अपंग असलो म्हणून काय झाले...?

अपंग असलो म्हणून काय झाले...?

Friday January 22, 2016,

4 min Read

आज ज्या माणसांकडे दोन हात आहेत, धडधाकट शरीर आहे, ती माणसं छोटी छोटी दु:खं घेऊन रडत बसतात. त्यांच्याकडे असणाऱ्या कमतरतेविषयी दुख: व्यक्त करीत उर्वरित आयुष्य व्यतीत करताना दिसतात, पण आपल्याकडे काय कमी आहे याचा विचार करण्यापेक्षा काय आहे याचा विचार करून जिद्दीच्या बळावर अवघे अवकाशही आपण कवेत घेऊ शकतो. त्यासाठी अवकाश कवेत घेण्याची जिद्द लागते. ही जिद्द म्हणजेच पुणे येथे राहणारा आणि एक हात गेला म्हणून निराश न होता आपल्याजवळ असलेला दुसरा हात पुस्तकावर ठेवून एका मोठ्या पदावर नोकरी प्राप्त करणारा नमित कटारिया हा होय.


image


आपण आजच्या काळात मुंबईत रेल्वेने प्रवास जरी केला तरी आपल्यासमोर एका हाताने, पायाने अपंगत्व आलेले अनेक जण भीक मागत आपल्यासमोर येतातच. ते त्यांच्या अपंगत्वाची भीक मागत त्यांचा उदरनिर्वाह करीत असतात. अनेकांना तर विविध कारणांनी हात गमवावा लागल्याने छोट्या-छोट्या गोष्टींसाठीही त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. दैनंदिन जीवनातील साध्या गोष्टी करताना अनेक अडचणी येतात. काहींना तर रोजगार किंवा व्यवसायाचे साधन मिळत नाही. पण अशा सर्वांसमोर पुण्यातील नमित कटारिया याच्या कर्तुत्वाचा एक आदर्श उभा राहिला आहे.


image


पुण्यातील अप्पा बळवंत चौकात राहणार्‍या नमित सहावीच्या इयत्तेत शिकत असताना शाळेतील लिफ्टमध्ये मजा मस्ती करण्याच्या नादात लिफ्टमध्ये अडकला व या अपघातात त्याचा उजवा हात गेला. हॉस्पिटलमध्ये सुरवातीचे काही दिवस होत असलेल्या हाताच्या वेदना, आपल्या शरिरातील एक भाग आता आपल्याजवळ नाही याची सतत होणारी जाणीव, छोट्या-छोट्या कामांसाठी इतरांचा घ्यावा लागणारा आधार या सर्व गोष्टींमुळे नमित काही दिवस मानसिक तणावाखाली गेला होता. आता आपले भविष्यात काय होणार? आयुष्यभर आता आपल्याला एकाच हाताच्या आधारे जगावे लागणार... याचे भयंकर चित्र डोळ्यांसमोर आले की त्याची झोप उडायची. रात्र-रात्र जागुन तो आपण गमावलेल्या उजव्या हाताबाबत खंत व्यक्त करीत होता. त्याचं कुटुंब एक हसतं खेळतं कुटुंब होतं. नमितचा उजवा हात गेल्याने कटारिया कुटूंबात स्मशानाची शांतता पसरली होती. आता आपल्या मुलाचे भविष्य काय असणार याची चिंता तर त्याच्या कुटूंबियांना लागलीच होती, पण त्याच्या कुटूंबियांनी त्यांची ही चिंता नमितसमोर कधीच येऊ दिली नाही. एक हात तुटून गेला म्हणून काय झालं, दुसरा हात आहे ना, ही सकारात्मक ऊर्जा देत त्याला जगण्याचं बळ देत राहिले. आपला उजवा हात नाही याचे दुःख करण्यापेक्षा आपल्याजवळ असलेल्या डाव्या हातात त्याने पुस्तक धरले आणि दिवसरात्र एक करून अभ्यासाला नव्याने सुरवात केली. आयुष्यभर चिकटलेल्या या वेदनेला कुरवाळण्यापेक्षा तिला कवटाळून त्याने झेप घेतली आणि चमत्कार घडला. दहावी आणि बारावीच काय?... तो आयआयटीपर्यंत गेला; तेही दोन्ही हातांची गरज असणारा संगणकशास्त्र विषय घेऊन. तिथेच तो थांबला नाही... अमेरिकेत त्याने संगणकशास्त्रातच मास्टर इन सायन्स ही पदव्युत्तर पदवी तर मिळविलीच; पण तेथील लिंकडिन या नेटवर्किंग कंपनीत नोकरीही मिळवली. एका हाताने अपंग असुन सुद्धा सध्या तो आपल्या कुटुंबाचा काही प्रमाणात का असेना कमावता आधार बनला आहे, असे त्याचे कुटूंबिय मोठ्या आत्मविश्‍वासाने सांगतात. त्याच्या ना चेहर्‍यावर त्रासिक भाव किंवा ना कधी कंटाळा. आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जसा असतो त्याप्रमाणे आनंद घेतला तर कितीही संकटे आली तरी त्यातून आपण नक्कीच बाहेर येतो या एकाच जाणिवेने त्याचा हा प्रवास चालू आहे. त्याचे अनुभव आणि अपंगत्वावर केलेली मात यावर ज्यावेळी तो बोलतो त्यावेळी प्रत्येक वाक्यात सकारात्मकता असते अन् कोणत्याही आव्हानाला भिडण्याचा दुर्दम्य आत्मविश्‍वास झळकतो; दु:खाला कुरवाळणार्‍या अन् हताश झालेल्या धडधाकट माणसांना उत्साह आणि ऊर्जा देणारा!

