गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणारा अवलिया...

‘सुपर 30’ची यशोगाथा घडवणारे..आनंद कुमार !

गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणारा अवलिया...

Saturday October 17, 2015,

7 min Read

आई-वडिलांची आणि स्वत:ची स्वप्नं पूर्ण करण्याची इच्छा तर प्रत्येकाचीच असते. तसं ते चांगलंही आहे. पण अशा फारच थोड्या व्यक्ती असतात, ज्या गरीब आणि निराधार मुलांची स्वप्नं पूर्ण करणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय बनवतात, तेच जगतात. पाटण्यामध्ये जन्मलेले आणि तिथेच लहानाचे मोठे झालेले आनंद कुमार अशाच व्यक्तींमधले एक आहेत. आज जगाला आनंद कुमार यांची ओळख ‘सुपर-३० ’ संस्थेचे संस्थापक म्हणून आहे. दरवर्षी आयआयटी अर्थात इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीसाठीच्या प्रवेश परीक्षांचे निकाल लागतात, तेव्हा ‘सुपर-३० ’ची भरपूर चर्चा होते. त्याला कारणही तसंच आहे. दरवर्षीप्रमाणेच २०१४ सालीही ‘सुपर ३० ’मधल्या ३० मुलांपैकी २७ मुलांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला. २००३ सालापासून आयआयटीमध्ये ‘सुपर ३० ’मधून आलेल्या मुलांनी यश मिळवलंय. पण एवढं मोठं यश काही सहज सोपं नव्हतं. त्यापाठीमागे आनंद कुमार यांनी आयुष्यभर केलेला संघर्ष आणि प्रबळ इच्छाशक्ती आहे. उद्याचा समृद्ध भारत घडवण्याची.

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही आनंद कुमार यांच्या कामाची दखल घेतली

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही आनंद कुमार यांच्या कामाची दखल घेतली


आनंद कुमार एका साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातून आले. त्यांचे वडील पोस्ट ऑफिसमध्ये क्लार्क होते. त्यामुळे मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवणं, इंग्रजी शाळेत प्रवेश मिळवून देणं त्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती. त्यामुळे त्यांनी मुलांना हिंदी माध्यमाच्या सरकारी शाळेतच शिकवलं. मुलांच्या शिक्षणासाठी ते कायम आग्रही होते. मुलांनाही त्याची जाणीव होती. आनंद यांना हे पूर्णपणे माहिती होतं, की उपलब्ध संधी आणि साधनांमध्ये शक्य तितकं चांगलं शिक्षण घेणं क्रमप्राप्त आहे. आनंद कुमार यांना गणित फार आवडायचं. आणि मोठं झाल्यावर त्यांना इंजिनिअर किंवा वैज्ञानिक व्हायचं होतं. यासाठी सर्वांनीच त्यांना विज्ञान विषयाचा अभ्यास करायचा सल्ला दिला. त्यांनी पाटणा विद्यापीठात प्रवेश घेतला. अभ्यासादरम्यान त्यांनी गणिताची काही नवीन सूत्र शोधून काढली. त्यांच्या या कामगिरीवर त्यांचे शिक्षक देवीप्रसाद वर्मा फारच खूश झाले. त्यांनी ही सूत्रं इंग्लंडला पाठवून तिथे प्रकाशित करण्याचा सल्ला आनंद कुमार यांना दिला. देवीप्रसाद वर्मा यांच्या सल्ल्यानुसार आनंद कुमार यांनी मग ही सूत्र इंग्लंडला पाठवून तिथे प्रकाशितही केली. आनंद कुमार यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्यांचे पेपर्स वाचून त्यांना थेट केंब्रिज विद्यापीठातून बोलावणं आलं. त्यांच्या शिक्षकांनी त्यांना कसलाही विचार न करता केंब्रिजला जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्या घरीही या बातमीमुळे आनंदाचं वातावरण होतं.

पण आनंद कुमार यांच्या केंब्रिज जाण्यामध्ये एक मोठी अडचण होती. ती म्हणजे पैशांची सोय कशी करायची? कॉलेजने त्यांची फी माफ करण्याचं आश्वासन दिलं. पण केंब्रिजला जाऊन तिथे रहाण्याचा खर्च तब्बल ५० हजारांच्या घरात होता. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आर्थिक मदतीसाठी अर्ज केला. दिल्ली ऑफिसपर्यंत पाठपुरावा केला. शेवटी आनंद यांचं कर्तृत्व पाहून दिल्ली ऑफिसकडून मदतीचं आश्वासन देण्यात आलं. १ ऑक्टोबर १९९४ या दिवशी आनंद कुमार यांना केंब्रिजला जायचं होतं. पण म्हणतात ना की नियतीच्या मनात असतं तेच घडतं. आनंद यांच्या बाबतीतही हेच घडलं. २३ ऑगस्ट १९९४ रोजी आनंद यांच्या वडिलांचं निधन झालं. आनंद आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का होता. या घटनेमुळे आनंद कुमार यांच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांच्या कुटुंबासमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं. कारण घरात आनंद कुमार यांचे वडिलच फक्त कमावणारे होते. त्यांचे काका अपंग होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आनंद यांच्यावरच येऊन पडली. या सर्व परिस्थितीचा विचार करुन आनंद यांनी केंब्रिजला न जाण्याचा निर्णय घेतला आणि पाटण्यामध्येच राहून कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी काम सुरु केलं. वडिलांच्या जाण्यामुळे जणू आनंद कुमार यांच्या करिअरला पूर्णविरामच लागला होता. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं.

गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणारा अवलिया...

गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणारा अवलिया...


परिस्थिती हलाखीची होती. पण आनंद कुमार यांना वडिलांप्रमाणे आयुष्यभर क्लार्कची नोकरी करायची नव्हती. त्यामुळे त्यांनी वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर मिळत असलेली नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. शिकवणीमध्ये ते आपला आवडता विषय गणित शिकवून चार पैसे कमवू लागले आणि आपल्या कुटुंबाचं पालन-पोषण करु लागले. पण एवढ्यावर घरखर्च भागणार नव्हता. त्यामुळे त्यांच्या मातोश्रींनी घरच्या घरीच पापडाचा व्यवसाय सुरु केला. आनंद स्वत: रोज संध्याकाळी सायकलवर किमान चार तास हे पापड विकायचे. अशा त-हेनं शिकवणी आणि पापड व्यवसाय यातून कसाबसा घरखर्च भागू लागला.

'सुपर 30'..उद्याचा भारत घडवणारी प्रयोगशाळा !

'सुपर 30'..उद्याचा भारत घडवणारी प्रयोगशाळा !


पण आनंद यांच्या डोक्यात विचारचक्र सुरु होती. हे असं कधीपर्यंत सुरु रहाणार? मग आनंद यांनी आपल्या गणिताच्याच जोरावर ‘रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स’ सुरु केलं. या संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रवेश परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. कुणी १०० रुपये फी द्यायचं, कुणी २०० तर कुणी ३०० . आनंद कोणतीही घासाघीस न करता ते पैसे ठेऊन घ्यायचे. हळूहळू दोन विद्यार्थ्यांपासून सुरु झालेल्या या संस्थेमध्ये विद्यार्थीसंख्या वाढू लागली आणि मुलांना बसायला जागा कमी पडू लागली. त्यासाठी मग आनंद यांनी एका मोठ्या हॉलची व्यवस्था केली आणि वर्षाला ५०० रूपये फी निश्चित केली.

‘रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स’ ...एका मोठ्या स्वप्नाचा भरभक्कम आधार

‘रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स’ ...एका मोठ्या स्वप्नाचा भरभक्कम आधार


एकदा आनंद कुमार यांच्या या संस्थेमध्ये बाहेरच्या एका गावातून अभिषेक नावाचा एक मुलगा आला आणि त्यानं त्यांच्याकडे एक विनंती केली. तो म्हणाला, “सर आम्ही खूप गरीब आहोत. ५०० रूपये एकरकमी देणं आम्हाला शक्य होणार नाही. मी थोडे थोडे करून हे पैसे देईन. आमच्या शेतातून जेव्हा माझे वडील बटाट्याचं पीक काढतील आणि ते बटाटे आम्ही विकू, तेव्हा मी पैसे देईन.” पण मग अशा परिस्थितीत तो रहात कुठे असेल, खात काय असेल असे प्रश्न आनंद यांना पडले. विचारल्यावर त्या मुलानं सांगितलं तो एका प्रसिद्ध वकिलाच्या घरी जिन्याखाली रहातो. दोन-तीन दिवसांनी जेव्हा आनंद स्वत: तिथे गेले, तेव्हा खरंच तो मुलगा भर दुपारच्या टळटळीत उन्हात त्या पाय-यांखाली घामानं निथळत बसला होता. त्यांनी त्याच्या हातात पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तो कुठलंतरी गणिताचं पुस्तक वाचतोय. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर आनंद मुळापासून हादरुन गेले.

घरी येऊन आनंद कुमार यांनी आपली आई आणि भावाला त्या मुलाची हकीगत सांगितली. त्यांनी सांगितलं की अशा मुलांसाठी आपल्याला काहीतरी करायला हवं. या मुलांमध्ये शिकण्याची जिद्द आहे, पण त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिकता येत नाही. आनंद कुमार यांच्या मातोश्रींनीही त्यांच्या या कल्पनेला पाठिंबा दर्शवला. पण मग वर्षाला अशा तीस मुलांना जरी शिकवायचं म्हटलं, तरी मग त्यांच्या रहाण्या-खाण्याचा प्रश्न उभा रहातो. मग आनंद यांनी एक घरच खरेदी करण्याचा विचार केला. या मुलांना जेवण देण्याची जबाबदारी आनंद यांच्या मातोश्रींनी घेतली. आणि अशा प्रकारे आनंद कुमार यांचं ‘सुपर 30’ संस्था सुरु करण्याचं स्वप्नं साकार झालं.

