वयाच्या ९५ व्या वर्षी योगाचे धडे देणारे स्वातंत्र्यसैनिक
आजच्या या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायाला वेळ मिळत नाही त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्यावर राज्य करताना दिसतात. त्यामुळे ऐन तारुण्यातच अंगदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन संपूर्ण भारतभर साजरा केला. या योगादिनाला अबालवृद्धांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. निम्मित फक्त योगादिनाचं नव्हतं तर उत्तम शरीरसंपदा राखता यावी यासाठी अनेकजण पुढे सरसावले. 'आरोग्य हीच संपत्ती' या उक्तीप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळं या गावाचे मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक मुरलीधर भाऊराव काळे हे वयाच्या ४० वर्षापासून योगाचे धडे देत आहेत. आत्तापर्यंत काळे यांनी ५० ते ५५ गावांमध्ये, शाळा, महाविद्यालयात जाऊन योगाचे धडे दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात आयोजित केलेल्या योगदिना दिवशी त्यांनी उस्मानाबाद जिल्हा अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी कर्मचारी व नागरिकांना योगाचे धडे दिले.
खरंतर काळे आजोबा यांना योगाची फारशी आवड नव्हती, पण त्यांना सहा मोठ्या आजारांना तोड द्यावे लागले. टीबी, मुळव्याध, निमोनिया, अर्धागवायु या आजारांनी त्यांना ग्रासले होते. अनेक डॉक्टर, तज्ञ यांच्याकडे त्यांनी धाव घेतली, खूप पैसा खर्च केला पण गुण काही येत नव्हता. डॉक्टरांनी सागितले की, सर्व आजार बरे होणे कठीण आहे. 'आजाराचा सामना करण्यासाठी तुम्ही योगाचा मार्ग निवडावा' डॉक्टरांचा सल्ला ऐकून हताश न होता जिद्दीने योगाभ्यास करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यांनी योगाचं एक छोटसं पुस्तक खरेदी केलं. त्यात योगाचे फक्त ३० प्रकार होते तेवढ्यावर त्यांचे काही भागले नाही, तर त्यांनी आज योगाचे २५० प्रकार आत्मसात केले आहेत.
वयवर्ष ९५ असलेले काळे आजोबा आजही मोठ्या हिंमतीने सांगतात की, "मी सकाळी पहाटे चारला उठतो व सातवाजेपर्यंत प्राणायाम, योगासन करतो. वयाच्या ९५ व्या वर्षी योगसाधनेचा प्रचार करणाऱ्या या योगीला प्रशस्तीपत्र देवून अनेक ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे. सातत्यपूर्ण योगसाधनेमुळे त्यांच्या सर्व आजारांनी त्यांना कायमचाच रामराम ठोकला. इतकेच नव्हे तर गेल्या ४० वर्षात त्यांनी दवाखान्याचे तोंड देखील पहिले नाही, हे सांगताना त्यांच्यात ओसंडून वाहणारा आत्मविश्वास ठायी ठायी जाणवतो. मी त्यांना सहज विचारलं की," आजोबा एवढ्या उन्हात फिरत जाऊ नका तर ते सागतात की जोपर्यंत अंगात ताकद आहे तो पर्यंत हे शरीर थांबणार नाही. म्हातारपण हे मला आजपण बालपणासारखे वाटते" असे ते मिश्किलीने सांगतात.
त्यांच्या निरोगी शरीरयष्टीकडे पाहून रोजच्या दिनचर्येत ते काय- काय घेता असे विचारल्यावर ते सांगतात की, " रोज योगासन झाल्यावर चहा घेतो त्यासोबत चार गुड्डे बिस्कीट, फळे, जेवणात आवर्जुन चार चमचे गाय किवा म्हशीचे तूप, एक ज्वारीची भाकरी, आठवड्यातून दोन दिवस मांसाहार करतात. त्यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे व्यसन केलं नाही, त्यापासून चार हात लांबच राहिलो".
स्वातंत्र्यसैनिक असल्यामुळे शासनाकडून महिन्याकाठी दहा हजार रुपये मिळतात त्यामुळे कोणा पुढे हात पसरण्याची वेळ आली नाही. एस टी बस पण त्यांना मोफत आहे त्यामुळे फिरणं हे चालूच असतं. मराठवाडा स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होऊन अन्याय विरुद्ध चार हात केल्याचे ते हिमतीने सांगतात. त्यावेळेस शरीरात एक वेगळीच ताकद होती. मोठमोठे कुस्त्याचे फडही त्यांनी गाजवले आहे. त्यांच्या वयाचे पहिलवान त्यांना भेटल्यास आजही ते कुस्ती खेळण्यास उत्सुक असल्याचे सांगतात. त्यांना खंत या गोष्टीची वाटते की, त्यांच्या वयाचा सवंगडी आज त्यांच्या सोबतीला हितगुज करण्यासाठी नाही.
आजच्या युवकांना ते आवर्जून सांगतात की, " सकाळी उठून योगासन करत राहा वेळ वाया जाऊ देऊ नका. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आजचे युवक वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले दिसतात, त्यामुळे कमी वयात त्यांना मृत्यूशी सामना करावा लागतो. आज गावरान किंवा नैसर्गिक खाद्य पदार्थांची वानवा तर आहेच, मात्र योगसाधनेच्या आधाराने शरीरस्वास्थ्य उत्तम राखणे शक्य होते."
काळे आजोबा देवपूजा, कर्मकांडांपासून चार हात लांब राहणे पसंत करतात, मात्र इतरांना विरोध करत नाहीत. या वयात शारिरीक स्वास्थ्य असल्याने मानसिक स्वास्थ्य आहे. माझा कुटुंबाला माझा त्रास नाही, माझ्या मुलांचा नातवांचा देखील मला त्रास नाही. त्यामुळे मी सुखी समाधानी आयुष्य जगत असल्याचे ते सांगतात.
यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :