अंधाऱ्या गावांना प्रकाशाने उजळून टाकणारे ʻसौर सैनिकʼ कनिका खन्ना यांचा ʻसंकल्पʼ
जुनी पुराणी साडी परिधान केलेली एक वृद्ध महिला एका मातीच्या झोपड्यात बसली आहे. डोक्यावर खोलवर पडलेल्या आठ्या आणि डोळ्यात निराशा, अशा परिस्थितीत आपले डोके वर करुन ती छतावर तारेच्या सहाय्याने लोंबकळणाऱ्या बल्बकडे पाहते. आपल्या संपूर्ण आयुष्यात तिने हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच त्या बल्बला प्रकाश देताना पाहिले आहे. तो बल्ब तिच्या झोपडीत किंवा आयुष्यात प्रकाश पसरवेल, याची तिला आशा नाही. मात्र आपल्या मुलांना किंवा नातवडांना तरी किमान त्या व्यर्थ लटकणाऱ्या वस्तूचा उपयोग व्हावा, याची ती मनोमन प्रार्थना करते. हे कोणत्या चित्रपटातील दृश्य नाही किंवा एखाद्या अविकसित देशाच्या व्यथेवर भाष्य करणाऱ्या कोणत्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे वर्णन नाही. तर ही भारतासारख्या देशातील असंख्य गावांची व्यथा आहे, जेथे आजपर्यंत विद्युतीकरण झालेले नाही किंवा अशा सुविधासंपन्न गावांची परिस्थिती आहे, जेथे विद्युतीकरण तर झाले आहे. मात्र अद्यापही तेथील नागरिक वीज पुरवठ्यापासून वंचित आहेत. सरकारी धोरणांप्रमाणे, जर कोणत्या गावातील १० टक्के घरे वीज तारांनी जोडली आहेत. तर त्यांना वीज पुरवठा होत आहे की नाही, याचा विचार केल्याविनाच त्यांना ʻइलेक्ट्रीफाईडʼ (विद्युतीकरण झालेले) समजण्यात येते.
भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले आणि सर्वात कमी विद्युतीकरण झालेले राज्य म्हणजे उत्तरप्रदेश. त्यातील सुदूर अंचल हे एक गाव आहे. गुलाबगंज आणि त्या गावाची नावे जरी वेगळी असली, तरी गोष्ट मात्र सारखीच आहे. सरकारी माहितीनुसार, सदर गावे पूर्णतः विद्युन्मय जरी असली, तरी तेथे अजून वीजपुरवठा करण्यात आलेला नाही. गेल्या २५ वर्षांपासून गुलाबगंजचे ग्रामस्थ पौर्णिमेच्या रात्री सर्वाधिक प्रकाश पाहतात. विशेष म्हणजे गुलाबगंज येथे अनुसूचित जातीच्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. अर्थात राज्याच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्याचा विशेषाधिकार ज्या नागरिकांना आहे, तेच या योजनांपासून वंचित आहेत, ही परस्पराविरोधी स्थिती आहे. सरकार, राजनेता आणि स्थानिक नेत्यांच्या खोट्या वचनांमुळे निराश झालेले गुलाबगंजचे ग्रामस्थ वीज पुरवठ्याबाबतच्या कोणत्याही प्रस्तावावर विश्वास ठेवत नाहीत. सदर प्रस्ताव खोटे ठरवून ग्रामस्थ सरळ ते नाकारतात.
ʻसंकल्प एनर्जीʼच्या संस्थापक कनिका खन्ना आणि त्यांची टीम वीज पुरवठ्यासंदर्भातील चर्चा करण्यासाठी जेव्हा गुलाबगंज पोहोचल्या, तेव्हा लोकांनी त्यांनादेखील संशयास्पद नजरेने पाहिले. सुरुवातीला जेव्हा त्यांनी सौरउर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्याबाबत आणि नागरिकांना स्वावलंबी बनविण्याबाबत चर्चा केली, तेव्हा लोकांनी त्यांच्याकडे अविश्वासाच्या नजरेने पाहिले. त्या क्षणी त्यांना काय वाटले असेल, याची फक्त कल्पनाच केलेली बरी. संकल्प एनर्जी सौर उर्जेकरिता तयार केलेला एक उपाय पुरवतात आणि आपण दिलेले उपकरण त्यांना अशा ठिकाणी स्थापन करायचे असते, जेथे त्याची सर्वाधिक गरज आहे. त्यामुळे ज्या गावांचे विद्युतीकरण सौरउर्जेद्वारे केले जाऊ शकते, अशा ग्रामीण भागांचा ते शोध घेत असतात. निवड करण्यासाठी त्यांच्याकडे पर्यायांची कमतरता नव्हती. कारण भारतात एक लाखापेक्षा अधिक गावे अशी आहेत, जेथे अद्यापही विद्युतीकरण झालेले नाही.
वीज पुरवठ्याबाबत गुलाबगंजचा सुरू असलेला लढा संकल्पने आपल्या हाती घेतला. आपल्या सौर सैनिकांच्या मदतीने त्यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. गावाची वीजेची गरज सौर उर्जेद्वारे पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक लोकांकडून पैसे गोळा करण्याची त्यांनी मोहिम सुरू केली. या योजनेचा प्राथमिक खर्च जननिधीतून पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत खर्च फार कमी होता, जो स्थानिकांकडून वीज पुरवठा केल्यानंतर रोख रकमेद्वारे पूर्ण करता येऊ शकत होता. याप्रकारे संपूर्ण गाव वीजपुरवठ्याबाबतीत स्वावलंबी बनू शकणार होते. अधिकतम २ किलोवॅट क्षमतेच्या एका वीजगृहाच्या निर्मितीची त्यांची योजना आहे. ज्यामुळे प्रत्येक घरात किमान दोन दिवे, एक पंखा आणि एक चार्जिंग पॉईंटसाठी वीज उपलब्ध होऊ शकेल. शाळा, दुकाने आणि वीजेची जास्तीत जास्त गरज असलेल्या सर्वांसाठी ते वीज उपलब्ध करुन देणार आहेत. गावातील एक व्यक्ती वीज मीटरची देखरेख, शुल्क आकारणी तसेच सौर उर्जा वीजगृहाच्या देखभालीचे काम पाहणार आहे. आपल्या अंदाजापेक्षा अधिक आव्हाने समोर आल्याने कनिका काही काळासाठी संभ्रमित झाल्या होत्या. कनिका सांगतात की, ʻसुरुवातीला लोक आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते. त्यांना या अभियानाबाबत समजावण्यात, त्याबाबत होकार मिळवण्यात आणि ग्रामपंचायतीकडून परवानगी मिळवण्यात बराच कालावधी लोटला. लोकसहभाग आणि सार्वजनिक कार्याकरिता स्थानिकांकडून देणगी गोळा करणे, हा शहरी भारताकरितादेखील एक नवा विचार आहे. गुलाबगंजच्या ग्रामस्थांना या योजनेसाठी आपले पैसे देण्यास राजी करणे, जवळपास अशक्य होते.ʼ ग्रामपंचायतीच्या परवानगीने आणि ९३ टक्के घरांना या योजनेकरिता तयार केल्यानंतर अभियानात येणारी जवळपास सर्वच आव्हाने संपुष्टात आली. सौर सैनिक आता निम्नस्तरावर मीटर लावणे, सक्षम मायक्रो ग्रिड तयार करणे तसेच उत्पादन आणि वितरण व्यवस्थेला वीजचोरीपासून पूर्णतः सुरक्षित करण्याचे काम करत आहेत. प्राथमिक भांडवल गुंतवणुकीच्या २० टक्के म्हणजेच २५०० अमेरिकन डॉलर्सची व्यवस्था करण्यात यशस्वी झाल्याने आणि आपल्या या प्रयत्नांबाबत जनसामान्यांमधुन मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे या पाच सदस्यीय संघाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. जर तुम्हालादेखील कोणाचे तरी जीवन प्रकाशाने उजळून टाकायचे असेल, तर पुढाकार घ्या आणि सौर सेनेशी जोडले जा.