दृष्टिहीन मित्राने केलं आकशवाणीच्या बातमीपत्राचं वाचन, धनराज पाटील यांनी घडवला इतिहास
४ जानेवारी २०१६ आकाशवाणीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा ठरला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऐकलं जाणारं आकशवाणी पुणे केंद्राचं सकाळी ७ वाजून १० मिनिटांच्या बातमीपत्राचा काही भाग सोमवारी चक्क एका दृष्टिहीन वृत्त निवेदकाने वाचला. आकाशवाणी वरील मराठी बातमी पत्राच्या इतिहासात हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला. लुई ब्रेल यांच्या जयंती निमित्त हा प्रयोग करण्यात आला. पुणे ब्लाईड मेन्स असोसिएशनच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आला. दृष्टिहीन मित्र धनराज पाटील यांनी बातमीपत्र वाचलं. यासाठी हे बातमीपत्र ब्रेल लिपी मध्ये टाईप करण्यात आलं होतं. दृष्टिहीन मित्राचं आयुष्य सुकर व्हावं या यासाठी फ्रेंच शास्त्रज्ञ लुई ब्रेल यांनी संशोधन करून ब्रेल लिपीचा शोध लावला. लुई ब्रेल हे अंधांचा ज्ञान चक्षु झाले. लुई ब्रेल हे स्वतः अंध होते. त्यांनी आठ वर्ष संशोधन करून ६ बिंदूंवर आधारित ब्रेल लिपीचा शोध लावला.
श्राव्य माध्यम हे दृष्टिहीन मित्रांच्या अगदी जवळचे आहे, आणि लुई ब्रेल यांच्या जयंती निमित्त अंध मित्राने पुणे आकाशवाणी वरून बातमीपत्राचं वाचन करावं असा प्रस्ताव पुणे ब्लाईन्ड मेन्स असोसिएशन च्या वतीने पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाकडे आला होता. या प्रस्तावाला आकाशवाणी वृत्त विभागाच्या मुख्यालयाने परवानगी दिल्यावर हा उपक्रम राबवण्याचं निश्चित करण्यात आलं.
पण एखाद्या अंध व्यक्ती कडून बातमीपत्र वाचून घेणं हे काही सोपं नव्हतं डोळस माणसाला थेट प्रसारणात बातमीपत्र वाचायचं असेल तर आधी काही महिने वाचनाचा सराव करावा लागतो. मग अंध मित्राकडून बातमीपत्र वाचून घेणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं. पुणे आकशवाणीचे वृत्त विभाग प्रमुख नितीन केळकर आणि वृत्त निवेदक मनोज क्षीरसागर यांनी हे आव्हान स्वीकारलं. या अभिनव प्रयोगासाठी योग्य व्यक्ती म्हणजे धनराज पाटील याचं नाव पण ब्लाईड मेन्स असोसिएशनने सुचवलं. यासाठी पाटील यांना वाचनाच्या सरावाची गरज होती.
धनराज पाटील रोज आकाशवाणीच्या संकेतस्थळावरील बातमीपत्र ऐकून, त्या पद्धतीने बातम्या लिहून ती वाचनाचा सराव करत असत. तसंच ही बातमीपत्र रेकॉर्ड करून ती ऐकत असत, आणि ते वाचन वृत्त निवेदका प्रमाणे होत आहे कि नाही याची खात्री करत असत. धनराज पाटील यांना बातम्या वाचणं सोपं जावं यासाठी आकशवाणीच्या बातमी पत्राचा काही भाग ब्रेल लिपी मध्ये तयार करण्यात आला होता. बातमीपत्राचं थेट प्रसारण होण्याआधी सकाळी दोन वेळा वाचनाचा सराव केला. तसंच पाटील यांच्या सोयीसाठी बातमीपत्राचा काही भाग आदल्या दिवशी तयार करून देण्यात आला. पाटील यांनी त्या बातम्या ब्रेल मध्ये रुपांतरीत केल्या. या सरावानंतर धनराज पाटील यांनी सोमवारी आकाशवाणी वरून यशस्वी रित्या बातमीपत्राचं वाचन केलं आणि आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्राच्या क्षेत्रात नवीन इतिहास घडवला. मराठी बातमीपत्र वाचणारे ते पहिले दृष्टिहीन मित्र ठरले.
याधी ४ जानेवारी २०११ मध्ये अहमदाबाद आकशवाणी वरून अंध मित्राने वाचलेलं बातमीपत्र प्रसारित झालं होतं. त्यानंतर पुणे आकशवाणीवरून हा प्रयोग यशस्वी करण्यात आला.
धनराज पाटील हे येरवड्याच्या मध्यवर्ती कारागृहात ब्रेल निर्देशक म्हणून कार्यरत होते. ३० वर्ष सेवा झाल्यानंतर त्यांनी २०११ मध्ये निवृत्ती घेतली. त्यांच्या प्रामाणिक सेवेबद्दल राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि राष्ट्रपती सेवा पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
धनराज पाटील यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तमगाव इथं एका शेतकरी कुटुंबात झाला. वयाच्या ७ वर्षी त्यांना देवी रोगामुळे अंधत्व आले. पण त्या अंधत्वाने खचून न जाता त्यांनी त्याचं शिक्षण पूर्ण केलं. धनराज पाटील सांगतात," अंधश्रद्धेमुळे उपाय न केल्याने मी वयाच्या ७ व्या वर्षी अंध झालो. पण माझ्या लहानपणीच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. मला अजूनही माझ्या आई आणि वडिलांचा चेहरा आठवतो."
पाटील याचं शालेय शिक्षण नाशिक, मुंबई आणि पुण्यात झालं. त्यांनी मुंबई मध्ये डीएड केलं. त्यानंतर पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र या विषयात बी. ए. आणि एम ए. केलं. त्यानंतर ते येरवडा मध्यवर्ती कारागृहात ब्रेल निर्देशक म्हणून रुजू झाले.
धनराज पाटील यांची दृष्टी गेली पण त्यांची दुसरी शक्ती प्राप्त झाली. त्यांना देणगी मिळाली. बातमी पत्र वाचनासाठी त्यांचा आवाज योग्यच आहे. तसंच ते उत्तम गायनही करतात. पाटील यांनी संगीताच्या मध्यमा पर्यंतच्या परीक्षा दिल्या आहेत. तसंच पाटील कविताही करतात.
याच बरोबर धनराज पाटील पुणे दृष्टिहीन मंडळाचं काम गेली २५ वर्ष करत आहेत. अंधजनांना शैक्षणिक, वैद्यकीय तसंच इतर मदत मिळवून देण्यासाठी ते काम करतात. अंधजनांच्या पुनर्वसनासाठी ते काम करतात. ते अंतर्ज्योती द्वैमासिकाचे संपादक आहेत. तसंच त्यांच्या मध्यवर्ती कारागृहातील दीर्घ सेवेमुळे त्यांची कैदी पुनर्वसन समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
धनराज पाटील सांगतात," अंध मित्रांसाठी सगळी क्षेत्र खुली आहेत. सगळ्या क्षेत्रात व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. फक्त अंधजनांनी ब्रेलकडे दुर्लक्ष करू नये. ब्रेलचा सराव त्यांनी करावा, म्हणजे सगळ्या क्षेत्रात व्यवसायाच्या संधी त्यांना उपलब्ध होतील."