दशरथ मांझी...पहाडाला हरवणारा माणूस !
व्यवस्थेला हादरा देणारी 22 वर्षांची कठोर तपस्या...
जवळपास 121 कोटी लोकसंख्येचा आपला देश. एकीकडे यातले बहुतेक ग्रामीण भागात रहातात, तर दुसरीकडे शहरी झोपडपट्ट्यांमध्ये रहाणा-यांची संख्याही लक्षणीय आहे. दर दिवशी आपल्यापैकी लाखोंना एक सन्मानजनक आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आणि उरलेले..अर्थात आपण सर्वजण..अजूनही आपल्या अनेक प्रश्नांवर, समस्यांवर, अडचणींवर उपाय कसा शोधावा याचाच विचार करत आहोत..अजूनही.
ही कहाणी अशा एका माणसाची आहे ज्यानं विचार मुळी केलाच नाही. केली ती फक्त कृती. भारतातल्या अठराविश्वे दारिद्र्य पाचवीलाच पुजलेल्या अत्यंत गरीब समाजातला एक. त्यानं ठरवलं की जर सत्तेत असणा-यांनी त्याच्या माणसांना मदत केली नाही, तर तो त्याच्या माणसांना मदत करेल. त्याचा स्वत:वर विश्वास होता. स्वत: कंबर कसून काम करण्यावर विश्वास होता. आणि त्यानं तेच केलं. अगदी क्षणाचीही उसंत आणि शब्दाचाही विचार न करता. स्वत:च्या हातांच्या भरोशावर. ही कहाणी आहे दशरथ मांझीची. ज्यानं प्रत्यक्ष पहाडालाच कापून काढलं. फक्त त्याच्या माणसांना डॉक्टरकडे वेळेत पोहोचता यावं म्हणून..
गेल्होर..गाव तसं चांगलं..
तो काळ होता 1960चा. बिहारच्या गयामध्ये अत्री भागाच्या डोंगराळ प्रदेशात भूमीहीन मजूरांची एक जमात रहात होती. मुसहार. गेल्होर नावाच्या त्या छोट्याशा खेडेगावातही त्यांना जातीव्यवस्थेच्या अगदी तळाशी स्थान देण्यात आलं होतं. पाणी, वीज, शाळा आणि वैद्यकीय सेवा या मूलभूत गरजाही त्यांना नाकारण्यात आल्या होत्या. मुसहार गावाबाहेर एका 300 फूट उंच डोंगरापल्याड रहायचे. हा डोंगर म्हणजे त्यांच्या आणि विकासादरम्यानची जणू सीमारेषाच होती.
इतर सगळ्याच मुसहारांप्रमाणेच दशरथ मांझीही त्या 300 फूट डोंगरापलीकडेच कामासाठी जायचा. त्याची पत्नी फुगनी त्याच्यासाठी रोज जेवण घेऊन यायची. रस्त्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे तासनतास डोंगरावर चढ-उतार करण्याशिवाय पर्याय नव्हता. एका दगडाच्या खाणीत मांझी काम करायचा. तळपत्या उन्हात दगड फोडावे लागत असल्यामुळे दुपारपर्यंत त्याच्या शरीरातला प्रत्येक अवयव बंड करुन उठायचा. पण मांझीकडे पर्याय नव्हता.