पंचविशीतला नमित म्हणतो, ‘आयुष्यात जे कधीच बदलता येणार नाही, ते मान्य केलं होतं. त्यामुळं अपंगत्वाचा विचार कधी केला नाही. एक हात नसल्याची सवय झाली होती. मुंबईत असताना एकटा राहिलो; पण कोणतीही अडचण आली नाही. अपघातानं अपंगत्व आलं याचं दु:ख वाटतं. पण त्यामुळे अडचणींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला, सकारात्मकता आली. जिद्दीनं काही मिळविण्याची वृत्ती बनली. याचं श्रेय माझ्या कुटुंबीयांना आहे. माझ्या जिद्दीपेक्षा आई-वडील आणि मोठ्या भावाच्या जिद्दीची उंची खूप मोठी आहे. त्यांनी हार मानली नाही. भावानं खूप मदत केली. अभ्यासात मला जे जमलं नाही, ते त्यानं माझ्याकडून करून घेतलं.’’ अनेक तरुण माझ्याकडून हे होणारच नाही, असा विचार करतात. पण यशासाठी कष्ट करावेच लागतात. एखादी गोष्ट मिळविण्यासाठी प्रयत्न करीत राहिलं आणि झटत राहिलं, तर ती मिळतेच. पण अपयश आलं तरी त्यातून मिळणारा अनुभव खूप मदत करतो, असा आशावाद तो व्यक्त करतो. दोन वर्षांपूर्वी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे धैर्य प्राप्त केले. लिंकडिन या कंपनीत तीन महिन्यांसाठी इंटर्नशिप केली. इंटर्नशिपचा कालावधी संपला आणि शेवटच्या दिवशी कंपनीने त्याला नोकरीची ऑफर दिली. ‘‘ माझे अपंगत्व हा माझ्या नशिबाचा एक भाग होता. अपंगत्वाचा बाऊ न करत बसता माझ्याप्रमाणे इतरांनीसुद्धा स्वत:च्या पायावर उभे राहून आत्मविश्वासाने जीवन जगावे’’, असा सल्लासुद्धा त्याने या निमित्ताने आपल्यासारख्या इतरांना दिला आहे. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘रनर अप फॉर बेस्ट रिसर्च पेपर’ हा अवॉर्ड त्याला मिळाला आहे. यासोबत त्याला स्टुडंट ट्रॅव्हल अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

image


image