वाशी गावातील ‘खेकड्याच्या मावशी’ गुणाबाई सुतार
आपल्या पारंपारिक खेकड्याच्या व्यवसायाला जपत याच व्यवसायाला परदेशात पोहचवून नवी मुंबईचे नाव आंतरराष्टीय पातळीवर नेणार्या वाशी गावातील खेकड्याच्या मावशी म्हणजेच गुणाबाई नामदेव सुतार यांना यंदाच्या वर्षीच्या ठाण्यातील आगरी महोत्सवात ‘आगरी गौरव पुरस्कार २०१५’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नवी मुंबईच्या छोट्याश्या खाडी किनाार्यावर एका महिलेने घाम गाळून चक्क खेकडे परदेशी निर्यात करण्यास सुरवात केली. गुणाबाई नामदेव सुतार असे त्यांचे नाव आहे. त्यांचे वय आहे अवघे ६०. मासे घेतल्यानंतर मासळी बाजारात त्या मासे घेऊन येतात. रात्री १० वाजता घरी परत जातात. १७ तास त्या आपल्या व्यसायानिमित्त घराच्या बाहेर असतात. सकाळी घर सोडताना घरातील सर्व कामे उरकून यायचे. रात्री घरी गेल्यावर पुन्हा स्वयंपाक करायचा. घरात सर्व माणसांची काळजी घेणे, असाच काय तो त्यांचा दिनक्रम...वयाच्या ६० पर्यत पोहचलेल्या गुणाबाई सुतार यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार पहिले. या व्यवसायात नुकसानही सहन करावे लागले. मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही आणि आपला खेकडी मासे विकण्याचा व्यवसाय सुरूच ठेवला. पूर्वी गुणाबाईंच्या घराजवळ कालवा होता. मासेमारी करून त्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असत. मात्र, नागरीकरणाच्या लाटेत हा कालवा बुजविण्यात आला. मासेमारी बंद झाली, पण गुणाबाई मोठ्या हिंमतीच्या होत्या. त्या पदर बांधून कामाला लागल्या. त्यासाठी त्या स्वतः खाडी किनार्यावर जाऊन खेकडे पकडून आणत. मात्र मागणी वाढू लागल्या नंतर त्यांनी इतर महिलांकडून खेकडी विकत घ्यायला सुरुवात केली आणि आपला व्यवसाय वाढविला. सुरुवातीला काही हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्याकडून खेकडी व मासे नियमितपणे घेण्यास सुरुवात केली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी मग त्या इतरांकडून मासे व खेकडी घेऊन हॉटेल व्यवसायिकांना पुरवठा करू लागल्या. याचदरम्यान चेन्नई मधील हॉटेल व्यवसायिकांनी त्यांच्याकडे खेकडी पुरवण्याची मागणी केली. त्यानंतर मग सुरु झाला त्यांचा खेकडे विकण्याचा मोठा व्यवसाय...५ वर्षा पूर्वी नवी मुंबईच्या खाडी किनार्यावर मिळणारी ही खेकडी गुणाबाई सुतार यांच्या कौशल्यामुळे थेट चेन्नईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोहचली. विशेष म्हणजे त्यांचे कोणतेही शालेय शिक्षण झालेले नसूनही आपला व्यवसाय वाढवून परिसरातील इतर महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या खेकडण्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी मग त्यांनी इतर लहान सहान खेकडे विकणार्यांकडून खेकडे विकत घेऊन मोठ्या हॉटेलची मागणी पूर्ण करण्यास सुरवात केली. त्यामुळे इतर मासेमारांनाही व्यवसाय मिळू लागला. त्यांच्या या मागणीने मग सिंगापूरमधून ही मागणी येण्यास सुरवात झाली आणि त्यांनी मोठी झेप घेतली. हे करत असताना त्यांचा मुलगा सुभाष आणि सून अरुणा यांची मोठ्या प्रमाणात मदत मिळाली. त्यातून आता या व्यवसायाला त्यांनी एका उद्योगात रुपांतरीत केले आहे. यशाच्या या उंच डोंगरावर पोहचताना व्यवसाय करण्यासाठी गुणाबाई सुतार यांनी शासकीय परवानग्या घेण्यासाठी अनेक सरकारी पायर्या झिजविल्या. पण त्या डगमगल्या नाही आणि आपला व्यवसाय त्यांनी सुरु ठेवला. पहिली पर्यंत शिक्षण झाले असून सुद्धा निर्यातीशी संबंधीत कायदेशीर बाबी त्या स्वतः पूर्ण करतात.
आगरी विकास सामाजिक संस्थेच्या वतीने आगरी महोत्सव दरवर्षी भरवला जातो. समाजाशी संबंधित व्यवसायाला जपून त्याला वाढवून त्यांनी इतरांनाही खेकड्या आणि माशांच्या विक्रीतून रोजगार मिळवून दिला आहे. त्यांच्या मेहनतीला जिद्दीला सलाम करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. गुणाबाई सुतार यांना प्राप्त झालेल्या पुरस्कारामुळे नवी मुंबईच्या मानाच्या तुरा आणखी उंचावला आहे.