उत्तरप्रदेशातील दोन प्रसिध्द शहरे वाराणसी पासून६१ किमी आणि अलाहाबादपासून ९०किमीवर असलेल्या भदोही जवळचे छोटे गाव भिकारीपूर मध्ये एक मुलगा आपल्या मित्रांसोबत खोड्या करण्यासाठी प्रसिध्द होता. घर ते महाविद्यालय अश्या पंधरा किमी परिसरात मित्रांसोबत सायकलवरून फिरणे, फुकट सिनेमे पाहणे आणि पार्किंगचे पैसे न देणे, पैसे न देताच समोसे, जिलेबी मिळवणे, हे सारे करताना दोन-तीन वर्षात तो २६५ सिनेमे पाहतो, आणि घरी जाऊन या सिनेमामधील सा-या पटकथा, गीत , संवाद आणि सिनेमाशी संबंधित सारी माहिती लिहून ठेवतो. त्या १८-२० वर्षांच्या नव तरूण अखिलेशकुमार मिश्र याला हे माहितीच नव्हते की, या सा-यातून एक दिवस तो यशस्वी मालिका लेखक होईल. ही गोष्ट डॉ बोधीसत्व यांची आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक मालिका गाजल्या आहेत. असे असूनही एका मुक्तलेखका समोर असलेल्या आव्हांनांचा सामना ते रोज करतात. डॉ बोधीसत्व यांनी आपल्या लहानपणी हे नक्कीच विचार केले होते की, त्यांना लोकप्रिय व्हायचे आहे, पण टेलिव्हिजन, सिनेमाच्या लेखनातून प्रसिध्दी मिळेल हे त्यांना माहिती नव्हते. त्यांनी आम्रपाली, १८५७ क्रांती, शकुंतला, रेत, जय हनुमान,कहानी हमारे महाभारत की, देवो के देव महादेव सारख्या मालिका आणि शिखर सारख्या सिनेमाचे लेखन केले. अखिलेश मिश्र ऊर्फ बोधिसत्व लहानपणी खूप भटके आणि खोडकर स्वभावाचे होते. जरी त्यांच्या घरात शिक्षण पहिल्यापासूनच होते तरी त्यांचे मन शाळेत शिकण्यात कमी आणि इकडे-तिकडे भटकण्यात जास्त लागत असे. असे नाही की त्यांना शिकण्यात रस नव्हता, पण ते त्या पुस्तकांकडे जास्त आकर्षित होते जी कपाटात होती आणि मोठे लोक वाचत असत. याच पुस्तकांना आणि वर्तमान- नियतकालिकांना वाचता वाचता त्यांना त्यात छापण्याची इच्छा झाली. ते सांगतात, “ माझी सर्वात मोठी इच्छा होती की माझे नाव छापलेले पहावे. अगदी ते मृताच्या उठावन्यात भाग घेणा-या व्यक्तींमध्ये का असेना, लोकांनी मला ओळखावे. साहित्यात मानतात की प्रसिध्दीची इच्छा मनात असावी. त्यातूनच पुढे वाचण्याचे मार्ग मिळतात. चौथी पाचवीत मी निर्मला वाचली, मग रामचरित मानस, रामायण, भागवत, अशी पुस्तके घरात उपलब्ध होती. आम्ही मुले त्यात नकली चौपाई बनवून अंताक्षरीमध्ये इतर मुलांना हरवत असू. आम्ही जिकंत होतो पण कसे ते आमचे आम्हाला माहिती”.