२००२ साली आनंद कुमार यांनी ‘सुपर 30’ची सुरुवात केली आणि तीस मुलांना मोफत आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शन देणं सुरु केलं. पहिल्याच वर्षी, म्हणजेच २००३ साली आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत ‘सुपर ३० ’च्या ३० विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर दुस-या वर्षी २००४ मध्ये २२ , तर २००५ मध्ये २६ विद्यार्थ्यांनी आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्याची करामत करुन दाखवली. आनंद कुमार यांच्या प्रयत्नांना आता फळ मिळू लागलं होतं. २००८ मध्ये तर ‘सुपर ३० ’चा निकाल १०० टक्के लागला.

‘सुपर ३० ’ला मिळणा-या मोठ्या यशामुळे स्थानिक कोचिंग माफिया अर्थात प्रस्थापित क्लासचे मालक चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी आनंद कुमार यांच्यावर मोफत न शिकवण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. त्यांच्या या दबावाला आनंद बळी पडले नाहीत, तर त्यांच्यावर हल्ले केले गेले, बॉम्ब फेकले गेले, बंदुकीच्या गोळ्या झाडल्या गेल्या. एकदा तर आनंद यांच्यावर चाकूने हल्लाही करण्यात आला. पण तेवढ्यात मध्ये आनंद यांचा एक विद्यार्थी आला आणि चाकू त्याला लागला. तीन महिने तो रुग्णालयात राहिला. या दिवसांमध्ये इतर विद्यार्थ्यांनी त्याची मनापासून सेवा केली आणि तो अगदी ठणठणीत बरा झाला.

माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासमवेत आनंद कुमार

माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासमवेत आनंद कुमार


आनंद कुमार यांच्या ‘सुपर ३० ’ला मिळालेल्या यशानंतर अनेक स्वयंस्फूर्त लोकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. मोठमोठ्या उद्योगपतींनी आनंद कुमार यांना आर्थिक मदतही देऊ केली. चक्क तत्कालीन पंतप्रधानांकडूनही आनंद यांना मदत देऊ केली गेली. मात्र आनंद कुमार यांनी कुणाकडूनही आर्थिक मदत स्वीकारली नाही. कारण हे काम त्यांना स्वत:ला कोणाच्याही आर्थिक मदतीशिवाय करायच होतं. ‘सुपर ३० ’चा संपूर्ण खर्च त्यांच्या ‘रामानुजम स्टडी सेंटर’च्या मिळकतीवर चालतो.

आज आनंद कुमार यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून स्थानिक विद्यार्थी आणि मान्यवरांना संबोधित करण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रणं येतात. त्यांच्या ‘सुपर ३० ’च्या चर्चा फक्त देशातच नाही तर विदेशातही होऊ लागल्या आहेत. अनेक परदेशी विद्वान मंडळी त्यांची ही अजब ‘सुपर ३० ’ संस्था पहायला येतात आणि त्यांची कामाची पद्धत समजून घेण्याचा प्रयत्न करतात.

आनंद म्हणतात की त्यांना जे काही यश मिळालंय त्याचं संपूर्ण श्रेय हे त्यांच्या विद्यार्थ्यांचं आहे. विद्यार्थ्यांची मेहनत आणि दृढ विश्वासाचं आहे. शिकण्याच्या जिद्दीचं आहे. पण आयआयटीमध्ये दरवर्षी पास होणारे त्यांचे सर्वच विद्यार्थी त्यांच्या यशाचं श्रेय अगदी छातीठोकपणे त्यांच्या या अजब अवलिया गुरुला देतात. ‘सुपर३० ’ आनंद कुमार यांच्यासारखे गुरु आणि त्यांच्या मेहनती शिष्यांनी मिळून साकार केलंय. त्यांच्या याच अतुलनीय कामगिरीचा अनेक पुरस्कारांनी सन्मानही करण्यात आलाय. आनंद यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर , “यशस्वी होण्यासाठी मनापासून प्रयत्न, सकारात्मक विचार, कठोर मेहनत आणि प्रचंड धैर्याची गरज असते.”

२००३ ते २०१४ पर्यंत, ‘सुपर ३० ’चे एकूण ३६० विद्यार्थी आयआयटीच्या प्रवेश परीक्षेला बसले. त्यापैकी तब्बल ३०८ विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली. हे आकडे, यशाचं हे प्रमाण कोणत्याही प्रशिक्षण वर्गासाठी अर्थात कोचिंग क्लाससाठी एक आदर्शच आहे. आजपर्यंत आनंद कुमार यांनी कित्येक विद्यार्थ्यांची स्वप्नं साकार केली आहेत. पण त्यांचं स्वत:चं स्वप्न आहे की अशी एक शाळा सुरु करावी, जिच्यामध्ये सहावीपासूनच मुलांना गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचं शिक्षण दिलं जावं. त्यांची जिद्द आणि कठोर मेहनत पहाता, आनंद हे स्वप्नही लवकरच पूर्ण करतील यात अजिबात शंका नाही. कारण आनंद जी गोष्ट ठरवतात, ती पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे...नक्कीच !