गाणी ऐंकायचो.

आज अरुण पुराणिक यांच्याकडे जगातल्या जवळपास सगळ्या रेकॉर्ड कंपन्यांच्या रेकॉर्ड आहेत. ओडीयन, जय भरत, झोनोफोन, कोलंबिया...तुम्ही म्हणाल ती कंपनी. त्याच बरोबरीनं सिनेमाची पोस्टर्स जमवण्याचा छंद लागला. सिनेमांची पोस्टर्स, बुकलेटस्, ग्लास लाईटस्, बॅनर्स, पोस्टकार्डस्, शो कार्डस्, कॅलेंडर अशी दहा हजाराच्यावर पब्लिसिटी मटेरिअल माझ्याकडे आहे. हे सगळं मटेरिअल केवळ छंदापायी जमवलं असलं तरीही हिंदी सिनेमाचा दस्ताऐवज म्हणून त्याच महत्व मोठं आहे. हा दस्ताऐंवज पुण्याच्या फिल्म आर्काइव्हकडेही नाही. शिवाय काही वर्षांपूर्वी संस्थेला लागलेल्या आगीत इथला बराचसा मौल्यवान संग्रह जळून खाक झाला. एकूणच दस्ताऐंवज करण्याची गरज भारतीयांना कधीच वाटली नाही. हा विचार आपल्याला शिकवला तो ब्रिटीशांनी. आजही फिल्म इंडस्ट्रीचं स्वतःचं आर्काईव्ह नाही. यशराज आणि राजश्री प्रोडक्शनसारखे तुरळक अपवाद वगळता कोणाकडेही या नोंदी नाहीत. अगदी प्रभात फिल्मकडेदेखील. ज्यांच्याकडे आहेत त्या स्वतःच्या वैयक्तिक सिनेमाच्या. अरुण पुराणिक यांच्याकडे एकोणीशे पासष्ट सालापर्यंतचं सिनेमांचं, एकोणीशे दहापासून ते एकोणीशे पन्नासपर्यंतचं भारतीय आणि वेस्टर्न संगीत असा अमुल्य ठेवा आहे. या संग्रहातील काही माहिती पुराणिक यांनी डिजिटलाईज केलीय. सिनेमावरील अनेक पुस्तकांमध्ये पुराणिक यांच्या संग्रहातील फोटो वापरण्यात आलेत. फिल्मस्टार देवानंद यांच्या निधनानंतर मेहबूब स्टुडिओमध्ये श्रद्धांजली सभा आयोजीत करण्यात आली होती त्या सभेत पुराणिक यांच्याकडील देवानंदचे फोटोज् वापरण्यात आले होते. त्यांच्याजवळील फोटोज् वापरुन लता आणि हिरॉईन्स संकल्पनेवर कॅलेंडरही प्रसिद्ध झालय. २००० साली बीबीसी लंडनसाठी पुराणिक यांच्या संग्रहातील गाण्यांच्या रेकॉर्डस् वापरण्यात आल्या. त्यांच्या या सहकार्याबद्दल बीबीसीनं ऑस्कर पुरस्कार पटकावलेल्या ८४ फिल्मचं स्पेशल कलेक्शन पुराणिक यांना भेट म्हणून पाठवलं. पहिला भारतीय सिनेमाचा मान ज्या मराठी फिल्मला मिळाला तो सिनेमा ‘हरिशचंद्राची फॅक्टरी’ पुराणिक यांच्या संग्रहात आहे. सिनेमाकडे आपण फक्त मनोरंजन किंवा छंद म्हणून पहातो. पण एक सिनेमा आपल्याला कित्येक गोष्टी शिकवतो. त्या त्या काळातील सामाजिक, आर्थिक वास्तवाचा आरसा म्हणजे सिनेमा. कपडे, मेकअप, हेअरस्टाईल, दागिन्यांची फॅशन, लोकेशन्स...अफाट माहिती. मुंबईवरच्या सिनेमांमध्ये तर मुंबईचा विकास, मुंबई कशी बदलत गेली ते सगळं सिनेमा आपल्याला दाखवतो. याचं विषयावरील बॉम्बे टॉकीज् या पुस्तकावर सध्या अरुण पुराणिक काम करताहेत.

image


एक अभ्यासक म्हणून पुराणिक यांना मुंबईतल्या सोमय्या कॉलेज, किर्ती कॉलेजमधून बोलावणी येतात. एशियाटीक लायब्ररीमध्ये त्यांची व्याख्यानं होतात. काला घोडा फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या संग्रहातील काही गोष्टींचं प्रदर्शन भरवलं गेलं होतं. तिथे लोकं भेटतात, बोलतात. पण ते पुरेसं नाहीये. या विषयात अधिक संशोधन करणारी माणसं निर्माण झाली पाहिजे. हा सगळा संग्रह लोकांना पहाता यावा, सिनेमाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हाताळता यावा यासाठी एक स्टडी सेंटर उभारण्याचा पुराणिक यांचा विचार आहे. मात्र हे काम खर्चिक आहे. कलेची जाण असणारी योग्य माणसं मिळाली तर एक दिवस हे स्टडी सेंटर उभं राहील असा विश्वास पुराणिक यांना आहे.


image