भुकेल्या पोटाने आणि निथळत्या घामाने दशरथ मांझी दररोज फुगनीची वाट बघायचा. त्या दिवशीही रखरखीत उन्हामुळे आणि पोटातल्या भुकेमुळे मांझी काकुळतीला आला होता. जेवणाची वेळ कधीच टळून गेली होती. खूप उशीरानं फुगनी आली. इतका उशीर का केला हा प्रश्न रागावलेल्या मांझीच्या अगदी ओठांपर्यंत येऊन तिथेच थबकला. फुगनीच्या हातात काहीच नव्हतं. तिच्या अंगावर ठिकठिकाणी खरचटलेलं होतं. ती पायानं लंगडत चालत होती, जवळपास फरफटतच. दशरथ मांझीला पहाताच ती त्याच्या गळ्यात पडली आणि केविलवाणं रडायला लागली. काय झालं होतं? डोक्यावर आलेल्या सूर्याला न जुमानता तो डोंगर चढणा-या फुगनीच्या शरीरानं सूर्यासमोर हार पत्करली होती. डोंगर चढता-चढताच तिला घेरी येत होती. त्यातच तिचा पाय एका सैल झालेल्या दगडावर पडला आणि ती कोसळली. काही तासांनी शुद्धीवर आल्यानंतर तिला पहिली आठवण झाली होती ती दशरथची. फुगनीच्या डोळ्यातलं पाणी पाहून दशरथ मुळापासून हादरला आणि त्यानं त्या क्षणीच एक निर्धार केला.
दगडांच्या डोंगराला आव्हान...
मांझीनं त्याच्या शेळ्या विकून टाकल्या आणि त्यातून तीन वस्तू खरेदी केल्या. हातोडा, छिन्नी आणि पहार. तो त्या 300 फूटांच्या अक्राळ-विक्राळ डोंगराच्या अगदी टोकावर गेला..आणि आत्तापर्यंत फक्त दगड फोडणा-या त्याच्या हातांनी थेट डोंगर फोडायला सुरुवात केली. मांझी एकटा होता. पण त्याचा निर्धार पक्का होता. जो त्यानंतरची 22 वर्ष त्याची सोबत करणार होता. त्यानं ठरवलं होतं, “त्या डोंगरानं आजवर अनेक जीव घेतले, संसार उध्वस्त केले. माझ्या प्रेमळ पत्नीला त्यानं पोहोचवलेली इजा मी सहन करु शकत नाही. आता माझं अख्खं आयुष्य यात खर्ची पडलं तरी बेहत्तर, पण मी हा डोंगर फोडून त्यातून रस्ता बनवणार...”
झालं. अख्ख्या गावात मांझीच्या या निर्णयाची चर्चा सुरु झाली. त्यानं त्याची नोकरी सोडली. त्याच्या कुटुंबाला अनेक वेळा उपास घडू लागला. त्यातच फुगनी आजारी पडली. पण डॉक्टर 75 किलोमीटर लांब वझीरगंजमध्ये होता. त्याच 300 फूट डोंगरापल्याड. डॉक्टरकडे पोहोचण्याआधीच फुगनीनं प्राण सोडला. फुगनीच्या जाण्यानं मांझीचं जणू सर्वस्व उद्ध्वस्त झालं. आणि त्याचा निर्धार अजूनच पक्का झाला.
हे सोपं काम नव्हतं. पण दशरथ मांझी ठाम होता. कठोर होता. कठीण होता. त्या डोंगरापेक्षाही कठीण. ब-याचदा तो डोंगर जणू मांझीवर दगडांचा मारा करायचा. मांझी पडायचा, जखमी व्हायचा. पण परत उठायचा आणि घाव घालायला सुरुवात करायचा..डोंगराच्या छातीत. पण डोंगर फोडायचा तर पोट भरणंही गरजेचं होतं. मांझीच्या घरात दोन उपाशी चिमुकली तोंडं होती. त्यांच्या तोंडासाठी तरी घास कमवावा लागणार होता. मग अशा वेळी मांझी अगदी गरजेपुरता परतावा घेऊन लोकांचं सामान डोंगरापार करुन द्यायचा. एकटा. वर्षामागून वर्ष लोटली. डोंगर बधत नव्हता आणि मांझी थकत नव्हता. 10 वर्षांनंतर त्या अचल, आडदांड डोंगराच्या छातीत मांझीनं चांगलीच मोठी फट केली. लोकांचा आता मांझीवर विश्वास बसायला लागला. काही हात मदतीसाठी आले. आणि तब्बल 22 वर्षांनंतर, 1982 साली आख्खं गेल्होर गाव त्या दुभंगलेल्या डोंगराकडे आश्चर्यचकित होऊन पहात होतं.
