पर्यटनासोबत ‘ग्रंथपंढरी भिलारची करू या वारी’, ‘पाहुणे या’ ‘हे हाय ‘लयभारी’!

पर्यटनासोबत ‘ग्रंथपंढरी भिलारची करू या वारी’, ‘पाहुणे या’ ‘हे हाय ‘लयभारी’!

Tuesday May 09, 2017,

3 min Read

‘या बालानो यारे या, लवकर भर भर सारे या, मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा,.....स्वस्थ बसे तोची फसे, नव भूमी दावीन मी, नवी बघा दुसरी दुनिया’ असे ते कुतूहल जागवणारे शब्द होते. लहानपणी बालभारतीच्या पाठ्य पुस्तकात ही एक छानशी कविता होती, त्या कवितेत एक जादू होती तिच्या शब्दात ताकद होती, मनाचे सारे रंग, नूर बदलण्याची. तसेच काहीसे झाले होते महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरील स्ट्रॉबेरीचे गाव भिलारला भेट देताना! पुस्तकांचे गांव! देशातील एकमेव पहिले वहीले पुस्तकांचे गांव! राज्याचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे याच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि पर्यटनाच्या आजच्या युगाला ज्ञान माहिती आणि रंजनाची जोड देणा-या या उपक्रमाची ‘याची देही याची डोळा’ अनुभूती घेण्यासाठी आम्ही निघालो होतो.


image


खरेतर महाबळेश्वर म्हटले की किंवा पांचगणी म्हटले की, काय मनात येते तर रोजच्या धकाधकीपासून दूर निवांत निसर्गाच्या कुशीत शांतपणे जीवनाच्या मौलिक क्षणांची साथ करण्याचे थंड हवेचे ठिकाण! चार दिवस विरंगुळा, आराम आणि शिण घालवून रोजच्या जीवनाला सामोरे जाताना ताजेतवाने होण्याचे ठिकाण. काही जणांच्या सुरा पानाच्या सुखाच्या कल्पना, काही जणांच्या प्रणयाच्या, मधुचंद्राच्या सुखाच्या कल्पना, तर काही जणांच्या निसर्गाच्या मुक्त सौंदर्याच्या वेडाने बहरून जाण्याच्या कल्पना अशा ठिकाणी उचंबळून येत असतील. पण ज्या मराठी मातीत आपण निसर्गाच्या कुशीत जातो त्या परिसरात या निवांतपणाचा फायदा नवे ज्ञान, माहिती, रंजन आणि संस्कृती समजून घेण्यात होवू शकतो असे सांगितले तर तुमच्या पैकी किती जणांचा विश्वास बसेल? होय तेच तर आता साकारले आहे भिलार या पुस्तकांच्या गावांत! महाराष्ट्र सरकारने ‘पुस्तकाच्या गावाची’ ही अनोखी संकल्पना प्रत्यक्षात साकार केली, नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत हे आगळंवेगळं ‘पुस्तकांचं गाव’ पुस्तकप्रेमींच्या मांदियाळीने खुलून गेले. इंग्लंडमधील ‘हे ऑन वे’ या ‘पुस्तकाच्या गावा’च्या धर्तीवर राज्याच्या मराठी भाषा आणि सांस्कृतिक विभागाने अथक प्रयत्नांनी भिलार हे देशातील पहिलेवहिले ‘पुस्तकाचे गाव’ वसवले आहे.


image


समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिमघाटाच्या कुशीत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे पर्यटनासाठी सुप्रसिद्ध ठिकाण. याच महाबळेश्वरपासून १४ किमी आणि पाचगणीपासून पाच किमी अंतरावर भिलार हे निसर्गरम्य वातावरणाने नटलेलं गाव आणि याच गावात आता घरोघरी पुस्तकालय सुरू करून स्ट्रॉबेरीसारख्या आंबट-गोड अशा रसाळ चवीप्रमाणेच वाचनसंस्कृतीची चवदेखील आता चाखायला मिळणार आहे.

इंग्लंडमधील ‘हे ऑन वे‘ या पुस्तकाच्या गावावरून मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना ही संकल्पना सुचली आणि देशातील पहिलेवहिले ‘पुस्तकाचे गाव’ उदयास आले. खरं तर मोबाईल आणि इंटरनेटच्या आजच्या सुपरफास्ट जमान्यात सगळे काही अगदी घरबसल्या सहजतेने मिळते, अगदी पुस्तकंही... पण निसर्गरम्य पर्यटनाच्या निवांत वातावरणात वाचनानंदाची समाधी लावायची असेल, किंवा मेजवानी झोडायची असेल तर भिलारच्या पुस्तक पंढरीच्या वारीला जायलाच हवं,आणि सुख अनुपम अनुभवायला हवे नाही का?


image


एरवी राजकीय व्यक्तींच्या कल्पनेतून साकारलेल्या गोष्टीना त्यांचे राजकीय विरोधक सहजतेने स्विकारात नाहीत पण भिलार त्याला अपवाद ठरले आहे. कारण उद्घाटन झाले आणि लागलीच दुसर्‍या दिवशी भाजपा सरकारचे टिकाकार आणि राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनीही या ‘पुस्तकाच्या गावा’ला भेट देऊन ‘पुस्तकाच्या गावा’चे पहिले पर्यटक आणि वाचक होण्याचा मोह आवरता आला नाही. इतकेच काय, त्यांनी पुस्तक वाचनानंद घेतलाच शिवाय राज्य सरकारच्या या उपक्रमाची स्तुतीही केली. यातच या उपक्रमाचे यश सामावले आहे नाही का?, ज्याला विरोधकांनी देखील खुल्या मनाने दाद दिली! चला तर मग निघायच ना? पुस्तकांच्या गावाला. . . . म्हणजे ‘केल्याने देशाटन, पुस्तक मैत्री भिलार ग्राम संचार .... ही उक्ती सर्वार्थाने खरी होणार तर!