डॉ बोधिसत्व यांना त्यांच्या शाळेतील शिक्षकांनी प्रेरणा दिली त्या बाबत ते सांगतात की, “ शाळेत लक्ष्मीप्रसाद उपाध्याय इंग्रजी शिकवत.पण त्याशिवाय बरेच काही शिकवत होते. ते निपुत्रिक होते. आमच्याकडे याचा अर्थ केवळ मुली असणे मुलगा नसणे असा होता. ते प्रत्येक शनिवारी एक सांस्कृतिक आयोजन करत असत त्यात प्रत्येकजण एक कविता सांगता असे. मी सुध्दा कविता ऐकविली त्यावेळी त्यानी कौतुक केले. ‘आज’ आणि ‘ओज’ या नियतकालिकांत त्यांच्या काही कविता प्रसिध्द होत. माझ्या काकांची मुलेही शायरी करत. त्यामुळेच मी सिनेमांसाठी असंख्य गाणी लिहिली. गावात उर्दुचे चांगले वातावरण असे. कसम आणि तलाक हे शब्द जास्त प्रचलित होते. तलाक ने आम्ही मैत्री तोडत होतो आणि प्रत्येक गोष्टीत अल्लाहची कसम खात होतो. पुस्तके वाचणे, कविता करणे या शिवाय शालेय शिक्षणात त्यांना स्वारस्य नसल्याने इंटर आणि पदवी पर्यत ते कसेबसे शिकले. महाविद्यालयात केलेल्या खोड्यांबद्दल सांगताना ते म्हणतात की, “ ही गोष्ट १९८४च्या आसपासची आहे. शिक्षणाचे वातावरण नव्हते. १२-१५जण १०-१५किमी सायकल चालवत शिकायला जात होते. चार-पाच किमी परिसरात चारपाच सिनेमाघरे होती. महाविद्यालयात हजेरी झाली की सिनेमाघरात जाणे फुकट सिनेमा पाहणे, फुकट सायकल पार्क करणे, बाहेर निघताना दुकानातून एक समोसा दोन जिलब्या पळवणे, हे आमचे रोजचे काम झाले होते. दोन वर्षात मी२६५ सिनेमे पाहिले. जेंव्हा नविन सिनेमा नसे तेंव्हा जुने पाहत असू. नदिया के पार मी पाच वेळा पाहीला. मी केवळ सिनेमा पाहत नव्हतो तर त्याची पूर्ण माहिती मिळवत होतो. वहीच्या एका बाजुला सिनेमांची सारी माहिती, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, गीत लेखक पटकथा सर्वाकाही लिहून ठेवले असे. दहावी पर्यंत स्थिती काही प्रमाणात ठीक होती. पण बारावीत तिस-या वर्गात उत्तीर्ण झालो. पदवीच्या वेळी देखील हिच स्थिती. कॅम्पसमध्ये जायचे नाही, शिक्षकांशी वाद, शिकायचे नाही म्हणून निघून जाणे, अलाहबादमध्ये फिरत राहणे. असे नाही की शिकायचे नव्हते, वर्गात जर त्या दिवशी बिहारी किंवा तुलसी शिकवणार असतील तर मी बसत नसे, कारणे हे मी आधीच शिकले होते. आधी एकजण बाहेर पडत असे मग पाच- सहा त्याच्या मागे निघत असत. असे मी कधीही मित्रांशिवाय राहात नसे. भदोहीतून अलाहाबादमध्ये आल्यावर हेच सुरू होते. हिवाळ्यात रात्रभर सायकलिंग करणे, उन्हाळ्यात चेह-यावर रुमाल बांधून फिरणे, कुणी आडवत नव्हते. असे नाही की फक्त खोड्याच करत होतो. जेंव्हा शिकण्यात लक्ष दिले एम ए मध्ये वरच्या वर्गात उत्तिर्ण झालो आणि जेआरएफची शिष्यवृत्ती मिळवून पीएचडी केली.
