संपादने
Marathi

१७ वर्षीय दिया शाहचा खामगाव गावकऱ्यांना इंग्रजीचा परिसस्पर्श

Team YS Marathi
10th Jan 2016
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

महानगरांमधले किशोरवयीन बऱ्याचदा सगळ्या सुखसोयींनीयुक्त वातावरणात वाढत असल्याने त्यांना सर्व आरामदायी गोष्टींची सवय होते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नवीन स्थळ पाहणं, मुलांकरता असणाऱ्या शिबीरांमध्ये जाणं किंवा एखादा अभ्यासाशी संबंधित क्लास लावणं असंच काहीतरी शहरातली मुली-मुलं करत असतात. पण १७ वर्षांच्या उत्साही आणि धाडसी दिया शाहने सुट्टीमध्ये काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. दिया बी डी सोमानी इंटरनॅशनल शाळेची विद्यार्थिनी आहे.

आयसीएसई बोर्डाच्या परिक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत तिनं रायगडमधल्या खामगाव गावात गावकऱ्यांना इंग्रजी व्याकरणाचं प्राथमिक शिक्षण द्यायचं ठरवलं. सुरूवातीला तिला गावात एकटी पाठवायला तिच्या पालकांनी तीव्र नापसंती दाखवली. पण नंतर गावकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याच्या दियाच्या प्रेरणेला ते विरोध नाही करु शकले.

image


झरिना स्क्रूवाला यांच्या स्वदेस या स्वयंसेवी संस्थेकरता दिया काम करते. सुरूवातीला तिथं प्रशिक्षणार्थी म्हणून ती बचत गटांची माहिती संकलित करायचं काम करायची. ग्रामीण भागाच्या विकासासाठी काहीतरी करायचं अशी दियाची आकांक्षा आहे.

दिया म्हणते, “आपण अतिशय उथळ जगात वावरत असतो. पैसा हेच सर्वस्व मानून नाण्याची पलिकडची बाजू पाहतच नाही. आपल्या झापडांच्या पलिकडे सुंदर गाव आहेत”.

दियाच्या मते, संवादांमधली पोकळी भरण्याकरता शिक्षणाला आवश्यक ती गती मिळाली पाहिजे. हसतखेळत इंग्रजी शिकवण्याकरता तिने काही परिणामकारक धडे आणि पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन बनवले.

प्रवासाची सुरूवात

दियाच्या या प्रवासाला जून २०१४ मध्ये सुरूवात झाली. ती गावातच एका कुटुंबाच्या घरी राहू लागली. त्यांच्या रोजच्या कामात त्यांना मदतही करायची. त्यामुळे या कुटुंबाचं आणि दियाचं जिव्हाळ्याचं नात निर्माण झालयं. ती सकाळी लवकर उठून त्यांच्यासोबत चपात्या बनवणं, विहिरीवरून पाणी आणणं आणि घरातली आणखीही कामं करायची.

गावातला अनुभव सांगताना दिया अगदी भरभरून बोलते, “मी गावकऱ्यांशी मराठीत गप्पा मारायचे. त्यामुळे काही दिवसांतच त्यांनी मला आपलंसं केलं. उपलब्ध गोष्टींमध्ये ते अगदी आनंदाने जगतात. गावात अगदी एकोप्याने राहतात. महानगरात राहिल्यामुळे तुमच्यात असलेला मोकळेपणा श्रेष्ठ की त्यांचं प्रेम आणि आपलेपणा? हा प्रश्न आपल्याला सतत पडत राहतो. आनंदी राहण्याकरता पैशांची गरज नसते हे आपल्याला त्यांच्याकडून शिकता येतं”.

इंग्रजी भाषेचं महत्त्व लोकांना समजवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण या नवख्या मुलीनं गावकऱ्यांच्या मनात तिचं स्थान निर्माण केलं. दियाने खामगावमध्ये येण्याचं तिचं ईप्सित गावकऱ्यांना पटवून दिलं आणि त्यांच्या मनात इंग्रजीचं बी रुजवलं.