‘बाबा’ दशरथ मांझी...
मांझीने त्या बलाढ्य डोंगराच्या छातीवर शेवटचा घाव घातला आणि मोकळ्या झालेल्या आरपार वाटेवर येऊन तो उभा राहिला. 22 वर्ष..दशरथ दास मांझीचा संघर्ष या पायवाटेच्या रूपानं यशस्वी झाला होता. एका बहिष्कृत जातीच्या भूमीहीन मजुरानं 300 फूटांच्या डोंगराचा पराभव केला होता..त्याला जिंकलं होतं. मांझीनं त्या डोंगरातून तब्बल 360 फूट लांब आणि 30 फूट रूंद रस्ता काढला होता. आता वझीरगंज, तिथले डॉक्टर, तिथल्या शाळा, तिथला रोजगार अवघ्या 5 किलोमीटर इतक्या जवळ आला होता. अत्री भागातल्या तब्बल 60 गावांना या रस्त्याचा लाभ मिळत होता. शाळेत जाण्यासाठी लहानग्यांना फक्त 3 किलोमीटर चालावं लागत होतं. या लहानग्यांसाठी आता दशरथ मांझी ‘बाबा’ झाले होते. वयामुळे नाही, तर त्यांच्याबद्दल मनापासून वाटणा-या आदरामुळे !
पण दशरथ मांझी उर्फ ‘बाबा’, तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी आता डोंगरातून जाणा-या या पायवाटेवर शहराच्या मुख्य रस्त्याला जाऊन मिळणारा एक जोडरस्ता बांधण्यासाठी प्रयत्न सुरु केले. लोकांकडे मदत मागायला सुरुवात केली. आपली मागणी थेट राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी ते रेल्वेरुळाला धरुन चालतच निघाले. आपल्या मागणीला पाठिंबा देण्यासाटी वाटेत लागणा-या सर्व रेल्वे स्टेशन्सवरच्या स्टेशन मास्तरांच्या सह्या त्यांनी घेतल्या. रस्ता बांधणी, गावात हॉस्पिटल, मुलांसाठी शाळा आणि गावासाठी पाणी या मागण्यांसाठी त्यांनी दिल्ली दरबारी अर्ज केला. 2006मध्ये ‘बाबा’ दशरथ मांझी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भेटीला त्यांच्या ‘जनता दरबार’मध्ये गेले. बाबांच्या या सगळ्या कामामुळे मुख्यंमत्री प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांची स्वत:ची खुर्ची, मुख्यमंत्र्यांची खुर्ची बाबांना बसण्यासाठी देऊ केली. मांझी ज्या समाजातून आले होते, त्या समाजातल्या कुणाही व्यक्तीला इतका आदर-सन्मान कदाचित पहिल्यांदाच मिळाला असावा.
मांझींच्या या अतुलनीय कामगिरीची पोचपावती म्हणून सरकारने त्यांना एक जमीन देऊ केली. तर ‘बाबा’ मांझींनी ती जमीन एका हॉस्पिटलसाठी दान करून टाकली. सरकारनं त्यांच्या नावाची ‘पद्मश्री’ या केंद्र सरकारच्या मानाच्या पुरस्कारासाठी शिफारसही केली. मात्र वनविभागानं या शिफारशीला तीव्र आक्षेप घेतला. आणि त्यांचा दावा असा होता की मांझींनी फोडलेला डोंगर हे बेकायदा कृत्य आहे. “मला हे पुरस्कार, ही प्रसिद्धी, या पैशाशी काहीही देणंघेणं नाही. मला हवंय ते म्हणजे माझ्या गावासाठी एक रस्ता, एक शाळा आणि एक हॉस्पिटल. माझे गावकरी खूप कष्टाचं आयुष्य जगतायत. यामुळे माझ्या गावच्या महिलांना, मुलांना खूप मदत होईल.” मांझींना हवा असलेला रस्ता अस्तित्वात यायला पुढे 30 वर्ष उलटावी लागली.