रामायण- महाभारताची पारायणे झाली होती. त्याच काळात त्यांची भेट त्या काळातील प्रसिध्द कवि उपेंद्रनाथ अश्क यांच्याशी झाली त्याबद्दल ते सांगतात की, “ वृत्तपत्रात उपेंद्रनाथ अश्क यांची मुलाखत होती, त्यात त्यांनी म्हटले होते की, नव्या प्रतिभेला वाव देऊ. वर्तमान पत्रात अण्णा हजारे यांच्यासारख्या कुणाचे छायाचित्र प्रसिध्द झाले होते. मला वाटले की हा देवदूत मला पाठबळ देईल. मी त्यांच्यासारखा कुडता-पायजमा टोपी परिधान केली आणि खुसरोबागला पोहोचलो. मी तिथे जाऊन त्यांचा पत्ता विचारला तेंव्हा ऐकाने जे सांगितले ते आश्चर्यकारक होते. त्याने सांगितले की, ‘ त्या वेड्याचे घर तर त्या भिंती पलिकडे आहे,’ मे जूनचे ऊन होते. त्यानी मला पाहिले आणि सांगितले की राग सोडला तर अश्क भेटतील. क्रोध पापाचा चेहरा आहे असे सांगत सुरईतून पाणी पाजले. माझ्या आठ दहा कविता ऐकल्या एक कविता निवडली आणि म्हणाले यावर काम करा, मला वाटले काम म्हणजे चांगली लिहा आणि ती पुन्हा चांगल्या अक्षरात लिहिली. त्यांनी पुन्हा यावर काम करा सांगितले. मग त्यांनी स्वत:च तीला सुधारले. मला अभिमान वाटला की त्यांनी माझ्या कवितेला शिर्षक दिले. ते पान आजही माझ्याजवळ आहे. ‘...अपने आप बोल उठता हूँ जैसे, बोल उठता है हवा में उडता सूखा पत्ता’ तीन वर्ष मी त्यांच्या संपर्कात होतो. मग त्यांनी चार शिक्षकांची नावे दिली. त्यानंतर दुधनाथसिंग यांच्या संपर्कात राहिलो. दुधनाथजींनी दहा कवित्या निवडल्या आणि तश्याच मी ७०-८० लिहिल्या. ते म्हणाले की जो विषय एकदा लिहिला तो पुन्हा लिहू नको. त्या कवितांपैकी ४० त्यांनी आलोचना नियतकालिकात पाठवल्या. १४ नामवरजी यांनी छापल्या. ५ मंगेश डबराल यांना दिल्या ज्या त्यांनी जनसत्ता मध्ये प्रसिध्द केल्या. त्यांनी सोमदत्त यांना दिेलेल्या बाकीच्या कविता ‘स्वतंत्र भारत आणि चौथी दुनिया मध्ये प्रसिध्द झाल्या. तीन महिन्यात ४५ कविता छापल्या. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. कविता वाचून अनेकांना वाटले की कुणी म्हातारा असेल जो बोधिस्तव नावाने लिहितो.
अखिलेश मिश्र ने डॉ बोधिसत्व होणे ही सुध्दा खूप मनोवेधक गोष्ट होती. ते म्हणाले की कुणी लेखक तद्भव नावाचे नियत कालिक काढत होते. त्यांचे नावही अखिलेश होते माझ्या कविता वाचून लोक त्यांची तारिफ करु लागले तर काहींनी त्यांना कथाकार समजले. त्यांच्या म्हण ण्यानुसारच अखिलेश कुमार यांनी नव्या नावाचा विचार सुरू केला. मग शिल्परत्न, शालीहोत्री धुसर, सिध्दार्थ, गौतम बुध्द सहीत वज्रपान अशी दहा निश्चित केली. शेवटी गौतम बुध्द नाव नक्की झाले पण त्याच नावाची माहिती घेताना त्यांना बोधिसत्व नाव मिळाले आणि तेच त्यांची ओळख बनून राहिले.
त्याच दिवसांत बोधिसत्व यांनी अमर उजालासाठी सुध्दा काम केले. त्या दिवसांबाबत ते सांगतात की, तो संघर्षाचा काळ होता. फेलोशिपच्या पैश्यात भागत नसे. त्यासाठी अशी नोकरी हवी होती, जिथून तीन हजार रुपये मिळावे. अमर उजाला मध्ये ते मिळाले. आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापिठात त्यांनी काम केले. तीन वर्षांपर्यत अभ्यासक्रम समितीचे सदस्य आणि संग्रहालयाचे निदेशक राहिले आणि एक दिवस अचानक त्यांना मुंबईत फिल्म आणि टेलिव्हिजनच्या दुनियेत बोलावणे आले. झी टिव्हीवर गौतमबुध्द यांच्यावर एक शो करण्यासाठी चार महिने सुटी घेऊन ते मुंबईत गेले आणि तिथलेच होऊन गेले. या