लवकरच मुलांमध्ये इंग्रजीची गोडी निर्माण होऊन त्यांची भाषा शिकण्याची भूक वाढू लागली. त्यामुळे दिया संध्याकाळीही वर्ग घेऊ लागली. मग वेळ वाढत जाऊन रात्रीपर्यंत वर्ग चालू लागले. मूळाक्षरांची उजळणी, वाचन, व्याकरणाचे नियम समजणे आणि अनेक गोष्टींचे पाठ रात्री असत.

image


गैरसमजुतींचं उच्चाटण

इंग्रजी भाषा बोलता आल्याने किंवा ती येत असेल तर तुम्ही इंग्रजी न येणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ ठरता हा भारतीयांमध्ये न्यूनगंड असतो. या गैरसमजुतीमुळे कित्येक लोक आपला आत्मविश्वास गमावतात. त्यांच्यात न्यूनतेची भावना निर्माण होते.

दिया म्हणते, “ही गैरसमजूत दूर करण्यासाठी, मी अगदी पायाभूत इंग्रजी शिकवायला सुरू केलं. नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, संबोधन हे शिकवू लागले. जेणेकरून त्यांना साधी वाक्य सहजपणे तयार करता येऊ शकतील”.

यासोबतच, स्वदेश आपल्या केंद्रामध्ये महिलांकरता दुपारी शिवणाचा क्लास घेतं. तिथं दिया जाऊ लागली आणि महिलांशी मैत्री केली. हळूहळू तिनं इंग्रजी शिकण्याकरता महिलांचं मन वळवलं. एका आठवड्यात ३० पेक्षा अधिक महिला तिच्या वर्गात येऊ लागल्या.

मग दियाने तीन बॅचेस बनवल्या. तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांकरता सकाळची बॅच, दुपारी केवळ महिलांकरता आणि संध्याकाळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता अशा प्रकारे बॅचेस सुरू झाल्या.

दिया सांगते, स्वदेशने रायगडमधल्या ३० गावांतल्या आंगणवाड्यांमध्ये लहान मुलांकरता शैक्षणिक खेळांचं सामान वितरीत केलयं. या खेळण्यांचा वापर कसा करावा आणि मुलांना या खेळण्यांच्या साहय्याने कसं शिकवावं याबाबत दियाने शिक्षिकांना प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. १२-१५ गावांमधील किमान २५-३० शाळांमध्ये तिनं या खेळण्यांचं प्रशिक्षण दिलं.

निरोप घ्यायची वेळ

तिच्या खामगाव मुक्कामाच्या शेवटच्या दिवशी गावकऱ्यांनी तिच्यासाठी एका निरोप समारंभाचं आयोजन केलं. अख्खं गाव या कार्यक्रमामध्ये सामील झालं. यावेळी दियाने त्यांच्या आयुष्यावर, विचारांवर कसा परिणाम केला हे गावकऱ्यांनी आपल्या मोडक्या तोडक्या इंग्रजीमध्ये व्यक्त केलं. खामगावमधल्या आपल्या सात आठवड्यांच्या अल्प वास्तव्यात तिला प्रेमाची परिभाषा, कुटुंबाची बांधिलकी तर लाभलीच आणि मानवतेशिवाय दुसरं काही श्रेष्ठ नसल्याची अनुभूती झाली.

दिया अगदी विस्ताराने सांगते, “आपल्या स्वप्नांना आणि दृष्टीला बळकट पंख देण्याकरता तुम्ही लहान गाव, तालुक्यात की मोठ्या शहरात राहता हे महत्त्वाचं नाही. तुम्ही लहानशा खेड्यात राहूनही आपलं ध्येय साध्य करू शकता. आज, मी आपल्या खेड्यांकडे दयेच्या नजरेने पाहत नाही. आशा, परिवर्तन आणि सक्षमीकरणाचं साधन म्हणून पाहते”.

दिया छान प्रेरणादायी ओळींनी निरोप घेते-

‘एखादं स्थळ हे तिथल्या लोकांच्या चांगुलपणामुळे चांगलं बनतं’

‘स्व ने बनलेला देश-

माझा देश; तुमचा देश; आपल्या सर्वांचा देश’.


लेखिका- अपराजिता चौधरी

अनुवाद – साधना तिप्पनाकजे

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags