मानवी संवेदना जागवणाऱ्या सिनेमांची आज खरी गरज आहे -अभिनेता डॉ.अमोल कोल्हे
मराठी सिनेमामध्ये नवनवे प्रयोग होतायत नवनवीन विषय मांडले जातायत यात नातेसंबंध, कौटुंबिक तसेच सामाजिक विषयांचा समावेश होतोय. अशाच सामाजिक आणि प्रांतिक समस्येवर प्रकाश टाकणारा मराठी टायगर्स हा सिनेमा येत्या फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होतोय. सीमाप्रश्नावर आधारित या सिनेमाचा विषय पहाता सध्या या सिनेमाला बेळगांवमध्ये कानडी संघटनांकडून कडाडून विरोध होतोय. अभिनेता डॉ.अमोल कोल्हे याची या सिनेमात महत्वाची भूमिका आहे.
अमोलच्या मते मराठी सिनेमा अधिक वास्तवदर्शी बनतोय हे खरंय. पण अजूनही मराठी सिनेमात असे अनेक विषय येणं बाकी आहे ज्याचा संबंध महाराष्ट्र आणि यातल्या विविध चळवळींशी आहे. मग तो सीमाप्रश्न असू दे किंवा भाषिक चळवळ. कारण या चळवळी वाटताना जरी राजकीय मुद्दा वाटत असला तरी त्याचा संबंध हा तिथल्या प्रत्येक माणूस आणि त्याच्या रोजच्या आयुष्याशी आहे ही बाब नाकारुन चालणार नाही. मानवी संवेदना या फक्त कुटुंब, नातेसंबंध याच बाबींशी निगडीत नाहीये तर आपण जिथे रहातो तिथे आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य, भयमुक्त वातावरण आणि समान हक्क मिळणंही गरजेचं आहे. म्हणूनच सिनेमा. कारण सिनेमा हे जसं मनोरंजनाचं माध्यम आहे तसंच प्रबोधनाचं आणि जनजागृतीचंही.
मी असं म्हणत नाही की या विषयांवर सिनेमा बनतच नाहीयेत पण बनले तरी ते लोकांपर्यंत पोहचतायत का लोकांपर्यंत पोहचले तरी ते त्यांना भावतायत का पटतायत का हे महत्वाचंय. अनेकदा असे सिनेमे बनतात आणि कुठल्या ना कुठल्या वादात अडकतात किंवा ते प्रदर्शित झाले तरी त्यांना प्रेक्षकांचा पुरेपुर प्रतिसाद मिळतोच असे नाही. मराठी टायगर्स हा सिनेमा एका ज्वलंत विषयाला प्रकाशझोतात आणतो अर्थात हा विषय मांडताना यात सिनेमॅटीक लिबर्टी येतेच. त्यामुळेच या सिनेमात लव्हस्टोरी आहेत गाणी आहेत. पण यातनं सिनेमाच्या मूळ विषयाला धक्का लागत नाही.
एक अभिनेता म्हणून अमोलने आत्तापर्यंत ज्या ज्या कलाकृती साकारल्या त्या वास्तववादी आणि सामाजिक विषयांना मांडणाऱ्या आहेत. म्हणजे मग अमोलची भूमिका असलेले अरे आवाज कुणाचा, रणभुमी, रमा माधव, राजा शिवछत्रपती, राजमाता जिजाऊ सारखे सिनेमे असू दे किंवा भगवा, सत्ताधीश, शिवपुत्र संभाजीराजे सारखी नाटकं असू देत. आपल्या भूमिकेतून आणि कलाकृतीमधून अमोल नेहमीच सामाजिक जाणिवा जपत आलाय.
अमोल सांगतो, जेव्हा मराठी टायगर्स या सिनेमाबद्दल मला विचारले गेले मी लगेच होकार कळवला. कारण बेळगावमध्ये सीमाप्रश्नाच्या या वादामुळे माझ्या एका चर्चित नाटकाचा शो मला मोकळ्या मैदानात करता आला नव्हता, एक कलाकार म्हणून त्यावेळी मला वाईट वाटलेच पण या देशाचा एक नागरिक म्हणून मी अधिक दुखावलो होतो. माझ्या भाषेमुळे जर राज्यातल्या एका भागात माझ्यावर मर्यादा येत असतील तर मी कसं सहन करावं. याबद्दल जर मला आवाज उठवायचा असेल तर कलाकार म्हणून माझ्याकडे खूप सक्षम असं माध्यम आहे आणि हे माध्यम म्हणजेच हा सिनेमा.
अमोलला या गोष्टीची खंत आहे की त्याचा हा अनुभव त्याला मराठी टायगर्स या सिनेमात समाविष्ट करता आला नाही. मात्र तरीही तो आवर्जुन सांगतो की मराठी टायगर्स सारख्या सिनेमांची आज खऱी आवश्यकता आहे.
मराठी टायगर्स या सिनेमाच्या प्रदर्शनाला बेळगावमध्ये विरोध होतोय हे खरं असलं तरी यावरचा तोडगा काय याबद्दल कोणीच बोलत नाही. म्हणजे एरवी एका कुटुंबासारखं वावरणारं मराठी मनोरंजन क्षेत्र काही मुद्दयांबद्दल मात्र अलिप्तच रहाताना दिसतं. अमोल मात्र त्याच्या या नव्या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे, बेळगांवमध्ये होणारी मराठी लोकांची मुस्कटदाबी समोर आलीच पाहिजे असं त्याचं म्हणणंय. कलाकार म्हणून तो या मुद्द्याला उचलूनही धरतोय.