दिवसांत लेखकांच्या मूळ हस्तलिखितांना मिळवण्याचंही काम त्यांनी केले. ते सांगतात की, माझ्या जीवनात बेरोजगारीच मित्रासारखी होती. कधी दोन लाख रुपये कंपनीने दिले तरी काम काहीच नसे. योगायोग असा की त्यावेळी साहित्य अकादमीने काव्य वाचनासाठी बोलावले होते. परवा कार्यक्रम होता आणि आज निरोप मिळाला जाणार कसे? भाऊ म्हणाला विमानाने जायला मिळणार होते ३६०० रुपये. येण्याजाण्यात २४० ०जाणार होते. शेवटी गेलो. विमानात बाजुलाच संजयखान बसले होते. त्याच दिवसांत त्यांचा शो सुरू होता. मी काहीच न बघता त्यांच्यावर बसरलो. . . . . तुमच्या शो मध्ये इतके खोटे कसे चालते. . . . आपण १८४९मध्ये कानपूरमध्ये विमाने उडवता आहात बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे चालली होती आणि उत्तर भारतात तर १८८३मध्ये आली होती. . . ते ऐकत राहिले आणि आपले कार्ड देऊन मुंबईत भेटण्यास सांगितले. अश्या प्रकारे बोधिसत्व यांना वळणा वळणावर अनेकजण भेटले. सिनेमा आणि टेलिव्हिजनसाठी लिहिताना त्यांना अभ्यास करावा लागला. गंगा जमुना, शोले, देवदास, दो बिघा जमीन, सारख्या सिनेमा बघून त्यांच्या पटकथा लिहून काढल्या. आपल्या या जीवनाबद्दल ते सांगतात , “ मी स्वत:ला यशस्वी मानत नाही. पण अपयशी देखील मानत नाही. यशाबद्दलचे समज वेगवेगळे आहेत. आता दोन सिनेमांच्या पटकथा लिहिल्या आहेत. निर्माता, दिग्दर्शक यांची वाट पाहतोय. पैसा मिळवणे जर यश असेल तर मी यश मिळवतो आहे. मी काही गमावले नाही.”
टेलिव्हिजन आणि सिनेमासाठी लेखन यात खूप अंतर असल्याचे ते मानतात. त्यांचे म्हणणे आहे की टेलिव्हिजन बडबड केल्यासारखे आहे, ज्याला अंत नाही. कोणताही विषय कितीही ताणता येतो. पण सिनेमा त्या कवितेप्रमाणे मर्यादित असतो. टीव्हीच्या प्रत्येक नव्या भागात मालिकेची कथा बदलत जाते पण सिनेमात असे करता येत नाही. त्यामुळेच सिनेमात लिहिणे आव्हानाचे आहे. तिथे पन्नास साठ पानांमध्ये सांगायच्या गोष्टी १५-२० सेकंदात सांगाव्या लागतात. खरेतर सिनेमा साहित्याला श्रीमंत करतो. तो त्याला बाधक नसतो. काही चांगले करण्यास चुचकारतो. आपल्या याच विचारांमुळे ते साहित्य, टेलिव्हिजन आणि सिनेमात टिकून राहिले. या क्षेत्रात लेखकांसाठी आजही यशानंतर केंव्हा अपयश येईल, कितीवेळ यशाची वाट पहावी लागेल सांगता येत नाही. बोधिसत्व या आव्हांनाचा उल्लेख करताना सांगतात की, “ माझ्यासाठी अडचण आली ती मुख्यत: आर्थिक रुपात होती. पण मित्रांच्या मदतीने सुटत गेली. तसे मला कुणाची मदत मागणे कठीण काम वाटते आणि उधार मागणा-याला नाही म्हणणे तसेच कठीण काम वाटते. मला सर्व स्थितीत जगण्याची सवय आहे. जरी कपडे आणि पुस्तके माझा छंद राहिले आहेत. पण लहानपणी मी भावंडांचे कपडे घातले आहेत, पदवी मिळवे पर्यंत माझ्याजवळ एक दोनच नवे कपडे असत. भावांचे कपडे सैल होत कमरेला घट्ट करून वापरत असे. जेंव्हा संजयखान यांच्याकडे तीन वर्षे काम केल्यावर अचानक माहिती झाले की, त्यांचे काम बंद होते आहे तेंव्हा मी खोलीत बसून रात्रभर रडलो होतो. पण पुन्हा जीवन सुरू झाले आणि खूप लोकांसोबत फिरत राहिलो. मग काम मिळत राहिले. डॉ बोधिसत्व मानतात की, कोणताच काळ असा नसतो की तुम्ही हार मानून शांत बसावे कारण नाऊमेद होण्यात मोठा धोका असतो. वाईट काळातच माणसाची खरी परिक्षा होते. चांगल्या काळात काहीच परिक्षा होत नाही. त्यामुळे वाईट काळात निराश होण्यापेक्षा त्यातून शिकले पाहिजे.