संघर्ष संपलेला नाही...
17 ऑगस्ट 2007. त्या बलाढ्य डोंगरालाही हार पत्करायला लावणा-या जिद्दी, निर्धारी दशरथ मांझींना कर्करोगाशी झुंजताना मृत्यू ओढवला. त्यांनी आयुष्यभर जे केलं, त्यातलं कणभरही स्वत:साठी नव्हतं. “माझ्या पत्नीवर असलेल्या प्रेमापोटी मी हे काम सुरु केलं होतं. पण माझ्या माणसांसाठी, माझ्या गावासाठी मी ते आयुष्यभर करत राहिलो. जर मी केलं नसतं, तर कुणीच केलं नसतं.” दशरथ मांझींचे हे शब्द आपल्या देशाचं वास्तव अगदी स्पष्टपणे व्यक्त करणारे आहेत. त्यांनी आयुष्यभर ज्या त्यांच्या माणसांसाठी, गावासाठी संघर्ष केला, ती माणसं आजही गरीबच आहेत. तिथे विजेचे खांब तर आहेत, पण वीज नाहीये. पाण्याचे नळ आहेत, पण त्या नळांना पाणी नाहीये. अगदी नावालाच म्हणावं असं शिक्षण. ना हॉस्पिटल आहे, ना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा. मांझींच्या सुनेचाही काही महिन्यांपूर्वी आजारपणामुळे मृत्यू झाला. मांझींनी दिलेल्या संघर्षाच्या इतक्या वर्षांनंतरही तिथल्या लोकांचं वर्तमान आणि भविष्यही आणखी एका संघर्षात हेलकावे खातंय..गरिबी. अजूनही तिथल्या पेशंटला एक साधा डॉक्टर आणि किमान आवश्यक वैद्यकीय सुविधा आवाक्याबाहेरच्या वाटतायत. न परवडणा-या ठरतायत.
दशरथ मांझींचा वारसा आजही कायम आहे, आणि पुढेही चालत रहाणार आहे. तो अस्तित्वात आहे. इतरांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी लढणा-यांमध्ये..नवनव्या संकटांचा सामना करणा-यांमध्ये..आणि नवनवी आव्हानं सर करणा-यांमध्ये. तो तुम्हा-आम्हा सर्वांमध्ये जागता आहे, ज्यांचा संकटांच्या अशाच पहाडांशी सामना आहे.
आता आपली वेळ...
दशरथ दास मांझींचा वारसा, त्यांची प्रेरणा त्यांच्यासोबतच संपून जायला नको. आव्हानांचा सामना करणा-या, संघर्ष करणा-या आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणा-या आपल्यासारख्या लाखोंमध्ये तो वारसा जतन व्हायला हवा, वाढायला हवा. समोरची एखादी समस्या मी स्वत: सोडवणार आहे असं तुम्हाला कितीवेळा वाटतं?
आता वेळ आलीये की तुम्ही स्वत: हातोडा घेऊन पुढे या आणि अशा अगणित समस्यांचे डोंगर फोडून काढण्यासाठी सज्ज व्हा. आज देशाला तुमची गरज आहे. तुमच्या प्रयत्नांची गरज आहे. तुम्ही स्वत: पुढाकार घेण्याची गरज आहे. अशा असामान्य सामान्यांच्या धैर्यकथा इतरांपर्यंत पोहोचवा आणि इतरांनाही प्रेरणा द्या..पुढाकाराची. या ‘माऊंटन मॅन दशरथ मांझीं’च्या यशोगाथेपासूनच ही सुरुवात करा.